द थेफ्ट ऑफ इंडिया - रॉय मोक्झाम

 

रॉय मोक्झम यांचे द थेफ्ट ऑफ इंडिया असे एक पुस्तक आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘असा लुटला भारत’ या नावाने सरिता आठवले यांनी केला आहे. मेहता मार्फत त्याचे प्रकाशन करण्यात आले आहे. 212 पानांचे हे पुस्तक आहे. रॉय मोक्झम हा एक ब्रिटिश इतिहासकार आहे. इतिहासातील दुर्लक्षिल्या गेलेल्या घटनांचा, नोंदींचा अभ्यासपूर्ण ऊहापोह हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ठ्य समजले जाते. 

वास्को द गामाच्या मोहिमेआधी पासून ते ब्रिटीशांनी बंगाल ताब्यात घेईपर्यन्तचा कालखंड यात समाविष्ट केला आहे.  मुळात यात पहिल्यांदा एक बाब नवीन कळली की, पोर्तुगीज किती क्रूर व अमानुष होते. यातील त्यांच्या हत्याकांडांची वर्णने वाचतांना अंगावर काटा येतो. कोजिकोडे, गोवा, दिव या ठिकांनावर ताबा घेण्यासाठी क्रूरतेची सगळी सीमारेषा त्यांनी पार केली होती.   त्यांचे एकच काम चांगले होते त्यांनी मिरची, साबुदाणा, बटाटे,  अशी पदार्थ भारतात आणली.  

धर्मांतर व व्यापार ते सोबतच करत असत. त्यांचे अनुभव व व्यापारातील प्रगति लक्षात घेता ब्रिटीशांनी आपली रणनीती बदलली. त्यामुळे अनेक वर्ष येथील सामाजिक व धार्मिक बाबतीत ब्रिटिश लुडबूड करत नसत. आपण समजतो तसा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रवास किवा प्रगति देखील लिनियर पद्धतीने झाली नाही. सुरूवातीचे त्यांच्या समस्या फार वेगवेगळ्या असत. मुळात इतका लांबचा समुद्रप्रवास, बोटीवर आजारी पडून मृत्यूमुखी पडणारे लोक शिवाय येथे आल्यावर देखील हवामान सूट न झाल्याने विविध आजारांना बळी पडून कैक इथेच जीव सोडत असत. 

फ्रेंच, डच, पोर्तुगीज, इंग्रज कोणीही असो सुरुवातीच्या काळात येणार्‍यांसोबत त्यांच्या बायका नसत. किंवा लग्न न झालेले तरुण येत. त्यामुळे येथील देशी स्रीयांशी ते लग्न करत त्यातून परत अनेक समस्या उद्भवत. 

पिटर मुंडी याने भारतातील प्रवासाचे केलेले वर्णन आजही इतिहासकार तेव्हाची स्थिति कशी होती यासाठी आधारभूत मानतात. तो सूरत हून बरहानपुर मार्गे आग्रा येथे गेला त्या प्रवासातील आंखो देखा हाल त्याने लिहून ठेवला आहे. तेव्हा दुष्काळ पडलेला होता. लोकांना खायला अन्न नव्हते. नंदुरबार जवळ आल्यावर त्याने रस्त्यात पडलेले अनेक प्रेते पाहिले. हेच चित्र त्याला पुढे देखील दिसले. 

या पुस्तकात पोर्तुगीजांचे वर्णन आहे. मात्र ब्रिटिशांची क्रूरता तितकी दाखवली नाही. त्यासाठी विलियम डलरिंपल यांची पुस्तके वाचायला हवे. पण या पुस्तकात अनेक बाबी नव्याने कळतात. 

- समाधान महाजन 

11 एप्रिल 2023 


No comments:

Post a Comment