तर माझा एकूणच वाचनाचा परीघ पाठय पुस्तकांबाहेर विस्तारला जाण्यास सुरुवात झाल्यावर श्रीमान योगी,राऊ,मंत्रावेगळा,राजर्षी,सारख्या ऐतिहासिक तसेच कऱ्हेचे पानी सारखे आत्मचरित्रात्मक पुस्तकांच्या प्रभावातून बाहेर पडण्याची कुठलीच शक्यता उरली नसतांना एका अपघाती दिवशी व पु काळेंचे सखी हे पुस्तक कारणीभूत ठरले...अन तेथून पुढे समग्र वपु सम्पेपर्यंत व त्याच्या प्रभावातून बाहेर येई पर्यंत बरेच दिवस संपलेत.
त्याचे असं झालं कि नवोदयच्या हॉस्टेल ला असतांना एका मुलाच्या हाती वपुंचे सखी पुस्तक दिसले त्याचे ते आकर्षक व वेगळेच मुखपृष्ठ पाहून मित्राकडून उसने घेऊन मी ते पुस्तक पूर्ण केले....पण त्यानंतर शाळेच्या वाचनालयातील वपुंचे एकही पुस्तक मी बिन वाचायचे शिल्लक ठेवले नव्हते. अर्थात हे सर्व वाचन आठवी ते दहावी या वर्गातील तेही अत्यन्त व्यस्त शेड्युल मधून मिळेल त्या वेळी....त्याही वयात रात्री बऱ्याच उशिरा पर्यंत जागायची सवय या पुस्तकांमुळे लागली....
वाचलेल्या पुस्तकातील आवडलेल्या ओळी सुभाषिताप्रमाणे वहीत लिहून ठेवण्याची सवय वपुंमुळे लागली...नंतर वपुंचे वपुर्झा आले त्यातील निम्मे हुन अधिक माझ्या वहीत लिहून ठेवलेली होती......
वाक्य च्या वाक्य तोंडपाठ असत....अन असच एक दिवस 'पार्टनर' हाती आलं.... अन अक्षरशः कहर केला त्या पुस्तकाने..... उमलत्या वयातील भावविश्व व वपुंची वेगळीच शैली एक डेडली कॉम्बिनेशन बनत गेलं ....'आपल्याला हवं तेव्हा तिसरा माणूस न जाणे म्हणजे नरक' व 'पोरगी म्हणजे झुळूक अंगावरून जाते पण धरून ठेवता येता नाही' असली चमत्कारिक वाक्य मित्रांसोबत असतांना अनेकदा वरच्यावर वापरली जात ....
तेव्हापासून तर पार कॉलेज सम्पेपर्यंत वपु डोक्यात ....अर्थात इतर वाचन पण सुरूच होते पण हे जरा जवळचं वाटायचं...
अशाच एक बेरोजगार दिवशी डोकं गच्च असतांना वपुंना पत्र लिहायला घेतले ....त्यांचे प्रत्येक पुस्तक त्याचा अनुभव अजून काय काय लिहित असतांना जेव्हा पूर्ण झाले तेव्हा चक्क 12 पेजेस भरली होती अर्थात भावूकता जास्त असावी वयाप्रमाणे..
अन कुठल्याही उत्तराची अपेक्षा न करता पोस्टात टाकून दिले.
चक्क काही दिवसांनी त्यांचे उत्तर आले त्यांच्या हस्ताक्षरात तेव्हा 'आज मैं उपर ...' अस काहीसं फिल होत होतं...
......
आज इतक्या दिवसानंतर जुनी पेटी उपसत असतांना हे पत्र हाती आले न हे सर्व आठवले ...
आज जरा हा प्रकार हास्यास्पद वाटला...पण कदाचित ते त्या वयात बरोबर असावं...
आज आवडते लेखक कोणी विचारलं तर यादीत कदाचित वपुंचे नाव पण येणार नाही....वय व सततच्या वाचनाने अनुभव विश्व जस जसं समृद्ध होत जात तस तसं आवडी निवडी बदलत असतात हे खरं असल तरी मार्गात येणारे बरेच जण आपली मोहोर आपल्या वाचन अनुभवावर उमटून जातात हे खरंय.
- समाधान महाजन

सर आपले ते 12 पानी पत्र असेल तर वाचायला आवडेल...
ReplyDeleteमाझा व्हॉट्सॲप नंबर 9923593063
त्या पत्राची माझ्याकडे एक प्रत ठेवावी इतकं मला तेव्हा सुचलं नाही.....तेव्हा सहजपणे माझ्या आजूबाजूला झेरॉक्स देखील नव्हते अशा खेड्यात मी होतो...आणि वय इतकं कमी व अल्लड की भावनेच्या भरात लिहून झाल्यावर मी तसेच पॅक करून पोस्टात टाकले होते....
Delete