नागराज आणि झुंड

 तर काय असतय की  एकदा का हाईप क्रिएट झाली की कोणी बिलकुलच ऐकून घेत नसतय. तर असच त्या दिवशी नागराज अण्णाचे अत्यंत मनःपूर्वक फॅन म्हणून फर्स्ट डे फर्स्ट शो ला झुंड ला गेलो. 

फॅन्ड्री व सैराट असेच पहिल्या दिवशी पाहिलेले. बऱ्याच दिवस येणार येणार म्हणून अखेर झुंड आला. नागराज व अमिताभ हे मोठे आकर्षण.... सैराट नंतर आणखीन नागराज कशावर भाष्य करतो ही मोठी उत्सुकता..झोपडपट्टीतील फुटबॉल खेळणारी पोर व त्यांचा कोच अमिताभ ....नेमके काय असेल हे जाणून घ्यायचे होते. ...पण  चित्रपट जस जसा पुढे जायला लागला...त्याचा विस्कळीतपणा जाणवायला लागला.

नागराजच्याच आधीच्या चित्रपटातील बहुतांश पात्र परत दिसायला लागली. गरज नसतांना काही प्रसंग वाढलेले दिसले. आर्ची तिचे कागदपत्र तयार करण्यासाठी जातांना एखाद्याच प्रभावी प्रसंगातून तिचा त्रास दाखवता आला असता. माझ्या बाजूला बसलेला  मित्र म्हंटला, 'बहुतेक अन्नाने कलाकारांसाठी रोजगार हमी योजना  राबवलेली दिसतेय... ' ...अनेक कलाकार घेता येतात no issue... पण तितकी पटकथा सादरीकरण व एडिटिंग   दमदार असायला हव.. gangs of Wasseypur मध्ये म्हणून तीन चार पिढ्या व अनेक कलाकार येतात पण त्यात सहजता असते.

रामदास फुटाणे पासून प्रदीप अवटेपर्यंत सर्व मंडळी एकामागोमाग एक येत होती.  काही प्रसंग तर खास त्यांच्या मैत्रीखातर चित्रित करण्यात आली की काय असे वाटत होते. दिग्दर्शकाने खरे तर आपल्या निर्मितीत कठोर राहणे आवश्यक असते. तडजोड आली कि मग कलाकृतीची वाट लागते. 

अमिताभच्या घरी ती सर्व फुटबॉल खेळणारी पोरं जमली, त्यांची माहिती सांगायला लागली तेव्हा एखादी डॉक्युमेंट्री पाहतोय की काय असा भास होत होता... हा सीन काही वेगळ्या पद्धतीने चित्रित करता आला असता किंवा एडिटिंग व्यवस्थित करायला हव होते...

सर्वात महत्वाचं म्हणजे चित्रपटाचा आकर्षणाचा जो केंद्रबिंदू होता अमिताभ ...हा प्रेक्षकांसाठी आकर्षण असता तर समजण्यासारखे होते...पण त्यात काम करणाऱ्यांना तसे वाटून चालण्यासारखे नव्हते पण दुर्दैवाने ते झाले .. अगदी मी ज्याच्या कवितांचा व अभिनयाचा फॅन आहे तो किशोर कदम देखील अमिताभ समोर झाकोळून गेल्यासारखा वाटला. पूर्ण चित्रपट भर अमिताभचा प्रभाव असा होता की तो सोडून बाकीच्यांचा नैसर्गिक अभिनय दिसत नव्हता अर्थात आकाश ठोसर व त्याहीपेक्षा तो फुटबॉल खेळणारा मुलगा प्रभावी होता ज्याच्या कटर टाकण्याने चित्रपटाचा शेवट झाला. 

आणि मुळात चित्रपटाचा शेवट देखील नागराज स्टायल झालाच नाही. fandri चा दगड व सैराट मधील म्युट केलेल्या सीन मध्ये लहान मुलाचे त्या रांगोळीवरून उमटणारे पाय ....इथे असे काही भिडलेच नाही.  संपला संपला असे वाटत असतांना तो लांबत होता. अनेक चांगल्या फ्रेम्स अक्षरशः वाया गेल्यात त्यांच्या मागे पुढे काही जोरदार कंटेंटच नव्हते 

त्याकाळात जितक्या पण फेसबुक किंवा इतर ठिकाणी या चित्रपटाविषयी पोस्ट आल्या त्या अत्यंत चांगल्या लिहिणाऱ्या दिसत होत्या. 

नागराज चे वैयक्तिक आयुष्य, त्याचा संघर्ष व आजपर्यंतचा प्रवास कौतुकास्पद, प्रेरणादायी आहेच. त्याचे  तुम्ही आम्ही फॅन आहोतच. विषय हा आहे की आपण एखादी कलाकृती निर्मित करतो व ती पब्लिक प्लॅटफॉर्म वर येते ती जर अधिक प्रोफेशनल व परफेक्ट असेल तर लोकांना स्वतः हून आवडते. सैराट हा लोकांनी स्वतः डोक्यावर घेतलेला चित्रपट होता. झुंड  घ्यायला लावला. 

मग झुंड मध्ये काहीच चांगले नाही का... नक्की आहे ... त्याची कथा हा त्याचा स्ट्राँग पॉइंट होता.....दुर्दैवाने पडद्यावर येईपर्यंत ते सर्वच कुठेतरी फसले. 

नागराज अण्णा मध्ये प्रचंड शक्यता आहेत....अजूनही खूप काही सांगण्यासारखे नक्कीच असेल. पण एक चित्रपट रसिक व नागराज चा चाहता म्हणून विनंती आहे की त्याने हा आजूबाजूचा प्रभाव झटकून स्वतः च्या वाटेने दिग्दर्शन करावं ..... 

त्याच्याच कवितेच्या शब्दात सांगायचे म्हटले तर...

" का तू 

उन्हाच्या कटाविरुद्ध 

गुलमोहरासारखा 

त्वेषाने फुलत नाहीस....." 


- समाधान 

No comments:

Post a Comment