ककल्ड

खर तर सात सक्क त्रेचाळीस वाचल्यानंतर पुन्हा कधी किरण नगरकरांच्या नादी आपण लागायचे नाही अस मी मनोमन ठरवलं होत. अबोध, अगम्य जे सामान्यपणे कळत नाही त्यातला हा एक महान लेखक आहे व ते समजून घेणे आपल्या आवाक्यापलीकडे आहे अशी स्वतःची समजूत मी करून घेतली होती. त्यामुळे मैफिलीत गाणारे गायक आपल्या गुरूचे नाव घेतांना कानाच्या पाळीला हात लावून रिसपेक्ट व्यक्त करतात. यापुढे कुठेही नगरकरांचा विषय निघाला की, मनातल्या मनात मी मुकपणे हाच रिसपेक्ट व्यक्त करत अधिकच मुक होणार होतो.
पण नाही हे अस कायम राहणं शक्य झालं नाही. आज 612 पानांची ककल्ड संपतांना वाटत होत की, अजून तितकेच पेज या पुस्तकात असते तर किती बर झालं असत. हा एकदम 180 डिग्रीचा बदल कसा झाला?
ककल्ड ही साहित्य अकादमी प्राप्त कादंबरी होती व युरोपातील अनेक देशात तिचे अनुवाद होऊन कौतुकही झाले होते, त्याबद्दल वाचनातपण आले होते. त्यातच अलीकडे आमच्या कार्यालयातील शैलेन्द्र परदेशी या अधिकारी मित्रांनी ककल्ड कादंबरी भेट स्वरुपात दिली. याच आसपास अजून एका मित्राशी बोलतांना या कादंबरीचा विषय निघाला. बाकी शून्य मध्ये आलेली शारीरिक वर्णने त्याला फारसे आवडले नव्हते त्या वेळी त्याने ककल्ड वाच म्हणून सल्ला दिला. आता बाकी शून्य माझी आवडती कादंबरी असतांना त्या पेक्षा ककल्ड वाचून पहा असा सल्ला मिळाल्याने व योगायोगाने पुस्तक पण हाती आल्याने मी ते जरा अनिच्छेनेच वाचायला सुरुवात केली आणि बघता बघता लेखकाने मांडलेल्या त्या भव्य-दिव्य कालपटामध्ये कधी रंगून गेलो कळलंदेखील नाही. इतकी ताकद या लिखाणाची आहे.  किती विस्तृत व भव्य पट मांडलाय पण जस वाचत राहू तशी उत्सुकता वाढत जाते.  
काय नाही यात? इतिहास आहे, युद्ध आहे, कपट आहे, छळ आहे, प्रतारणा आहे, शृंगार आहे, राज्यव्यवस्था, समाज, चालीरीती .... काय नाही . सर्वच आहे. स्थूलातून सूक्ष्माकडे कधी जातो व व्यक्तीकडून समष्टीकडे कधी जातो कधी परत येतो लक्षात पण येत नाही. 
मेवाडचा इतिहास व परंपरा आपल्याला माहती असते. तिथली कृष्णभक्त मीरा आपल्याला माहिती असते पण तिचा पती भोजराज हा मात्र काळाच्या उदरात गडप झालेला ज्याची पूर्ण नोंद इतिहास ठेवत नाही. ते पात्र जबरदस्त ताकदीने नगरकरांनी उभे केले आहे. अनेक ऐतिहासिक व प्रसिद्ध पुस्तके वाचण्यात आली पण प्रथमपुरुषी नायक म्हणून जे काही युवराज बनून लेखक स्वतः आपल्याला या काळात घेऊन जातो ते निव्वळ निव्वळ कालातीत.....इव्हन भोजराजने जरी येऊन ककल्ड वाचले तरी त्याला आपली आत्मकथा कोणी लिहिलीय असा प्रश्न पडावा. इतका तादात्म एकरूपतेने नगरकरांनी ते मांडलेय. 
थोड बाहेर येऊन जरी विचार केला तरी वाटत की इतक लिहिण्यासाठी काय लेव्हलला जाऊन मेहनत घ्यावी लागली असेल नगरकरांना याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. एक संपूर्ण राज्याचा आडवा-उभा पट युवराजच्या नजरेतून उभा करण्यासाठी अनेक ऐतिहासिक कागदपत्र, लोककथा, बखरी, प्रवाद, भूगोल, व असंख्य संदर्भ ग्रंथांचा अनेक दिवस अभ्यास करून ते पात्र स्वतःमध्ये मुरवून घेत परत पुन्हा अनेक दिवसांच्या बैठकीनंतरच असे उच्च दर्जाचे लिखाण होऊ शकते. याबाबतीत नगरकरांना मानाचा मुजरा. 
पुस्तकात अनेक ठिकाणी आपण स्वतः उभे आहोत इतकी जीवंत वर्णने आहेत. बाबरसोबतचे युद्ध असो वा जे गुजरातच्या सेनेसोबत युद्ध , त्याची वर्णने वाचतांना अस वाटत की आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवर आहोत, विशेषतः नायक जेव्हा गनिमी काव्याने लढाईचा निर्णय घेतो व त्याची अंमलबजावणी करतांना ची जी वर्णने आहेत ती म्हणजे जणू आपल्या डोळ्या समोरच एक एक मुडदा पडत जातो. गुजरात सेनापतीने शीर धडावेगळे करण्याचे दृश्य पण तसेच,युद्धभूमीचे परीक्षण करतांना नायकाने सकाळ,संध्याकाळी पाहिलेली दृश्य, दलदलीच्या प्रदेशातील वर्णने जणू लेखकाने यासाठी किती minute डिटेलिंग केलय अस सारख वाटत राहतं. मेवाड मध्ये पसरलेली पटकीची साथ असो वा युद्ध प्रसंगी टाकलेल्या राहुट्या व तंबूच्या आजूबाजूचे वातावरण असो  हे सारे  वाचतांना तत्कालीन मेवाड डोळ्यापुढे उभे राहते अर्थात ही बाब अनेकवेळा होते.
मीरा माहीत होती, मेवाड, राणा संग, बाबर हे सर्व माहिती होते पण भोजराज पहिल्यांदाच कळाला व छाप सोडून गेला. चला आता नगरकरांची इतर हेडिंग पण ट्राय करून पाहू

                                                                                                              -समाधान महाजन 

No comments:

Post a Comment