आपण जेवणाची ऑर्डर दिली आणि ते येईपर्यंत आपल्या टेबलजवळ वा हॉटेलमध्ये आजूबाजूला असणाऱ्या अनेक पुस्तकांपैकी एखादी आपल्याला आवडणारे पुस्तक आपण वाचू शकतो. वाटल्यास विकत घेऊ शकतो. चहाचा कप हातात घेऊन अनेक प्रसिध्द कवितांचे भिंतीवरील पोस्टर आपण वाचू शकतो... थोडक्यात खाद्य व वाचन संस्कृतीचा मिलाप असणारे आगळेवेगळे हॉटेल आहे हे. याचे नाव आहे हॉटेल रिलॅक्स कॉर्नर. आजीचे हॉटेल या नावाने अलीकडे ते ओळखले जाते. नाशिक पासून चांदवडकडे जातांना ओझर जवळ दहावा मैल या ठिकाणी हे हॉटेल आहे.
आजीचे हॉटेल या नावाने प्रसिद्ध असलेल्या या आजींचे नाव आहे. भीमाबाई जोंधळे. वय वर्ष सत्तरच्या पुढे पण अजून डोळ्याला चष्मा नाही. वाचनाची आवड व त्यातही आजी अगदी गोष्टीवेल्हाळ. खूप मस्त बोलतात. आपले जुने गरीबीचे दिवसांवर त्या थोडक्यात सांगून आज सकाळपासून किती ऑर्डर झाल्या हेही सहजच सांगून जातात. आजींच्या हाताला चव आहे. इथली आजींच्या हाताची पिठलं भाकरी व इतर गावरान पदार्थ लोक आवर्जून खायला जातात.
आजींचे चिरंजीव प्रवीण जोंधळे हे आमचे कवीमित्र. त्यांचा यात महत्वाचा सहभाग व मेहनत आहे. अलीकडे इथे साहित्यिक कार्यक्रम देखील होतात. इथली कवितांची भिंत देखील प्रसिद्ध आहे. इथे अनेक कवींच्या प्रसिद्ध कवितांचे पोस्टर लावलेले आहेत. ते बनवले आहेत आमचे कविमित्र विष्णू थोरे यांनी. या भिंतीवर माझीही 'बामियानचा बुद्ध' हि पोस्टर कविता पाहून आनंद वाटला.
एकदा नक्की या हॉटेलला भेट द्या.
- समाधान महाजन
No comments:
Post a Comment