हे माझ्या पुरतेच होते व फक्त मलाच असे वाटत होते का, हे माहीत नाही....
शाळा किंवा कॉलेज ला असताना ते शेवटचे दिवस असतात ना सुट्टी लागण्याच्या आसपासचे ते भयंकर एकांतलेला, अस्वस्थ व लांबच्या लांब दिवस घेऊन यायचे. हे दिवस सरता सरायचे नाही. रानभर पेटलेल्या लालभडक पळसाची दाहकता जाणवत राहायची. निळसर गडद रंगात लपलेला डोंगर अनोळखी वाटू लागायचा.
स्वतः ला चांगले घर व सांभाळणारे आईवडील असतांना देखील घरी जाण्याचे फार आकर्षण नसायचे. अर्थात जाऊन ही वा न जाऊन ही आपल्या जीवनात फार काही फरक पडणार नाही अशी भावना असायची.
नवोदयला असतांना, अशाच एका वेड्या वेळी 'आनंद' पाहिला...
"बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहीय,लंबी नहीं"..म्हणणारा आनंद जीवन शिकवून गेला पण उलट अर्थाने असे कि, हे अस काहीतरी आजार वैगेरे आपल्यालापण हवं होतं. म्हणजे मग उरात ते दुःख बाळगून उरलेल जीवन आपण पण आनंदात घालवल असत. सालं आपल्या जीवनात काही आत-बाहेर दुःख नाही म्हणजे आपला काहीच उपयोग नाही,वाया गेलेलं जीवन जगतोय आपण अस वाटायचं. एक सिनिअर भैयाच्या वडिलांना कॅन्सर झालेलं कळलं तर मला पार कसस झालं. तो चुकून कधी हसतांना दिसला तरी काळीज विदीर्ण होऊन जायचे की याच्या जीवनात इतके दुःख असताना हा हसूच कसा शकतो! ..
पडक्या इमारतीच्या छतावर... समदुखी(सुखी) मित्रा सोबत भविष्य कालीन अ गम्य, अ तार्किक आगामी दुःखाच्या गप्पा करत वर्तमान कालीन छोट छोट्या दुःखद आठवणींना उजाळा देण्याचे काम अधून मधून करायचो.
त्यातून चेहऱ्यावर इतकी विषन्नता, खिन्नता व दुःखाचा अलोट सागर ओथंबून वाहते असे की, कोणी चुकून जरी विचारलं असत की, का रे बाबा इतका काय विचार करतोय/ कसलं टेन्शन आलंय? तर त्याला बाणेदार पणे "चिंता करतो मी विश्वाची" अस उत्तर दिले असते. पण जगाच्या सुदैवाने अस कोणी तेव्हा विचारलं नाही.
1991 चा सडक नुकताच आलेला, त्यातलं
"रहने को घर नहीं,
सोने को बिस्तर नहीं
अपना खुदा है रखवाला...
अब तक उसी ने है पाला."
हे गाणं लैच लागू होत असं वाटायचं... अजून विषन्नता, अजून स्वतः च्या कोशात स्वतः ला बंद करून घेणे व्हायचे.
त्यातच सहावीपासून नवोदयच्या हॉस्टेलला असल्याने जगातील दुःख आमच्याच माथी मारलीयत अस ठळक वाटायचे(अर्थात हे तत्कालीन विचार).
एकदा तर गावातील गोडाऊन मधून नव्या बिल्डिंगच्या एम.पी हॉल मध्ये राहण्यासाठी जाण्याचे फर्मान हिमालय हाऊस साठी सुटले, त्यातही विशेष म्हणजे स्वतः चे कॉट स्वतः च न्यायचे होते. चार-पाच जणांनी मिळून ते कॉट रस्त्यावरून वरात काढत वाहत नेत असतांना अगदी मोठ्याने गळा काढून म्हणावे वाटत होते...
"अपनी तो जिंदगी कटती है फुटपाथ पे,
उंचे उंचे ये मेहल अपने है किस काम के
हमको तो माँ बाप के जैसी लगती है सडक
कोई भी अपना नहीं, रिशते है बस नाम के
अपने जो साथ है ये अंधेरी रात है
अपना नहीं है उजाला, अब तक उसी ने है पाला...
अर्थात संजू बाबा सडक वरुन 93 ला खलनायक बनेपर्यंत आम्ही पण आठवीत पोहचलो होतो..झुंजूमंजू धुक्यातले दिवस सुरू झाले होते...डार्क शेड चे आकर्षण माणसाला जात्याच असते , ते वळवाव लागत नाही. म्हणून मग
"नायक नहीं, खलनायक हूं मै"... अपील होत होतं...दर सुट्टीवरून आल्यावर व सुट्टी लागायच्या आधी कोमात जाणे सुरू होते,
दहावी संपल्यावर... सर्व संपल्यासारख वाटत होतं.. सर्व सामान बिमान जमा झालं..तरी सर्व काही अमानत इथेच ठेऊन जात असल्यासारखे पाय निघताना जड झाले होते.
बस स्टँड पासून परत हॉस्टेल व परत स्टँड दोन फेऱ्या झाल्या. टाटा बाय बाय करत जवळपास सर्वजण निघून गेले होते...परत तिसरी फेरी मारली तेव्हा सोडून जात असलेले अवकाश, पेरलेला एकांत व निर्वात आकाशाचे रितेपन भरून घेण्याचा असफल प्रयत्न केला.
सोबत जेव्हढी आली तेव्हढी खिन्नता व निराशा पदरी घेऊन पुढची दोन वर्षे तळोद्यात काढली. आतासारखे मोबाईल नसल्याने उठसुठ मुलांना जेवलास का, झोपलास का अस विचारणारी घरची मंडळी लाभली नाही हे भाग्य...
त्यामुळे तळमळत रात्र व मळमळत दिवस गेला तरी विचारणारे कुणी नव्हते.
पुढे चुकून ढकलून दिल्यासारखे डी एड ला गेल्यावर जणू बांधून ठेवलेल्या दुःखाला मोहर फुटला होता. जे आवडत नाही व जे करायची इच्छा पण नाही ते दोन वर्षभर करायचे असल्याने गर्तेत उतरायला अफाट अवधी मिळाला.
सुट्ट्याच का लागतात व सुट्ट्या लागल्यावर घरीच कशाला जायचे हे मूलभूत प्रश्न कोणाला विचारावे अस वाटत पण नव्हते. म्हणून मग सहन करायचे ...मोठं मोठाले दिवस.
अशीच कोणती तरी सुट्टी लागलेली .... नेहमी प्रमाणे सर्व जण गावी गेलेले व तितकी उत्सुकता नसल्याने मी तिथेच... खूप दिवसांपासून पुस्तके वाचली नव्हती, नुकतंच एक मित्राच्या मदतीने शिरपूरच्या नगरपालिका संकुलावरील नव्यानेच ओपन झालेले वाचनालय लावले होते, आवडणारे जवळपास सर्व पुस्तके वाचून सम्पली होती.
माझ्या जवळ असलेले "एका मुंगीचे महाभारत" हे गंगाधर गाडगीळांचे आत्मचरित्र हे जमा करून दुसरं घ्यायला गेलो.
तिथं गेल्यावर कपाटांमध्ये थोडी खाली वर करून व कॅटलॉग बघून कळलं की आता माझ्यासाठीचा स्टॉक संपलाय.
काय करावं असं विचार करत होतो. ते वाचनालय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे भेटण्याचे ते ठिकाण पण होते. तिथे दोन चार गाद्या- उश्या लोड असं काही सामान पण होतं.
आता दुसरं कोणतंच पुस्तक नाही म्हटल्यावर परत ते एका मुंगीचे महाभारत घेऊन मी त्या गादीवर वाचत बसलो व वाचता वाचता कधी झोपी गेलो कळलं नाही...
उठलो तेव्हा पुस्तक बाजूला पडलेले होते. ढणढणत जळत असलेल्या पिवळ्या बल्पच्या उजेडात दोन तीन म्हातारे पेपर पार डोळ्यासमोर धरून वाचत बसलेली दिसली, हवेतील उष्णता जाणवण्याइतपत होती, भोवताल पसरलेला अंधार ....निशब्द होता.
- समाधान महाजन
(विशेष सूचना - संजय दत्त मला आवडतो अस बिलकुल नाही)😊
उठलो तेव्हा पुस्तक बाजूला पडलेले होते. ढणढणत जळत असलेल्या पिवळ्या बल्पच्या उजेडात दोन तीन म्हातारे पेपर पार डोळ्यासमोर धरून वाचत बसलेली दिसली, हवेतील उष्णता जाणवण्याइतपत होती, भोवताल पसरलेला अंधार ....निशब्द होता.
- समाधान महाजन
(विशेष सूचना - संजय दत्त मला आवडतो अस बिलकुल नाही)😊

No comments:
Post a Comment