![]() |
| मांजा लागून पंधरा दिवस झाल्यानंतरचा फोटो. गळ्यात पट्टी तशीच आहे. |
पतंगाचा नायलॉन मांजा हा जीवघेणा आहे या बातम्या टीव्ही वर पाहतांना व पेपरला वाचतांना त्याचे इतके गांभीर्य नसते कोणाला.पण जेव्हा हा प्रसंग स्वतःवर येतो तेव्हा त्याची व्याप्ती व गंभीरतेची जाणीव होते.अशाच एका जीवघेण्या प्रसंगातून मी शब्दशः वाचलो जेव्हा १४ जानेवारी २०१६ ला संध्याकाळी कार्यालयातून घरी जात असतांना एकदम काहीतरी अडल्यामुळे स्पीड कमी करत गाडी साईडला घेतली तोपर्यंत माझ्या गळ्यातून रक्त येत होते व बोटातून पार मांस बाहेर येऊन रक्ताची धारच लागली होती.क्षणभर काय होतेय काय करावे काहीच लक्षात येत येत नव्हते पण सगळीकडे रक्त रक्त दिसले व गाडीवर मांजा येऊन पडलेला दिसला.
मागून बाईक वर दोन मुले येत होती त्यांना हात दिला.रक्त येतांना पाहून तेही पटकन थांबले.माझा हातरुमाल बोटाला बांधला व त्यातील एकाने त्याचा रुमाल माझ्या गळ्याला बांधला. ‘सर आप अभी गाडी नही चला सकते,आप पीछे बैठो मै चलउंगा खाली इतना बतावो आपको कहा छोडणे का?.त्या स्थितीत डॉक्टरकडे जाने योग्य असल्याने मी त्यांना माझ्या family डॉक्टरचा पत्ता सांगितला,त्या पूर्ण दहा पंधरा मिनिटात काहीहि होऊ शकले असते.पण पोरांनी मला तिथपर्यंत सोडले लगेच डॉक्टरांनी आत घेतले.उपचारानंतर डॉक्टरांनी सांगितले कि तुमच्या सर्व गळ्याजवळील सर्व वेन्स फक्त काही सेंटी/मिलीमीटरने वाचल्या व त्या पोरांनी तुम्हाला वेळेत डॉक्टरकडे पोहचवले. गळ्याला 10 व बोटाला 6 टाके पडले.
पतंग उडवणे चांगले असेल एक वेळेस पण ते नायलॉनच्या मांज्याने उडवणे इतके आवश्यक आहे का ? संक्रांतीच्याच कालावधीत फक्त नाशिकमध्ये आतापर्यंत अनेक जन जखमी झालेत व काही जणांचा जीवही त्यात गेलेला आहे. अनेक पक्षीही मृत्यूमुखी पडतात. एक छोटी चार-पाच वर्षाची चिमुरडी आपल्या पापांसोबत पुढे गाडीवर बसलेली असतांना पतगाच्याच मांज्याने वडिलांदेखत त्या चिमुरडीचा गळा कापला गेला.काय प्रसंग आला असेल या परिवावर कल्पना करवत नाही. आजही तुम्ही व्यवस्थित पेपर वाचा रोज कोणाला न कोणाला लागत असते. कोणाचा हात, कोणाचा पाय, कोणाचा गळा ....
हा नायलॉन मांजा इतका विघातक आहे कि जेव्हा मला लागले तेव्हा माझ्या डोक्यावर हेल्मेट होते. त्यावरून सरकून त्याने माझा गळा कापला ते करतांना हेल्मेटचा बेल्ट सुद्धा कापला गेला होता. माझ्या अंगावर जाड जर्किन होते त्या जर्किनच्या दोन्ही कॉलर अर्ध्या इतक्या कापल्या गेल्या होत्या. हे सर्व माझ्या अंगावर नसते तर कदाचित काय झाले असते कल्पना सुद्धा करवत नाही.
नायलॉनच्या पतंगाचा आनंद आपल्या घरात कोणी घेत असेल तर त्यांना सांगा, “बाबांनो हा तुमचा काही मिनिटांचा खेळ असेल पण निष्पाप लोकांचा यात जीव जात आहेत त्यांनी तुमचे काय नुकसान केले.” साध्या दोऱ्याने पतंग उडवायची विनंती आपल्या सर्व ओळखीचे,नातेवाईक,शेजारी यांना करा व निष्पाप लोकांचे जीव वाचवा हि कळकळीची विनंती. मला ज्यांना शक्य आहे त्यांना मी कायम सांगत असतो कि संक्रात जवळ आली कि आपला जीव सांभाळा. काहींना या गोष्टीचे गांभीर्य नाही. परदुख शीतल असते. जोपर्यंत आपल्या जीवाशी येत नाही त्याचे गांभीर्य कळत नाही. पण असे करू नका. मी अनेक दिवस धक्क्यात होतो. किंबहुना हा विषय कोणी काढला तरी मला आवडत नसे. संक्रातीच्या काळात आजही बाहेर निघायची भीती वाटते. फक्त आज मी हे इतक्या वर्षानंतर या साठी लिहित आहे कि, या बातम्या आजही सुरु आहेत. हे वाचून आपण काळजी घ्यावी इतकीच इच्छा.
काळजी सर्वांनी घ्यावी असे हे दिवस असतात. विशेषतः ज्यांचा प्रवास बाईकवर असतो त्यांनी खालील काळजी नक्की घ्या.
१. हेल्मेटशिवाय घराबाहेर पडू नका.
२. पायात शूज व गळ्यात रुमाल बांधलेला असू द्या.
३. सुनसान रस्ता असेल तर विशेष सावधगिरी बाळगा.
४. गाडीचा वेग कमीत कमी ठेवा.
५. आजूबाजूला कोणी असे जखमी असेल तर नक्कीच मदत करा.
६. आपल्या घरात किंवा आपण स्वतः पतंग उडविण्यात सहभागी असाल तर नायलॉन मांजा वापरू नका. नायलॉन मांजा म्हणजे माणसांना मारण्याचे हत्यार आहे लक्षात ठेवा.
सण व उत्सव आनंदात साजरा करा व दुसरे पण तितक्याच आनंदात साजरा करतील याची काळजी घ्या. संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा.
- समाधान महाजन
१३ जानेवारी २०२३

No comments:
Post a Comment