कवी संजय चौधरी

बेरोजगार पावसाळ्याची एक दुपार,सर्व जन शेतात गेल्यामुळे गावातली गल्ली सुनसान झालेली. क्वचितच घरी असलेली एक दोन लहान मुल,त्यांच्यावर ओरडणाऱ्या त्यांच्या आज्या, दाराशी बांधलेल्या शेळ्यांचा येणारा आवाज, कधी येईल ते माहित नसलेली व केव्हा गेली ते आठवत नसलेली लाईट सोबत असण्याचा प्रश्नच नव्हता. दाटून आलेले आभाळ व त्याच्या तोडीस तोड मी मी म्हणणारा घरातील अंधार..घरातील खाट पार दारात नेऊन ठेवली तेव्हा थोड थोड वाचण्यापुरत दिसत होत. अर्थात घरी मी एकटाच त्यामुळे पोटाची व डोक्याची दोन्ही भुका तितक्याच कडकडून लागत, 
त्यातल्या त्यात त्या दिवशी पोटाची व्यवस्था झालेली असावी म्हणून मी अधाशासारखा वाचत सुटलो होतो.पावसाळ्याच्या त्या दिवसात अंगावर गोदडी पांघरून खाटेवर पडल्या पडल्या वाचण्यात जे सुख होत ते तेव्हा दुसर कशातही मिळायचं नाही,कॉलेज नुकतेच संपले होते...बोलण्यासारख आजूबाजूला कोणीच नव्हत,जे होते त्यांचे व माझे विषय सारखे नसल्याने फार वेळ बोलन शक्यच नसे. अक्खा दिवस अंगावर येऊन उभा राहायचा. मग मी तो वाचून वाचून संपवायचो..घरातील पुस्तक तरी किती पुरणार....
शेवट जुने पडलेले पेपर काढले, त्यातल्या त्यात साहित्यिक पुरवण्या बाजूला केल्या अन एकाएक एक तरुणाई सारखे काहीतरी नाव असलेली पुरवणी माझ्या हाती आली. परत मी गोदडी अंगावर घेतली अन पहिलीच ओळ वाचताच सरसरून अंगावर काटा उभा राहिला.....
“मित्र आपलाच एक अवयव असतो,
दुसऱ्या आईच्या पोटी जन्मलेला.”
अन त्या पूर्ण कवितेसह कितीतरी वेळ मी अक्षरशः थिजून पडलो होतो. परत परत मी ती कविता वाचत होतो अन माझे डोळे भरून येत होते, कदाचित त्या माझ्या अवकाशातील पोकळी त्या शब्दांनी भरून काढली असावी. पण हे लिहिणाऱ्या त्या कवीचे नाव कायमसाठी माझ्या मनावर कोरले गेले...तो कवी(नंतर झालेला मित्र) होता संजय चौधरी.
कालांतराने स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्या काळात हे सर्व मागे पडले..मग मध्येच कधीतरी जिंतूरला असतांना अगदीच निरस व कवितेविना जीवन नको म्हणून मग कवितारतीचा अंक लावला, त्यानंतरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या अंकात मला कविवर्य इंद्रजीत भालेराव यांनी संजय चौधरीच्या “माझ इवल हस्ताक्षर” या काव्यसंग्राहवर लिहिलेली समीक्षा वाचायला मिळाली.(चू.भू.दे.घे.) कदाचित भालेराव सर तेव्हा जिंतूरलाच होते.त्यांच्याशी झालेल्या भेटीतच समजल होत कि अशा अशा अंकात सरांनी या संग्रहावर लेख लिहिलेला आहे. त्यामुळे घरी गेल्या गेल्या मी कवितारती शोधून ते समीक्षण वाचायला घेतल अन आजही मला आठवत मधले सर्व शब्द सोडून वाचलेल्या त्या कवितेच्या ओळी कायमसाठी माझ्या मनात रुतून बसल्या..(त्यानंतर मी आवर्जून संग्रह घेतला, वाचला) इतक्या कि त्या कविता लक्षात ठेवण्यासाठी मला काहीच कराव लागल नाही. वाचल्या न ओठात बसल्या इतक्या साध्या शब्दात थेट काळजात घर करून जाणारे शब्द मी प्रथमच वाचत होतो.
जस कि,
“पाउस एकदा हिंदू मुसलमानांच्या दंगलीत सापडला” किंवा 
“गंगेवरची म्हातारी , कातडीला चिकटलेल्या लोकांच्या नजरा धुतेय” किंवा 
“मला मुलगी झाली तर तीच नाव सीता ठेवणार नाही.”
या कविता मलाच नाही तर माझ्या आईलाही खूप आवडल्याच तिने सांगितल. तेव्हा आम्हा शिक्षकांच्या अनेक कार्यक्रमात व त्यानंतर मी उपस्थित असलेल्या अनेक कार्यक्रमात जेव्हा, बिनदिक्कत पणे नाव न घेता,
“ आभाराचे भार कशाला, हे फुलांचे हार कशाला” या ओळी वापरल्या जातात तेव्हा तेव्हा या मित्राच्या कवितेची आठवण तीव्र होत जाते.
आजही संजय चौधरीच्या ज्या कविता वाचनात येत आहेत त्या सर्व “माझ्या इवलं हस्ताक्षर” इतक्याच ताकदीच्या आहेत. तसेच काळाशी सुसंगत आहेत, अधिक धाडशी आहेत, अधिक स्पष्ट आहेत,बदलत्या काळाची भाषा वापरत त्यावर भाष्य करणाऱ्या हि आहेत.
“चंद्र एक अफवा, रात्र सर्वदूर पसरलेलं अफूच शेत, अन तू जहराचा लार्ज पेग” 
“संबंधाची राख उडतेय वाऱ्यावर”
“मी तुला अजून केला नाही साधा स्पर्श पण आरशात पाहशील तेव्हा बरच काही विस्कटलेल असत.- निम्मित valentain डे.
किंवा संपूर्ण सोशल मिडीयावर व्हायरल झालेली त्यांची , “ये रेडीओ का विविध भारती स्टेशन है” अस मनातल ओळखून मनातल्या भाषेत बोलणारी त्यांची कविता असो.
संजय चौधरीच्या आजच्या वाढदिवसानिमित्त हि त्यांची कविता अशीच बहरत जाओ. अधिक काळजाला भिडणारे लिखाण त्यांच्याकडून होत जाओ व आगामी वर्षामध्ये अजून नवनवीन कवितासंग्रह वाचायला मिळो हि मनःपूर्वक सदिच्छा.
- समाधान महाजन.

No comments:

Post a Comment