मला उध्वस्त व्हायचंय

"जेवणाला लोक असतच. मी अनेकदा त्याबद्दल धुसफूसत असे. पण नामदेव ऐकत नव्हता. रेशन नसायचंच. मग 'सोवियत देश' च्या बातमीपत्रांची बरीचशी थप्पी यायची, ती विकून आम्ही चहा, साखर,गहू वैगेरे आणायचो. कम्युनिस्ट पक्षाने, देशाने अशी खूप वेळा अप्रत्यक्षपणे आम्हाला मदत केलेली."
- मलिका अमर शेख
(मला उध्वस्त व्हायचंय)

मलिका अमर शेख यांच्या या आत्मचारित्रातील या ओळी आहेत. स्वतः एक कलावंत घरातील. शाहीर अमर शेख अर्थात मेहबूब पटेल यांच्या त्या कन्या.
कवी नामदेव ढसाळ यांच्या त्या पत्नी. ढसाळांसोबतचे जगलेले आयुष्य त्यांनी यात मांडलेले आहे. कोणत्याही मनस्वी कलंदर कलाकाराची पत्नी असणे हा काटेरी मुकुट अनेक आत्मचरित्रातून दिसतो.
जगात मोठी नावे असलेले व्यक्ती वैयक्तिक आयुष्यात अपयशी ठरल्याची उदाहरणे आहेत. जगात अनेक देशात क्रांतीस कारक ठरलेला कार्ल मार्क्स निष्कांचन अवस्थेत जग सोडून गेला. त्याच्या पत्नीस देखील भरपूर त्रास सहन करावा लागला.
म्हणून कदाचित मलिका यांनी हे पुस्तक जेनी मार्क्स यांना अर्पण केले आहे. हा वेगळ्या अर्थाने दुःखाचा बंध जागतिक स्थरावर जोडला गेला आहे. आपल्या अर्पण पत्रिकेत मलिका म्हणतात,
जेनी मार्क्स-
मार्क्सवादाइतकीच अटळ,सुंदर न
उंच वाटलीस मला !
तुला अर्पण.

याशिवाय या चरित्रातील अजून काही ओळी-

"माझ्या स्वप्नांच घरटं शाबूत ठेवणारं
एकही झाड उरलं नाही
किती बरं वर्ष झाली.....?
माझ्या तारुण्याच रेशमी वस्त्र चोचीत घेऊन
माझा प्रियकर केव्हाच उडून गेला"

"मूल्य, कट्टर तत्वनिष्ठा ही आज एक हास्यास्पद गोष्ट वाटते सगळ्यांना . ज्यांना खरोखरच तळमळ आहे, असे लोक उध्वस्त होत आहेत आणि विकले जाणारे सत्ता आणि पैसा या वेश्यांकडे पडून असतात"

- समाधान महाजन 

कविता

मी पाहिली त्या रक्ताळलेल्या माणसाच्या 
डोळ्यातील मृत्युची भीती.
कोरोनाच्या संशयाने मॉब लिचिंग होण्याच्या आधी...

हजारो मैल अंतर गावाच्या ओढीने
तुडवत निघालेल्या मजुरांचे विदीर्ण चेहरे
डोक्यावरील गाठोडे व कडेवर घेतलेल्या 
खपाट झालेल्या लेकरांच्या पोटातील भूक..

महायुद्धाच्या काळात युद्धकैदी असल्यासारखे 
अन्नाच्या पाकीटांची वाट बघत
लोखंडी दरवाजामागे उभे असलेले विमनस्क चेहरे...

आपल्याच घरात अंतर ठेऊन जेवणारे व 
कितीही मायेने मन भरून आले तरी
दुरूनच चिल्ल्या-पिल्ल्यांचा निरोप घेणारे 
अनेक कर्तव्य कठोर हात...

घरातच बंदिस्त झालेले गावाच्या गावे व शहराच्या शहरे,
ओस पडलेले रस्ते, चौक व थांबलेली चाके

सुरू होईल सार काही पूर्वीसारखे व 
गजबजून जाईल भोवताल,
या आशेने, आज ठप्प झालेल्या जगाचा एक नवा इतिहास लिहिला जातोय.
                            - समाधान महाजन

संपलेला स्टॉक व एका मुंगीचे महाभारत

हे माझ्या पुरतेच होते व फक्त  मलाच असे वाटत होते का, हे माहीत नाही....
शाळा किंवा कॉलेज ला असताना ते शेवटचे दिवस असतात ना सुट्टी लागण्याच्या आसपासचे ते भयंकर एकांतलेला, अस्वस्थ व लांबच्या लांब दिवस घेऊन यायचे. हे दिवस सरता सरायचे नाही. रानभर पेटलेल्या लालभडक पळसाची दाहकता जाणवत राहायची. निळसर गडद रंगात लपलेला डोंगर अनोळखी वाटू लागायचा.
स्वतः ला चांगले घर व सांभाळणारे आईवडील असतांना देखील घरी जाण्याचे फार आकर्षण नसायचे. अर्थात जाऊन ही वा न जाऊन ही आपल्या जीवनात फार काही फरक पडणार नाही अशी भावना असायची.
नवोदयला असतांना, अशाच एका वेड्या वेळी 'आनंद' पाहिला...
"बाबूमोशाय जिंदगी बडी होनी चाहीय,लंबी नहीं"..म्हणणारा आनंद जीवन शिकवून गेला पण उलट अर्थाने असे कि, हे अस काहीतरी आजार वैगेरे आपल्यालापण हवं होतं. म्हणजे मग उरात ते दुःख बाळगून उरलेल जीवन आपण पण आनंदात घालवल असत. सालं आपल्या जीवनात काही आत-बाहेर दुःख नाही म्हणजे आपला काहीच उपयोग नाही,वाया गेलेलं जीवन जगतोय आपण अस वाटायचं. एक सिनिअर भैयाच्या वडिलांना कॅन्सर झालेलं कळलं तर मला पार कसस झालं. तो चुकून कधी हसतांना दिसला तरी काळीज विदीर्ण होऊन जायचे की याच्या जीवनात इतके दुःख असताना हा हसूच कसा शकतो! ..
पडक्या इमारतीच्या छतावर... समदुखी(सुखी) मित्रा सोबत  भविष्य कालीन अ गम्य, अ तार्किक आगामी दुःखाच्या गप्पा करत वर्तमान कालीन छोट छोट्या दुःखद आठवणींना उजाळा देण्याचे काम अधून मधून करायचो.
त्यातून चेहऱ्यावर इतकी विषन्नता, खिन्नता व दुःखाचा अलोट सागर ओथंबून वाहते असे की, कोणी चुकून जरी विचारलं असत की, का रे बाबा इतका काय विचार करतोय/ कसलं टेन्शन आलंय? तर त्याला बाणेदार पणे "चिंता करतो मी विश्वाची" अस उत्तर दिले असते. पण जगाच्या सुदैवाने अस कोणी तेव्हा विचारलं नाही.
1991 चा सडक नुकताच आलेला, त्यातलं
"रहने को घर नहीं,
सोने को बिस्तर नहीं
अपना खुदा है रखवाला...
अब तक उसी ने है पाला."
हे गाणं लैच लागू होत असं वाटायचं... अजून विषन्नता, अजून स्वतः च्या कोशात स्वतः ला बंद करून घेणे व्हायचे.
त्यातच सहावीपासून नवोदयच्या हॉस्टेलला असल्याने जगातील दुःख आमच्याच माथी मारलीयत अस ठळक वाटायचे(अर्थात हे तत्कालीन विचार).
एकदा तर गावातील गोडाऊन मधून नव्या बिल्डिंगच्या एम.पी हॉल मध्ये राहण्यासाठी जाण्याचे फर्मान हिमालय हाऊस साठी सुटले, त्यातही विशेष म्हणजे स्वतः चे कॉट स्वतः च न्यायचे होते. चार-पाच जणांनी मिळून ते कॉट रस्त्यावरून वरात काढत वाहत नेत असतांना अगदी मोठ्याने गळा काढून  म्हणावे वाटत होते...
"अपनी तो जिंदगी कटती है फुटपाथ पे,
उंचे उंचे ये मेहल अपने है किस काम के
हमको तो माँ बाप के जैसी लगती है सडक
कोई भी अपना नहीं, रिशते है बस नाम के
अपने जो साथ है ये अंधेरी रात है
अपना नहीं है उजाला, अब तक उसी ने है पाला...

अर्थात संजू बाबा सडक वरुन 93 ला खलनायक बनेपर्यंत आम्ही पण आठवीत पोहचलो होतो..झुंजूमंजू धुक्यातले दिवस सुरू झाले होते...डार्क शेड चे आकर्षण माणसाला जात्याच असते , ते वळवाव लागत नाही. म्हणून मग
"नायक नहीं, खलनायक हूं मै"... अपील होत होतं...दर सुट्टीवरून आल्यावर व सुट्टी लागायच्या आधी कोमात जाणे सुरू होते,
दहावी संपल्यावर... सर्व संपल्यासारख वाटत होतं.. सर्व सामान बिमान जमा झालं..तरी सर्व काही अमानत इथेच ठेऊन जात असल्यासारखे पाय निघताना जड झाले होते.
बस स्टँड पासून परत हॉस्टेल व परत स्टँड दोन फेऱ्या झाल्या. टाटा बाय बाय करत जवळपास सर्वजण निघून गेले होते...परत तिसरी फेरी मारली तेव्हा सोडून जात असलेले अवकाश, पेरलेला एकांत व निर्वात आकाशाचे रितेपन भरून घेण्याचा असफल प्रयत्न केला.
सोबत जेव्हढी आली तेव्हढी खिन्नता व निराशा पदरी घेऊन पुढची दोन वर्षे तळोद्यात काढली. आतासारखे मोबाईल नसल्याने उठसुठ मुलांना जेवलास का, झोपलास का अस विचारणारी घरची मंडळी लाभली नाही हे भाग्य...
त्यामुळे तळमळत रात्र व मळमळत दिवस गेला तरी विचारणारे कुणी नव्हते.
पुढे चुकून ढकलून दिल्यासारखे डी एड ला गेल्यावर जणू बांधून ठेवलेल्या दुःखाला मोहर फुटला होता. जे आवडत नाही व जे करायची इच्छा पण नाही ते दोन वर्षभर करायचे असल्याने गर्तेत उतरायला अफाट अवधी मिळाला.
सुट्ट्याच का लागतात व सुट्ट्या लागल्यावर घरीच कशाला जायचे हे मूलभूत प्रश्न कोणाला विचारावे अस वाटत पण नव्हते. म्हणून मग सहन करायचे ...मोठं मोठाले दिवस.
अशीच कोणती तरी सुट्टी लागलेली .... नेहमी प्रमाणे सर्व जण गावी गेलेले व तितकी उत्सुकता नसल्याने मी तिथेच... खूप दिवसांपासून पुस्तके वाचली नव्हती, नुकतंच एक मित्राच्या मदतीने शिरपूरच्या नगरपालिका संकुलावरील नव्यानेच ओपन झालेले  वाचनालय लावले होते, आवडणारे जवळपास सर्व पुस्तके वाचून सम्पली होती.
माझ्या जवळ असलेले "एका मुंगीचे महाभारत" हे गंगाधर गाडगीळांचे आत्मचरित्र हे जमा करून दुसरं घ्यायला गेलो.
तिथं गेल्यावर कपाटांमध्ये थोडी खाली वर करून व कॅटलॉग बघून कळलं की आता माझ्यासाठीचा स्टॉक संपलाय.
 काय करावं असं विचार करत होतो. ते वाचनालय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे भेटण्याचे ते ठिकाण पण होते. तिथे दोन चार गाद्या- उश्या लोड असं काही सामान पण होतं.
आता दुसरं कोणतंच पुस्तक नाही म्हटल्यावर परत ते एका मुंगीचे महाभारत घेऊन मी त्या गादीवर वाचत बसलो व वाचता  वाचता कधी झोपी गेलो कळलं नाही...
उठलो तेव्हा पुस्तक बाजूला पडलेले होते. ढणढणत जळत असलेल्या पिवळ्या बल्पच्या उजेडात दोन तीन म्हातारे पेपर पार डोळ्यासमोर धरून वाचत बसलेली दिसली, हवेतील उष्णता जाणवण्याइतपत होती, भोवताल पसरलेला अंधार ....निशब्द होता.
             - समाधान महाजन
(विशेष सूचना - संजय दत्त मला आवडतो अस बिलकुल नाही)😊


द दा विंची कोड

2008-09 चे वर्ष असेल. माझ्या upsc च्या तयारीचा peak-point होता. आता इतक्या करेक्ट डेट्स आठवत नाही पण कदाचित तेव्हा यूपीएससीची मेन्स दिलेली होती व मुलाखतीच्या तयारीसाठी सर्व आकाश खुले होते. समोर येणारा व प्रसिद्ध झालेला कुठलाही विषय अभ्यासाचा विषय बनून जात होता. महाराष्ट्रातील मुलांचा व त्यातही मराठी  माध्यमावर डिपेंड असलेल्या मुलांचा मुलाखतीविषयी जो भाषेचा तळ्यात-मळ्यात प्रॉब्लेम असतो: मी पण त्यातूनच जात होतो.  तरी अखेर यूपीएससी ची अंतिम लढाई इंग्रजीमधूनच लढावी असे ठरवले. द हिंदू ची बनवलेली डिक्शनरी(हे द हिंदू वाचनार्‍यांनी सुरूवातीचे दिवस आठवून पहावे☺) बाहेर काढून तिच्या वापरासह इतर अनेक  इंग्रजीचे विविध प्रयोग सुरू होते. बोलण्यापासून, लिहिण्यापासून ते अगदी ऐकण्यापासून व पाहण्यापासून इंग्रजीत काय करता येईल ते करायचे असे ठरवलेले( अर्थात या सर्व अचाट प्रयोगावर नंतर पुन्हा कधी तरी लिहू). 
तर आज या सर्व बाबींची आठवण यायचे कारण म्हणजे त्या काळातच एक चित्रपट भारतात एकदमच प्रकाशझोतात आला होता, त्यावर सर्व वृत्तपत्रात बातम्या, editiorials,  हिंदू चे संडे मॅग्झिन तर सर्व रीलेटेड मासिकांमध्ये देखील त्यावरच लेख येऊ लागले. तो चित्रपट होता "द दा विंची कोड". डण ब्राऊन या प्रसिद्ध कादंबरीकाराच्या याच नावाच्या प्रसिद्ध पुस्तकावर तो चित्रपट आधारित होता. आजही तेव्हाचे ते वृत्तपत्र व पुरवणीतील मोनालीसाचे चित्र व विंची कोड बद्दलचे लिखाण डोळ्यापुढे येते. ते सर्व वातावरण व हाताशी असलेला थोडा वेळ काढून मी व माझा एक मित्र पुण्याच्या इ-स्क्वेअर ला हा चित्रपट अति-उत्सुकतेने पाहण्यास आम्ही गेलो. तोपर्यंत अगदी टायतनिक व जुरसिक पार्क सोडले तर हॉलीवूडचे चित्रपट मी पाहिलेले नव्हते(त्या विषयी अजून नंतर कधीतरी).  चित्रपट सुरू झाला आणि तो सुरू राहिला... क्वचितच काही कळत होते. त्याच्या खाली ट्रान्सलेशनची स्ट्रिप येणे पण शक्य नव्हते कारण  क्ंप्लिट इंग्रजीत होता. डोक्यावरून ओढून घेतलेले काळे जरकिन घातलेला माणूस मध्येच गायब होत होता, पोलिस सारखे कोणाचातरी पाठलाग करत होते. लूव्र संग्रहालयातील 'मोनालिसा' व 'द लास्ट सफर' या लिओनार्दो च्या चित्रांचे अनेकदा दर्शन होत होते. डिसाफायर व कोड असले काही शब्द कळत होते. मध्येच कुठल्यातरी झालेल्या जोकवर चित्रपट गृहात हास्य उमटले मग बाकी भयंकर कससच होत मी बाजूला बसलेल्या मित्राकडे नजर टाकली तर तो कदाचित भारतात इंग्रजी आणनार्‍या लॉर्ड मेकोलेंच्या सतरा पिढ्यांचा उद्धार करत असलेला चेहरा घेऊन बसलेला. मग बाकी पूर्ण चित्रपट गुपचुप आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे जे दिसेल ते व जे समजेल ते या प्रमाणे पाहत बसलो.
आता पुन्हा हे आठवण्याचे कारण म्हणजे आजच ब्राऊन यांची ती प्रसिद्ध 'द दा विंची कोड' कादंबरी वाचून संपवली आणि तो चित्रपट, ते लेख सर्व आठवले. एखादी कादंबरी जगप्रसिद्ध होण्यासाठीचा सर्व ऐवज या कादंबरीत अगदी ठासून भरला आहे. निवडलेला विषय अगदी ख्रिश्चन धर्माच्या मुळाशी जाण्याचा असल्याने वादग्रस्त जरी झाला तरी एकूणच कादंबरीचा प्लॉट, त्यातील वेग, पकड, रहस्य टिकवून ठेवण्याची कला असे अनेक वैशिष्ठ्य या कादंबरीत एकसे बढकर एक आहेत.  
यानिमित्ताने दान ब्राऊन ने किती संशोधन केले असेल तेही लक्षात येते. कॅथॉलिक चर्चची डार्क साईड एकदम वाचकांच्या समोर येते. ती तशी या पुस्तकातून व चित्रपटातून सामोरी आल्याने जगभर त्या काळात खळबळ माजली होती. येशू ख्रिस्त हा मूळ ज्यू होता व मेरी मॅगडालीन त्याची पत्नी होती, तो एक कुटुंबवत्सल मनुष्य होता हे रहस्य व्हाटिकनने दडपून ठेवले. तो एक सर्व सामान्य पुरुष आहे असे मान्य केले तर त्याला दिलेल देवपण व त्या सोबतच चर्चचे अस्तित्व पण धोक्यात येईल ही भीती त्यामागे होती.  
पण तरीही हे सर्व रहस्य वर्षानुवर्ष टिकवून ठेवण्याचे काम प्रायरी ऑफ सायन ही संस्था करत असते. त्यासाठी अनेक सांकेतिक कोड, भाषा, चित्र यांचा वापर या संघटनेचे सदस्य करत असतात. या संघटनेत न्यूटन, लिओनार्दो द विंची असे अनेक प्रतिष्ठित लोक असतात. लिओनार्दो त्याच्या चित्रांमध्ये असे अनेक संकेत पेरून ठेवायचा असे उल्लेख यात येतात. विशेषतः मोनालिसा व द लास्ट सफर ही चित्रे. सोफी ही नायिका व लाँगडण हा नायक  यांच्या माध्यमातून हा सर्व मोठया विषयाचा  आपल्याला लेखक एक थरारक व रोमांचकारी कथेतून परिचय करून देतो. 
कवीमित्र नितिन वाघ यांची मोनालिसा वरील कविता आजच वाचण्यात आली, त्यांच्यामुळेच कळलं की आज लिओनार्दो द विंची चा वाढदिवस आहे. त्यांच्या कवितेतील ओळी, 
"काय रे खरंच काही गुपित आहे का तिच्याकडे?
कुठवर पोहोचत होती तुझी नजर
तू कोरलेली स्मशानं
उचकरलेली प्रेतं
छेद गरतींच्या गर्भाशयांचे
कुवाऱ्यांचे कारेपण
काहीच नव्हतं सामान्य तू केलेलं
सगळं इतकं अनैसर्गिक असूनही
तू वाटतो नैसर्गिक फार"
संपूर्ण कादंबरी वाचतांना या ओळी अत्यंत चपखल बसतात हे कोणालाही जाणवेल. 

या सर्व प्रवासातून जातांना वाटत होत की, हे असल काही अचाट ताकदीचे आपल्याकडे देखील झाले पाहिजे. हाडा माणसाच्या व्यक्तिला देवत्व देऊन त्यातून आपला स्वतःचा, एखाद्या धार्मिक संस्थेचा किंवा पुजास्थळाचा वापर स्वार्थासाठी करणारी मानवी जमात सर्व्या जगात व जगातील सर्व धर्मात आहे. त्याशिवाय का माणसाच्या जन्मानंतर सर्व धर्मातील ईश्वराने जन्म घेतला आहे. 
                                                                            - समाधान महाजन 

ककल्ड

खर तर सात सक्क त्रेचाळीस वाचल्यानंतर पुन्हा कधी किरण नगरकरांच्या नादी आपण लागायचे नाही अस मी मनोमन ठरवलं होत. अबोध, अगम्य जे सामान्यपणे कळत नाही त्यातला हा एक महान लेखक आहे व ते समजून घेणे आपल्या आवाक्यापलीकडे आहे अशी स्वतःची समजूत मी करून घेतली होती. त्यामुळे मैफिलीत गाणारे गायक आपल्या गुरूचे नाव घेतांना कानाच्या पाळीला हात लावून रिसपेक्ट व्यक्त करतात. यापुढे कुठेही नगरकरांचा विषय निघाला की, मनातल्या मनात मी मुकपणे हाच रिसपेक्ट व्यक्त करत अधिकच मुक होणार होतो.
पण नाही हे अस कायम राहणं शक्य झालं नाही. आज 612 पानांची ककल्ड संपतांना वाटत होत की, अजून तितकेच पेज या पुस्तकात असते तर किती बर झालं असत. हा एकदम 180 डिग्रीचा बदल कसा झाला?
ककल्ड ही साहित्य अकादमी प्राप्त कादंबरी होती व युरोपातील अनेक देशात तिचे अनुवाद होऊन कौतुकही झाले होते, त्याबद्दल वाचनातपण आले होते. त्यातच अलीकडे आमच्या कार्यालयातील शैलेन्द्र परदेशी या अधिकारी मित्रांनी ककल्ड कादंबरी भेट स्वरुपात दिली. याच आसपास अजून एका मित्राशी बोलतांना या कादंबरीचा विषय निघाला. बाकी शून्य मध्ये आलेली शारीरिक वर्णने त्याला फारसे आवडले नव्हते त्या वेळी त्याने ककल्ड वाच म्हणून सल्ला दिला. आता बाकी शून्य माझी आवडती कादंबरी असतांना त्या पेक्षा ककल्ड वाचून पहा असा सल्ला मिळाल्याने व योगायोगाने पुस्तक पण हाती आल्याने मी ते जरा अनिच्छेनेच वाचायला सुरुवात केली आणि बघता बघता लेखकाने मांडलेल्या त्या भव्य-दिव्य कालपटामध्ये कधी रंगून गेलो कळलंदेखील नाही. इतकी ताकद या लिखाणाची आहे.  किती विस्तृत व भव्य पट मांडलाय पण जस वाचत राहू तशी उत्सुकता वाढत जाते.  
काय नाही यात? इतिहास आहे, युद्ध आहे, कपट आहे, छळ आहे, प्रतारणा आहे, शृंगार आहे, राज्यव्यवस्था, समाज, चालीरीती .... काय नाही . सर्वच आहे. स्थूलातून सूक्ष्माकडे कधी जातो व व्यक्तीकडून समष्टीकडे कधी जातो कधी परत येतो लक्षात पण येत नाही. 
मेवाडचा इतिहास व परंपरा आपल्याला माहती असते. तिथली कृष्णभक्त मीरा आपल्याला माहिती असते पण तिचा पती भोजराज हा मात्र काळाच्या उदरात गडप झालेला ज्याची पूर्ण नोंद इतिहास ठेवत नाही. ते पात्र जबरदस्त ताकदीने नगरकरांनी उभे केले आहे. अनेक ऐतिहासिक व प्रसिद्ध पुस्तके वाचण्यात आली पण प्रथमपुरुषी नायक म्हणून जे काही युवराज बनून लेखक स्वतः आपल्याला या काळात घेऊन जातो ते निव्वळ निव्वळ कालातीत.....इव्हन भोजराजने जरी येऊन ककल्ड वाचले तरी त्याला आपली आत्मकथा कोणी लिहिलीय असा प्रश्न पडावा. इतका तादात्म एकरूपतेने नगरकरांनी ते मांडलेय. 
थोड बाहेर येऊन जरी विचार केला तरी वाटत की इतक लिहिण्यासाठी काय लेव्हलला जाऊन मेहनत घ्यावी लागली असेल नगरकरांना याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. एक संपूर्ण राज्याचा आडवा-उभा पट युवराजच्या नजरेतून उभा करण्यासाठी अनेक ऐतिहासिक कागदपत्र, लोककथा, बखरी, प्रवाद, भूगोल, व असंख्य संदर्भ ग्रंथांचा अनेक दिवस अभ्यास करून ते पात्र स्वतःमध्ये मुरवून घेत परत पुन्हा अनेक दिवसांच्या बैठकीनंतरच असे उच्च दर्जाचे लिखाण होऊ शकते. याबाबतीत नगरकरांना मानाचा मुजरा. 
पुस्तकात अनेक ठिकाणी आपण स्वतः उभे आहोत इतकी जीवंत वर्णने आहेत. बाबरसोबतचे युद्ध असो वा जे गुजरातच्या सेनेसोबत युद्ध , त्याची वर्णने वाचतांना अस वाटत की आपण प्रत्यक्ष युद्धभूमीवर आहोत, विशेषतः नायक जेव्हा गनिमी काव्याने लढाईचा निर्णय घेतो व त्याची अंमलबजावणी करतांना ची जी वर्णने आहेत ती म्हणजे जणू आपल्या डोळ्या समोरच एक एक मुडदा पडत जातो. गुजरात सेनापतीने शीर धडावेगळे करण्याचे दृश्य पण तसेच,युद्धभूमीचे परीक्षण करतांना नायकाने सकाळ,संध्याकाळी पाहिलेली दृश्य, दलदलीच्या प्रदेशातील वर्णने जणू लेखकाने यासाठी किती minute डिटेलिंग केलय अस सारख वाटत राहतं. मेवाड मध्ये पसरलेली पटकीची साथ असो वा युद्ध प्रसंगी टाकलेल्या राहुट्या व तंबूच्या आजूबाजूचे वातावरण असो  हे सारे  वाचतांना तत्कालीन मेवाड डोळ्यापुढे उभे राहते अर्थात ही बाब अनेकवेळा होते.
मीरा माहीत होती, मेवाड, राणा संग, बाबर हे सर्व माहिती होते पण भोजराज पहिल्यांदाच कळाला व छाप सोडून गेला. चला आता नगरकरांची इतर हेडिंग पण ट्राय करून पाहू

                                                                                                              -समाधान महाजन 

साईड-इफेक्ट

परिस्थिति दिवसेंदिवस खराबच होत आहे. आतापर्यंत फक्त मोठ्या शहरात असलेला धोका बुलढाणा, इस्लामपूर, जळगाव अशा छोट्या शहर व खेडेपर्यंत पसरलेला आहे. स्पेन व इटलीतील बळींची संख्या रोजच 500 -700च्या पुढे जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वारंवार जनतेला सांगत आहेत की, घराबाहेर पडू नका. स्वतःची काळजी घ्या. 

कदाचित भारत यातील तिसर्‍या टप्प्यावर आहे. संपूर्ण देश 14 एप्रिल पर्यन्त अर्थात 21 दिवसांसाठी लॉकडाउन आहे. या कालावधीत सर्वच बंद आहे. अनेक घटना प्रथमच घडत आहेत. 1974 नंतर रेल्वे प्रथमच इतके दिवस बंद झालीय. सर्व फॅक्टरी, प्रॉडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, सर्विसेस बंद आहेत, सर्व कुटीरोद्योग बंद आहेत. सर्व दुकाने मॉल्स बंद आहेत, बस, एस.टी बंद आहेत. खाजगी गाड्या बंद आहेत. रस्त्यांवरील प्रवासी-मालवाहतूक बंद आहे. (अत्यावश्यक सेवा वगळता), रस्ते निर्मनुष्य आहेत. रस्त्यावर आलेल्या लोकांना पोलिस परत पाठवत आहेत. कदाचित हा 21 दिवसांचा कालावधी निघून जाईल पण त्यानंतर येणारी आर्थिक मंदी मोठी असेल.
देशभरातील मजूर मिळेल त्या साधनांनी व तेही बंद झाल्यामुळे चक्क पायीच आपल्या गावी जाण्यासाठि निघाला आहे. एकूणच समाज व समाजशास्राच्या  दृष्टीने हा एक मोठा relevant व ज्वलंत विषय आहे. कारण एक तर हातावर पोट असणार्‍या मजुरांना दिवसभर कमावले तर रात्री खायला भेटते अशी स्थिति आहे. काम बंद याचा अर्थ आवक बंद मग खायला काय मिळेल? त्यातही बाहेरील सर्व खाद्यपदार्थाच्या गाड्या व हॉटेल्स बंद आहेत. बर ते राहतात त्या ठिकाणी घर म्हणावे असे काहीच नसते. शेवटी नाइलाजाने मोठी शहरे सोडून मजुरांनी गावाकडे जाणे पसंद केले. पण मग मार्ग काय ? मिळेल त्या ट्रक, दूध टँकर, भाजीपल्याची गाडी यातून पण शेवटी जिल्हा जिल्ह्याच्या सीमेवर याही गाड्या तपासण्यात आल्या. त्यातून त्यांना उतरवण्यात आले. झालं.... सजग मीडियाने याची बातमी देतांना 'अमुक इतक्या लोकांना या चेक नाक्यावर पकडण्यात  आले ' अशा स्वरूपाच्या बातम्या दिल्या. पकडण्यात काय पकडण्यात?  ते काय गुन्हा करून पळून जाणारे आरोपी होते?  पकडायला. 
अखेर अनेक मजुरांनी पायी जाण्याचा निर्णय घेतला. 300-400-500 किलोमीटर इतक्या अंतरावर घरे असतांना सर्व पर्याय संपल्याने ते पायी निघाले. त्यातही परत मेन हायवेवर चालतांना सापडले तर पकडून परत मेडिकल नेण्यासाठी नेले जात आहे. बर्‍याच ठिकाणी पोलिस विभाग व सामाजिक संस्थांकडून त्यांना जेवण्याची व्यवस्था केली जात आहे. फोटो व विडिओ करून ते परत माध्यमांवर टाकले जात आहेत. एक-दोन दिवस होईल पुढे काय? 
दिल्लीतील व upतील  मजूर पायी जातांना कडेवर लहान मूल असलेल्या स्रिया व डोक्यावर सामानाची गाठोडे असलेले पुरुष पायी चालतांना अनेक नॅशनल चॅनेल्सचे  अॅकर त्यांच्या मुलाखती घेत होते. बाहेरून येणार्‍या गाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या सूचना असतांना up त एका ठिकाणी 150-200 मजूर बसलेले असतांना त्यांच्या अंगावर केमिकलची फवारणी करण्याचा धक्कादायक प्रकार घडला... हे अमानवीय आहे. पेक्षा सरकारी दवाखान्यात नेऊन त्यांच्या टेस्ट करा फार-तर पण एखादी वस्तूसारखी ट्रीटमेंट मानवाला मिळणे हे भयंकर. 
बर पुढे जाऊन ही मंडळी गावात पोहचली तरी त्यांचे तिथे सर्व काही आलबेल आहे असे नाहीच.  उलट गावातील मंडळी त्यांच्याकडे संशयाने पाहण्याची शक्यताच जास्त. त्यातून रस्ते बंदी सारखे उपाय गावाच्या सीमेवर काही ठिकाणी करण्यात येत आहेत. या सर्वांचा सामना त्यांना करावा लागणार आहे.  
यासाठी स्वतः सरकार, अनेक सामाजिक संस्था व उत्साही मंडळी मदत करीत आहेच. ते चांगलेच आहे पण या गटाचे विस्कळीत स्वरूप, कुठलाही डाटा बेस नसणे व मेनस्ट्रिम सोसायटीबद्दल या मंडळींच्या मनात असलेली भीती-धास्ती व न्यूनगंड यामुळे अनेक जन या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 
बर हे सर्व आवरल्यावर त्यांची  मानसिक सामाजिक व आर्थिक स्थितीचे काय? एका विषाणूने मानवी समाजाची उलथापालथ होऊ लागली आहे.