कविता

मी पाहिली त्या रक्ताळलेल्या माणसाच्या 
डोळ्यातील मृत्युची भीती.
कोरोनाच्या संशयाने मॉब लिचिंग होण्याच्या आधी...

हजारो मैल अंतर गावाच्या ओढीने
तुडवत निघालेल्या मजुरांचे विदीर्ण चेहरे
डोक्यावरील गाठोडे व कडेवर घेतलेल्या 
खपाट झालेल्या लेकरांच्या पोटातील भूक..

महायुद्धाच्या काळात युद्धकैदी असल्यासारखे 
अन्नाच्या पाकीटांची वाट बघत
लोखंडी दरवाजामागे उभे असलेले विमनस्क चेहरे...

आपल्याच घरात अंतर ठेऊन जेवणारे व 
कितीही मायेने मन भरून आले तरी
दुरूनच चिल्ल्या-पिल्ल्यांचा निरोप घेणारे 
अनेक कर्तव्य कठोर हात...

घरातच बंदिस्त झालेले गावाच्या गावे व शहराच्या शहरे,
ओस पडलेले रस्ते, चौक व थांबलेली चाके

सुरू होईल सार काही पूर्वीसारखे व 
गजबजून जाईल भोवताल,
या आशेने, आज ठप्प झालेल्या जगाचा एक नवा इतिहास लिहिला जातोय.
                            - समाधान महाजन

No comments:

Post a Comment