तर हे पुरुषोत्तम बोरकर आपल्या विदर्भातील अगदी ताकदीचे कादंबरीकार. कालपरवा २७ जुलै २०१९ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा या आपल्या गावी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. या पुरुषोत्तम बोरकरांच्या तीन कादंबऱ्या अत्यंत प्रसिद्ध आहेत. मेड इन इंडिया, आमदार निवास रूम नं. १७५६ आणि १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी या त्या तीन कादंबऱ्या. अगदी मिळवून वाचाव्यात अशा.
मेड इन इंडिया वाचतांना अनेक ठिकाणी अगदी पोट धरून हसाल अशी प्रसंग रचना व तितक्याच ताकदीचे वऱ्हाडी भाषेतील लिखाण बोरकरांनी केले आहे. हि कादंबरी प्रकाशित झाली १९८७ मध्ये. त्या वर्षाचा राज्यशासनाचा पुरस्कार देखील या कादंबरीला होता.गरसोई खुर्द या गावातील पंजाबराव साहेबराव पाटील हे कॅरेक्टर हे तुम्हाला गावाची अशी काही डिटेलमंधी सफर घडवून आणते कि जीयाचे नाव तेच. पंजाबरावच्या अनेक पिढ्या गावातील प्रमुख पदी आहेत. अस्सल गावरान, इरसाल व बेरकी नमुने पंजाबराव त्याच्या स्टाईल मध्ये व्यक्त करतो तेव्हा आपण त्याच्या आसपासच कुठेतरी आहोत असा भास तयार होतो. हि या लेखकाची ताकद.
शेषरावच्या घरात साप निघतो. ते मारायला येणारे लोक व शेषराव व त्याची बायको यांच्यात होणारे संवाद किंवा सापाचे स्वगत चिंतन खूपच गमतीदार प्रसंग आहे. हा प्रसंग वाचतांना साप मारायच्या अशाच एका मिरासदारांच्या कथेची आठवण येते. पण वर्हाडी भाषेतील व अस्सल गावातील हे संवाद अगदीच खुसखुशीत आहेत.
पंजाब रावच्या घरी त्याच्या आईशी बोलायला एक शेजारीण बाई येऊन बसते. तेव्हाचे संवाद व निरीक्षणे अख्खा प्रसंग डोळ्यापुढे उभे करते. पंजाबराव व त्याच्या बापामधील संवाद किंवा पंजाबरावाचे स्वतःबद्दलचे आकलन अफलातून आहे.
या कादंबरीची मुख्य भाषा वऱ्हाडी असली तरी प्रमाण भाषा, हिंदी शायरी, इंग्लिश शब्द याचे मिश्रण खूपच मस्त आहे. या कादंबरीतील भाषेची भाषातज्ञांनी नक्कीच चिकित्सा करावी असे स्वतः पु.ल.देशपांडे यांनी सांगून ठेवले होते व या कादंबरीचे त्यांनी कौतकहि केले होते.
यातील काही मोजक्या वऱ्हाडी म्हणी
रान जयतेत जन पाह्यते, मन जयते त कोन पाह्यते.
काम करणाऱ्याले करमकाट्या आणि बसणाराले तूपरोट्या अशी मेथड आहे रोह्योची.
बारमाह शेती न बोळक लागे हाती.
सराई नाही घरी नवऱ्या देखत पाणी भरी.
मी सांगतो लोकाले अन शेंबुळ माह्या नाकाले.
याच्यात्याच्यावर भागे तं मग नवरा काहाले लागे.
बोरकरांची १५ ऑगस्ट भागिले २६ जानेवारी हि तशी वरवर राजकीय पण मुळातच एकूण भारतीय लोकशाही, मूल्य, नैतिकता, मानवी अमानवीयपण, अशा अनेक बाबींना स्पर्श करत ओरखडे ओढत जाते. हि कादंबरी तशी मराठीत आहे. पण अगदीच थेट भाषेत लिहिलेली मी वाचलेली पहिली मराठी राजकीय कादंबरी असेल. मुंबई दिनांक व सिहासन यांचा बाज नक्कीच वेगळा आहे.
मेड इन इंडिया नंतर बोरकरांची नावाजलेली कादंबरी म्हणजे आमदार निवास रूम नंबर १७५६. मंत्रालयात खूप जणांची कामे असतात. एक दोन दिवसांचा मुक्काम मुंबईत करायचा म्हटला तर हमखास आमदार निवास हे हक्काचे ठिकाण असते. पण एखाद्या व्यक्तीचे जीवनच त्यावर अवलंबून असेल तर काय होईल? तर या अवघ्या ८६ पानी छोट्याशा कादंबरीतील पोपटराव हे पात्र आपल्याला आमदार निवासाची व त्याला जोडून असलेल्या अनेक घटनांची सफर घडवून आणते. हि एक समांतर दुनिया आहे. जिचा सर्वसामान्यांचा कधी तरी संपर्क येतो. पण हे जग सत्ता बदलली, लोक बदलले, पक्ष बदलले तरी हे जग मात्र त्याच गतीने धावत असते. ताकदीची कादंबरी आहे हि. वेबसिरीजचा ऐवज ठासून भरलेला दिसतो यात.बोरकर गेल्यानंतर बालाजी सुतार यांनी लिहिलेला लेख अप्रतिम होता. राजाभाऊ गायकवाड यांनी देखील त्यांच्या पुस्तकावर वेळोवेळी लिखाण केलेले आहे. तरी इतका ताकदीच्या लेखकाचे मराठी साहित्यात पाहिजे तस नाव झाले नाही हे नक्की.
-समाधान महाजन.



No comments:
Post a Comment