संस्कार स्वप्न

सातपुडा पर्वतातील एका दुर्गम वस्ती, तिच्या जवळून जाणारा एक रस्ता व घाटाखालून वर येणाऱ्या पहिल्या एसटीची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे असलेलो आम्ही दोघ. मी व पप्पा. पावसाळ्याचे दिवस, या भागात सतत पडणारा पाउस आज सकाळ पासून बंद होता. पण मला मनातून वाटत होते कदाचित घाटातील पावसात गाडी अडकली तर;  कारण  अकरा वाजता येणारी गाडी अजून आली नव्हती, आज तसा रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस त्यामुळे पपांनाही जास्त काम नव्हत. मग थोड्या वेळाने माझे एकदोन मित्र तिकडे खेळत खेळत आले. मग आम्ही रस्त्याला कान लाऊन गाडीचा आवाज येतो का ते बघू लागलो. कसलाच  आवाज येत नव्हता मग आम्ही परत  खेळण्यात गुंतलो...
अन एकदम समोरच्या वळणावर लाल-पिवळी एसटी गच्च भरल्यामुळे एखाद्या पोटुशी बाईसारखी हळुवार येतांना दिसली अन मला प्रचंड आनंद झाला मग आम्ही सर्व आतुरतेने एस.टी जवळ येण्याची वाट पाहू लागलो. करकरत एसटी थांबली अन ड्रायव्हर ने नेहमी प्रमाणे दोन तीन पेपरांची भेंडोळी आमच्याकडे फेकली. मला कोण आनंद झाला होता कारण रविवारी येणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये खास मुलांसाठी येणार्या पुरवण्या राहायच्या व मी त्यांची आतुरतेने वाट पाहायचो. पप्पांनी मला हि वाचायची सवय कशी लावली कुणास ठाऊक पण अगदी तिसरीत असतांना अशा प्रकारे येणाऱ्या वृत्पात्राची वाचण्यासाठी वाट पहायची सवय मला लागली.ते आले कि लगेचच मला कळणाऱ्या सर्व मजकुरांचा मी फडशा पाडत असे. 
आमच गाव धुळे तालुक्यातील तरवाडे पण पप्पा शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षक होते. त्यांच्या सतत बदल्या होत त्या पण खूप लांब लांब म्हणजे आताचा मी विचार केला तर एखाद्या चतुर्थ श्रेणी तील माणसच्या इतक्या लांब लांब प्रशासकीय बदल्या होण  व जणू पर्यायच नसल्यागत त्या त्या ठिकाणी वडिलांनी हजर होणे हे आजच्या काळात दुर्मिळच. साधा तालुका बदलला तरी तो शिक्षकांना अडचणीचा ठरतो तिथ मी चौथीला जाईपर्यंत पप्पा पुणे(आंबेगाव तालुका), जव्हार (ठाणे), धडगाव (नंदुरबार) या तालुक्यातील अतिदुर्गम भागांच्या शाळेंवर बदली होऊन होऊन आले होते.
वरील प्रसंग हा धडगाव मधील मी चौथीत असतांनाचा आहे.पप्पांचे एक ठरलेले असायचे व ते नेहमी कोणालाही सांगायचे कि आयुष्यात कदाचित मला इस्टेट प्रॉपर्टी पैसा कमावता येणार नाही पण माझ्या मुलांना मी घडवेल त्यांना मोठ बनवेल साहेब बनवेल कलेक्टर करेल. मी परीक्षा पास होऊन क्लास वन ऑफिसर झालो पण तो क्षण बघायला ते नव्हते.
पण त्यांनी माझ्या मनात इतकी संस्काराची झाडे रोपण करून  ठेवलीत कि आज त्या झाडांच्या सावलीत त्यांची सावली मी शोधत राहतो. संस्कार हे बळजबरी करून देण्याची व घेण्याची गोष्ट नव्हे ते आपोआप येतात व दिले जातात. त्यासाठी गडगंज श्रीमंती कामास येत नाही न कोणता वशिला कामास येत नाही. गुनसुत्रांनी आपोआप ज्याप्रमाने पिढी दर पिढी जैविक घटकांचे संक्रमण होत असते त्याप्रमाणे घरातील आपल्या वागण्या बोलण्यातून आई वडिलांकडून हा संस्कार नावाचा घटक संक्रमित होत असतो. मग आपल भोवताल व वातावरण कसही असो. आहे त्या परिस्थितीत शक्य होईल ते करण तर आपल्या हातात असते कदाचित हेच सूत्र माझ्या पप्पानी आम्हाला वाढवतांना लक्षात ठेवले असावे अस आता मला वाटत.
बऱ्याचदा ज्या ज्या आदिवाशी  आश्रम शाळांवर आमच्या बदल्या व्हायच्या तेथील  आमच्या घराच्या भिंती कुडाच्या राहायच्या व वर कौल असायची.  त्या शेणाने सारवलेल्या कुडाच्या भिंतींवर पप्पा खास कागदाचे चार्ट करून ते काट्यांनी किंवा खळ करून चिटकवून द्यायचे व ते सर्व पाठ करायला  सांगायचे अशा पद्धतींने पाठ केलेलं सर्व मला अगदी चौथी पासूनच्या परीक्षांपासून उपयोगात आले.त्या चार्टस वर सर्व राहायचे म्हणी,वाक्प्रचार,समानार्थी शब्द, श्लोक, पसायदान अस सर्व. हि पाठांतराची सवय  आम्हाला पुढे खूप कामी आली.
आम्ही व पप्पा ज्या शाळेत होतो तेथील मुल शाळेचा वेळ सोडला तर बहुतांश त्यांच्या आदिवासी भाषेत बोलायची व ज्या पाड्यावर किंवा वस्तीवर शाळा असायची म्हणजे आमचे घर जिथे असायचे त्या आजूबाजूची लोकही आदिवासी च बोलायची त्यामुळे लहानपणी मला कोकणी,वारली, पावरी, भिलाऊ व मराठी अशा भाषा मला यायच्या पण आमची गावाकडील मातृभाषा आहिरणी मला यायची नाही कारण अगदी पाचवी संपेपर्यंत मी आमच्या गावात आलोच नव्हतो.
त्यामुळे पुढे मला अगदी कुठल्याही भाषिक प्रांतात जाण्याची वेळ आली तेव्हा मला आनंदच वाटायचा कारण वडिलांसोबत फिरल्यामुळे व अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यामुळे बहुभाषिक संस्कार माज्यावर झाले होते. त्यामुळे पुढे थोड कळत झाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग यायचा तेव्हा फक्त आपल्याच प्रदेशापुरत बोलणारे आपल्या भागाची व भाषेची गरजेपेक्षा जास्त प्रौढी मिरवनाऱ्या लोकांचा मला खेद वाटायचा कारण वेगवेगळ्या ठिकाणची सर्व लोक सारखीच असतात व थोडा बहुत कमीजास्त पण सर्वांमध्ये असतो अस नकळत माझ्या मनावर बिंबवल गेल्याने कदाचीत   वसुधैव कुटुंबकम या विचारांशी माझी जास्त जवळीक होती.
दुसर खूप महत्वाच काम पप्पानी आमच्यासाठी केल ते  म्हणजे ज्या शाळेवर त्यांची बदली व्हायची  तेथील ग्रंथालय वाचनालय जे काही असेल त्याचा चार्ज ते स्वतःकडे घ्यायचे याचे कारण  म्हणजे एक तर त्यांना स्वतःला त्यात आवड होती व त्यानिमित्ताने शाळेतील सर्व मुलांसोबत आम्हालापण त्याचा फायदा करून द्यायचा त्यामुळे बर्याचदा अस व्हायचं कि आम्ही जिथे जायचो तेथील पुस्तकांची कपाटे व पुस्तकांवरची  धूळ साफ करण्याचा मान आम्हीच घ्यायचो कारण तोपर्यंत त्यांना कोणी हाथ लावलेला नसायचा. बरेच लेखक हे असे दर्याखोर्यातील  आश्रम शाळेत मला सापडले ते वडिलांमुळेच. लहान मुलांसाठी असलेले त्या त्या शाळेतील सर्व पुस्तक आम्ही अक्षरश आधाशासारखी फस्त करायचो. पार इसापनीती, किशोरकथामाला, विक्रम वेताळ, साने गुरुजी, किशोर अंक, साहसांच्या जगात,  व अशी अनेक ज्यांची नावे आता आठवतही नाही अशी पुस्तके लहानपणीच वाचून काढलीत. 
चि.वि जोशी, द.मा. मिरासदार मला या ग्रंथालयातच मिळाले. मी भाऊ बहिणी आई वडील या सर्वांनी या पुस्तकांचा आनंद घेतला. दोघांच्या कथांची नावे व कथा आजही  आमच्या घरात सर्वांना आठवतात. नारायण धारप यांच्या थरारक कथांचा आस्वाद असाच अंगावर येणाऱ्या काट्यानसोबत एकट्यानेच घेतलेला आठवतो. मराठी विश्वकोश चे बरेच खंड काढून त्यांचे अभ्यासपूर्वक वाचन कसे करावे हे पाप्पानीच शिकवलं. एका ठिकाणी तर खूप मजा वाटली मला जेव्हा किश्रीम मासिकाचे १९८५-८६ पासूनचे अंक मला वाचायला मिळाले त्यात अनेक सुप्रसिद्ध लेखकांचे लिखाण मला वाचायला मिळाले त्याने मी इतका भारावून गेलो होतो कि या किस्रीम असण्याच्या काळात मी का नव्हतो अस  सारख  मला वाटत राहायच. या किस्रीम चे अनेक अंक जसेच्या तसे न वाचता गठ्ठ्यांमध्ये बांधून पडले होते त्यामुळे जुनाटपानाची पडलेली पिवळी पाने व राहून गेलेला नवा वास अस वासांचे combination यायचे व सोबतच कमी जाहिराती व  खूपच दर्जेदार मजकूर, कथा, कादंबरीचा अशंत भाग अस खूप काही त्यात असायचं...सानिया नावाची लेखिका, विद्याधर पुंडलिक नावाचे कथाकार, व श्री ना पेंडसे सारखे कादंबरीकार मला या कीस्रीम मुळे कळले ..या सार्यान्मागे माझे पप्पाच होते. 
जुने पेपर, जुनी मासिके, जुने दिवाळी अंक कमी पैशात घरी आणून वाचायची सवय पप्पांना असल्यामुळे पार ऐंशीच्या दशकातील लोकप्रभा नंतर चित्रलेखा श्री अशी अनेक मासिके अंक वाचून काढलीत शाळा संपल्यावर सुट्टीत अस काही वाचायला मिळाले कि खूप मजा वाटायची. काहीच वाचायला नसल कि कालनिर्णयची जुनी दिनदर्शिकाही आम्ही वाचत असू. कोणी कालनिर्णय कशासाठी घेत असतील पण
त्यामागचा मजकूर खूप छान असतो म्हणून तो वाचण्यासाठी बाबा कालनिर्णय विकत
घेत व अनेक वर्ष पुढे तसेच सांभाळून ठेवत.
वाचन हे जस त्यांनी पोहचवल ते अधिकृत पणे तस न कळता अनेक चांगल्या बाबी वडिलांकडूनच माझ्यापर्यंत आल्या ज्या त्यांनी स्वतःहून सांगितल्या  नाहीत पण त्यांच्या आवडी पोहोचल्या जस चांगले चित्रपट बघन , गाणी ऐकन इत्यादी. जेव्हा टीव्ही आमच्या घरी व गावातही नव्हता तेव्हा रामायण व महाभारत बघता याव म्हणून जेव्हा जमेल तेव्हा शेजारच्या गावी त्यांच्या मित्रांकडे ते आम्हाला नेत. जेव्हा टीव्ही घरी आला व चांगला चित्रपट किंवा जुनी गाणी लागली कि ते खूप खुश होत व त्याबाबतीत त्यांना माहिती असलेले व त्यांच्याशी निगडीत त्यांच्या स्वतःच्या आठवणी ते आम्हाला सांगत आजही एखाद्या जुन्या हिरोईन हिरो दिग्दर्शक चित्रपट यांच्या बाबत मी वाचतो तेव्हा त्यातील काही मजकूर पप्पानी सांगितलेला जसच्या तसा त्यात असतो, त्यामुळे दर्जेदार चित्रपट व  गाणी  ऐकण हा माझा छंद न बनता तर नवलच. 
कुठलीही गोष्ट करायची ती मनापासून करायची. त्यात आपल सर्व ओतायचे हा पप्पांचा स्वभावगुण माझ्यापर्यंत पण पोहचला. त्यामुळे जेव्हा मी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उतरलो तेव्हा झोकून देऊन अभ्यास करन  हे आपसूकच आल त्यासाठी मला वेगळे प्रयत्न करावे लागले  नाही. मी लहानपणापासून पाहायचो ते जे काही करायचे ते एखाद्या निरागस बालाकाप्रमाने त्यात खूप समरस होऊन करायचे. कोण काय म्हणेल याची लाज त्यांनी कधी बाळगली नाही व न आम्हाला बाळगू दिली. मनात जे आल ते प्रामाणिक पणे करायचे. मग एखादी झाडाचे रोप शोधन त्याला व्यवस्थित जागा पाहून ते लावण, एखादी आवडता चित्रपट खूप मन लाऊन पाहता पाहता त्याची माहिती आम्हाला सांगण, शाळेचे अधीक्षकपद हातात आल्यावर मुलांच्या जेवण वसतिगृह अंघोळी त्यांचा अभ्यास यासाठी स्वतःला वाहून देणे, आमचा अभ्यास घेताना खूपच लक्ष देणे, गप्पा मारतांना खळखळून मोकळ हसन, एखाद्याला मदत करतांना मागचा-पुढचा कसलाही विचार न करन, आश्रमशाळेतील बरीच मुले त्यांच्याशी अगदी मित्रांप्रमाने माहिती शेअर करत , मदत मागत ते जीत्थे जात तेथील ते आवडते शिक्षक बनत त्यामुळे वडिलांची बदली झाली कि दोन-दोन तीन तीन दिवस संपूर्ण शाळाच रडत असे , इकडे घरी आम्हीपण रडत असू असा हा सामुहिक रडरडीचा कार्यक्रम पार पडल्यावर पुन्हा सामानाची गाडी भरून नवीन शाळेवर आलो कि तेथील हि विध्यार्थी स्वागतासाठी तयार असत.
आमचे बाबा आमच्या तरवाडे गावातील पहिले इंग्रजीचे  पदवीधर झाले होते पण नोकरीसाठी वणवण इकडे तिकडे भटकतांना  जे मिळेल ते काम करत, रस्त्याचे काम सुरु असताना त्यावर मजुरी केली  , रोजगार हमी च्या  चालणाऱ्या कामांमध्ये शिकलेला मनुष्य म्हणून कामासोबत हजेरी भरण्याचे काम केले, एक वेळ अशी आली कि त्यांनी चक्क कर्ज काढले म्हशी घेऊन दुधाचा धंदा सुरु केला, आजही गावातील जुनी जाणती म्हातारी कोतारी माणस भेटली कि माझ्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवत ते म्हणतात, 
“बेटा तू गन मोठा साहेब झाया असशी पण तुना बापनी डोकावर शेन न टोपल उचलतांना कवय कसानी लाज ठी नई, तू बी गरीब दुबयाले मदत करतांना लाज ठेवजो नको, कारण तो तुना बापनी खस्ता खायात म्हणून तुले आज या दिन उनात.”
त्याचं तंतोतंत खर असत व  माझ्या डोळ्यात पाणी तरळून जात. मग माझ्या डोळ्यापुढे मी लहान असतानाचे बाबा दिसू लागतात. जे सतत आम्हा सर्व भावंडांच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन असत. त्यांना फक्त शिक्षण घेण्यातच अर्थ नव्हता  तर खूप मोठ झालेले त्यांना आम्हाला पाह्यचे होते. तेव्हापासूनच सर्व परीक्षांची तयारी ते आमच्याकडून करून घेत. अन वेगवेगळ्या परीक्षांची माहितीही ते कुठून जमवत कुणास ठावूक कारण आजसारख त्याकाळी नेट नव्हते न इतर संपर्काची साधने तरी अगदी चौथी स्कॉलरशिप पासून सर्व परीक्षा देण्यासोबतच त्यांची पुस्तके गाईड आणून देणे स्वतः माझा अभ्यास घेणे हे काम ते खूप आवडीने करत. मला आठवत त्यावेळी आम्ही सातपुड्यातील धडगाव जवळील एका शाळेवर असतांना सातारा सैनिक स्कूल ची परीक्षा देण्यासाठी चक्क तिथून नाशिकला आलो होतो. हे अंतर तेव्हा सर्वच दृष्टीने खूप मोठ होत. एसटी बसेस खूप कमी  असायच्या, कुणाकडे तरी  मुक्कामी आम्ही आलो होतो, शिवाय आर्थिक दृष्ट्या या सर्व गोष्टी आम्हाला परवडायच्या नाहीत, याच प्रवासासाठी तिकिटाला लागणारे पैसे नव्हते तर बाबांनी मलाच  त्यांच्या एका सहकारी शिक्षक मित्राकडे पाठवले व त्यांना सांगायला लावले कि, “माझी परीक्षा नाशिकला आहे तर बस साठीचे पैसे  माझ्या बाबांनी मागीतलेत.” त्या सरांनी लगेच बहुदा शंभर रुपये पटकन काढून दिले.  कदाचित बाबांनी त्यांना आधीच सांगितले होते.मग मला का पाठवले परत म्हणून बाबाचा थोडा राग पण आला व वाईट पण वाटत होते कारण एकतर पैसे मागायला जातांना मला खूप अवघडल्यासारख होत होत. आपण खूप गरीब आहोत व आपल्याकडे साधे तिकिटाचे पैसे नाहीत असा विचार करून करून सारखं रडायला येत होत.पणकदाचित याची लाज वाटू नये व आपली परिस्थिती नेमकी कशी आहे तेही कळाव असा कदाचित मला पाठवण्यामागे बाबंचा उद्देश असावा असा मी दोन तीन वर्षांनी पुढे नवोदयला गेलो तेव्हा अर्थ काढला. पण ती घटना कायमस्वरूपी माझ्या मनावर कोरली गेली. इतकी कि जेव्हा बाबा नव्हते तेव्हा माझ्या स्वतःच्या शिक्षक असल्याच्या पगारातून खर्च करून मी दिल्लीला युपीएससी ची मुलाखत द्यायला गेलो तेव्हा खर्च करतांना अनेकदा बाबांसोबत मला ते शंभर रुपये पण आठवत व मी कमी खर्च करत असे. बाबांनी घेतलेल्या तयारी मुळे तर नवोदयची परीक्षा पास झालो व पुढील काही वर्ष बाबांच्या मनासारखं वातावरण मला मिळालं ज्यामुळे माझ आयुष्य समृद्ध झाल.
आर्थिक परिस्थिती जवळपास ते रिटायर होईपर्यंत अगदी बेताचीच राहिली कारण एकतर त्यांना वयाच्या खूप उशिरा नोकरी लागली त्यातही नोकरी गावापासून लांब.सततच्या बदल्या, घरून कसलाही आधार नाही, त्यात आम्ही चार भावंड –आम्ही दोन भाऊ व दोन बहिणी, मी घरात सर्वात लहान व मोठा भाऊ विकास मध्ये दोन्ही बहिणी, ताई व माई . तरी भाऊ एमएस्सी पर्यंत व दोन्ही बहिणी पदवीधर होईपर्यंत शिकले. पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास  करणाऱ्या मोठ्या भावाला एकूणच परिस्थितीमुळे माघार घेत पटकन नोकरीसाठी प्रयत्न करावे लागले कदाचित अजून थोडीसी जरी परिस्थिती बरी असती तरी भाऊ पण नक्कीच मोठा अधिकारी झाला असता कारण तो जात्याच हुशार होता. त्यातच  बहिणींचे लग्न व इतर सर्व खर्च यांची हातमिळवणी करता करता कधी वडिलांची रिटायरमेंट जवळ आली हे त्यांनाही कळल  नाही. बऱ्याचदा अनेक कारणांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेण्यची पण वेळ आली. एक दोनदा तर मीच गेलेलो पैसे आणायला. या पैशांच्या कारणांवरून वा सततच्या बदल्यांच्या कारणांवरून आईचे व बाबांचे भांडण व्हयाचे पण  बाबा कायम , ‘हे सर्व मी माझ्या मुलांसाठी करत आहे ते नक्कीच मोठे होऊन काही करून दाखवतील’  अस म्हणत राहत.आईला ते पटत असे पण संसार रेटतांना होणारा त्रास ती सांगेल तरी कोणाला व कसा. पण शेवटी बाबांचे म्हणणे तिला पटे कि, ‘आपली संपत्ती आपली मुले आहेत’. त्यामुळे आई पण आमच्या मागे खंभीरपणे उभे राहत असे.
मला अनेकदा वाटत लहान मुलांवर संस्कार करतांना कृत्रिम शब्दांपेक्षा आपण रुटीन लाईफ मध्ये काय बोलतो, कस बोलतो, कोणते शब्द कसे वापरतो, आपला बोलायचं टोन कसा असतो, तो कसा वेगवेगळ्या परिस्थितीत बदलतो, आपण वेगवेगळ्या घटनांवर कसे react करतो हे खूप महत्वाच आहे मुल यातूनच जास्त शिकत असतात किमान मी तरी अशा अनेक घटनांतून आपोआप शिकत गेलो. अगदी उदाहरनच द्यायचे तर मी बाबांकडून कधीही नशीब हा शब्द ऐकला नाही ओघाने ते बोलून हि गेले असतील पण ज्या वेळी स्वतःच्या चुका किंवा परिस्थितीचे खापर फोडायची वेळ येते तशा वेळी नक्कीच त्यांनी नशिबाला दोष दिलेला मला कधी आठवला नाही. अगदीच टोकाचे म्हणजे त्यांचा दैववादावर पण तितकासा विश्वास नसावा. कारण मला आठवत कदाचित मी दुसरीत असेल तेव्हा ऑफिसमध्ये अधीक्षक पदाची जबादारी दिल्यानंतर बाबांनी शाळेला जी शिस्त लावली त्यातून दुखावलेल्या काही जणांनी बाबांची खोटी तक्रार केली त्यानंतर बऱ्याच काही घडामोडी झाल्या असाव्यात पण एक दिवस माझी सकाळची शाळा सुटल्यानंतर मी दुपारी घरी असतांना बाबा एकदम काही आवेशात घरी आले व त्या आमच्या कुडाच्या भिंतींवर जे जे काही देवी देवतांची पोस्टर फोटो लावले होते ते सर्व टराटर फाडले तस्वीरी खाली आपटून फोडल्या, ती सर्व कागद जाळली, थोडा वेळ तसेच विमनस्क पणे बसले  व परत ऑफिसला गेले. दुसर म्हणजे खूप नाराज असण, दुखी – कष्टी होण कुठल्याही परीस्थित मी  त्यांना पाहिलं नाही. या सर्व बाबींचा परिणाम नकळत माझ्यावर होत गेला असावा. कारण स्पर्धा परीक्षा देतांना अनेकदा मला ऐन शेवटच्या टप्प्यावर अपयश यायचे पण ना मी कधी अपयशाने कोलमडून गेलो न कधी स्वतःच्या नशिबाला शिव्या घातल्या. मी परत लढायची तयारी ठेवली जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण असा विजय संपादन करन हीच तर बाबांची खरी इच्छा होती.
माझी मुल मोठे साहेब बनतील त्यांना मी कलेक्टर बनवेल मोठ्या गाडीत मागे बसून फिरेन, साहेबाचा बाप म्हणून माझा असा रुबाब राहील  अन असे खूप काही स्वप्न जे ते सतत बोलून दाखवत, लोकांना सांगत, काही वाईट घटना घडली, वाईट दिवस आले कि त्यांचा एकमेव आशावाद असायचा माझी मुल हि सर्व परिस्थिती बदलवतील.   चक्क त्यांचा पाया पडायला गेल तरी आशीर्वाद हि तोच देत कि लवकर मोठा साहेब हो. हि अशी अनेक स्वप्न जी त्यांनी आमच्यासाठी पाहिली व त्यासाठी स्वतःचे आयुष्य अक्षरश वाहून दिले ते आमचे बाबा हि स्वप्नपूर्ती झाली तेव्हा ते बघायाला या जगात नव्हते. एम.पी.एस.सी. तून क्लास वन अधिकारी व्हायच्या पाच वर्ष आधीच एक अचानक आलेल्या ब्रेन हेमरेज च्या झटक्यात त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 
पण त्यांचे संस्कार स्वप्न व निरागसता ते कायमसाठी माझ्याजवळ सोडून गेले त्यामुळे आजही ते माझ्याजवळच आहेत अस सारख मला वाटत राहत.

- समाधान महाजन
(व्यासपीठ दिवाळी अंक 2017 )

नोंदी आठ

# लिटररी नोंदी # आठ

दिवे जळतात,पेटतात, लक्ख सूर्यप्रकाशाच्या उजेडाचे बटन बंद करून स्वतःचा मिनमिणता प्रकाश टेभ्यांगत मिरवत राहतात.व्यक्त होऊ देत नाहीत, व्यक्त करू देत नाहीत. ऐकून तर घेतच नाहीत, बोलू पण देत नाहीत. लॉजिकली बोललेल्या दोन चार वाक्यांना निगेटिव्हनेसच लेबल लावून एका कम्पार्टमेंटमध्ये बंद करून टाकण्याची भीती बाळगत लाखो उमेदवार उसनी आणलेली पॉजिटिव्हीटी न लपणाऱ्या केविलवाण्या नजरेने मिरवत राहतात. तेव्हा कीव येत राहते साऱ्याचीच व संताप पायाखाली चुरगळत राहतो सारखा.

अरे,आग आत पेटू दे आत, अंगार चेतवू दे तो पण आतच ....पहायचेच तर उघड्या डोळ्यांनी स्वप्न पहा....अन स्वतः च्या पायांनी चालत जाण्याची हिम्मत असेल तरच हा रस्ता पकड. सर्व ठिकाणी खिसा, भावना व अश्रू कामाला येत नाहीत. कधी कधी हलवून खात्री करून घेत जा, डोकं डोक्याच्याच जागी आहे का ते......
                    - समाधान महाजन

नोंदी सात

# लिटररी नोंदी, सात#
मुलाखत देऊन आम्ही पायीच इंडिया गेटकडे निघालो, संध्याकाळच्या किरणांमध्ये इंडिया गेटचा वरचा भाग चांगलाच सोनेरी रंगात न्हाऊन गेला होता,कसलतरी पथनाट्य सादर करणारे तरुण मुलं-मुली दिसत होते, एकूणच परिसरातील काही गर्दी त्यांच्याभोवती थोडी उभी होती, काही लक्षपूर्वक ऐकत होते तर काही उगाचच ऐकायचे म्हणून ऐकत होते, बाजूला उभे राहून काही जण मोबाईल वर बोलत होते काही कानात कॉर्ड लावून गाणं ऐकत चालत होते, सर्व जण धुंदीतच होते आपापल्या………..
आम्ही मोकळे झालो होतो, अतिमोकळे झालो होतो, धरणातील सार पाणी वाहून गेल्यानंतर खाचखळग्यांमधून नाईलाजाने डचमळत डचमळत जाणाऱ्या अंतिम पाण्याच्या प्रवाहसारखे आमची पावले अडखळत होती.सर्व शक्ती सम्पली होती.कोणीतरी काहीतरी भयानक पद्धतीने आमच्या शरीरातून मोठी ताकद व ऊर्जा काढून घेऊन आम्हाला रिकामं करून टाकलं होत, त्राण निघून गेला होता, जीव नव्हता,हाडामासाच एक शरीर उरलं होतं आमचं व फक्त श्वास घेता येत होता.
स्पर्धेच्या शेवटच्या स्थानाला स्पर्श करून तर आलो होतो पण अजून कोण जिंकेल हे काही दिवस गुलदसत्यातच राहणार होते,प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकाचवेळी सुटकेचा भाव व माहित नसलेल्या भविष्यतिल क्षणांची उत्कटता दिसून येत होती.
इतक्यात मागच्या बाजूने मोठमोठ्याने गलका ऐकू आला, आम्ही पण तिकडे वळालो, तीन चार सुरक्षा रक्षक एका जणाला इंडिया गेटच्या त्या आतील भागात जाण्यापासून रोखत होते.तो त्यांच्या विनवण्या करत होता मध्येच मोठ्याने बोलत होता, काळी पॅण्ट, पांढरा शर्ट, याला तर बहुतेक आताच धोलपुरा हाऊस मध्ये मी पहिल्यासारख वाटत होतं.
रंजन ओरडला , “अरे, हा कपिल…..”
आम्ही गर्दीतून वाट काढत त्याच्याकडे जाऊ लागलो इतक्यात सूरक्षा रक्षकांच कड तोडून तो मध्ये घुसला, कदाचित त्यांनी त्याला परवानगी दिली असावी,तो ऐन मध्यात जाऊन लडखडत खाली बसला जोरजोराने रडायला लागला , त्याचा आवाज संध्याकाळच्या आसमंतात अधिकच भेसूर वाटू लागला …
रंजन त्याला चांगला ओळखत होता, तो म्हटला हा कपिलचा शेवटचा attempt यानंतर तो एजबार होतोय, सात आठ वर्षातील हा त्याचा तिसरा interview, घरातून अक्षरशः पळून आलाय, स्वतः च काम करतो, कमवतो, व अभ्यास करतो, या वेळी भयानक टेन्शन मध्ये आहे, इंजिनीअरिंग झालंय, गेल्या वर्षी एक दोन कंपनीत ट्राय केला पण upsc चा कीडा त्याला स्वस्थ बसू देत नाही, आता परवा भेटला सदनात तेव्हा म्हटला कि, मी माझ्या फिल्डचंही काम आता विसरून गेलोय , घरचे मला विसरून गेलेय, आतापर्यंत कुठेच कसलं सिलेक्शन झालं नाही, यावेळी नाही झालं तर आयुष्यच संपल.
आम्ही त्याला मोकळं होऊ द्यायचं ठरवलं, आता तो धुमसत होता, विझत चाललेल्या निखाऱ्यासारखा.
हि आग येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या धोलपुरा हाऊसच्या त्या थंडगार एसी रूम पर्यंत जाईल का?
त्याच्या विचाराच्या विचारांनी आसमंत दाटून आलं होत, अंधार पसरू न देण्याचा आटोकाट प्रयत्न सर्वत्र पेटलेल्या नियॉन एल इ डि दिव्यांनी चालवलेला होता, ……
– समाधान महाजन

नोंदी सहा

# लिटररी नोंदी#  सहा
रात्रीची वेळ,बाहेर बऱ्यापैकी थंडी,मधूनच कुत्र्यांचा व बाजूच्या मोठ्या झुडपांमधील रातकिड्यांचा आवाज.......आत एक चादर पांघरून वाचत बसलेलो मी, बाजूच्या रूम मधून येणारा फॅन चा घरर्र आवाज, ट्यूब लाइटचा थिजलेला प्रकाश वही पुस्तकांवर सांडलेला. अख्या जगात उजेड इतकाच. जग इतकंच जे माझ्या चष्म्यातून दिसतंय आणि काळ हा असाच या ठिकाणी अनेक दिवसांपासून घट्ट चिकटून असल्यागत...........
आता तरी हा अंधार संपव ना रे
अन उठू दे एकदा मला उजेडाच्या भल्या पहाटे.
                                        समाधान महाजन.

कविवर्य खलील मोमीन

काही माणसं कायमच मनात अढळ स्थान निर्माण करून जातात. ते जितक त्यांच्या कवितांमुळे होत तितकच त्यांच्यातील माणूसपणा मुळे होते. कवितेत व कवितेबाहेरही एकसारखच असणाऱ्या “निरामय” कवी खलील मोमीन यांचा ३१ ऑक्टोबरला वाढदिवस असतो. त्यांना उदंड व निरोगी आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा (उशीर झालाय …होऊ दे पण भावना महत्वाच्या).
माझ्या “अस्वस्थ क्षणांचे पाश “ या कवितासंग्रहाच्या नावाच फक्त बारसच सरांनी केल नाही तर अत्यंत कठोरपणे okams रेझर वापरून चांगल्या कवितांची निवड पण सरांनी केली.
कविता निवडतांना कवी किरण भावसार यांच्या निवासस्थानी अख्खा दिवसभर मोमीन सरांकडून एक से एक दर्जेदार कवीता ऐकतांना आम्ही भरून पावलो....... फक्त स्वतःच्याच नाही तर महाराष्ट्रातील अनेक कवींच्या कविता त्याच्या अर्थासहित ऐकतांना अस वाटत होत कि मी पहिल्यांदाच कविता ऐकत आहे. तो आवाज, चढ-उतार, भावना, अर्थ , विश्लेषण सार ऐकतांना जाणवत होत कविता मोमीन सरांच्या कणाकणात वसलेली आहे. कवितेवर निखळ प्रेम करणारा हा माणूस तितकच निखळ प्रेम माणसावर पण करत आला आहे.
मराठीच व उर्दूच पण अक्षर इतक सुंदर मी अजून पाहिलं नाही. त्याचं अक्षर आपल्या संग्रही असावं यासाठी काही वर्षांपूर्वी त्यांचे पत्र आपल्याला याव यासाठी कवी धडपडत असत. या वयोमानात त्यांना नवीन असलेल फेसबुक सारख
माध्यम हि ते हाताळतात हे कौतुकास्पद आहेच पण त्यामुळे त्यांची नवीन कविता आमच्या पर्यंत पोहचते हेही नसे थोडके. सुंदर गझल, कविता लिहिणारा …. विना कुंपनाच्या घरात राहणारा व मनमाड सारख्या सतत धडधडत
असणाऱ्या स्टेशनच्या गावी राहणारया मोमीन सरांची लेखणी सदैव धगधगत
राहो हि शुभेच्छा.....

न्यूटन

न्युटन चा टीजर पाहिल्यापासून उत्सुकता होती चित्रपट पाहण्याची.कारण आतापर्यंत फारशा प्रकाशात न आलेल्या एका वेगळ्याच विषयावर बनवलेला हा चित्रपट वाटत होता अन तो तसा आहेही. “नक्षलग्रस्त भागातील एक मतदान केंद्रावर घेतली जाणारी मतदान प्रक्रिया” या एका थीमवर आधारित हा चित्रपट असला तरी त्या अनुषंगाने आदिवासी, नक्सलवादी, लष्कर व प्रशासन यांच्या अनेक बारीक सारीक बाजूंवर यात भाष्य केले आहे.बी एल ओ म्हणून स्थानिक आदिवासी मुलीची भूमिका करणाऱ्या अंजली पाटील तसेच नायक न्युटन(राजकुमार राव) व लष्करी अधिकारी आत्मा सिंह (पंकज त्रिपाठी) यांच्या संवादातून खुपदा बोचर व तितकच वास्तव मांडण्याचा दिग्दर्शकाने केला आहे. 
भारत काय देश आहे, प्रशासन कस चालत-हलत-पळत, लोकशाही खर्या अर्थाने कशी राबवली जाते या आणि अशा अनेक प्रश्नाची उत्तरे शोधायची असेल तर एकदा माणसाने या निवडणूक प्रक्रियेत आतून सहभागी झाल पाहिजे. मी स्वतः या प्रक्रियेतील विविध स्तरांवर अनेक वर्ष काम केल्याने मला न्युटन मधील प्रसंगाशी खूप लवकर रिलेट करता आले.
काही वर्षांपूर्वी मी जेव्हा मी पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडनुकीच्या निम्मिताने एक साधा पोलिंग ऑफिसर म्हणून लातूर जिल्ह्यात डूयटीवर असतांना त्या तीन चार दिवसांच्या प्रक्रियेत जे अनुभवत होतो ते अक्षरशः आवाक करणार होत.एक अत्यंत विशालकाय अवजड चक्र जे वेगवेगळ्या अनेक छोट्या चक्रांनी जोडलेले होते. ते सुरु करतांना सुरुवातीला खूप करकरत आवाज करत फिरता फिरत नाही त्याला स्वतःला आपला वेग आठवत नाही ताकद आठवत नाही.सुरु करतांना सर्वांची दमछाक होते धांदल उडते गडबड होते.मग हळूहळू स्पेअर पार्ट काम करू लागतात ओइलिन्ग ओरयलिंग सुरु होत.अवजड चक्र हळूहळू स्पीड पकडत व नंतर नंतर अत्यंत वेगाने ते मोठे चक्र सोबतच्या अनेक लहान-मोठ्या चक्रांसोबत जोरात फिरायला लागत. निवडणुकीची प्रक्रिया हि अशी असते हे तेव्हा मला कळाल होत यातला गमतीचा व सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे चक्र कोणी एकटा मनुष्य फिरवू शकत नाही यासाठी गरज लागते टीमवर्क ची. मतदान प्रक्रियेत शासकीय अशासकीय खाजगी अनेक अस्थापना सहभागी होत असतात वा करून घेतल्या जातात. महसूल, विकास, कर, एस टी, पोलीस, शिक्षण विभाग, होमगार्ड, लष्कर, नौदल, हवाई दल, निमलष्करी दले या व अशा अनेक विभागातील लोक यात एकत्र येत असतात.हे सर्व कुठल्यातरी एका पातळीवर एकमेकाच्या संपर्कात येतात तेव्हा रेल्वेने रूळ बदलतांना होणारा खडखडाट एकाच वेळी अनेक ठीकांनाहून ऐकू येतात व काही वेळातच ते एकमेकांशी जुळवून घेतात व पार पाडली जाते जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची सर्वात मोठी निवडणूक प्रक्रिया.
म्हणून मग न्युटन मधील मास्टर ट्रेनर जेव्हा म्हणतो कि, 
भलेही संसद में कूछ गुंडे चुनकर जाये
लेकीन चुनाव में गुंडागर्दी नही चलेगी.
तेव्हा ते वाक्य सरळ अपील होत.
या चित्रपटातील सर्व character विचारपूर्वक घेतलेले दिसतात. अगदी प्रसंगांची मांडणी व त्या साठी वापरली गेलेली स्थळ हि अत्यंत वास्तववादि वाटतात. अगदी पहिल्याच प्रसंगात निवडणूक प्रशिक्षणासाठी वापरलेला हॉल व मास्टर ट्रेनर म्हणून काम केलेला संजय मिश्रा जणू अनेकदा पाहिलेले वाटतात इतके चपखल त्या प्रसंगात फिट बसतात.संजय थोड्या वेळासाठीच आहे पण अप्रतिम आहे.
यातील मला आवडलेली सर्वात महत्वाची बाब म्हणजे कथेचा नायक एक प्रेसायडिंग ऑफिसर आहे तो कोणी कलेक्टर कमिशनर वा समाजसेवक नाही तर आयुष्यातील आपली पहिलीच निवडणुकीची डूयटी करणारा एक साध्या परीवारातला व्यक्ती आहे त्यामुळे मुळातच या लोकशाहीतील सर्वात मोठी प्रक्रिया पार पडण्याची जबाबदारी एक रूट लेव्हल च्या माणसाला देवून त्याच्या नजरेतून विचारातून ती आपल्याला पाहायला मिळते. 
एकूणच चित्रपट मस्तच आहे, निवडणुकीची कामे करणाऱ्या व केलेल्या लोकांनी हा अजून एक वेगळा अनुभव म्हणून आवर्जून पहावा असा आहे.
काही बाबी आवडत नाहीत, जसा शेवट एकदमच संपवला आहे त्याला काहीही अर्थ नाही पण आपण आर्ट फिल्म बनवलीय हे सांगण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी कि काय शेवट असाच मोडून टाकायची फ्याशन आलीय कि काय देव जाणे.उलट चित्रपटातील सर्व पात्र एका प्रसंगात एकत्र आनता येन सहज शक्य होत.त्याने काही चित्रपटाचा प्रभाव कमी पडला नसता.
दुसर म्हणजे लष्करी अधिकारी म्हणून पंकज त्रिपाठी ने खूपच संयमी भूमिका केलीय हे पात्र नको तितक समजदार व तितकच मुरब्बी पण दाखवलंय. कारण काही प्रसंगात प्रीसायडिंग ऑफिसर च म्हणन तो सहज टाळू शकत होता सुरक्षेच्या कारणावरून पण तस झाल नाही.
पण एकूणच निवडणूक प्रक्रियेचा backbone असलेले पोलिंग बूथ तेथील प्रीसायडिंग व पोलिंग ऑफिसर यांच्या भोवती फिरणाऱ्या कथेचा चित्रपट ऑस्कर साठी जातोय हे बॉलीवूड मधील १८० तून बदलणाऱ्या कोनाच प्रतिक आहे.
मुळात निवडणुका व निवडणूक प्रक्रिया हा खूपच आवाढ्व्य विषय आहे न्युटन मध्ये त्यातील एका विषयावर प्रकाश टाकण्यात आला आहे आजून खूप काही बाकी आहे ज्यावर आगामी काळात आणखी चित्रपट येतील अस वाटत.
- समाधान महाजन

कवी महेश लोंढे

कवी व अधिकारी मित्र महेश लोंढे (IRS) यांचा “निद्रानाशाची रोजनिशी” संग्रह नुकताच वाचून पूर्ण केला. बारलोणी बुक्स ने प्रकाशित केलेला व फेसबुक लाइव माध्यमाचा वापर करून प्रकाशन समारंभ करणारा हा संग्रह असा त्याच्या जन्मापासूनच आगळावेगळा व प्रस्थापित वाटा नाकारून स्वतःचा मार्ग शोधणारा आहे.म्हणून महेश कदाचित आपल्या एका कवितेते म्हणतो,
“कुठल्याच व्यासाने लिहू नये आपले महाभारत
म्हणून प्रत्येक त्रिज्येवर नेम धरून थांबलोय मी.”
आतलं व बाहेरच, चांगल व वाईट, अंधार व उजेड या परिघात वावरतांना मनात चाललेलं द्वद्व, संघर्ष, घुसमट व स्वतःचा स्वतःशी चाललेला संवाद, त्यातून स्वतःच स्वतःचे मार्ग शोधणारी हि कवितेतील भाषा वाटते.
“जोवर डोंगरांना कवटाळता येत नाही तोवर
माणसांनाच मिठी मारुया आपण
जोवर कळत नाही पक्ष्यांची,प्राण्यांची भाषा तोवर
स्वतःशीच बोलत राहिले पाहिजे.” किंवा
“ आपापल्या डोळ्यांच्या उजेडात प्रत्येकाला सापडत राहो आपापला रस्ता.” अशा ओळी महेश सहज लिहून जातो.
upsc च्या परीक्षेची तयारी करतांना, एका बाजूला अभ्यासाचा भला मोठा डोंगर एकाग्रतेने उपसत असतांनाच, एक सामान्य व्यक्ती म्हणून रोजीरोटीच्या व्यवहारातील चटकेही जवळपास रोजच सहन करावे लागतात. मी असो, महेश असो वा तयारी करणारा कुठलाही उमेदवार असो त्याला एकाच वेळी अनेक खिंडीवर लढाई द्यावी लागते. त्यातही असा उमेदवार पराकोटीचा संवेदनशील असेल तर त्याचा त्रास दुप्पट वाढतो. एकाच वेळी माणूस स्वतःला प्रशासनाच्या सर्वोच्च पदावर पाहत असतांना त्याच वेळी तो अक्षरशः शून्य असतो. अन मग जर त्याला लिहिता येत असले तर हा सर्व अव्यक्त अवकाश तो कागदावर उमटवत राहतो, कारण अभ्यासामुळे दोन जगातील फरक फार चटकन लक्षात येतो.
‘’ हे रोजचेच जागरण, हा दिवसांचा गोंधळ,हा न वाजणारा संबळ
ही निद्रानाशाची रोजनिशी,या अंतन रात्री, हे स्वतःशी वाद तुंबळ.’’
हा असा स्व संवाद सुरु असतांना कवी विरोधाभास फार चटकन मांडून जातो.
‘’सहा लिटर पाणी एकदम फ्लश करतांना
धडकीच भरते उरात
चाललेला मैल आठवतो, चिखलाचा बैल आठवतो.’’
एकूणच संग्रहातील सर्वच कविता दर्जेदार आहे, महेश ची स्वतःची काही निरीक्षणे आहेत काही मोजमाप आहे त्यामुळे कवितेत फाफटपसारा जाणवत नाही. निवडक मोजक्या शब्दात महेशची कविता खूप काही सांगून जाते. महेशला या काव्यसंग्रहाबद्दल खूप खूप शुभेच्छा.

कवी संजय चौधरी

बेरोजगार पावसाळ्याची एक दुपार,सर्व जन शेतात गेल्यामुळे गावातली गल्ली सुनसान झालेली. क्वचितच घरी असलेली एक दोन लहान मुल,त्यांच्यावर ओरडणाऱ्या त्यांच्या आज्या, दाराशी बांधलेल्या शेळ्यांचा येणारा आवाज, कधी येईल ते माहित नसलेली व केव्हा गेली ते आठवत नसलेली लाईट सोबत असण्याचा प्रश्नच नव्हता. दाटून आलेले आभाळ व त्याच्या तोडीस तोड मी मी म्हणणारा घरातील अंधार..घरातील खाट पार दारात नेऊन ठेवली तेव्हा थोड थोड वाचण्यापुरत दिसत होत. अर्थात घरी मी एकटाच त्यामुळे पोटाची व डोक्याची दोन्ही भुका तितक्याच कडकडून लागत, 
त्यातल्या त्यात त्या दिवशी पोटाची व्यवस्था झालेली असावी म्हणून मी अधाशासारखा वाचत सुटलो होतो.पावसाळ्याच्या त्या दिवसात अंगावर गोदडी पांघरून खाटेवर पडल्या पडल्या वाचण्यात जे सुख होत ते तेव्हा दुसर कशातही मिळायचं नाही,कॉलेज नुकतेच संपले होते...बोलण्यासारख आजूबाजूला कोणीच नव्हत,जे होते त्यांचे व माझे विषय सारखे नसल्याने फार वेळ बोलन शक्यच नसे. अक्खा दिवस अंगावर येऊन उभा राहायचा. मग मी तो वाचून वाचून संपवायचो..घरातील पुस्तक तरी किती पुरणार....
शेवट जुने पडलेले पेपर काढले, त्यातल्या त्यात साहित्यिक पुरवण्या बाजूला केल्या अन एकाएक एक तरुणाई सारखे काहीतरी नाव असलेली पुरवणी माझ्या हाती आली. परत मी गोदडी अंगावर घेतली अन पहिलीच ओळ वाचताच सरसरून अंगावर काटा उभा राहिला.....
“मित्र आपलाच एक अवयव असतो,
दुसऱ्या आईच्या पोटी जन्मलेला.”
अन त्या पूर्ण कवितेसह कितीतरी वेळ मी अक्षरशः थिजून पडलो होतो. परत परत मी ती कविता वाचत होतो अन माझे डोळे भरून येत होते, कदाचित त्या माझ्या अवकाशातील पोकळी त्या शब्दांनी भरून काढली असावी. पण हे लिहिणाऱ्या त्या कवीचे नाव कायमसाठी माझ्या मनावर कोरले गेले...तो कवी(नंतर झालेला मित्र) होता संजय चौधरी.
कालांतराने स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळात हे सर्व मागे पडले..मग मध्येच कधीतरी जिंतूरला असतांना अगदीच निरस व कवितेविना जीवन नको म्हणून मग कवितारतीचा अंक लावला, त्यानंतरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या अंकात मला कविवर्य इंद्रजीत भालेराव यांनी संजय चौधरीच्या “माझ इवल हस्ताक्षर” या काव्यसंग्राहवर लिहिलेली समीक्षा वाचायला मिळाली.(चू.भू.दे.घे.) कदाचित भालेराव सर तेव्हा जिंतूरलाच होते.त्यांच्याशी झालेल्या भेटीतच समजल होत कि अशा अशा अंकात सरांनी या संग्रहावर लेख लिहिलेला आहे. त्यामुळे घरी गेल्या गेल्या मी कवितारती शोधून ते समीक्षण वाचायला घेतल अन आजही मला आठवत मधले सर्व शब्द सोडून वाचलेल्या त्या कवितेच्या ओळी कायमसाठी माझ्या मनात रुतून बसल्या..(त्यानंतर मी आवर्जून संग्रह घेतला, वाचला) इतक्या कि त्या कविता लक्षात ठेवण्यासाठी मला काहीच कराव लागल नाही. वाचल्या न ओठात बसल्या इतक्या साध्या शब्दात थेट काळजात घर करून जाणारे शब्द मी प्रथमच वाचत होतो.
जस कि,
“पाउस एकदा हिंदू मुसलमानांच्या दंगलीत सापडला” किंवा 
“गंगेवरची म्हातारी , कातडीला चिकटलेल्या लोकांच्या नजरा धुतेय” किंवा 
“मला मुलगी झाली तर तीच नाव सीता ठेवणार नाही.”
या कविता मलाच नाही तर माझ्या आईलाही खूप आवडल्याच तिने सांगितल. तेव्हा आम्हा शिक्षकांच्या अनेक कार्यक्रमात व त्यानंतर मी उपस्थित असलेल्या अनेक कार्यक्रमात जेव्हा, बिनदिक्कत पणे नाव न घेता,
“ आभाराचे भार कशाला, हे फुलांचे हार कशाला” या ओळी वापरल्या जातात तेव्हा तेव्हा या मित्राच्या कवितेची आठवण तीव्र होत जाते.
आजही संजय चौधरीच्या ज्या कविता वाचनात येत आहेत त्या सर्व “माझ्या इवलं हस्ताक्षर” इतक्याच ताकदीच्या आहेत. तसेच काळाशी सुसंगत आहेत, अधिक धाडशी आहेत, अधिक स्पष्ट आहेत,बदलत्या काळाची भाषा वापरत त्यावर भाष्य करणाऱ्या हि आहेत.
“चंद्र एक अफवा, रात्र सर्वदूर पसरलेलं अफूच शेत, अन तू जहराचा लार्ज पेग” 
“संबंधाची राख उडतेय वाऱ्यावर”
“मी तुला अजून केला नाही साधा स्पर्श पण आरशात पाहशील तेव्हा बरच काही विस्कटलेल असत.- निम्मित valentain डे.
किंवा संपूर्ण सोशल मिडीयावर व्हायरल झालेली त्यांची , “ये रेडीओ का विविध भारती स्टेशन है” अस मनातल ओळखून मनातल्या भाषेत बोलणारी त्यांची कविता असो.
संजय चौधरीच्या आजच्या वाढदिवसानिमित्त हि त्यांची कविता अशीच बहरत जाओ. अधिक काळजाला भिडणारे लिखाण त्यांच्याकडून होत जाओ व आगामी वर्षामध्ये अजून नवनवीन कवितासंग्रह वाचायला मिळो हि मनःपूर्वक सदिच्छा.
- समाधान महाजन.

नोंदी पाच

# लिटररी नोंदी # पाच

पावसाळी दिवसांची सुरुवात, उन सावलीचा सुरु असलेला खेळ, गाडीच्या साईड विंडो मधून दिसणारे  काळेभोर ढग, पूल उतरत असतांना रस्त्याच्या बाजूच्या इलेक्ट्रिक पोलांची एक सरळ रेषेत मागे पळत जाणारी लाईन. मागच्या बाजूच्या रिकाम्या रस्त्यावरून हळूहळू जवळ येत जाणार्या कारसारखी सरळ मनात  जागी होत जाणारी  तुझी आठवण, आणि वळणावर अजून एक आर्त आलाप घेत स्पंदन वाढवणारा अर्जित सिंग..........बस्स,

नाही जायचंय आता कुठ, नको ते रुटीन , तोच रस्ता, तेच ऑफिस , तेच घर, तीच मानस, तोच तोच ठरलेला वेळ.....आता नकोय.....

... हे सगळ झुगारून कुठल्याही बंधनात बांधून न घेता  सैरवैर सुटलेल्या व अफाट वेगाने स्वतःच्याच मनात रमलेल्या बेफान मनाला  वाटेल तस व  व्वाटेल तिकडे जाव, कुणाचीच अगदी
स्वतःचीही पर्वा न करता ....एकदम बिनधास्त ........पणे ....
इतक्या कि अगदी रस्त्यात तू जरी दिसली तरी तुझ्याकडे न पाहता अत्यंत मुजोरपणे सुसाट निघून जाव.....

तशीही आताची तू  मला सोबत असण म्हणजे तेव्हाची तू माझ्यासोबत नसण्याइतकच तीव्र वेदनादायी आहे माझ्यासाठी........

.......त्यामुळे मला आवडलेले तुझ्यासोबतचे सुगंधी क्षण, अंगभर तसाच टिकउन ठेवलेला तुझा स्पर्श, कानात अजूनही गुदगुल्या करणारे तुझे आकार-उकार-हुंकार....तू घेत आलेली काळजी, मला मनापासून आवडणारी  तूझ्या वाट पाहण्याचा अंदाज, मध्येच अंदाज चूकउन येणारा तुझे चुकार फोन......अस खूप काही, खूप काही......जे त्या त्या दिवसात आणि हो रात्रीत पण मला जे जे वाटलेले असेल ते सर्व...... सोबत घेऊन जात रहाव....

....मन मानेल तस ...मन म्हणेल तिकडे.....

...पण आता तू नकोय .... अन तुझी अलीकडची आठवण तर बिलकुलच
नकोय......

नाहीतर मग बाकी प्रश्नांचे अवाढव्य डोंगर उभे राहतात माझ्या शहराच्या चोहोबाजूंनी व अंधार करून टाकतात सारीकडे ...मग माझ्या नजरेला बाकी काहीच दिसत नाही.

..... तरी मी उजेडाच्या आशेने  धो धो पावसात अंधार वाढतच असतांना ......  ..तुझ्या डोळ्यातली ती चमक शोधत राहतो राणी ....
........वेड्यासारखा.
                                                        # समाधान #

नोंदी चार

# लिटररी नोंदी # चार

पावसानंतरची उन सावली, नुकतच मैदानावर वाढू लागलेली हिरवळीची बेट..
भरदिवसा घरातल्या अंधारात बुचकळलेलो मी...किती वेळेपासून काय???......अनादी अंतापासून इथच आहे...
हा अंधार संपत नाही न मी त्याला संपवू शकत नाही..
कोंडलेला एकांत कि एकांतात कोंडलेला मी मरू शकत नाही....
मी एकटाच आहे इथ...कळत असल्यापासून...बाप बाहेरच्या खोलीत असतो..तो बाहेरच्या बाहेर जातो...अन येतो...
अरे...कसला आवाज येतोय तिकडे मैदानाच्या पलीकडे...जोराचा गलका ..गोंधळ...पाठोपाठ शिव्या......कधी नव्हे तो झपाट्याने पावले उचलत मी तिकडे गेलो..तिथ जाईपर्यंत थकवा आला .....मग मी पाहिलं ..बाप रस्त्याच्या बाजूला खाली पडलेला ...चार-पाच जन हनतायत...दिसेल जागा तिथे.. लाथा बुक्क्याने तुडवतायत त्याला ...एक जन छातीवर कुदून बसलाय... एक छोटस पोरग काठी घेऊन आलेलं...तेही मारतंय जस जमेल तशी काठी....मी त्या पोराकडेच पाहतोय..त्याची निरागसता हरवली नाहीय ...पण तरी कुठल्या अनामिक ताकदीच्या बळावर  त्याचा बाबा शोभणाऱ्या माणसाला काठीने बडवत असेल तो .....देव इतकी निर्लजता त्याला देत असेल का?..त्याला यावेळी त्याची आई पण आठवत नसेल का....?
मी पाहतोय त्या मुलाच्या व माणसांच्या हालचाली...मी थांबवत नाहीय त्यांना ...ते विचार करत असतील का कि या माणसाचा एकुलता एक तरूण मुलगा इथ आपल्याच बाजूला उभा आहे....त्याचं जाऊदे हा खाली पडलेला बाप विचार करत असेल का कि त्याचा मुलगा बाजूलाच उभ राहून या मारणार्यांकडे फक्त पाहत आहे.....पावसाचे थेंब परत टपटप सुरु झाले..मारणाऱ्यांनी मन मोकळ मारून घेतल...मनसोक्त...आता रक्ताळलेला बाप पडलाय.....खाली...मी हळूहळू खाली बसलो...बापाने कण्हत..रक्ताळलेल्या मिटमिटत्या डोळ्यांनी एकवार पाहिलं....त्याच्या काटे आलेल्या शरीरावर मी नजर फिरवत असतांनाच पाउस जोराचा सुरु झाला ....पाण्यासोबत वाहत जाणाऱ्या मातींच्या कणांमध्ये विरघळत विरघळत मी हळू
हळू जमिनीच्या पोटात सरकू लागलो....

                                                          # समाधान #

नोंदी तीन

# लिटररी नोंदी # तीन
Read at your own risk....

‘सेवकाने सेवकासारख रहाव’......गावाचा मालक होऊ नये...काय?.....
भरगच्च पिळदार मिशा, कानावरून बरेच पुढे आलेले लांबलचक केस....डोक्यावर थोडी तिरकस झालेली टोपी..कपाळावर गंध ......तांबडे लाल डोळे.....हातात
धरलेला धोतराचा सोगा... अन खमक्या आवाज...

भर सकाळी माळरानावरून वाहणाऱ्या थंडगार हवेत ....बारीक घाम माझ्या अंगावर जमा व्हायला लागला..

'‘हे खालच्या अंगाला लांबसडांग वावर दिसतेय नव्ह...थोरल्या पोराने कुऱ्हाड घातली होती मोहरल्या वावरवाल्यालाच्या डोस्क्यात .....दहा दिवसात पोराला
सोडवून घरी आणला .... हं.....तितके दहा दिवस सून राहिली फौजदाराच्या घरी... पण मग कराव  लागत अस
...नाही का....?’'

"ते काय तुमचे प्रयोग असतील न ते तुमच्या गावी करा.....इथ जे मी म्हणेल तो प्रयोग....हा हा हा ...सेवका ...जरा ऐका...."

अन माझा खांदा जरासा दाबून ..सरपंच ती माळरानाची वाट उतरू लागला.....आजूबाजूची तरारून आलेली शेती.......गार वारा....बैलांच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज.....चोहोबाजूंनी फुललेल हिरवगार शिवार...दूरवर दिसणार कौलारू टुमदार गाव............

गांधीजींच्या स्वप्नातील खरा भारत इथे गावात राहतो.......माझ्यासारख्या अनेकांच्या  डोळ्यातील स्वप्नाची राखरांगोळी करत....

              # समाधान #
# होता होता राहील...ते वयच तस असत..(2)

मी एम एफ हुसेन पेक्षाही मोठा चित्रकार बनायचं अस ठरवलं होत,नवोदयला असतांना कस कोण जाणे पण कळल तेव्हा मी एकदम आर्ट क्लब मध्ये होतो...
आर्टचे नेवगीरे सर अत्यन्त चांगली व्यक्ती, मुळात ते खूप कनवाळू व इतरांपेक्षा सॉफ्ट वाटायचे, कर्नाटकी भाषेची छाप त्यांच्या बोलण्यात असल्याने बऱ्याचदा हसू यायचे.

त्यांच्यामुळे चित्रांची भाषा कळाली, पान, फुल व निर्जीव ऑब्जेक्ट कागदावर कसे उतरवायचे ते कळू लागले- मुळात कागद,पेन्सिल,चित्र व त्यात रंग भरता भरता त्या लहानशा वयातहि भरले जाणारे रंग हे इतकं डेडली व perfect combination ठरलं कि आजही सरांसोबतचे अनेक क्षण जसेच्या तसे आठवतात.

एकदा असच ती कोणती इंटर्मिजीएट्री कि कोणती अशी परीक्षा देण्यासाठी बसने दुसऱ्या गावी चाललो होतो...तेव्हा काय संदर्भ होता कोणास ठाऊक .. पण सर एकदम जवळ आले व म्हटले , "तुझ्यात तितका स्पार्क वाटत नाही...तू बोलत पण नाहीस काही..." ..पुढचे शब्द ऐकू यायच्या आधी डोळे भरून आले होते ...आत सर्व आग आग झाली होती ...हे अस कस बोलू शकता म्हणून ...
मुळात माझं माझ्याही खूप बोलणं सुरु असायचं. And i observed very intensly that time ..म्हणून मग त्या त्या वेळची सकाळ, ऊन , संध्याकाळ, पाऊस, वारा, सर्व जस एकदम फ्रिज झाल्यासारखं डोक्यात फिट व्हायच.....
म्हणून इतक्या सर्व उलाढाली आतून सुरु असताना व मी सतत स्वतः शी संवाद साधत असतांना मला सरांचं बोललेलं खूप लागलं....

मग मी त्याचवेळी ठरवलं कि खूप मोठा चित्रकार व्हायचं ...चित्राच्या माध्यमातून बोलायचं ...ज्याला समजेल त्याला समजेल......आणि त्या पुढच्या काळात जिथे जिथे चित्रकला व त्या विषयीची माहिती दिसली कि मी ती आधाशी सारखा वाचून काढायचो,विविध आर्ट गॅलरीची माहिती घ्यायचो....
व्हॅन गॉग, गायतोंडे,कदम , मायकेलेन्जेलो, लिओनोर्दो,  एम एफ हि सर्व मंडळी माझी आदर्श बनली होती....
त्या झपाटलेल्या काळातील चित्रांचे काही तुकडे जे आज संग्रही आहेत ते पाहून आज मलाच विश्वास वाटत नाही ते मीच काढ्लेयत म्हणून....

Even...Upsc ची मेन्स च्या वेळी जे जे स्कुल ऑफ आर्ट ला नम्बर आल्यावर जितका आनंद प्री पास होऊन झाला होता तितकाच किंबहुना त्याहून काकणभर जास्त आनंद जे जे त बसून पेपर देता येतील याचा झाला होता.....

पेपर झाल्यावरही बराच वेळ त्या वास्तूच्या आवारातच रेंगाळत असतांना चित्र सोडाव लागल्याबद्दल खूप त्रास होत होता , वाईट वाटत होत....दिल ढूंडता है फीर वही फुरसत के रात दिन ....अस काहीस ...
.
.
.
थोडक्यात मॉडर्न आर्ट मध्ये एक मोठा चित्रकार मला व्हायच होत पण राहीलच.........

                        # समाधान #
# होता होता राहील.....ते वयच तस असत..(1)

कंपनी, सरकार व विशेषतः सत्याचा  ...... इतका प्रभाव होता कि, मला अस वाटायच कि या सारख अंडर world मध्ये आपण पण जॉईन कराव.....साल हे मचूळ निष्क्रिय व कसलंही दम नसलेले दळभद्री आयुष्य जगायपेक्षा मस्त अशी एखादी गँग असावी ज्यात आपण त्या गँग चा intellactualहेड असावं ...
कोणाचा गेम कधी करायचा व कधी कोणाला उचलायचा, कोनाला बाहेर काढायचा कोणाला ठेवायचा हे
त्या गँग च्या भाई ने आपल्याला विचारून करायचे..... आपण आल्यानंतर गँग
च्या ठिकाणी काही वेळ स्मशान शांतता पसरली पाहिजे ....
पोलीस व राजकारणात
पण आपल्या intellectual भाईगिरीला किंमत असावी..एक छान हिरोईन पण असावी सोबत ...

कामात ..काही अडचणी मुळे चुकून मला जेलमध्ये टाकावं लागल तर वरिष्ठ अधिकारी व मंत्री यांच्यात मला सोडण्यासाठी जोरदार स्पर्धा लागावी..... सर्व गँग फिल्म्स मधील ग्रे व डार्क शेड्स आवडायचेत ...त्या रोमांचक व रिस्की लाईफ च प्रचंड आकर्षण वाटायचं.मुंबईला जायच्या आधी मुंबईच्या गल्लीबोळ म्हणजे गेम केल्यानंतर पळायसाठीच बनवलेत कि अस वाटायचं.

अगदी त्या काळात आपले पप्पा आपल्याला कलेक्टर बनवायचं स्वप्न पाहत असतांना डोक्यात एक साईड ला हे सुरु असायचं.....😋😋

थोडक्यात एक
intellectual दबंग भाई ...व्हयाचे होते मला पण राहीलच..😅😅
                             # समाधान #

बेगमजान

बेगमजान व भारत पाक फाळणी
बेगमजान आला अन वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिला सेन्सॉर पासून तर थेट अंगावर येणाऱ्या संवादांपर्यंत तसेच विद्या बालन व नसिरुद्दीन सहित इतर अभिनेत्यांच्या अभिनयापर्यंत. आणि त्या चित्रपटाचा एकूणच आवाका
लक्षात घेता अस होण साहजिकच होत, या सर्व गदारोळात जरा कमी चर्चेला गेलेला विषय होता भारत पाकिस्तानची फाळणी;
किंबहुना फाळणी नसती तर हि कथा अशी बनली नसतीच. भारत- पाक फाळणीमुळे तत्कालीन समाजाला एकूणच राजकीय सामाजिक आर्थिक तसेच व्यक्तिगत रित्या किती गंभीर मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले याचे चित्रण अनेक कथा कादंबरया कविता व काही तत्कालीन चित्रपटांमध्ये आले आहे. आणि अजून येत आहे.
फाळणी हे जगाच्या इतिहासातील अत्यंत भयंकर, क्रूर, गंभीर व रक्तपाताने माखलेले पान आहे. पुस्तकासोबतच आमच्या पिढीने फाळणी अनुभवली ती गदर मध्ये. नावाप्रमाणेच ती एक व्हायलेंट स्टोरी जरी दाखवली गेली तरी प्रेताने भरलेली ट्रेन तिकडून येते व इकडून माणस घेऊन जाणारी ट्रेन तिकडे
जाईपर्यंत परत प्रेतांनी भरून जाते हे सत्यच तर होते.
खुशवंत सिंग यांच्या ट्रेन टू पाकिस्तान मध्ये अनेक बारकावे टिपले गेले आहेत. १९७३ मध्ये आलेल्या ‘गरम हवा’ चित्रपटातही फाळणी , राजकारण याबाबत खूपच चित्रण
केले आहे. इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी बऱ्याचदा विचार करतो हि घटना अशीच आजच्या काळात घडली असती किंवा ज्या काळात घडली त्या काळात आतासारखी माध्यम व
२४*७ चालणारी न्यूज च्यानेल असती तर काय काय झाल असत, कॅमेऱ्यांनी काय काय टीपल असत व निवेदकांनी काय काय सांगितल असत, रात्रीच्या चर्चा- संवाद
कशा रंगल्या असत्या.....असो इतिहासात जर तर नसतोच कधी, जे झाल ते झाल. बदलायचीच असेल तर फक्त पाहण्याची नजर बदलावी लागेल कारण घटना त्याच
आहेत.
म्हणूनच अलीकडील subaltern history (अन्तःस्तरातील इतिहास) सांगण्याचा प्रयत्न सर्व बाजूने होत आहे. यात पृष्ठभागाकडील (किंवा परिघावरील) घडामोडींचा आढावा घेतला जातो. गाभ्याकडून परीघाकडे जाण्याऐवाजी परीघाकडून गाभ्याकडे अशी उभारणी केली जातेय थोडक्यात नीचे से देखो असे सूत्र वापरले
जात आहे. उगाचच मोठ्या व्यक्तींच्या माध्यमातून मोठ्या घटना न सांगता लहान लहान प्रसंग व गावागावात घडलेल्या घटनाचा व व्यक्तींचा प्रभावी वापर करून त्या त्या काळातील घटनाच पट समोर मांडण्यात येतो. बेगमजान हा असाच subaltern इतिहास सांगणारा चित्रपट आहे असे मला वाटते.
बरोबर ज्या ठिकाणाहून सीमारेषा आखली जाणार आहे त्याच रेषेवर एक व्येश्यागृह चालवणारी बेगमजान अर्थात विद्या बालन तिच्या सोबतच्या पाच दहा मुली व आता याच रेषेवरून सीमारेषेचे बांधकाम करण्यास व पुढील रेषा आखण्यास आलेले त्यातल्या त्यात लोकल स्तरावरील अधिकारी यांच्यातला संघर्ष अस वरवर पाहता वाटू शकत परंतु जसजसा चित्रपट पुढ सरकतो तसतस तो
बारीकसारीक संदर्भांचे चित्रण करत चालतो.
जस कि सीमारेषा आखण्यासाठी आलेला अधिकारी वर्तमानात काय घडतंय याशी रिलेट न करता फिरणाऱ्या
तबकडीवरील जुन्या काळातल एक गान ऐकत तो नकाशावर काम करत असतो. असाच एक प्रसंग ट्रेन टू पाकिस्तान मध्ये सीमारेषेच्या भागात भेटीला जाणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ आय.सी.एस. अधिकार्यांच्या साग्रसंगीत दौर्याबाबत खुशवंत
सिंग यांनी रेखाटला आहे. पुढे लहानपनीचे मित्र असलेले पण एकाच वेळी हिंदू मुस्लीम असून दोघानाही सोबत आपापल्या देशासाठी काम कराव लागत तेव्हा एक बाजूला जुनी मैत्री व एक बाजूला कर्तव्य अशा कात्रीत ते सापडले असतांना फाळणीच्या दंगलींमुळे त्या दोघांच्या कुटुंबावर झालेले अत्याचार ऐकतांना या वेळी हिंसेला उत्तर हिंसा नसते किंवा हिंसेची फळे दोघांनाही भोगावी लागतात हे सांगायला कोण
महात्मा किंवा नेताजीची गरज राहत नाही न सांगताही हा सिग्नल प्रेक्षकांच्या सरळ लक्षात येतो.
त्याचप्रमणे जगात दंगल कुठेही असेल तरी त्यात सर्वाधिक बळी पडणारा व अत्याचार होणारा घाटक स्रीच असते.
बेगमजान सोबत राहानाऱ्या मुली अशाच अत्याचारपिडीत आहे ज्यांचा आक्रोश तोंडातून बाहेर निघायला पण घाबरतो.
सआदत हसन मंटो च्या कथेच्या आधारे या चित्रपटाची रचना करण्यात आली आहे. मुळात फाळणीवर मंटोने अनेक लघुकथा लिहिल्या आहेत,त्यातील 'मिस्टेक' नावाची लघुकथा इथे मला सांगावी वाटते,
".....त्याच पोट फाडत तो सुरा खाली गेला.त्या माणसाच्या पायजम्याची नाडीही कापली गेली. त्या सुराधारी माणसानं पाहिलं आणि तो अतिशय खेदपूर्वक म्हणाला, ओह! मिस्टेक!"
मंटोच्या कथा कधी कधी वाचता वाचता माणूस सुन्न होऊन काही वेळ पुस्तक बाजूला ठेऊन देतो इतक्या विलक्षण अंगावर येणाऱ्या या कथा आहेत.
त्यामुळे सेन्सॉरने कितीही कापले तरी अंगावर येणारे संवाद येतातच. मुळात फाळणीसारख्या काही घटना इतक्या दाहक असतांना भाषा तरी कशी पवित्र राहील ?
हरीश करमचंदानी म्हणतात तस, फाळणी म्हणजे न टाळता येणार इतिहासातील एक दुर्दैवी पान
हां, सदि के इस मलीन छोर को चाह कर भी आप अलग नही कर पायेंगे, इतिहास कि किताब से |
उजला समय जब पलटेगा पन्ना, इस पर जरूर अटकेगी उसकी नजर .
-समाधान महाजन

दो लफ़्जो कि है दिल कि कहानी......

https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjf4M-hju7YAhVHXrwKHZ9rCPoQ3ywIKDAA&url=https%3A%2F%2Fwww.youtube.com%2Fwatch%3Fv%3DwaeAGdCvJd8&usg=AOvVaw0l4vv4Ii5PNv1PtFsniK8Uदो लफ़्जो कि है,दिल कि कहाणी,
या है मोहोबत या है जवानी।  .................

रात्रीची वेळ,स्टॉप आल्यावर बसने स्वतः च्या गर्दीतून अक्षरशः खाली लोटून स्वतः च एक उसासा टाकून निघून गेली. खाली उतरताच जाणवला तो मिट्ट अंधार.एरवी लाईट कुठंतरी चमकतोच पण आज कुठंच नाही , चालतांना एक दोनदा पाय
डबक्यात जाऊन ओला झालो. बेमोसमी पावसानं शहराला झोडपून काढलेल्याचा परिणाम अंधार सर्वत्र पसरला होता.
सवयीचा रस्ता व वळण असली तरी अंधारात नेमकं चालावं कुठं ते लक्षात येत नव्हतं , आकाशात वाऱ्याने पळणाऱ्या ढगांमधून मध्येच कुठंतरी चांदण्यांचा उजेड चमकून जाई, पावसाने गारठलेल्या कुत्र्यांचा रडण्याचा आवाज,पुन्हा
शांतता, पुन्हा अंधार........
अशावेळी कायच्या काय आठवत राहत.

* * * * * * *
अंधारगच्च पडदयावर लख्खकन ..व्हेनिसच्या कालव्यातून जाणाऱ्या बोटीत बसलेले अमिताभ व झिनत-
"ये कश्तीवाला क्या गा रहा था, कोई इसे भी याद आ रहा था" अस गाणं दिसायला लागलं. म्हणजे असच कॉलेज च कुठलं तरी वर्ष असेल, पैसे संपले, रूम सोडलि, मित्राच्या घरी मुक्काम,मित्र पुण्याला. एकुलत्या एक मुलाचा मित्र म्हणून
सर्व सामानासहित माझी रवानगी हॉल मध्ये , पुस्तक पोत्यात बंदच होते, समोर भला मोठा टीव्ही तोही रंगीत,कसाबसा खटपटून सुरु केला.इतक्या मोठ्या स्क्रीनवरच रंगीत चित्र प्रथमच पाहत होतो,छोट्याशा डब्यावर काळं पांढर पाहण्याची सवय असलेल्या डोळ्यांना रंगावर स्थिरावण्यास वेळ लागला.
थकवा,उत्सुकता,नवं घर, वय, वेगळेच वास, वेगळ्याच वस्तू साऱ्यांची समिश्रता खोलीभर पसरली असतांनाच स्क्रीनवर झिनत अमिताभ च 'दो लफ़्जो कि है दिल कि कहाणी' अशाच्या आवाजात ऐकत असतांनाच डोळ्यात दाटून आलेली झोप-
खोलीभर व्हेनिस चा कालवा व मी त्या वातावरणाचा एक भाग बनत असतांना - कदाचित टीव्ही रात्रभर सुरु राहिला, दुसऱ्या दिवशी सकाळीच अनेक कारणांचा गोड दाखला ऐकत हेही घर सोडावं लागलं, नंतर राहिलो असेल कुठं बरेच दिवस इकडं तिकडं आठवत नाही, पण ते गाणं, ती झिनत, तो अमिताभ, ते व्हेनिस व आशा विसरलो नाही.
कसा विसरेल? रात्रभर टीव्ही सुरु राहण्यापायी घर,मित्र,नात
सार दुरावल होत.

* * * * * *

तर मग अस ते गाणं आज ओठांवर आलं,भर अंधारात,चालत चालत आता घर जवळ आलं होत, नाल्यावरचा पूल पार केला. दूरवरून थोड्या काळपट उजेडात ते भव्य वडाच
झाड चमकल, मग मागचं ते जुनाट मंदिर, त्यातील मिनमीनता दिवा.कमालाय इतक्या वादळात,कोणी लावला असेल परत? नाल्याचे पाणी एरवी काळेजर्द,असंख्य जीवजंतू सारखे खालीवर करत राहतात त्यांचा एक नरकच वाटत असतो .त्याचा एक वेगळाच घाण वास परिसरात पसरलेला असतो  तो वास नाकासोबत जीवनाचाही भाग झालेला. हा
वड,नाला,हे मन्दिर, हा वास या सर्वांचा मी भाग आहे वर्षानुवर्षे अस वाटत राहत,अनेकदा ...वाटायला काय काहीही वाटत.

' दिल कि बातों का मतलब न पूछो
  कुछ और हमसे बस अब न पूछो '

काळेभोर केसं कपाळावरून सावरत,सुंदर डोळे,पांढऱ्या पिवळ्या फुलांचा टॉप घातलेली झिनत , निळे पाणी व खोल डोळ्यात खोलवर भाव दिसणारा अमिताभ. अस चित्र डोळ्यापुढं उभं राहत असतांनाच दरवाजाजवळ पोहचलो, किल्ली घेऊन कुलूप चाचपडल पण ते हाताला लागलच नाही,वरती हात करून कडी काढली अन आत पडलेलं
पहिलं पाऊल पोटरी पर्यंतच्या पाण्यात गेलं,दुसरा पाय आत घेऊन रूम मधील पाण्याच्या पातळीत उभा राहिलो. हे काय कस झालं काहीच कळत नव्हतं. खालची गादी, सर्व सामान, सर्व पुस्तकं, मासिकं, पेपर, कपडे व एकूण एक वस्तू या पाण्यात तरंगत असावी याचा अंदाज आला,अरे अस काय म्हणून मान वर केली तर  वरच्या पत्रया ऐवजी वरच आभाळच एकदम खोलीत आलं त्या सोबत मध्येच
चमकणाऱ्या चांदण्या दिसू लागल्या व  हळूहळू डोळ्यात पाणी पसरून उद्विग्नता आली,यश-अपयशाच्या चक्रातून आधीच सुटका नसतांना रुसो कांट हेगेल मार्क्स सहित सारे विचारवंत पाण्यात तरंगत होते  रोमिला थापर ,बाशम
सहित सर्व इतिहास हि पाण्यात होता, हे खूप मोठं नुकसान होत हि अपयशाच्या साखळीची अजून एक कडी होती जी माझ्या हातात नव्हती,मी बसायला माझी एकुलती एक खुर्ची शोधत असतांना  परत अडखळून जोरात वर  पुढच्या ओळी आल्या,

"इस जिंदगी के दिन कितने कम है
कितनी है खुशियाँ और कितने गम है"

आता हे गाणंच नको होतं, आता यातलं कोणीच नको होतं,
तू रहा बाई अमितसोबत त्या सुंदर लोकेशन वर असंही या फालतू पत्रे उडून गेलेल्या रुम मध्ये येऊन तू काय करशील? आणि असंही love cant divide at
single time so buy...
इथल्या अपयशाच्या भिंतींवर विजयाची सोनेरी अक्षर कोरण्याचा इतिहास अजून बाकीय ,  तो तर मी लिहिणारच आहे तोवर कैकपटीने सहन करण्याची ताकद हा अंधारच मला देईल.

                                                       - समाधान महाजन

                                                         # लिटररी नोंदी #

रइस च्या निमित्ताने


शाहरुख चा बहुचर्चित रइस पाहिला, अन होत्या नव्हत्या त्या अपेक्षा पण धुळीस मिळवल्या गेल्याच याची देही याची डोळा पहाव लागल. मुळात आपली ताकद ओळखून त्यात सर्वोच्च स्थान गाठन हा अभिनेत्याचा प्रवास असावा लागतो.तो तसा असावा अस त्याच्या चाहत्यांना देखील वाटत असत.शाहरुखच्या बाबतीत अस होतांना दिसत नाही.
मुळात नव्वदच्या दशकात देशातील आर्थिक,राजकीय व जवळपास एकूणच जबरदस्त स्थित्यंतर जगभर सुरु असतांना चित्रपटसृष्टी त्याला अपवाद नसावी. तत्कालीन अमिताभ चा पडता काळ, खान बंधुपैक्की अजून उर्वरित दोन्ही वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे वेगवेगळ्या भूमिका साकारत असतांना व त्यातही आपल काही वेगळ देण्याच्या प्रयत्नात असतांना फौजी व सर्कस च्या दूरदर्शन सीरिअल च्या माध्यमातून स्वतःला सिध्द करत असतांना शाहरुख दिवाना चित्रपटातून भारतीय सिनेमात एक पाउल टाकतो व अवघ्या काही वर्षातच तरुनाईच्या गळ्यातील ताईत बनतो, त्यातही कुटुंबातून कुठलीही चित्रपट सृष्टीची पार्श्वभूमी नसतांना हे कौतुकास्पद होत.
जागतिकीकरण भारताने स्वीकारल्यानंतरच्या लगतच्याच वर्षात दिवाना,बाजीगर,डर,अंजाम यासारखे एक पाठोपाठ एक चित्रपट तरुणांनी डोक्यावर घेतले त्यात बदलत गेलेली एकूणच सर्व परीस्थिती कारणीभूत असावी.
१९७५ हे वर्ष आणीबाणी व भारतातील एकूणच असंतोष पूर्ण स्थितीतील वातावरनात angree yong man अमिताभ चा दिवार मधील उदय हा योगायोग निश्चितच नव्हता.तत्कालीन तरुणांची चीड संताप हा सलीम जावेदच्या वाक्यातून व अमिताभच्या अभिनयातून बाहेर येत होता व नव्या नायकाची सुरुवात होत होती.
१९९१ नंतरच्या अस्थिर काळात अशीच काहीशी आठवण क..क..क..किरण करत नायिकेच्या मागे “तू हा कर या ना कर ...तू है मेरी किरण” म्हणत प्रेमाने जबरदस्त पछाडलेला नायक म्हणून शाहरुख खान कडे बघतांना होते. जो पुढे अंजाम मध्ये हि कायम होता..
एक पूर्ण एनर्जीटिक व्यक्तिमत्व, सळसळता उत्साह, हातांच्या मनगटापासून तर मानेपर्यंत ताईट झालेल्या नसा, डोळ्यात भडकलेली आग, उच्चारातून व देहबोलीतून जाणवनारी प्रचंड महत्वकांक्षा, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कोणत्याही भयानक मार्गाचा वापर करण्याइतका बिनधास्तपणा व त्याच मोहक डोळ्यांनी प्रियसिला घातलेली साद व प्रेम करण्याचा आपला स्वतंत्र अंदाज हि ताकद घेऊन तो पुढील अनेक चित्रपटातून सक्सेस होत गेला.
त्याच्या कारकीर्दीच तिसर दशक तो अशा पद्धतीने निभावत नेत असतांनाच त्याच्या सोबतच्या दोन खान बंधूंनी आपआपला मार्ग काळाप्रमाणे बदलण्यास सुरुवात केली होती. चोकलेट बॉय आमिरखान आपल्या गुडीगुडी भूमिका सोडून अधिकच चोखंदळ भूमिका स्वीकारत स्वतःमध्ये अधिकच पूर्णत्व आणण्याच्या प्रयत्नात होता तर सलमान खान आपली बिनधास्त शैली कायम ठेवत wanted, दबंग,सारख्या स्वतःच्या रफटफ व्यक्तित्वाला साजेशा व लोकांच्या पसंतीस उतरणारे चित्रपट करत असतांना शाहरुख मात्र या काळात चाचपडत असतानाचे दृश्य दिसत आहे. यावर्षीचा सलमानचा सुलतान व आमिरचा दंगल त्या दोघांनी आपापले वय, एनर्जी, व क्षमता कामाला लाऊन क्लास व मास प्रेक्षकांची मने जिंकली असल्याचे दिसत असतांनाच
आपला romantik पना वयाला  शोभणार नाही हे समजून तेही न करणारा, हाणामारीच्या प्रसंगातही पूर्वीइतकी एनर्जी नसलेला, पूर्वीचा सळसळता उत्साह हरवलेला शाहरुख रइस मध्ये भलताच केविलवाणा दिसतोय. मुळात रइस पाहतांना once upon time in Mumbai सारख्या सश्क्त चित्रपटाची वारंवार आठवण येते हे रइसच्या पटकथेचे अपयश आहे. gangstar, टोळीयुद्ध, एकाची जागा दुसऱ्याने घेण्याचा सत्तासंगर्ष हा आजवर अनेक चित्रपटातून मुंबईच्या पार्श्वभूमीवर दाखवलेला असतांना यात गुजरातचा प्लॉट निवडल्याने वेगळे काहीतरी दाखवण्याची संधी दिग्दर्शकाने चुकवली आहे. ज्या नवाजुद्दिन सिद्दिकीला सलमान ने त्याच्या किक व बजरंगी भाईजान मध्ये वापरून त्यालाही एक वेगळ्या भूमिकेला उंचीवर नेण्याची संधी दिली त्याच नवाजुद्दींनची भूमिका सुरुवातीला ताकदीची दाखऊन नंतर फक्त फरफटत नेण्याचा दिग्दर्शकीय मूर्खपणा अनाकलनीय आहे.
रइसच्याच सोबत प्रदर्शित झालेल्या कबिल ने मात्र फार अपेक्षा नसतांना चांगलाच धक्का दिला आहे. प्रमोज बघून सुरुवातीला black किंवा तत्सम अपंग व्यक्तींवरील मनाला हात घालून डोळ्यातून पाणी काढणारा तद्दन मसाला चित्रपट असावा अस वाटत असतांनाच मनासोबत डोक्यालाही चांगल समाधान देणारा हा चित्रपट वाटतो.एकीकडे केव्हाही संपला तरी चालेल असा रइस व एकीकडे संपूच नये अस वाटत असणारा कबिल. संपूर्ण चित्रपटात कसलीही उत्सुकता वाटत नसणारा रइस व उत्कनटा कायम ठेवणारा काबील या लढाईत प्रेक्षकांनी काही दिवसातच कबिल ला पसंती दिल्याचे दिसत आहे.
एकूणच शाहरुख ने काळाची पावले ओळखणे आवश्यक आहे.

भाग सहा

नवोदयचे दिवस

एक अर्धवट बांधकाम झालेल्या इमारतीची गच्ची , आम्ही दोघ , दूरवरून मजीदितील येणारे अल्ला हो अकबरचे आवाज..संध्याकाळ दाटून आलेली, पिवळे दिवे घराघरातून हळूहळू लागत आहेत, मुलांचा खेळण्याचा कलकलाट वाढत आहे,रस्त्यावरून नळामुळे वाहणारे पाणी गटारीच्या पाण्यात बेमालूम मिसळून जात आहे काही घरातून चुलीचा निघणारा धूर या सर्व वातावरणातील उदास पण गडद करत सभोवताली पसरत जातोय अर्धी थंडी अंगाला जाणवतेय पण ती तीतकीच. आताच गेम्स खेळून आलेल्या पटांगनावरच्या पिवळ्या गवतावर दवाचे पाणी पसरू लागले असावे.
 संध्याकाळच्या प्रेअरला दांडी मारून आम्ही इथ काय करत आहोत.
.
.
.
कोपऱ्यातील खोलीतून पेटीचे व तबल्याचे आवाज येत आहेत. आता यावेळी त्या  खोलीत असणारे सर्व उपस्थित हे माझ्यासारखे क्षुद्र पृथ्वीतलावरचे मर्त्य मानव नसून स्वर्ग लोकातून आलेले गंधर्व व अप्सरा त्या ठिकाणी आहेत , त्यांच्या सर्वांच्या आवाजाला एक स्वर्गीय वरदान लाभले असून साक्षात देवाधीपती देवांना संगीत शिकवणारे गुरु त्या ठिकाणी असल्याने त्यातील कोणाचाही आवाज कानी पडणे हा आपल्या कानाकडून झालेला अक्षम्य अपराध आहे अस समजून तिकडे थोडेही न बघता व काहीच ऐकू येत नसल्यागत तिथून फक्त रस्ता नसल्याने अत्यंत नाईलाजाने  त्या खोलीजवळून जाव लागत असल्याचे पाप उरी बाळगत सोबत चालत असलेल्या मित्रांसोबत , “प्यार के कागज पे....किंवा .....नजर के सामने ...किंवा ..... जादू तेरी नजर “ यासारखे अभद्र लोकांसाठी निर्माण केलेली गाणी मनातल्या मनात म्हणत अगदीच कसतरी आम्ही जात असू.
.
.
.
संध्याकाळची कंपल्सरी  स्टडीची वेळ , पावसाळयाचे दिवस ..भरीस भर अंगावर पांढराशुभ्र नेहरू सदरा , पाउस सुरु आहे कदाचित आज दिवस भरापासून कारण सकाळची पी.टी गोडाऊन मध्ये इकडे तिकडे हात पाय तानण्यात अर्थात योगा करण्यात गेल्याच आठवत होत
वरच्या पत्र्यावर पाउस पडल्याचा आवाज व ते पाणी खाली टपटपत वाहून जात असतांना लगतच्याच व्हरानड्यावर त्यातील काही थेंब अंगावर उडत असतांना पिवळ्याधमक बल्ब खाली बसून कसलस न कळणार इंग्रजीच पुस्तकातील डोक्यावरून जाणाऱ्या ओळींचं वाचन म्हणजे अभ्यास सुरु असतांना कोणास ठाऊक का कदाचित वातावरणामुळे अंगात बारीक ताप असावा, कदाचित भूक लागली असावी, कदाचित थकलो असावा ,कदाचित काय वाचतोय ते कळत नसाव, कदाचित कोणी काहीतरी म्हटल्याच वाईट वाटत असावं ..पण मी माझ्या नकळत घरी पोहचलो होतो इथल्या थंडगार वातावरणापेक्षा घरात उबदार वाटत होत, समोरून आई असावी मी आईच्या मांडीवर डोक ठेवल व आई केसांवरून हात फिरवतेय..
एक सणसणीत कानाखाली बसली .. नको त्या वेळी झोप येणे हि महाभयंकर चूक होती. कदाचित रात्र रडण्यात गेली असावी. बर्याचदा कारणच सापडत नाही घटना का अशा घडून जातात. पण आयुष्यात शिकउन जातात इतक पण साध सोप कस म्हणता येईल कि त्या एक आठवण ठेऊन जातात. कारण कधी आठवणी महाभयंकर असतात कधी खूप गोड,हसऱ्या, हलक्या  नाजूक . या हलक्या नाजूक आठवणी मोरपीस अंगावर फिरवल्यासारखा नाजूक स्पर्श देऊ करतात तर काहिंकडे पाहून आताही त्या काळाच्या पडद्याला सरकाव वाटत नाही कारण सत्य नको तितक नग्न असत.
.
.
.

वेळ उन्हाळ्यातील रात्रीची...नुकतच नववीतून दहावीत गेल्याची. नुकताच रात्री १० ला सुरु झालेला १० वीचा चहा  घेऊन वर्गात डोळ्या खाली भल मोठ पुस्तक तास-दोन तास वाचून झाल्यावर गरम होतंय म्हणून व चला आता कॉटवर जाऊन पडू म्हणून आमच टोळक हळूहळू रस्त्यावर येत, मध्येच एखादी ट्रकचा अपवाद वगळता वाहतूक जवळपास बंदच..
भलमोठ गोडाऊन झोपेच्या आधीन झालेले, रस्त्यावरचे काही लाईट मध्येच चमकून जातायत.अनेक दिवसांपासूनच्या उभ्या असलेल्या दोन ट्रकांवर प्रचंड धूळ साचलेली, ग्यारेजचे ऑईल पसरलेले,काही टायरचे तुकडे इतस्त विखुरलेले व इकडे ....
एकदम हसले सर्वच आणि हसतच राहिले..
why the karishma exposed herself in such bold manner in ‘सरकायलिओ खटीया जाडा लगे..’ 
म्हणजे बस का ,
म्हणजे सम्पल का , 
म्हणजे इतकच का , 
म्हणजे अजून काय पाहयाचे राहील, 
इत्यादी इत्यादी ... and once again dance for the road … जाडे मे बलमा प्यारा लागे..हा हा हा तुफानच . 

हा दिवस आहे कि रात्र हा उन्हाळा आहे कि हिवाळा हे आम्हीच आहोत कि अजून कोणी काहीच कळत नव्हत ..हे समोर जे गोडाऊन दिसतेय ना तिथे रहाव वाटत नव्हत काही वर्षांपूर्वी, आम्ही कैदी, आमचा कैदी नंबर, कैद्यांची कायम लाईन आणि शिस्त, हा तुरुंग आहे प्रचंड मोठा, अस सुरुवातीला काही म्हणत ते अस का म्हणत कळत नसे मी इतका टोकाचा विचार कधी केला नव्हता पण सुरुवातीला खूप कोंडल्यासारख वाटायचे आणि आज आता हा रोड डान्स ..
आता कोणी बांधून ठेवलंय आम्हाला ? कोणीच नाही. आता या क्षणी आम्ही इथून जाऊ शकतो का ? तर सहज जाऊ शकतो कारण मुळातच आम्ही रस्त्यावर उभे आहोत. पण आम्ही जात नाहीत , आमच्या मनात असा आता विचारही येत नाहीय. आमच्यातल्या काहींना तर आता कधी घरीही करमत नाहीय .. आता सवय झालीय ..आता सवय झालीय .. आता या सर्व रुटीनची सवय झालीय, पूर्वी  वाटणारा त्रास  आम्ही आता एन्जोय करतोय ..या सर्वातून आम्हला सुटका नकोय कारण आम्ही त्याचा भाग झालोय अन ते आमचा भाग झालंय 
हे नवोदय आम्ही खरच तुझ्या प्रेमात पडलोय.

                              आगामी ‘नवोदयचे दिवस’ या पुस्तकातून
                                                     (समाधान महाजन )

भाग- पाच

मी मला आठवतोय अगदी जसाच्या तसाच ज्या दिवशी नवोदयला जाण्यासाठी पप्पांसोबत निघालो होतो. बसचा प्रवास करतांना खूप आनंद व्हायचा कधीही कुठेही बसने गावाला जायचे ठरले तर मी खुश व्हायचो, कारण खिडकीजवळ बसून बाहेरचे पळणारे दृश्य पाहून छान वाटायचे. आमचा बराचसा प्रवास हा डोंगरातून झाडांच्या गर्दीतून वाट काढत जाणार्या घाटांच्या वळणदार रस्त्यातून व्हायचा, त्यामुळे गाडी सपाटीवर लागली कि नजरेच्या टप्प्यात जितके सामाऊन  घेता येईल तितका माझा अधाशीपणा वाढलेला असायचा.
आज आजूबाजूला खूप छान छान दिसत होत,हिरवीगार शेतं, बांधांवर गच्च हिरवीगार झाडे जरा लांब पाहिलं तर खूप सार पाणी दिसत होत ती एक मोठी नदी असावी, पप्पांना विचारल तर ते म्हटले कि ती या भागातील एक मोठी नदी आहे , सूर्य बराच कललेला होता त्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे पाणी अधिकच चमकत होत.सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरलेला होता , गाडीच्या काचान्वरून तो पार आतपर्यंत येत होता
आज मी एका नव्या शाळेत जात आहे इतकच माहिती होत. आपल घर सोडून तिथे राहायचं आहे  हे कळत होत पण त्याबाबत फारस दुख नव्हत किंबहुना काहीतरी वेगळ घडणार आहे इतकच जाणवत होत ; ते काय घडणार आहे किंवा कस घडणार हेही माहित नव्हत माझ्यापेक्षा कदाचित घरच्या लोकांना त्रास जास्त होत असावा. निघतांना फार काही नाटकीय रडारडीचे प्रसंग झाले नाही पण  जुनी शाळा सोडतांना फार चमत्कारिक म्हणावं अस वाटत होत म्हणजे हे सोडून कुठतरी चांगल्या ठिकाणी आपला नंबर लाग्लाय त्यामुळे सर्व जन आपल कौतुक करत आहेत व त्यामुळे आपण काहीतरी वेगळे आहोत अशी चांगली भावना मनात निर्माण झाली होती सोबतच्या मित्रांच्या व परीचीतींच्या नजरेतून ते सारख जाणवत असल्याने हे सर्व इतक चांगल सोडून मी जिकडे जाणारेय ते कसय याची जाम उत्सुकता होती.मनातल्या मनात मी त्या शाळेविषयी तेथील वातावरणाविषयी कल्पनाचित्र रंगवत असू बर्याचदा कुठून कुठून वाचलेली वर्णन व पप्पा मम्मीनि सांगितलेली माहिती या मनोभौगोलिक पार्श्भूमिवर मी रंगून जात असे
आज हलक हल्क होऊन मी पप्पांच्या जवळ बसलो होतो. तेही आज वेगळेच वाटत होते नेहमीप्रमाणेचा  वडिलांचा कडकपणा त्यांच्यात थोडाही दिसत नव्हता व त्यांचे हे नवे मउशर वागण्याने मला कसतरीच लाजल्यासारख वाटत होत. कदाचित ते आतून पार लोण्यासारखे मऊ झाले असावेत. पण वरील रुबाब व करारीपणा यामुळे त्यांच्या चेहरयावर ते तस काही जाणवू देत नसावेत.
मग मध्येच गाडी थांबे घेत घेत चालू लागली.माझ्या दोन चार मित्रांचे चेहरे डोळ्यापुढे येऊ लागले. मग एक गाव आले, आम्ही तसे आतापर्यंत खूप छोट्या खेड्यात जिथे झोपड्या व कौलारू घरे असतील अशा ठिकाणी राहत असल्याने हे गाव मला तस खूप मोठ वाटत होत..एसटी हळूहळू बस stand वर आली.उतरण्यासाठी मी पप्पांसोबत उभा राहिलो.एक भली मोठी पत्र्याची पेटी व इतर सटर-फटर सामानाची पिशवी त्यांनी घेतली.एसटी च्या पायऱ्या उतरून जिथे पाय ठेवाल त्या ठिकाणी भल्या मोठ्या खड्यात पाणी साठलेले होते.पप्पांनी कसाबसा तो खड्डा चुकवला.मी त्यांच्या मागे उडया मारत चालत होतो, थोड्याच वेळात लक्षात आल कि ते संपूर्ण बसstand असच खड्डयाखड्ड्यांनी भरले होते,  stand म्हणून जुनाट पत्र्याची एक दोन शेड कशी बशी तग धरून उभी होती जिथे जागा सापडेल तिथे गाड्या उभ्या होत्या व जिथे पाय ठेवायला जागा मिळेल तिथे लोक उभे होते.
एव्हाना पप्पा माझ्या पुढे चक्क डोक्यावर पेटी घेऊन व हातात एक पिशवी घेऊन जोरात चालत होते.ते या बाबतीत माझे हिरो होते त्यांना कोणतेही काम करण्याची कधीच लाज वाटत नसे स्वतःचे काम स्वतः करण्यात कसली अआलीय लाज असे ते म्हणत. मला मात्र मजा वाटत होती, बऱ्याचदा पप्पांच्या ज्या हाताने सणसणीत मार खाल्ल्लेला होता त्याच हाताने ते आज माझा सामान उचलून चालत होते.
कधी एकदाच ते नवोदय कस असत ते मला दिसेल याची जाम उत्सुकता लागली होती मी पप्पांना विचारत होतो,थोड्याच वेळात त्यांनी मागे वळून मला हात करून सांगितल,
‘हे आल’
मी पाहिलं,समोर मोकळ्या मैदानाच्या दोन्ही बाजूंला एल आकारात शाळा दिसत होती, दुरूनच निळ्या रंगात रंगवलेली व पांढऱ्या अक्षरात लिहिलेली एक पाटी दिसत होती , तो नीळा रंग ज्यावर जवाहर नवोदय विद्यालय अस लिहिलेलं ती माझ्या आयुष्याची एक मोहोर बनून जाणार आहे हे तेव्हा कुठ मला ठाऊक होत.
आम्ही समोरच्या ऑफिसकडे चालू लागलो, काहीजण शाळेच्या ड्रेस मध्ये तर काही चक्क वेगवेगळ्या रंगातील बनियन व सफेद pant  मध्ये दिसत होती, हा एक  नवीनच प्रकार मी पाहत होतो.
इतक्यात पप्पानी मला आत बोलवलं.
- समाधान महाजन