श्रीदेवी

आशा कि लता , तेंडूलकर कि गावस्कर, रफी कि किशोर असले प्रश्न सारखे चर्चेत येत असतात. त्यावर वादही होतात पण याबातीत आम्ही मध्यममार्गी आहोत किंबहुना हे महान व्यक्तित्व सोडून यांच्या काळात थोडे मागे  वाटणारे पण थोडा का असेना दमदार परफॉर्मन्स देणारे व्यक्ती आंम्हाला जाम आवडायचे ....मग अलका याज्ञीक, सलमा आगा, बेगम अख्तर असो वा मुकेश, तलत, हेमंतकुमार असो व सौरव, जडेजा, द्रविड असो भारी वाटायचे........याबाबतीत माझ्या एका मित्राशी चर्चा होत असतांना त्याला सांगितल होत कि बघ सूर्य सूर्य असतो सर्वांना तो माहिती असतो त्याचे महत्व माहिती असते पण तरी लोक चंद्रावर प्रेम करतात तितक सूर्यावर करत नाही .....
माधुरी कि श्रीदेवी अस काही विचारल कि आम्ही हे दोन्ही सोडून त्यांच्या काळात कार्यरत इतर तारकांचे कौतुक करायचो....आज  श्रीदेवी गेली...जाणाऱ्या माणसाबाबत चांगलच म्हणावं असा संकेत आहे.. कारण चित्रपट सृष्टीला बहुमूल्य योगदान देण्यात व आपल्या आदाकारीने अनेकांना खिळवत ठेवनाऱ्या पद्मश्री श्रीदेवीचा मोलाचा वाटा होता श्रीदेवीला भावपूर्ण श्रद्धांजली.

आमची पिढी हि अशा काळात मोठी होत होती जेव्हा चित्रपटगृह व व्हिडीओ पार्लर यांचा पतनाचा काळ सुरु झाला होता व घराघरात पसरणाऱ्या केबल टीव्ही ने जाळे पसरायला सुरु केले होते ..हा तोच काळ होता ज्याच्या काहीच वर्ष आधी  घरावरील अँटीने सरळ करून करून आठवड्यातून एक-दोनदा दूरदर्शन वर दिसणाऱ्या चित्रपटासाठी आतुरलेले  आसायचो ....बदल झपाट्याने होत होते ...आमच्या वडीलधाऱ्या मंडळींकडून ऐकलेली चित्रपट व गाणी अगदी स्वतःच्या घरी नाही म्हटले तरी आजूबाजूच्या मित्रांच्या घरी जावून सहज पाहायला मिळू लागली होती.....आणि हा तोच काळ होता जेव्हा आम्ही श्रीदेवीचा अस्त व माधुरी-जुही-काजोल च्या उदयाच्या बातम्या वृत्तपत्रात व आजूबाजूच्या एकूण चर्चेत वाचत वा ऐकत होतो ....

आमच्यासाठी श्रीदेवी हि वडिलधाऱ्या फार फार तर मोठ्या भावाच्या पिढीतील हिरोईन वाटायची ....तिचा  चांदणी आमच्यासाठी टेपरेकॉर्डर च्या कसेट कव्हरपुरता मर्यादित होता....पाहायला मिळाला नव्हता व पाहिला हि असता तरी त्या वयात काही कळला हि नसता....त्यामुळे फक्त ऐकू येतील तेव्हडी गाणी ऐकायचो...त्यातही ' मेरे शोना पकडो ..पकडो ...' अस 'तू मेरी चांदणी' गाण्यात ऐकल कि वाटायचं हि काहीतरी बालिश हिरोईन असावी (तोपर्यंत तो चित्रपट व गाण पाहिलेले नव्हते)......लम्हे ऐकूण होतो ....पण त्या अनिल कपूर- श्रीदेवी पेक्षा वन-टू-का-फोर व एक-दो-तीन करणरे अनिल कपूर व माधुरी हि जोडी चांगली वाटायची व आमच्या बाल बुद्धीला पटणारी वाटायची......

नंतरच्या काळातही १९९२-९३ च्या आसपास  आलेले डर, बाजीगर या anti हिरो शाहरुखचे व संजय दत्त च्या टाडा मुळे प्रकाशात आलेल्या सडक, खलनायक या चित्रपटांच्या ..नुकतेच पदार्पण करणाऱ्या अजय देवगण ..खिलाडी अक्षय कुमार ...सैफ अलीखान च्या प्रेमात पाढणारी हि पिढी होती मग वेगवेगळी हेअरस्टाईल..कपडे...देहबोली ...फॉलो करण्यासारखा हा काळ होता...व महत्वाचे म्हणजे मग या काळात चर्चेत असणार्या अभिनेत्री होत्या माधुरी.. जुही, काजोल, शिल्पा..अशा

खुदा गवाह हा गाजावाजा करून येणारा चित्रपट अमिताभ व श्रीदेवी ला तारणार असल्याच्या बातम्या वाचायचो पण कधी आला कधी गेला कळल नाही ....वर उल्लेख केलेल्या चित्रपट व अभिनेत्रींच्या गर्दीत श्रीदेवीचे लाडला व गुमराह कधी येवून गेले कळलपण नाही....

नंतर परत एकदा जाणीवपूर्वक पाहण्यात आलेल्या श्रीदेवीच्या चित्रपटामध्ये जुदाईतील कधी हसू येणारी कधी कीव व कधी राग येणारी भूमिका ....चांदनितील मध्यंतरानंतरची भूमिका...बऱ्या वाटल्या व अलीकडची इंग्लिशविंग्लिश मधील भूमिका आवडली...बाकी मि.इंडियात अमरिशपुरी नसता तर साराच लहान मुलांचा चित्रपट वाटला असता...चालबाज ...तोहफा सुमार  मनोरंजन होते....

एकूणच पौंगडअवस्थेतील एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडावी जी तिच्या नंतरच्या आयुष्यातही लक्षात राहावी...तशी त्याच काळात वावरत असणाऱ्या अभिनेत्रीही त्याच्या मनोविश्वाचा भाग कळत-नकळत बनत जातात.....आमचा काळ श्रीदेवीचा नव्हता .....इतकच .

पद्मश्री श्रीदेवीला श्रद्धांजLI
                                                               - समाधान महाजन.



                                                                               

शहर (२)

संध्याकाळच्या गर्दीत रस्त्यावरून सरकत जाणारी गाड्यांची साखळी..मागच्या बाजूने पाहिले तर सर्वांचे चमकणारे लालभडक इंडिकेटर्स..टेललाईट्स...प्रत्येक गाडीत कोणी न कोणी बसलेले असेल ..प्रत्येक जण आपापल्या विचारात असेल .कोण कोणत्या कोणी कोणत्या ...जवळ बसलेल्या व्यक्ती ला सुद्धा माहिती नसेल बाजुच्याच्या मनात काय सुरु असेल ..

...तरी प्रत्येकासाठी हे सर्व भौतिक जग म्हणजे त्याचेच विश्व असेल ...जस कि हा ट्रॅफिक सिग्नल सर्व जण बघतायत ...हा भला मोठा चौक ...त्याच्या बाजूला असलेला हा भला मोठा निऑन लाईटीत चमकणारा जाहिरातीचा बोर्ड..हि मोठी जुनी इमारत दिवसातून हजारो जण या रस्त्यावरून जात असतील...प्रत्येकाला ते आपलं वाटत असेल किंवा हा भलामोठा कॅनव्हास त्याला त्याच्या जीवनातील या दिवसाच बॅकग्राऊंड वाटत असेल.....

हे सर्व सर्वांना सारख असतांना काही जणांना उगाचच अस का वाटत असत कि जणू काही या भूतलावर सर्व सृष्टीची निर्मिती फक्त व फक्त त्यांच्यासाठीच झाली आहे......

लहानपनी मी पाहायचो कुठला कार्यक्रम असला कि आई तयार व्हायची ...नवी साडी..त्यावर सर्व मॅचिंग ...गजरा अस सर्व ...मग आईच्या मैत्रिणी यायच्या ..मग एकमेकांकडे बघण्यात, कौतुक करण्यात व दुसऱ्याच्या डोळ्यात व चेहऱ्यावर स्वतःचे कौतुक पाहण्याचा सोहळा काही वेळ चालायचा ...मग या सर्व बायाना अजून काही बाया येऊन मिळायच्या मग त्या सर्व कार्यक्रमात जायच्या आता त्या ठिकाणी आधीच सजून धजून येणाऱ्यांची संख्या भरपूर असायची ...मग ते सर्व मला एकसारखेच वाटायचे ...फार काही फरक वाटायचा नाही....

तरी माणूस या संपूर्ण समष्टीत स्वतः साठी काहीतरी करत असतो ...पृथ्वीचं लाखो चौ कि मी चे क्षेत्रफळ पसरलेले त्यात फूट फूट इंच इंच जागा माणूस घेतो व अभिमानाने दुसऱ्याला दाखवतो तेव्हा चंद्रासह एकूणच सूर्यमालेतील जमीन असलेले सर्व ग्रह त्याच्या क्षुद्र कृतीला हसत असतील का?

माणूस सूट कोट टाय घालतो व साधे कपडे घातलेल्या माणसांकडे अतीव केविलवाण्या किंवा उपकृत नजरेने बघतो तेव्हा त्या सध्या माणसाच्या शरीरावरील अवयव  त्या कोट वाल्या माणसाच्या अवयांकडे आपलं मन मोकळं करत असतील का?

मानसिक वरचढ पण आपल्या बोलण्यातून दाखवून समोरच्याच तोंड बंद करण म्हणजे युद्ध जिंकल्याचा भास वाटत असतांना त्या केविलवाण्या समोरच्याला ईव्ह ने ते मायावी सफरचंद उगाचच खाल्लं व हि पिलावळ जन्माला आली असं काही वाटत असेल का ?


या गच्च भरलेल्या रस्त्यावर लालपिवळे  लाईट्स चमकत असणाऱ्या गाड्यांच्या मांदियाळीत बसलेल्या तमाम मनुष्य जातीपैकी  सर्वच्या सर्व त्या ऍपलच्या मोहामुळे जन्माला आले याची एकाला आठवण असेल का?

तसं नसेल तर हे परमेश्वरा मला पुन्हा एकदा त्या महाप्रलयाच्या लाटेमध्ये वाहून जाऊ दे.
                 -समाधान महाजन-

शहर (१)

या शहरात आलं कि, काळ पळत पळत येऊन बोट पकडून भूतकाळात  घेऊन जातो....अंगावर येणारा चौक... केव्हाही जोराने कोसळू लागेल इतपत तुडुंब भरून आलेले आभाळ...कोणीच नाही घरी वाट पाहणारे तरी घरी जायची फुका लागलेली ओढ ...साल हे बुळे मध्यमवर्गीय संस्कार व रिवाज...परत घरी जाण्याचे ....का जायचं घरी परत...या संपूर्ण अंगावर येणाऱ्या कोलाहालाचा भाग बनून यातच विरघळून जायचय मला....
ते बस स्टँड च्या कोपऱ्यातील बाकाखाली संपूर्ण भिजून कुडकुडणाऱ्या बारीक कुत्र्यात व व त्याच बाकावर निवांत आपला सर्वांग गलिच्छ पणा पांघरून पडलेल्या भिकाऱ्यात असलेला फक्त आजचा दिवस जिवन्त दिसतोय .... बाकी सारी बस स्टँड वर जमलेली जनता  एक तर गेलेल्या गाडीचा शोक मनवतेय किंवा एक तर अजून न आलेल्या गाडीचे स्वप्न पाहतेय....
                      - समाधान महाजन 

नीतू

तू फक्त आदि आहेस,अंत नाहीच

तू तुझ्या नजरे समोरच्या जाड काचेआड 
तुझी वेदना, तुझे दुःख , तुझा आक्रोश , अवहेलना, अपमान 
सारं आवाज न करता गिळून जगाला सामोरी जातेस ,

तेव्हा  सर्वांना दिसत असतं फक्त तुझ्या डोळ्यावरील जाड काच
 व चेहऱ्यावरील मिश्किल  हसू, जे तुझ्याही नकळत  तुला चोरून फुलत असतं.

फक्त तुला ते माहिती असतं, कि ते हास्य म्हणजे एक्सट्रीम दुःखाला लागलेली झालर आहे, 

म्हणून तू जगून घेतेस मनसोक्त पणे ऑनलाइन च्या जगात ,
जिथे ऑफलाईन चे सर्व सोपस्कार व दांभिक कायदेकानून सम्पलेले असतात, 

व  पॉवर प्ले मध्ये एखाद्या कसलेल्या फलंदाजाने भन्नाट फटकेबाजी करावी 
तसं तू  सर्वांचे मनोरंजन  करत असल्यासारखं वाटलं... 
तरी  खर तर  तू तुझ्या डोळ्या समोर उभा असलेला आक्राळ- विक्राळ  दिवस 
साजरा करत असतेस इतकंच.

तस तु असंही राग लोभ  द्वेषाच्या पलीकडे केव्हाच निघून गेलेली  
तरीही जेव्हा जेव्हा तुझ्या वैयक्तिक आयुष्यातील संकटे 
तू एका ओळीच्या मेसेजने  कळवते ....तेव्हा 
बराच वेळ काय उत्तर द्यावं कळत नाही....

कदाचित तुझी उत्तरे तुला सापडलेली असतात....
म्हणून तू फक्त प्रश्न फॉरवर्ड करत असावीस.

ते शाळेत नाही का ...पहिल्या बेंच वर बसून ही एखाद्या अवघड तासाला 
तू झोपलीयस कि जागीयस हे कळायचं नाही ......
तसं करून बघ न आयुष्याच्या अवघड वळणांवर...म्हणजे मग 
तितकाच त्रास कमी होईल....स्मूथली वळण  तरी  पार होतील.... 
असेही  बसायचे ते धक्के बसून गेलेचेयेत. 

अन अगदीच शेवटचं नाही पण त्याच्या अलिकडंच सांगायचं म्हटले तर 
सारखं  हास्य शेअर करतेस ... कधी दुःख पण शेअर करत जा ....
सर्वजण वाटून घेतील कि नाही माहीत नाही पण हलके नक्की करतील ...

                तूर्तास इतकेच ....

                                         -समाधान महाजन




व पु काळे


लहान वयात किंबहुना वाचनाचा झपाटा वाढल्याच्या वयात आपल्यापुढे कोणते पुस्तके येतात, कोणत्या भाषेची व कोणत्या लेखकाची पुस्तके येतात हे कदाचित त्या त्या व्यक्तीची भविष्यातील जडणघडण निर्धारित करत असावे. ती लोकं थोरच ज्यांचे वाचन ठरवून करवून देण्यात आले त्यांच्या जबाबदार पालकत्वाने.....पण अस ठरवून पण दिल तरी काय वाचायचं व कोणत्या वाचनात रस आहे हे त्या त्या व्यक्तीच्या एकूणच स्वभाव व आवडी वर अवलंबून असु शकतं....
तर माझा एकूणच वाचनाचा परीघ पाठय पुस्तकांबाहेर विस्तारला जाण्यास सुरुवात झाल्यावर श्रीमान योगी,राऊ,मंत्रावेगळा,राजर्षी,सारख्या ऐतिहासिक तसेच कऱ्हेचे पानी सारखे आत्मचरित्रात्मक पुस्तकांच्या प्रभावातून बाहेर पडण्याची कुठलीच शक्यता उरली नसतांना एका अपघाती दिवशी व पु काळेंचे सखी हे पुस्तक कारणीभूत  ठरले...अन तेथून पुढे समग्र वपु सम्पेपर्यंत  व त्याच्या प्रभावातून बाहेर येई पर्यंत बरेच दिवस संपलेत.
त्याचे असं झालं कि नवोदयच्या हॉस्टेल ला असतांना एका मुलाच्या हाती वपुंचे सखी पुस्तक दिसले त्याचे ते आकर्षक व वेगळेच मुखपृष्ठ पाहून मित्राकडून उसने घेऊन मी ते पुस्तक पूर्ण केले....पण त्यानंतर शाळेच्या वाचनालयातील वपुंचे एकही पुस्तक मी बिन वाचायचे  शिल्लक ठेवले नव्हते. अर्थात हे सर्व वाचन आठवी ते दहावी या वर्गातील तेही अत्यन्त व्यस्त शेड्युल मधून मिळेल त्या वेळी....त्याही वयात रात्री बऱ्याच उशिरा पर्यंत जागायची सवय या पुस्तकांमुळे लागली....
 वाचलेल्या पुस्तकातील आवडलेल्या ओळी सुभाषिताप्रमाणे वहीत लिहून ठेवण्याची सवय वपुंमुळे लागली...नंतर वपुंचे वपुर्झा आले त्यातील निम्मे हुन अधिक माझ्या वहीत लिहून ठेवलेली होती......
वाक्य च्या वाक्य तोंडपाठ असत....अन असच एक दिवस 'पार्टनर' हाती आलं.... अन अक्षरशः कहर केला त्या पुस्तकाने..... उमलत्या वयातील भावविश्व व वपुंची वेगळीच शैली एक डेडली कॉम्बिनेशन बनत गेलं ....'आपल्याला हवं तेव्हा तिसरा माणूस न जाणे म्हणजे नरक'  व 'पोरगी म्हणजे झुळूक अंगावरून जाते पण धरून ठेवता येता नाही' असली चमत्कारिक वाक्य मित्रांसोबत असतांना अनेकदा वरच्यावर वापरली जात ....
तेव्हापासून तर पार कॉलेज सम्पेपर्यंत वपु डोक्यात ....अर्थात इतर वाचन पण सुरूच होते पण हे जरा जवळचं वाटायचं...
अशाच एक बेरोजगार दिवशी डोकं गच्च असतांना वपुंना पत्र लिहायला घेतले ....त्यांचे प्रत्येक पुस्तक त्याचा अनुभव अजून काय काय लिहित असतांना जेव्हा पूर्ण झाले तेव्हा चक्क 12  पेजेस भरली होती अर्थात भावूकता जास्त असावी वयाप्रमाणे..
अन कुठल्याही उत्तराची अपेक्षा न करता पोस्टात टाकून दिले.
चक्क काही दिवसांनी त्यांचे उत्तर आले त्यांच्या हस्ताक्षरात तेव्हा 'आज मैं उपर ...' अस काहीसं फिल होत होतं...
......
आज इतक्या दिवसानंतर जुनी पेटी उपसत असतांना हे पत्र हाती आले न हे सर्व  आठवले ...
आज जरा हा प्रकार हास्यास्पद वाटला...पण कदाचित ते त्या वयात बरोबर असावं...
आज आवडते लेखक कोणी विचारलं तर यादीत कदाचित वपुंचे नाव पण येणार नाही....वय व सततच्या वाचनाने अनुभव विश्व जस जसं  समृद्ध होत जात तस तसं आवडी निवडी बदलत असतात हे खरं असल तरी मार्गात येणारे बरेच जण आपली मोहोर आपल्या वाचन अनुभवावर उमटून जातात हे खरंय.
                          - समाधान महाजन

नोंदी नऊ

मित्र शब्द बऱ्याचदा फसवा वाटतो, त्यातही हे असं व्यवहारी जीवनात रोजचच फिरणं असतांना त्यातील फोलपणा लगेच जाणवतो, पण असतात अशी काही नाती हृदयाशी जोडलेली त्यात कसलीच अपेक्षा नसते, देणं-घेणं नसत, मागणी काहीच नसते पण तरी मन ओलं झालेलं असतं, डोळ्यात काहीतरी दाटून येते व काही क्षण गच्च डोळे बंद करून त्याच्या आठवणींचा गारवा तप्त देहावर फुंकर घालून जातो.
आज एकदम नवीनच नम्बर वरून तुझा फोन आला,प्रवासात बऱ्याच उशिरा लक्षात आलं मग मीच फोन केला परत व तुझा आवाज खूप वर्षांनी ऐकला... तेव्हा खर तर काय बोलाव मला सुचत नव्हतं व तू आपलं सारख्या ह्याच इंप्रेशन मध्ये कि मी काहीतरी ऑफिसच्या कामात,मीटिंग मध्ये वैगेरे असेल तू सारखा विचारत होतास नंतर करू का ? कामात आहेस का?  अन मला नेमकं काय बोलावं शब्द सुचत नव्हते. खरं तर मला ओरडून सांगावं वाटत होतं मित्रा बोल तू, बोलत रहा, मला मोकळं बोलायच खूप बोलायचय तुझ्याशी .......पण यापैकी एकही शब्द फुटला नाही तोंडातून ......मग तूच म्हट्लास करतो नंतर म्हणून तरी मी तुला आडवू शकलो नाही.
मग माझा तो सम्पूर्ण दिवस असाच ओसाड गेला ......
अन त्या ओसाड माळरानावर सोसाट्याने वाहणाऱ्या तुझ्या आठवणींनी मला पार सैरभैर करून टाकलं.......

खर तर तू त्या दिवसात का बोलावं माझ्याशी, अन का आवडावा तुला माझा सहवास?? अस काही वेळा वाटून जायचं ....माझ्या फटकळ स्वभावाने अनेकदा उचल खाल्ली पण कि तुला विचारावे पण तेव्हा नाही विचारलं आता वाटत विचारलं असत तरी तू खूप शांत पणे छान उत्तर दिले असते ........ पण तेव्हा वाटायचे मला कि अस काही बोलण्याने तू माझ्या पासून दूर गेलास तर?? असंही व्यक्त होऊ शकणारी तेव्हा माझी खूप कमी ठिकाण होती त्या पैकी तू एक ....तुला दुखावून कस चाललं असत .....

तुझे डोळे कमालीचे निरागस होते लहान बालकासारखे ... तो nascent innocence मला खूप आवडायचा.... दुसर तू माझ्यासारखाच बंडखोर होतास...... तू काही क्षणापूरती सर्व बंधने झुगारून  प्रसंगी घरी खोटे बोलून ड्युटीच्या ठिकाणी काही दुसरे कारण सांगून फक्त माझ्यासाठी जेव्हा वेळ काढयाचास तेव्हा खर सांगू तेव्हाही उर भरून यायचं व आताही येतंच...
बर वेळ काढून काय करायचो आपण तर तुझ्या बाईक वर जिल्ह्याला जाऊन माझी पुस्तक आणायचो, कधी कसली कागदपत्र  जमा करायचो , एखाद्या lecture ला जायचो किंवा फार फार तर लांब शहराच्या बाहेर कुठतरी ..एखाद्या पुलावर वा रिकाम्या जागेवर जाऊन बसायचो बऱ्याचदा निःशब्द .....निसर्गाचा आस्वाद घेत ............तेव्हाचा तो गवताचा वास, पक्षांचा आवाज व मध्येच येऊन जाणाऱ्या एस टी बसचा आवाज आजही मला तसाच ऐकू येतो अनेकदा..

माझ्या आयुष्यातील पहिली चार चाकी गाडी जी मला आपली वाटली ती तुझीच व पहिल्यानंदा मोठ्या गाडीत बसलो ते तुझ्याच....तू हि इतका माझ्या सारखाच गुलछबू कि एखाद्या रिक्षाला बोलवावे तस मी तुला कॉल करून बोलवत असे तुही गाडी घेऊन यायचास व आपण जायचो कुठं तर चहा प्यायला ....

हे अस फार दुर्मिळ झालेय रे आजकाल ...लोक अंतराचा हिशेब करायाला लागतात लगेच ....अशावेळी मित्रासाठी बहिशोबी होणाऱ्या तुझी खूप आठवण येते.

आणि सर्वात महत्वाचे माझ्या आयुष्यातील त्या अनेक  अपयशी संध्याकाळ जेव्हा खुल्या अवकाशाखाली पसरलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यात मी तोंड खुपसून झोपलेलो असतांना तू मला समजवत रहायचा व माझ्या भविष्यातील यशाची खात्री मलाच देत रहायचा... तू मला कठोर, व्यवहारी , विचारी मानायचास पण खर सांगू तेव्हा माझ्या इतका कमजोर कोणी नसायचं पण तुझ्या त्या अश्वासक शब्दांनी मला खूप बर वाटायचं...तुझे ते निरागस डोळे मला आशादायी करायचे....

कुठून आणायचा रे तू माझ्यावर इतका विश्वास?
मिस यू डिअर.
                                  -समाधान महाजन