भाग- पाच

मी मला आठवतोय अगदी जसाच्या तसाच ज्या दिवशी नवोदयला जाण्यासाठी पप्पांसोबत निघालो होतो. बसचा प्रवास करतांना खूप आनंद व्हायचा कधीही कुठेही बसने गावाला जायचे ठरले तर मी खुश व्हायचो, कारण खिडकीजवळ बसून बाहेरचे पळणारे दृश्य पाहून छान वाटायचे. आमचा बराचसा प्रवास हा डोंगरातून झाडांच्या गर्दीतून वाट काढत जाणार्या घाटांच्या वळणदार रस्त्यातून व्हायचा, त्यामुळे गाडी सपाटीवर लागली कि नजरेच्या टप्प्यात जितके सामाऊन  घेता येईल तितका माझा अधाशीपणा वाढलेला असायचा.
आज आजूबाजूला खूप छान छान दिसत होत,हिरवीगार शेतं, बांधांवर गच्च हिरवीगार झाडे जरा लांब पाहिलं तर खूप सार पाणी दिसत होत ती एक मोठी नदी असावी, पप्पांना विचारल तर ते म्हटले कि ती या भागातील एक मोठी नदी आहे , सूर्य बराच कललेला होता त्याचे किरण त्या पाण्यावर पडल्यामुळे पाणी अधिकच चमकत होत.सोनेरी प्रकाश सगळीकडे पसरलेला होता , गाडीच्या काचान्वरून तो पार आतपर्यंत येत होता
आज मी एका नव्या शाळेत जात आहे इतकच माहिती होत. आपल घर सोडून तिथे राहायचं आहे  हे कळत होत पण त्याबाबत फारस दुख नव्हत किंबहुना काहीतरी वेगळ घडणार आहे इतकच जाणवत होत ; ते काय घडणार आहे किंवा कस घडणार हेही माहित नव्हत माझ्यापेक्षा कदाचित घरच्या लोकांना त्रास जास्त होत असावा. निघतांना फार काही नाटकीय रडारडीचे प्रसंग झाले नाही पण  जुनी शाळा सोडतांना फार चमत्कारिक म्हणावं अस वाटत होत म्हणजे हे सोडून कुठतरी चांगल्या ठिकाणी आपला नंबर लाग्लाय त्यामुळे सर्व जन आपल कौतुक करत आहेत व त्यामुळे आपण काहीतरी वेगळे आहोत अशी चांगली भावना मनात निर्माण झाली होती सोबतच्या मित्रांच्या व परीचीतींच्या नजरेतून ते सारख जाणवत असल्याने हे सर्व इतक चांगल सोडून मी जिकडे जाणारेय ते कसय याची जाम उत्सुकता होती.मनातल्या मनात मी त्या शाळेविषयी तेथील वातावरणाविषयी कल्पनाचित्र रंगवत असू बर्याचदा कुठून कुठून वाचलेली वर्णन व पप्पा मम्मीनि सांगितलेली माहिती या मनोभौगोलिक पार्श्भूमिवर मी रंगून जात असे
आज हलक हल्क होऊन मी पप्पांच्या जवळ बसलो होतो. तेही आज वेगळेच वाटत होते नेहमीप्रमाणेचा  वडिलांचा कडकपणा त्यांच्यात थोडाही दिसत नव्हता व त्यांचे हे नवे मउशर वागण्याने मला कसतरीच लाजल्यासारख वाटत होत. कदाचित ते आतून पार लोण्यासारखे मऊ झाले असावेत. पण वरील रुबाब व करारीपणा यामुळे त्यांच्या चेहरयावर ते तस काही जाणवू देत नसावेत.
मग मध्येच गाडी थांबे घेत घेत चालू लागली.माझ्या दोन चार मित्रांचे चेहरे डोळ्यापुढे येऊ लागले. मग एक गाव आले, आम्ही तसे आतापर्यंत खूप छोट्या खेड्यात जिथे झोपड्या व कौलारू घरे असतील अशा ठिकाणी राहत असल्याने हे गाव मला तस खूप मोठ वाटत होत..एसटी हळूहळू बस stand वर आली.उतरण्यासाठी मी पप्पांसोबत उभा राहिलो.एक भली मोठी पत्र्याची पेटी व इतर सटर-फटर सामानाची पिशवी त्यांनी घेतली.एसटी च्या पायऱ्या उतरून जिथे पाय ठेवाल त्या ठिकाणी भल्या मोठ्या खड्यात पाणी साठलेले होते.पप्पांनी कसाबसा तो खड्डा चुकवला.मी त्यांच्या मागे उडया मारत चालत होतो, थोड्याच वेळात लक्षात आल कि ते संपूर्ण बसstand असच खड्डयाखड्ड्यांनी भरले होते,  stand म्हणून जुनाट पत्र्याची एक दोन शेड कशी बशी तग धरून उभी होती जिथे जागा सापडेल तिथे गाड्या उभ्या होत्या व जिथे पाय ठेवायला जागा मिळेल तिथे लोक उभे होते.
एव्हाना पप्पा माझ्या पुढे चक्क डोक्यावर पेटी घेऊन व हातात एक पिशवी घेऊन जोरात चालत होते.ते या बाबतीत माझे हिरो होते त्यांना कोणतेही काम करण्याची कधीच लाज वाटत नसे स्वतःचे काम स्वतः करण्यात कसली अआलीय लाज असे ते म्हणत. मला मात्र मजा वाटत होती, बऱ्याचदा पप्पांच्या ज्या हाताने सणसणीत मार खाल्ल्लेला होता त्याच हाताने ते आज माझा सामान उचलून चालत होते.
कधी एकदाच ते नवोदय कस असत ते मला दिसेल याची जाम उत्सुकता लागली होती मी पप्पांना विचारत होतो,थोड्याच वेळात त्यांनी मागे वळून मला हात करून सांगितल,
‘हे आल’
मी पाहिलं,समोर मोकळ्या मैदानाच्या दोन्ही बाजूंला एल आकारात शाळा दिसत होती, दुरूनच निळ्या रंगात रंगवलेली व पांढऱ्या अक्षरात लिहिलेली एक पाटी दिसत होती , तो नीळा रंग ज्यावर जवाहर नवोदय विद्यालय अस लिहिलेलं ती माझ्या आयुष्याची एक मोहोर बनून जाणार आहे हे तेव्हा कुठ मला ठाऊक होत.
आम्ही समोरच्या ऑफिसकडे चालू लागलो, काहीजण शाळेच्या ड्रेस मध्ये तर काही चक्क वेगवेगळ्या रंगातील बनियन व सफेद pant  मध्ये दिसत होती, हा एक  नवीनच प्रकार मी पाहत होतो.
इतक्यात पप्पानी मला आत बोलवलं.
- समाधान महाजन 

No comments:

Post a Comment