नीतू

तू फक्त आदि आहेस,अंत नाहीच

तू तुझ्या नजरे समोरच्या जाड काचेआड 
तुझी वेदना, तुझे दुःख , तुझा आक्रोश , अवहेलना, अपमान 
सारं आवाज न करता गिळून जगाला सामोरी जातेस ,

तेव्हा  सर्वांना दिसत असतं फक्त तुझ्या डोळ्यावरील जाड काच
 व चेहऱ्यावरील मिश्किल  हसू, जे तुझ्याही नकळत  तुला चोरून फुलत असतं.

फक्त तुला ते माहिती असतं, कि ते हास्य म्हणजे एक्सट्रीम दुःखाला लागलेली झालर आहे, 

म्हणून तू जगून घेतेस मनसोक्त पणे ऑनलाइन च्या जगात ,
जिथे ऑफलाईन चे सर्व सोपस्कार व दांभिक कायदेकानून सम्पलेले असतात, 

व  पॉवर प्ले मध्ये एखाद्या कसलेल्या फलंदाजाने भन्नाट फटकेबाजी करावी 
तसं तू  सर्वांचे मनोरंजन  करत असल्यासारखं वाटलं... 
तरी  खर तर  तू तुझ्या डोळ्या समोर उभा असलेला आक्राळ- विक्राळ  दिवस 
साजरा करत असतेस इतकंच.

तस तु असंही राग लोभ  द्वेषाच्या पलीकडे केव्हाच निघून गेलेली  
तरीही जेव्हा जेव्हा तुझ्या वैयक्तिक आयुष्यातील संकटे 
तू एका ओळीच्या मेसेजने  कळवते ....तेव्हा 
बराच वेळ काय उत्तर द्यावं कळत नाही....

कदाचित तुझी उत्तरे तुला सापडलेली असतात....
म्हणून तू फक्त प्रश्न फॉरवर्ड करत असावीस.

ते शाळेत नाही का ...पहिल्या बेंच वर बसून ही एखाद्या अवघड तासाला 
तू झोपलीयस कि जागीयस हे कळायचं नाही ......
तसं करून बघ न आयुष्याच्या अवघड वळणांवर...म्हणजे मग 
तितकाच त्रास कमी होईल....स्मूथली वळण  तरी  पार होतील.... 
असेही  बसायचे ते धक्के बसून गेलेचेयेत. 

अन अगदीच शेवटचं नाही पण त्याच्या अलिकडंच सांगायचं म्हटले तर 
सारखं  हास्य शेअर करतेस ... कधी दुःख पण शेअर करत जा ....
सर्वजण वाटून घेतील कि नाही माहीत नाही पण हलके नक्की करतील ...

                तूर्तास इतकेच ....

                                         -समाधान महाजन




1 comment: