कवी महेश लोंढे

कवी व अधिकारी मित्र महेश लोंढे (IRS) यांचा “निद्रानाशाची रोजनिशी” संग्रह नुकताच वाचून पूर्ण केला. बारलोणी बुक्स ने प्रकाशित केलेला व फेसबुक लाइव माध्यमाचा वापर करून प्रकाशन समारंभ करणारा हा संग्रह असा त्याच्या जन्मापासूनच आगळावेगळा व प्रस्थापित वाटा नाकारून स्वतःचा मार्ग शोधणारा आहे.म्हणून महेश कदाचित आपल्या एका कवितेते म्हणतो,
“कुठल्याच व्यासाने लिहू नये आपले महाभारत
म्हणून प्रत्येक त्रिज्येवर नेम धरून थांबलोय मी.”
आतलं व बाहेरच, चांगल व वाईट, अंधार व उजेड या परिघात वावरतांना मनात चाललेलं द्वद्व, संघर्ष, घुसमट व स्वतःचा स्वतःशी चाललेला संवाद, त्यातून स्वतःच स्वतःचे मार्ग शोधणारी हि कवितेतील भाषा वाटते.
“जोवर डोंगरांना कवटाळता येत नाही तोवर
माणसांनाच मिठी मारुया आपण
जोवर कळत नाही पक्ष्यांची,प्राण्यांची भाषा तोवर
स्वतःशीच बोलत राहिले पाहिजे.” किंवा
“ आपापल्या डोळ्यांच्या उजेडात प्रत्येकाला सापडत राहो आपापला रस्ता.” अशा ओळी महेश सहज लिहून जातो.
upsc च्या परीक्षेची तयारी करतांना, एका बाजूला अभ्यासाचा भला मोठा डोंगर एकाग्रतेने उपसत असतांनाच, एक सामान्य व्यक्ती म्हणून रोजीरोटीच्या व्यवहारातील चटकेही जवळपास रोजच सहन करावे लागतात. मी असो, महेश असो वा तयारी करणारा कुठलाही उमेदवार असो त्याला एकाच वेळी अनेक खिंडीवर लढाई द्यावी लागते. त्यातही असा उमेदवार पराकोटीचा संवेदनशील असेल तर त्याचा त्रास दुप्पट वाढतो. एकाच वेळी माणूस स्वतःला प्रशासनाच्या सर्वोच्च पदावर पाहत असतांना त्याच वेळी तो अक्षरशः शून्य असतो. अन मग जर त्याला लिहिता येत असले तर हा सर्व अव्यक्त अवकाश तो कागदावर उमटवत राहतो, कारण अभ्यासामुळे दोन जगातील फरक फार चटकन लक्षात येतो.
‘’ हे रोजचेच जागरण, हा दिवसांचा गोंधळ,हा न वाजणारा संबळ
ही निद्रानाशाची रोजनिशी,या अंतन रात्री, हे स्वतःशी वाद तुंबळ.’’
हा असा स्व संवाद सुरु असतांना कवी विरोधाभास फार चटकन मांडून जातो.
‘’सहा लिटर पाणी एकदम फ्लश करतांना
धडकीच भरते उरात
चाललेला मैल आठवतो, चिखलाचा बैल आठवतो.’’
एकूणच संग्रहातील सर्वच कविता दर्जेदार आहे, महेश ची स्वतःची काही निरीक्षणे आहेत काही मोजमाप आहे त्यामुळे कवितेत फाफटपसारा जाणवत नाही. निवडक मोजक्या शब्दात महेशची कविता खूप काही सांगून जाते. महेशला या काव्यसंग्रहाबद्दल खूप खूप शुभेच्छा.

No comments:

Post a Comment