ख्वाडा, बबन आणि आता रौंदळ...
भाऊसाहेब शिंदे अभिनित जेही चित्रपट
आले ते अगदीच वेगळे व अस्सल ग्रामीण मातीतील आहेत. यातील कथा, संवाद भाषा ऐकतांना
आपण गावात असल्याचाच फील येतो. कुठेही कृत्रिमता भासत नाही. रौंदळ सध्या सगळीकडे
चांगला सुरु आहे. आधीचे दोन चित्रपट बऱ्यापैकी ग्रामीण जातीय वास्तव जे स्लो पॉइझनिंग
सारखे पसरलेले असते त्या वर्मावर बोट ठेवणारे होते तर रौंदळ हा क्लास (वर्ग)
व्यवस्थेवर जोरदार भाष्य करणारा आहे.
उस पिकविणारा शेतकरी हा कायम तालेवार,
बागायतदार व श्रीमंत शेतकरी असल्याचा काहीसा शहरी सूर असतो. अर्थात जो त्या
प्रक्रियेतील आहे त्याला यातील बारकावे चांगले माहिती असतात. अशा राबणाऱ्या
शेतकऱ्याचा उस अनेक बाबींवर अवलंबून असतो. त्यातील महत्वाचे म्हणजे उसाला चांगला
भाव मिळून तो योग्य वेळेत कारखान्याकडे गाळपासाठी जाणे. यातील वेळेचे गणित थोडेही
चुकले कि चार पाच एकर शेती असलेला शेतकरी अक्षरशः घायकुतीला येतो. तो त्याच्या
जीवनमरणाचा प्रश्न असतो. अस्तित्वाचा प्रश्न असतो.
त्याच्या याच अस्तित्वाच्या वाटेवर
एखादा मतांच्या गणितासाठी जर इगोचा फना काढून उभा राहत असेल तर संघर्ष जीवघेना बनतो.
आयुष्य पणाला लागते. असच काहीस रौंदळ उभे करतो अर्थात ते थिएटर मध्ये जाऊन
बघण्यासारखे आहे. भाऊसाहेब शिंदे पहिल्या चित्रपटापासून जोरदार आहे. यातही तो आपला
ग्रामीण रांगडी बाज राखून आहे. त्याला ते जमते किबंहुना ते त्याच्या अंगात आहे असे
दिसते. चित्रपटातील आजोबा आवडले. ग्रीप चांगलीच आहे. तत्सम तद्भव पुणेरी चॉकलेट,
कॅडबरी मराठी चित्रपटांपेक्षा असा एखादा वास्तव चित्रपट नक्की पाहायला हवा.
निर्माते बाळासाहेब शिंदे व भाऊसाहेब शिंदे
यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. खरतर ग्रामीण भागात लोकांपर्यंत चित्रपट गेला पाहिजे.
आम्हाला पिकवता येत पण विकता येत नाही .....त्याचे परिणाम पोहचले पाहिजे.

No comments:
Post a Comment