रिटर्न ऑफ अ किंग - विलियम डेलरीम्पल

विलियम डेलरीम्पल यांचे इतिहासावरील जी प्रसिध्द पुस्तके आहेत त्यात रिटर्न ऑफ द किंग हे पुस्तक प्रसिद्ध आहे. अफगाणिस्तानच्या ब्रिटीश सबंधावरील हे पुस्तक आहे. पहिले अफगाण युद्ध यात आहे. या पुस्तकासाठी लेखकाने मूळ कागदपत्र शोधली. अहवाल, पत्र, ब्रिटिश लोकांच्या रोजनिशी, ब्रिटनच्या गृह विभागातील कागदपत्र, दिल्लीतील इंडियन नॅशनल अर्काइवज म्हाधून ब्रिटिश अहवाल शोधून त्यांचा वापर केला. अलेक्झाडर बर्न्स याची कागदपत्र व पत्र. तसेच शाहशुजा यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक ‘वाकियत ई शाहशुजा’ याही पुस्तकाचे त्यांनी अभ्यासपूर्ण अंतर्भाव यात केला आहे. 1842 मध्ये त्याचा खून झाल्यानंतर त्याच्या अनुणयाने सुधारित आवृत्ती तयार केली. सर्वात महत्वाचे म्हणजे त्या काळात ब्रिटीश लोकांनी स्रियांनी वा अफगाण लोकांनी लिहिलेल्या आठवणी, त्यांच्या डायऱ्या या सर्वांची नोंद आवश्यक त्या ठिकाणी लेखकाने केली आहे. उदाहरणर्थ ऑकलंडच्या बहिणीने लिहिलेली डायरी, आफगानिस्थान मध्ये गेलेल्या मिसेस सेल ची डायरी, मोहनलालची डायरी यांचा प्रभावी वापर याठिकाणी केला आहे. 

 विल्यम डेलरीम्पल यांचे रिटर्न ऑफ किंग हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद मेहता प्रकाशनाकडून अंजनी नरवणे व सुनीती काणे यांनी केला आहे. अनुवाद देखील चांगला, सुंदर व ओघवता आहे पण विलियमने आपले मूळ पुस्तक लिहितांना जे संदर्भ नंबर प्रत्येक पेज वर दिलेले आहेत ज्याचे  डीटेल्स मागे आहेत. त्या मूळ पुस्तकाचे नाव किंवा त्याचे लेखक, पेज नंबर व जिथे शक्य आहे तिथे त्याचे मूळ वाक्य असे सगळे आहे. ते मराठी अनुवादात नाही. ते असते तर अधिक बरे झाले असते. खर तर इतिहासाच्या पुस्तकाचे तेच खरे सौंदर्य असते. असो, 

• शाहशुजा व त्यांच्या समकालीन लोकांनी अफगाणिस्तान हा शब्द कधीही वापरला नाही. त्यांच्या दृष्टीने ते काबुल चे राज्य होते. 1839 मध्ये ब्रिटिशांनी अफगाणिस्थान वर आक्रमण केले व अहमद शाह अब्दालीचा नातू शाहशुजा उल मुल्क याला पुन्हा गादीवर बसवले. हे पहिले अफगाणिस्थान युद्ध होते. 1842 ला त्यांना काबुल सोडावे लागले.

• शाहशुजाचे आजोबा अहमदशाह अब्दाली याने 1747 मध्ये अफगाणिस्तानची स्थापना केली अशी समजले जाते. दिल्ली लुटलेल्या नादिरशाहच्या संपत्तीचा ताबा अब्दालीने घेतला होता. शेवटी त्याला कॅन्सर किंवा कुष्ट टाईप आजार झाला होता. जो चेहऱ्यावर होता. 1761 मध्ये पानिपत च्या वेळेस त्याचे नाक नश्ट झाल्यामुळे नाकाच्या जागी हिरेजडित वस्तू बसवलेली होती. (पेज ९)

• अहमदशाह अब्दाली याचा लहान मुलगा तैमूरशाह याने नंतर गादी सांभाळली. त्याने देशाची राजधानी कंधारहून काबुल ला नेली.  तैमुरला 24 मुले होती त्यांच्यात सत्तेसाठी संघर्ष झाला. अखेर शाह झमन गादीवर आला. (१०) 1797 मध्ये झमन ने भारतावर स्वारी करण्याचे ठरवले. त्याला टिपू सुलतान कडून देखील बोलावणे आले होते. तो लाहोर पर्यंत आला. पण ब्रिटिशांनी वेलस्ली ने पर्शियाला मदत पाठवून त्याच्या पिछाडीवर हल्ला करण्यास लावले. झामान ने माघार घतली व जातांना 1799 मध्ये  लाहोर च्या गव्हर्नर पदी रणजित सिंग ला बसवले. माघार घेतांना झेलम नदीच्या पात्रात अडकलेल्या तोफखाना काढण्यास रणजित सिंग ने शाहशुजा ला मदत केली होती. (११)

• शाहशुजा हा आताच्या हमीद करझाई प्रमाणे पोपलझाई या उपजमातीचा होता तर शाह शुजा चे प्रतिस्पर्धी विरोधक हे घिलझाई टोळीचे होते. आताचे तालिबानी व त्यांचा नेता मुल्ला ओमर हा घीलझाई टोळीचा आहे.

• 1842 साली ब्रिटिशांचा पराभव झाला त्यानंतर देखील फार काळ कोणाची सत्ता अफगाणी स्तान मध्ये टिकली नाही. काबूलमधील परदेशी वाकीलातींच्या विभागाचे नाव आजदेखील ब्रिटिशांना पराजित करणाऱ्या नेत्यांच्या नावावरून दिली आहेत. मुल्ला ओमर ने शाह शुजा चा आदर्श न ठेवता दोस्त महमदचा आदर्श समोर ठेवला.

• अफगाणिस्तानवर आक्रमण करण्याचे कारण रशिया फ्रान्स युद्धात होते. 1807 मध्ये फ्राईडलंड लढाईत नेपोलियन ने रशियाचा पराभव केला. रशिया व फ्रान्स यांच्यात झालेल्या कराराला ' पिस ऑफ टिल्सिट ' म्हटले जाते. टॉलस्टॉय च्या पहिल्या कादंबरीचे पहिल्या खंडाचे नाव बिफोर टिल्सिट असे आहे. या तहात ब्रिटिशांना चिंताजनक असे कलम होते ते म्हणजे ब्रिटिशांच्या संपत्तीच्या मूळ स्रोत वर फ्रेंच रशियन संयुक्त हल्ला करण्याचे. अर्थात इंग्लंडच्या मालकीचा सर्वात श्रीमंत देश होता भारत. भारत ताब्यात घेऊन ब्रिटिशांची संपत्ती कमी करून त्यांची वाढती आर्थिक सत्ता नष्ट करणे ची नेपोलियन ची ईच्छा होती. ( पेज 5) कैरो वरून त्याने टिपू सुलतानाला मदतीचे आश्वासन देणारे पत्र लिहिले होते. (पेज 6)

• गव्हर्नर लॉर्ड मिंटो ने याची दखल घेऊन त्याच्या मार्गात येणाऱ्या चार वेगवेगळ्या देशांच्या वकीलातीवर आपले दुत पाठवले. त्यातील शाह शुजा कडे माऊंट एल्फिन्स्टन याला पाठवले. जो नंतर महारष्ट्रत आला.

• शाह झमन हा शाहशुजा चा मोठा भाऊ होता. झमनला आंधळे बनवून सत्तेवर काढले तेव्हा शुजा 14 वर्षाचा होता. एल्फिन्स्टन सोबत शुजा ची चर्चा अनेक दिवस सुरू होती. त्याच्या राज्याचा जो भाग नेपोलियन ने पर्शियाला देण्याचे वचन दिले होते त्याचे रक्षण करण्यासाठी त्याला ब्रिटिशांच्या मदतीची गरज होती (२२)

• 1803 ला शुजा कडे सत्ता येताच त्याने प्रथम भावाला सोडवले. त्याला ज्याने आंधळे केले होते त्याला न मारता तुरुंगात ठेवले. तो तेथून पाळला व बरक्झाई टोळीला जाऊन मिळाला जे शुजचे शत्रू होते. 

• बरक्झाई व साडोझाई यांच्यात वैर होते. बरक्झाई टोळीचा प्रमुख हा शुजचे वडील तैमूर चां वजीर पाईंदा खान  होता. तैमूर गेल्यावर झमन ला सत्ता मिळवून देण्यात त्याचा मोठा हात होता. पण लवकरच तो बंड करत असल्याचे कळताच त्याला व त्याच्या सोबत्यांना झमनने ठार मारले. त्यातून या दोन टोळ्यात यादवी सुरू झाली.

• पायिंदा खानच्या किझिल्बाश जमातीच्या बायकोचा मुलगा दोस्त महमद हा वेगाने नेता म्हणून पुढे येत होता. शाहशुजाच्या हाती 1803 मध्ये सत्ता आली तेव्हा त्याने बरक्झाई सोबत वैर संपवण्यासाठी प्रयत्न केले. शुजाने त्यांची बहीण वफा बेगमशी लग्न केले.

• 1809 मध्ये शुजा व एल्फिन्सटन तह करत होते तेव्हा बरक्झाई बंडखोरांनी काबुल ताब्यात घेतले होते. प्रत्येक माणूस एक खान असतो व प्रत्येक तेकडीमागे एक बादशाह असतो. सबंध चांगले ठेवण्यासाठी व मार्गाचा वापर करण्यासाठी मुघल देखील या टोळ्यांना पैसे देत असत.

• निम्ला येथे शहाहुजाचा पराभव झाला. अटोक या ठिकाणी त्याला कैद करण्यात आले. नंतर रणजितसिंह ने त्याला लाहोरला नेले. येथे शुजकडून कोहिनूर रणजितसिंह ने ताब्यात घेतला. तरी त्याला सोडले नाही. कैदेतून पलायन केले. 1816 ला तो लुधियाना या ठिकाणी आला. डेव्हिड ऑक्टरलोनी हे तेथील ब्रिटिश प्रतिनिधी होते.

• 1825 मध्ये ऑक्टरलोनी मरण पावला. त्याच्या जागी लुधियाना चा ब्रिटिश प्रतिनिधी आला कॅप्टन क्लोड मार्टिन वेड. तो बंगालमध्ये जनमला होता. पर्शियन भाषेचा अभ्यास होता. फ्रेंच प्रवासी क्लोड मार्टिन ने वेडच्या वडिलांना आर्थिक मदत केली होती म्हणून वडिलांनी कलोड मार्टिनाला आपल्या मुलाचा धर्म पालक करून त्याचे नाव क्लोडला दिले होते होते. या फ्रेंच संबंधांमुळे त्याला शीख रणजितसिंगच्या दरबारी सबंध ठेवण्याचे काम मिळाले. 

• एलेनबरोला विश्वास होता कि, सिंधू नदी हि ब्रिटिशांना मध्य आशियात जाण्यासाठी प्रमुख दळणवळणचा प्रमुख मार्ग होऊ शकेल. (५६)

• अलेक्झांडर बर्न्स याला महाराजा रणजितसिंग याच्याकडे घोडे भेट म्हणून घेऊन गेला. हे सहा घोडे सफोक प्रांतातले होते. बर्न्स हा उत्तर स्कॉटलंड मधील होता. तो पर्शियन व हिंदुस्थानी भाषा बोलत असे. बर्न्सचे १८ जुलै १८३१ रोजी लाहोरमध्ये स्वागत करण्यात आले. बर्नेससाठी रणजितसिंगने दोन महिन्यांचे करमणुकीचे कार्यक्रम आखले. 

• लुधियानाचा गव्हर्नर क्लॉड वेड याला मात्र बर्नेसच्या वागण्याचा काहीच परिणाम झाला नाही. एकीकडे बर्नेस दोस्त महम्मदशी आणि बराकझैंशी मैत्रीपूर्ण संवाद करत होता. आणि त्याच वेळी ब्रिटीश सरकारच दुसरीकडून गुप्तपणे त्याच्या विरुद्ध बंडाला मदत होते. 

• शाह्शुजाचे चार मोठे पराभव झाले. निम्ला येथील मोगल गार्डन्समध्ये त्याच्या सैन्यावर झालेला हल्ला. काश्मीरच्या बर्फात गोठलेल्या अवस्थेत झालेला दुसरा हल्ला, त्याच्या स्वतःच्याच दारुगोळ्याचा स्फोट होऊन झालेला तिसरा हल्ला, कंदाहारच्या बागांमध्ये झालेल्या हल्ल्याने झालेला पराभव. बराकझैंच्या मदतीने रशियन जर सरळ अफगाणिस्तानात आले तर ब्रिटीशांच्या मदतीसाठी शुजा हा महत्वातावाचा हुकुमाचा एक्का होता. (७४)

• लेफ्टनंट हेन्री रोलीन्सनला भारताच्या फलटणीतून पर्शियाला गुप्तहेर म्हणून पाठवले होते. पर्शियातील रशियाचे वाढते महत्व कमी करण्यासाठी त्याला तेथे खास पाठविण्यात आले होते. तो तेथे तीन वर्ष राहिला. पर्शियाच्या सेनेला प्रशिक्षण देणे आणि शस्र देणे व त्यांना ब्रिटीशांच्या बाजूने वळवून घेण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता. तेथे त्याने हे काम करत असतांनाच बेहीस्ताना येथील अकेमिनियम राजा डारीयासच्या हुकुमावरून रोझेटा शिलांवर तीन भाषांमध्ये कोरलेला मजकूर अभ्यास पूर्वक प्रय्त्नानानी वाचला. पुढील आयुष्यात रोलीन्सन दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध झाला एक त्या खडकावर कोरलेल्या लिपीचा अर्थ लावण्यासाठी व दुसरे म्हणजे द ग्रेट गेम हा शब्दप्रयोग वापरात आणण्यासाठी. 

• अलेक्झांडर बर्नेस ने ‘travels इन टू बुखारा’ हे पुस्तक लिहिले त्यामुळे बब्रिटनच काय तर जगात देखील त्याला प्रसिद्धी मिळाली. लॉर्ड एलेनबरोला भेटण्यासाठी त्याला लंडनहून बोलावणे आले. त्याच्या पुस्तकाचा फ्रेंच अनुवाद देखील प्रसिद्ध झाला. बर्नेसला काबूलला पाठवण्याचा निर्णय नवीन आलेला गव्हर्नर लॉर्ड ऑकलंड याने घेतला. रशियाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. 

• १८३४ मध्ये शाहशुजाच्या हल्ल्याचा समाचार घेतल्यानंतर दोस्त महमदने त्याचे लक्ष अफगाणिस्तानची हिवाळी राजधानी शिखांच्या ताब्यातून सोडवण्याकडे वळवले होते. फेब्रुवारी १८३५ मध्ये त्याने स्वतःला ‘अमीर अल मुमिनीन’ हा इस्लामी धर्माचा किताब घेतला. शाह्शुजाचे आजोबा अहमदशाह अब्दालीला जून १७४७ मध्ये एका सुफी संताने विधी करून हा किताब दिला होता. हाच किताब नंतर तालिबानच्या मुल्ला ओमरने १९९६ मध्ये घेतला होता. दोस्त महमद त्याचा आदर्श होता. (९७) दोस्त महमदने शिखांच्या विरुद्ध जिहाद पुकारला.

• लॉर्ड ऑकलंडचे नाव जॉर्ज एडेन होता. तो एक व्हिग सरदार होता. त्याला भारताचा इतिहास व संस्कृती यांचे ज्ञान नव्हते. त्यांची माहिती घेण्याचे देखील त्याने कष्ट घेतले नाही. पूर्वी तो नौदलात नोकरीला होता. त्याचा सल्लागार होता विल्यम macknaghaten आणि दोन खाजगी सचिव हेन्री टोरेंस व जॉन कोल्व्हीन.(१११) जॉन कोल्व्हीन वर तो जास्त अवलंबून राहत असे. त्यामुळे त्याचे खालचे लोक त्याला लॉर्ड कोल्व्हीन म्हणत असत. त्याच्या बहिणी एमिली व फेंनी हेडन. एमिली हेडनने डायरी लिहिली आहे. (११२)

• लॉर्ड ऑकलंडला दोस्त महमद मध्ये फारसा रस नव्हता पण दोस्त महमद त्याच्याशी सबंध ठेवण्यास उत्सुक होता. Macknaghaten ला देखील त्यांच्यात काही करार व्हावा असे वाटत नव्हते. वेड व macknaghaten जी माहिती अफगाणिस्तान बद्दल ऑकलंडला देत होती तीच त्याला माहिती होती. बर्नेस पाठवत असलेली माहिती थेट त्याच्यापर्यंत पोहचत नव्हती. वेड हा लुधियाना येथील गव्हर्नर होता. तो बर्नेसच्या अहवालाला जोडून स्वतःचा रिपोर्ट पटवत असे. (११६) या सर्वांमुळे ऑकलंडचे निर्णय चुकीचे होत गेले. त्याच्यापर्यंत मूळ व सत्य बातम्या पोहचत नव्हत्या. 

(या सर्व प्रकारातून एक नक्की कळते कि सत्तेच्या टोकावर असलेली व्यक्ती ज्याकडे निर्णय घेण्याची पूर्ण ताकद असते त्याने आपले निर्णय आपल्या खालच्या माणसांच्या पूर्ण भरवश्यावर न करता स्वतःची लिंक रूट लेव्हलला ठेवणे गरजेचे असते अन्यथा सत्यापासून फारकत घेणे होते. दुसरी गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान किती महत्वाचे आहे. पत्र घेणे व देणे यात काही महिन्यांचा कालावधी निघून जात असे. त्यामुळे सर्व घटना नियंत्रणात राहत नसत. आज बर्नेस असता तर तेच रिपोर्ट तत्काळ देता आले असते. Without mediator.)

• बर्नेसचे म्हणणे न ऐकल्याने लवकरच हेरतला पर्शियाचा वेढा पडला. पश्चिम अफगाणिस्तानवर पर्शियन लोक आधीपासूनच हक्क सांगत होती. १८०५ मध्ये त्यांनी हेरत ताब्यात देखील घेतले होते. १८३२ ला हल्ल्याचा plan केला होता. आताच्या या हल्याची तयारी देखील बरीच वर्ष सुरु होती. तसेच रशियाच्या झारने काबूलला एक वकील पाठवला होता त्याचे नाव होते कॅप्टन व्हिक्टोव्हीच. जो दोस्त महमदला रणजितसिंगशी लढण्यास पैसे देणार होता. त्याची व बर्नेसची भेट देखील झाली. पण इकडे ऑकलंडला अजूनही परिस्थितीची पूर्ण कल्पना आली नाही. 

• या सगळ्यात बर्नेसने मार्ग काढला कि, हेरतचा पराभव झाला व पर्शियाचे सैन्य अफगाणिस्तानवर आले तर बरकझैंना रक्षणासाठी तीन लाख रुपये देण्याचे त्याने वचन दिले. इकडे दोस्त महमदची ब्रिटिशांच्यासोबत करार करण्याची इच्छा होती. त्याचा बर्नेसवर विश्वास होता. व्हिक्टोविच ला त्याने जवळपास नजरकैदेत ठेवले होते. अखेर ऑकलंड कडून पत्र आले पण ते याबाबत कोणतीही जबाबदारी न स्वीकारणारे ठरले. बर्नेस एकटा पडला. निराश झाला. पर्शिया, मध्य आशिया ते थेट अफगाणिस्तान असा मोठा प्रदेश ऑकलंडच्या एका संदेशाने ब्रिटिशांनी सोडून दिल्यासारखे झाले.(१२४) 

• मोहनलाल-  हा बर्नेसचा सचिव व सल्लागार होता. दोघांची भेट १८३१ मध्ये दिल्लीत झाली. तेव्हा मोहनलाल २० वर्षांचा होता. वीस वर्षांपूर्वी त्याचे वडील एल्फिन्स्टनच्या वकिलातीत सचिव होते. त्यांनी मोहनलालला दिल्ली कॉलेजमध्ये इंग्रजी शिक्षण दिले. मोहनलाल हुशार होता. त्याला इंग्रजी, उर्दू, काश्मिरी व पर्शियन अशा सर्व भाषा उत्तम येत होत्या. बर्नेसचा मोहनलालवर पूर्ण विश्वास होता. मोहनलालने त्याच्या प्रवासावर पुस्तक लिहिले. दोस्त महमदचे दोन खंडात ९०० पानी चरित्र लिहिले. 

मेक्नेघटेनला मदत करण्यासाठी त्याने स्वतःच्या नावाने मोठे कर्ज घेतले होते. त्याचे आयुष्य कर्जात गेले. न्याय मिळण्यासाठी तो ब्रिटनला गेला. लंडनहून दिल्लीला परत गेल्यावर त्याला नोकरी मिळाली नाही. त्याच्या काश्मिरी पंडित समाजाने देखील त्याला वाळीत टाकले. १८५७ च्या विद्रोहाच्या वेळेस शिपायांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना वाटायचे तो ब्रिटीशांच्या बाजूने आहे. १८७७ मध्ये दरिद्री व उपेक्षित अवस्थेत तो मरण पावला.(४८२)

• इकडे ब्रीटीशांसोबत मैत्रीचा करार न झाल्याने दोस्त महमद व व्हीक्तोव्हीच यांची भेट झाली. बर्नेसचे दोस्त महमदसोबत चांगले सबंध होते पण त्याला फारसा प्रतिसाद भारतातून न आल्याने तो काहीच करू शकत नव्हता. इकडे ऑकलंडने दोस्त महमद विषयी चुकीचा अहवाल ब्रिटिशांना पाठवला. शाहशुजाला सत्तेवर बसवण्याचे त्यांचे विचार सुरु झाले. 

• सिमला – या काळात गव्हर्नर जनरलचे वास्तव्य सिमला येथे होते. वर्षातले सात महिने या हिमालयातल्या खेड्यातून कंपनी एक पंचमांश मानवजातीवर राज्य करत होती. हे खेड तिबेटच्या सरहद्दीवर होते. शेळ्या बकऱ्यांची पायवाट असते त्याहून जरा बऱ्या रस्त्याने बाहेरच्या जगाशी जोडलेले होते. १८२२ मध्ये कॅप्टन चार्ल्स केनेडीला हि जागा सापडली. तेव्हापासून वीस वर्षामध्ये कंपनीने एक अरुंद पठारावर ‘कल्पनेतले इंग्लंड’ बांधायला सुरुवात केली. गोथिक पद्धतीच्या चर्चेस, अर्ध बांधकाम लाकडाचे असलेली लहान घरे, स्कॉटीश पद्धतींचे उमरावांचे मोठे महाल येथे बांधण्यात आले होते. 

• १८३८ मध्ये मेकनेघटेन रणजितसिंग सोबत करार करण्यात यशस्वी झाला. त्यावेळी बर्नेस व मेस्सन दोन्ही होते. ब्रिटीश व रणजितसिंग मिळून शुजाला गादीवर बसवण्याचे ठरले. शुजा या वेळी लुधियाना मध्ये होता. जुलै १८३८ मध्ये मेकनेघटन तेथे गेला व शुजा सोबत १६ जुलैला त्रिपक्षीय करार केला. यालाच ट्रायpartaait अलायन्स म्हणून पुढे ओळखले जाऊ लागले. (१४०)

• १ ऑक्टोबर १८३८ रोजी ऑकलंडने एक घोषणा केली. जिला नंतर सिमला जाहीरनामा म्हणून ओळखले जात या घोषणेत त्याने अधिकृतरीत्या युद्ध पुकारले. अफगाणिस्तानमध्ये शाहशुजाला पुन्हा सत्तेवर स्तापित करण्यास भाग पाडणे हा ब्रिटनचा हेतू आहे असे जाहीर केले. (१४३) 

• ज्याला ब्रिटीश इतिहासकारांनी पहिल्या अफगाण युद्धाची सुरुवात म्हटले तो शाहशुजाचा त्याचे राज्य मिळवण्याचा चौथा प्रयत्न होता. दोन वेगवेगळ्या फलटण तयार केल्या दोन्ही पुढे काबुल मध्ये येऊन मिळणार होत्या. ‘आर्मी ऑफ द एन्ड्स’ असे नाव या सेनेला दिले होते. सेना तिथे पोहोचण्याच्या आधीच कंदहारमधून रशियन राजदूतला माघारी बोलावण्यात आले होते. पर्शियातील रशियन वकील देखील काढून टाकण्यात आला होता. तेव्हा दोन्ही धोके संपलेले होते. (१४९-५०)

• ज्याने नंतर अफगाण युद्धाचा इतिहास लिहिला तो सर जॉन के हा तेव्हा तोफखान्यातील प्रमुख अधिकारी होता. आर्मी ऑफ एन्ड्स मध्ये एक हजार युरोपियन, चौदा हजार इस्ट इंडिया कंपनीचे सैनिक होते. तसेच शुजाचे सहा हजार भाडोत्री सैनिक होते. २७ नोव्हेंबर १८३८ रोजी शिकारपूर येथे शिखांचे व कंपनीचे सैन्य एकत्र आले. 

• कलात प्रांताचा प्रमुख मेहरब खान अलेक्झांडर बर्न्स याला सांगतो, ‘तुम्ही या देशात सैन्य तर आणले आहे, परंतु तुम्ही ते परत कसे नेणार आहात?’ हे वाक्य नंतर भरपूर प्रसिद्ध झाले. अल कैदाच्या गुन्हेगारांचा वकील जावेद पराचा लेखक विलियम डेलरीम्पल हेच वाक्य २००३ मध्ये ऐकवतो जेव्हा अमेरिका हमीद करझाई चे सरकार स्थापन करत होती. (१६२)

• बोलन खिंडीतून जाणाऱ्या सैनिकांचे हाल झाले. कंदाहारचे वैभव अहमदशाह अब्दाली याने मिळवून दिले होते. नादीरशहाने १७३८ मध्ये जाळून नासधूस केलेल्या जुन्या कंदहारच्या जागी त्याने नवे शहर उभे केले होते. 

• ८ मे १८३९ रोजी शाहशुजा ला अफगाणिस्तानचा शासक म्हणून बसवण्यात आले. आर्मी ऑफ द एन्ड्सने त्याला सलामी दिली. त्यानंतर देखील शाहशुजाचे शासन स्थिर राहावे यासाठी ब्रिटीश सैन्य तेथेच ठेवावे असा निर्णय ऑकलंडने घेतला. 

• ८ मे १८३९ या दिवशीच रशियन एजंट व्हीकटोव्हीच याने आत्महत्या केली. सेंट पीटर्सबर्ग येथे. तो चौदा वर्षांचा असतांना हद्दपार करून त्याला रशियातील विस्तीर्ण उजाड माळरानावर कामाला पाठवले होते.तेथे अनेक अडचानिनंना तोंड देत तो अखेर गुप्तहेर झाला. ब्रिटीश प्रतिनिधी बर्नेसवर मात करून त्याने बराकझाईशी मैत्री केली होती. पण त्याने तिथे केलेल्या प्रय्तनांची दखल न घेता ब्रिटीश यशस्वी होत असल्याचे बाह्य रूप पाहून इकडे रशियात त्याला दुर्लक्षित करण्यात आले. इकडे मदतीच्या अपेक्षेने असलेल्या अफगाणाकडून त्याची अवहेलना होत होती. (१९९-२००)

• २७ जून १८३९ मध्ये महाराजा रणजितसिंग याचा मृत्यू झाला. त्याच दिवशी आर्मी ऑफ द इंडसने कंदाहारमाधीन काबुलकडे कूच केली. मृत्यूपूर्वी त्याने आपला प्रसिद्ध कोहिनूर हिरा एका गुरुद्वाराला दिला. त्याच्या चार सुंदर बायका व पाच काश्मिरी दासी त्याच्याबरोबर सती गेल्या. एमिली एडन सिमल्याला कंदाहारचा विजय साजरा करत होती. (१७९)

• यानंतर गझनीचा किल्ला ब्रिटिशांनी जिंकून घेतला. ३ ऑगस्ट १८३९ रोजी दोस्त महमद पळून गेल्याची बातमी ब्रिटीश छावणीत पोहोचली. त्यानंतर काबुलपर्यंत अंतर कापायला सैन्याला आणखी तीन दिवस लागले. फिरोजपुर सोडल्यापासून आठ महिन्यांनी ७ ऑगस्टला ‘आर्मी ऑफ द एन्ड्स’ अफगाणिस्तानाच्या राजधानीत काबुल मध्ये पोहोचली. 

• इकडे लंडनमध्ये ब्रिटीशांच्या विजयाचा उत्सव होऊ लागला. ‘द स्टोर्मींग ऑफ गझनी; हा नवा नृत्यप्रकार लंडनमध्ये गाजू लागला. पंतप्रधान लॉर्ड मेलबर्न म्हणाले कि, मेकनेघटन हाच खरा अफगाणिस्थानचा राजा होता. त्याला वेड व किन याला बरन व ऑकलंड ला अर्ल हि उपाधी दिली गेली. सिमल्याला बॉलडान्स समारंभ झाला. काबुलमध्ये देखील उत्सव झाला. शाहशुजा म्हणत असे कि इंग्रजांचा पाहुणा म्हणून तो तीस वर्ष राहिला.. त्याची परिस्थिती बादशाह हुमायूनसारखी होती. (२०४-२०५)

• सुमारे ७० हजार वस्ती असलेले काबुल त्या वेळी १८३९ मध्ये मध्य आशियाचे सर्वात मोठे व्यावसायिक प्रवेशद्वार होते. तसेच त्या प्रदेशातील व्यापारी काफिल्यांचे मुख्य केंद्र होते. (२०५) चाहर सुख नावाच्या कमानीखाली बाजार होता. १६४० ला आग्रा येथे ताजमहाल बांधला जात असतांना शाहजहानचा गव्हर्नर आली मर्दन खान याने हि कमान बांधली होती. नोव्हेंबर अखेरपर्यंत पहिली फलटण शिमला येथे पोहचली.. 

• इकडे बाला हिसार मध्ये शाहशूजचे प्रस्थापन होत असतांना दोस्त महमद खान उत्तरेकडे गाशा गुंडाळून निघाला होता.. त्याच्या मागे होते जेम्स ऑट्रम व जॉर्ज लॉरेन्स. दोस्त महमद खान पुन्हा बुखाराकडे यायला निघाला. 

• शाह्शुजाने जलालाबाद हि हिवाळ्यातील राजधानी बनवली होती. मेक्नेघटन त्याच्यासोबत होता. ब्रिटीश अधिकारी आणि अफगाण स्रिया यांच्यात विवाहसबंध होऊ लागले. कॅप्टन वॉरबर्टन आणि दोस्त महमदची भाची शहाजहान बेगम यांचा विवाह झाला. या लग्नात बर्नेस व लेफ्टनंट स्टर्ट हे साक्षीदार होते. या जोडप्याला झालेला मुलगा पुढे सर रोबर्ट वॉरबर्टन झाला. त्याने खैबर मध्ये १८७९ ते १८९८ मध्ये फ्रंटीयर फोर्सचे नेतृत्व केले. आणि द खैबर रायफल्सची स्थापना केली. (२२३)

• मार्च १८४० मध्ये शाहशुजा त्याच्या हिवाळी निवासस्थानाहून परत आला व बाला हिसारच्या राजवाड्यात पुन्हा दरबार सुरु झाला. दोस्त महमद बुखारामध्ये अंधारकोठडीत शिक्षा भोगत होता. नंतर तो तेथून निसटला व जिहादचे निशाण त्याने उभे केले(२३९)त्याचा मुलगा अकबर खान मात्र पकडला गेला. दोस्त महमदने खान कबीरच्या मदतीने सुफी फाकीरासारखा वेश धारण केला. अनेक दिवस तो उंटांच्या काफिल्यात राहिला.(२४०) नंतर मित्र अमीर मीर वालीकडे गेला. व ब्रीतीशान्विरुद्ध युद्ध सुरु केले. त्यांच्यात दोन महिने लढाई सुरु होती. लहान मोठ्या तेरा लढाया झाल्या. 

• चार नोव्हेंबर १८४० ला दोस्त महमद ब्रिटिशांना शरण आला. त्याला भारतात पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. इकडे भारतातील ब्रिटीश कलकत्त्याचा खजिना रिकामा होत आला होता. अफगाणिस्तानच्या मोहिमेचा खर्च प्रचंड होता. १८४१ पर्यंत या एकत्रित खर्चाची रक्कम वर्षाला वीस लाख पौंड इतकी होती. चहा व अफूच्या व्यापारातून इस्ट इंडिया कंपनीला होणाऱ्या नफ्यापेक्षा कितीतरी जास्त होती. (२६५) ऑकलंडने मेकनेघटनला पत्र लिहिले कि तिकडचा खर्च कमी करावा. इकडे अफगाणिस्तानात ब्रिटीशांच्या बायका येण्यास सुरुवात झाली होती. मेकनेघटनची पत्नी फ्रान्सेस, जनरल सेल ची पत्नी फलोरेन्तिना.

• वाढलेल्या महागाईने पैशांची किमत कमी होऊ लागली होती. काबुल मध्ये राहनारे ४५०० लोकांचे सैन्य आणि त्यांचे काम करणारे ११५०० लोक यामुळे अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेवर बोजा पडला होता. इकडे लंडन मध्ये फक्त एका मताने टोरी पक्षाचे सरकार आले होते. प्रधानमंत्री होते रोबर्ट पिल.

• इकडे अफगाणिस्तानमध्ये बंडाळी माजली असतांना मेकनेघटनला लॉर्ड ऑकलंडने मुंबई गव्हर्नरची जागा व मलबार हिल वरील गव्हर्नरचा बंगला याची सोय केली होती. तो जर तिकडे गेला असता तर इकडची जागा बर्नेसला मिळण्याची शक्यता वाढली होती. त्याला येथील बरीच माहिती होती. पण त्याच्या विषयोपभोग व ऐषआराम अशा वर्तणुकीमुळे अफगाणिस्तानातील लोक त्याचा तिरस्कार करू लागले होते. त्याच्याबद्दल आजही हेच मत आहे. अफगाणिस्तानमधील लोकांनी लिहिलेल्या हकीकतीवरून काबुलमध्ये शेवटी सर्वनाशाचा जो स्फोट झाला त्याचे कारण त्याचे हे वागणे आहे. (२९०) 

• १ नोव्हेंबर १८४१ रोजी बर्नेसला मारण्यात आले. दोनशे अफगानाणी तलवारीने त्याच्या शरीरातील हाडांचे तुकडे केले. त्याचे धड रस्त्यातील कुत्र्यांना खायला तेथेच टाकले.(३०४) लावलेल्या आगीत कॅप्टन बरोडफुट जळून मरण पावला. लेफ्टनंट चार्ल्सला मारण्यात आले. छारीकारमध्ये असलेल्या ७५० लोकांच्या सैन्यापैकी फक्त एल्ड्रेड पोंटीगर आणि जॉन हॉगटन हे दोघेच वाचले होते. (३२८)

• मेकनेघटन, लॉरेन्स, ट्रेव्हर व मेकेन्झी हे काबुल नदीकाठी अकबरखानाला भेटले. त्यांच्यात करार झाला. १४ डिसेंबर १८४१ला ब्रिटिशांनी तेथून निघायचे होते. त्यांच्या सुरक्षेची हमी दिली जाणार होती. कॅप्टन ट्रेव्हरला ओलीस म्हणून तेथे ठेवले जाणार होते. जलालाबाद, गझनी व कंदाहार येथील सैन्यानेहि बाहेर पडायचे होते. मोठ्या रकमेच्या बदल्यात धान्य, अन्न व मालवाहू उंट, घोडे ब्रिटिशांना प्रवासात दिले जातील असे ठरले. (३४१) या सर्व काळात शाहशुजाला काहीच विचारण्यात आले नाही. 

• लंडनमध्ये टोरी पक्षाचे सरकार आल्यामुळे लॉर्ड ऑकलंडने गव्हर्नर जनरल पदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या जागी लॉर्ड एलेनबरोची नेमणूक झाली होती. इकडे ब्रिटीशांची अवस्था बघून अकबरखान याने त्याच्या मागण्या अजून वाढवल्या. मेक्नेघटनची हत्या क्रूरपाने करण्यात आली. शीर धडावेगळ केले. बाजारात लटकवून ठेवले. कॉलीन मेकेन्झी व लॉरेन्स हे दोघे पळून जात असतांना त्यांना मारण्याचा प्रयत्न होत होता. (३५३)

• ६ जानेवारी १८४२ काबुल मधून माघार घेण्यास सुरुवात झाली. एल्ड्रेड पोंटीगर हा मेकनेघटनच्या मृत्युनंतर जिवंत असलेला सर्वात वरिष्ठ राजकीय अधिकारी होता.  जॉर्ज लॉरेन्स हा आणखी एक अधिकारी जिवंत होता.   लेडी सेल व तिची मुलगी या दोघींना कॅप्टन लॉरेन्सने संरक्षण दिले होते. लेडी सेल ने तर अनेकदा अशा आठवणी जिवंत वाटतील अशा लिहिल्या आहेत ज्यात मृत्यू समोर दिसत असतो. 

• या माघारीच्या अवस्थेत बर्फाची वादळे, मरणाची थंडी, बंडखोरांचे हल्ले, सोबत्यांचे जवळून मृत्यू, प्रेतांच्या आजूबाजूला काढावी लागणारी रात्र, घन दुर्गंदी असा प्रवास करावा लागला. शल्यविशारद डॉ.ब्रायडन यांनी या काळातील आठवणी लिहिल्या आहेत. ते स्वतः गंभीर जखमी झाले होते. 

• गंडमक/गंजमक येथे ब्रिटीश सैन्यावर जोरदार हल्ला झाला. अनेकांची कत्तल करण्यात आली. जेव्हा नेन्सी आणि लुई डूप्री या लेखकद्वयाने १९७० मध्ये गंजमकला भेट दिली. तेव्हा त्यांना हाडं, शस्रांचे अवशेष आणि लष्करी सामग्री खेड्यालगतच्या डोंगरावरच्या खडकाळ उतरणीवर सापडली. (३८६)

• संपूर्ण ब्रिटीश सैन्याची कत्तल झाल्याची बातमी सगळीकडे पसरली. या बातमीने भारतात उत्तेजित वातावरण तयार झाले. दिल्लीत चांदणी चौकाच्या बाजारातल्या पतपेढ्यांच्या सावकारांना हि खबर ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या दोन दिवस आधीच समजली होती. इस्ट इंडिया कंपनीच्या विरोधकांना नवी अशा व उत्तेजन मिळाले. जेव्हा १८५७ च्या बंडाला तोंड फुटलं तेव्हा त्याची सुरुवात खोर्द काबुलमध्ये ज्या शिपाई तुकड्यांना ब्रिटीश अधिकाऱ्यांनी वाऱ्यावर सोडून दिले होते त्याच तुकड्यापासून झाली हा निव्वळ योगायोग नव्हता. तसेच इराणी छापखाण्यांनी ब्रिटीशांच्या पराजयाचे वर्णन करणारी अफगाण महाकाव्य आणि गद्य अहवाल लखनौ, आग्रा, आणि कानपूर यासारख्या ज्या शहरांमध्ये उत्सहाने पुनर्प्रकाशित केले, तेथून या बंडाला प्रारंभ झाला. हा सुद्धा निव्वळ योगायोग नव्हता. 

• ब्रिटीशांच्या पराभवाची हि बातमी नवीन गव्हर्नर जनरल एलेनबरोला भारतात आल्या आल्या समजली. त्याने जणू अफगाणिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेत असल्याची पत्र ब्रिटनला लिहिली. सहा फलटणी बदला घेण्यासाठी पेशावरहून रवाना करण्यात आली. ऑकलंडने जनरल पदासाठी एल्फिन्स्टनची निवड केली. मेजर जनरल जॉर्ज पोलाक याच्याकडे नेतृत्व देण्यात आले. त्याने भारतात तीस वर्षांपेक्षा जास्त काळ व्यतीत केला होता. नेपाळ ब्रम्हदेश येथील युद्धांचा अनुभव होता. 

• दोस्त महमदला मसुरी जवळ जिथे ठेवण्यात आले होते तेथून सक्त कैदेत ठेवण्यात आले. इकडे अकबरखानकडे 120 युरोपियन कैदेत होते. लेडी मेकनेघटन, श्रीमती ट्रेव्हर तिची मुलगी आलेक्स्झान्द्रीना, श्रीमती सेल यांचा त्यात समवेश होता. लेडी सेल ने या कैदेतील प्रवासातील दिवसांविषयी लिहून ठेवले आहे. 

• १९ फेब्रुवारी १८४२ ला अफगाणिस्तानमध्ये भूकंप झाला. त्याच्या देखील नोंदी तत्कालीन लिखाणात सापडतात. ४ एप्रिल रोजी शाह शुजा बालाहीसार बाहेर पडला जलालाबादकडे जाण्यास निघाला. त्याला या रस्त्यावर मारण्यात आले. १८१६ मध्ये त्याने प्रथम सीमा ओलांडून ब्रिटीशांच्या ताब्यातील हिंदुस्तानात प्रवेश केला. शुजा आपल्या मित्रांशी निष्ठेने वागत असे. फारशी बोलणाऱ्या अत्यंत सुसंस्कृत अशा टीमरूड संस्कृतीचे आपण वारस आहोत असे तो समजत असे. तो स्वतः उत्तम कविता व गद्य लिहित असे. कवी आणि पंडित यांना मदतही करत असे. १८४२ चे बंड हे शाहशुजाच्या विरोधात नव्हते तर ब्रिटीशांच्या विरोधात होते. 

• ६ एप्रिल १८४२ ला अकबरखानच्या आदेशानुसार शुजाच्या मरणाच्या आनंदप्रीत्यर्थ साजरा करण्यात आला. ब्रिटीश सैन्याने जलालाबाद जिंकले. त्यांनी सगळीकडे बदल्याचा विध्वंस करणे सुरु केले. अगदी झाडे, फळबागा, घरे, किल्ले सर्व उध्वस्त करणे सुरु केले. जनरल सेलने अकबराचा पराजय केला. एल्फिन्स्टनचा मृत्यू या ठिकाणी झाला. पोलॉक व नॉट यांनी आपले आक्रमण सुरु ठेवले. 

• सोमनाथच्या मंदिराचे दरवाजे – एलेनबरोने जेम्स मिलचे हिस्ट्री ऑफ इंडिया हे पुस्तक वाचले होते. मिलने हे पुस्तक भारताबद्दल लिहिले पण तो कधीही भारतात आला नाही. ना इथले कोणी त्याच्या परिचयाचे होते. पण हे पुस्तक वाचून एलेनबरो चुकीची माहिती मिळाली कि, गझनीच्या महामदाच्या कबरीचे दरवाजे हे मुळात सोमनाथ मंदिराचे चोरून आणलेले दरवाजे आहेत. वस्तुतः हे दरवाजे ११ व्या शतकातील सेल्जूक कारागिरी केलेले आणि कबरीच्या काळातीलच होते. रोलीन्सनला दरवाजावरील अरेबिक भाषा लगेच ओळखू आली. त्याभोवतीची सहा टोकांच्या चांदण्यांची आणि फांद्या व पानांची नक्षी देखील अगदी इस्लामी धर्तीचीच होती. पण त्यामुळे त्याला फरक पडणार होता. एलेनबरोला ते दरवाजे हवे होते आणि नॉट ते दरवाजे त्याच्यासाठी घेऊन जाणार होता. (४५०)

एलेनबरो ने भारतातील संस्थानिकांना खलिते पाठवून जाहीर केले कि, ८०० वर्षापूर्वी झालेल्या हिंदुस्थानच्या अपमानाचा बदला घेण्यात येत आहे. दरवाजे परत येत आहे आणि ते ब्रीटीशांमुळे घडत आहे. या दरवाजांची पूर्ण भारतात मिरवणूक काढण्यात आली. पण भारतात त्यावर फारशा प्रतिक्रिया उमटल्या नाहीत. कारण असे दरवाजे लुटून नेले हेच लोकांना माहिती नव्हते. हे लाकडी दरवाजे काढले जात असतांना रोलीन्सन त्या कामावर देखरेख करत होता. त्यान म्हटलंय, “हे दरवाजे सोमनाथच्या मंदिरातले नाहीतच, त्यामुळे ते तिथे बसवणे शक्य नाही.” ते मंदिर हजार वर्ष भग्न स्थितीतच होते. या सर्व देखाव्याबद्दल हिंदू लोक उदासीन होते. हे दरवाजे नेल्याचे आफ्गानानाना देखील फार दुख झाले नाही.(४५१)

• ब्रिटीश युद्धकैदी काबुलजवळील एका किल्ल्यात होते. नॉट आणि पोलॉकच्या सैन्याने काबुलवर आक्रमण करून या सर्वांना सोडवले. पराजय झाल्यावर अकबरखान उत्तरेला खुल्म येथे पळून गेला. काबुलचा मोठा विनाश करण्यात आला. १२ ऑक्टोबर १८४२ रोजी ब्रिटिशांनी बाला हिसारवरचा राष्ट्रध्वज खाली उतरवला. इंग्रजांनी साडोझाई राजवंशाचा संपूर्ण विनाश घडवून आणला. इकडे दोस्त महमदची कैदेतून सुटका करण्यात आली. इकडे अफगाणिस्तानमधील ब्रिटीश सेना माघारी येण्यास निघाली. सेल पोलॉक, नॉट निकोल्सन यांचे स्वागत करण्यात आले. या युद्धाचा खर्च जवळपास एक कोटी पन्नास लाख रुपये होता. (आजच्या आकड्यात ५० अब्ज पौंड)

• फायटिंग बॉम्ब या नावाने ओळखला जाणारा जनरल सेल १८४५ च्या इंग्रज व शिखांच्या लढाईत मुडकी येथे जॉर्ज ब्रॉडफुटसमवेत मारला गेला. इस्ट इंडिया कंपनीला पंजाबमधील सुपीक जमीन ताब्यात घ्यायची होती. त्यामुळे हे युद्ध लढले गेले होते. नंतर लेडी सेल हि दक्षिण आफ्रीकेत स्तलांतरित झाली. १८५३ मध्ये केपटाऊन इथे तिचा मृत्यू झाला. तिच्या थडग्यावर शब्द कोरलेले आहेत, “लेडी सेलचे जे काही मरण पाऊ शकले ते या शिलेखाली विसावा घेत आहे.”

• डॉक्टर ब्रायडन १५ वर्षांनी १८५७ च्या बंडाच्या वेळेस जॉर्ज लॉरेन्स याचा लहान भाऊ हेन्रीच्या नेतृत्त्वात लखनौ रेसिडेन्सी वाचावयाच्या लढ्यात सहभागी झाला होता. १८७३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. लॉर्ड ओकलंड १८४९ मध्ये ६५ व्या वर्षी मरण पावला. नंतर तीन महिन्यांनी त्याची बहिण fani सुद्धा मरण अवली.

• इकडे अफगाणिस्तान मधील राजपुत्र अखेर दरिद्री अवस्थेत मरण पावले. या युद्धाचा फायदा एकाच माणसाला झाला ज्याला पदच्युत करण्यासाठी हे युद्ध लढले गेले तो म्हणजे दोस्त महमद. दोस्त महमदची सुटका झाली एप्रिल १८४३ मध्ये तो पेशावरहून गेला. आली मस्जिद येथे अकबर खान त्याचे स्वागत करण्यासाठी आला व काबुलला घेऊन आला. तिथे त्याचे जोरदार स्वागत झाले.  दोस्त महमद परत आल्यावर अकबरखानला जलालाबाद व लाघमनचा गव्हर्नर म्हणून नेमले. पण लवकरच त्याचा दरबार दोस्त महमदचा विरोधक म्हणून ओळखला जाऊ लागला. १८४७ मध्ये अकबरखानाला विष देऊन मारण्यात आले त्यात दोस्त महमदचा हात होता असे म्हटले गेले. दोस्त महमदने आपल्या साम्र्ज्याच्या सीमा विस्तारल्या. त्याच आधुनिक अफगाणिस्थानच्या सीमा बनल्या आहेत. हेरात मिळाले पण पेशावर त्याला सोडावे लागले. १८६३ मध्ये तो मरण पावला. गाझूर गाह येथे दोस्त महमदचे दफन करण्यात आले. १९७० च्या दशकात क्रांती घडेपर्यंत दोस्त महमदचे वंशज अफगाणिस्थानवर एकत्रितपने राज्य करत होते. 

- समाधान महाजन 

२८ जानेवारी २०२३

No comments:

Post a Comment