सूरज एंगडे व कास्ट मॅटर्स

 नुकतेच सूरज एंगडे यांचे कास्ट मॅटर्स हे पुस्तक वाचले. त्याबाबत बरीच उत्सुकता होती. एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यात पुण्यात तीन चार ठिकाणी सूरजच्या मुलाखतीचे कार्यक्रम अगदी हाऊस फूल झालेले दिसले. तशा बातम्या वृत्तपत्रासह सोशल मीडियावर सगळीकडे दिसल्या. खर तर सूरज सोबत आमची भेट मार्च मध्येच झाली. आणि थोडी थोडकी नव्हे तर तीन दिवस सातत्याने आम्ही भेटत होतो.  कधी कधी काही बाबी इतक्या अनपेक्षितपणे घडतात की त्या घडून गेल्यावर अनेक दिवस त्यांच्या लाटांमध्ये आपण वाहत असतो. 

सूरजची व माझी भेट होण्याचे कारण ठरले आमचे Additional Commissioner  येंगडे साहेब. साहेब स्वतः सखोल व चौफेर वाचतात. त्यांचा जनसंपर्क देखल दांडगा आहे. त्यांच्या परिचयातूनच सूरजची नुसती भेट झाली असे नाही तर तीन चार दिवस आम्ही सातत्याने भेटत होतो. त्यातून औपचारिक अनौपचारिक अशा भेटी-गप्पा-चर्चा झाल्या. नाशिक नंतर सूरज पुण्यात गेला व एकदम सर्व मीडियातून त्याच्या बातम्या प्रसारित व्हायला लागल्या. अर्थात आधी जी मंडळी लोकसत्ता व एक्सप्रेस वाचत होती. ट्विटरला होती त्यांना त्याबद्दल माहिती होती. सूरज इथे असतानाच मी त्याचे कास्ट मॅटर्स बुक केले. ते आले. आणि वाचून संपवले तेव्हा बर वाटले. 

पहिली बाब म्हणजे हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद मेहता प्रकाशनामार्फत प्रसिद्ध झाला आहे. प्रियंका तुपे व प्रणाली एंगडे यांनी या पुस्तकाचा अनुवाद अगदी ओघवत्या शैलीत केलेला आहे. पण मराठी पुस्तकाच्या शेवटच्या पानावर जे अनुवादीत आत्मकथन असे म्हटले आहे. ते तसे नाही. यात सूरज स्वतःची माहिती ओघाने आली तरच सांगत आहे. Otherwiseनाही. ती देखील खूपच त्रोटक आहे. त्यातून त्याचा जीवनप्रवास काही पूर्ण सांगितलेला नाही. त्यामुळे ते आत्मकथन नाही हे नक्की. 279 पेजेसचे हे पुस्तक तुमच्यातील नसलेले समाजभान जागृत करेल किंवा असलेल्याची पुन्हा नव्याने मांडणी करेल हे नक्की. 

दलित शोषित वर्गाकडून काही लिहून आले त्यातही आत्मभान जागृत करण्याविषयी तर ते आक्रस्ताळी असेल, आग ओकणारे असेल, प्रस्थापितांना शिव्या देणारे असेल, वरच्या वर्गाविषयी आकस व द्वेष असणारे असेल. असा काहींचा समज असतो. सूरजचे हे पुस्तक या सर्वांना एका दमात फाट्यावर मारणारे आहे. 
इथे फॅक्टस आहेत. लॉजिक आहे. उदाहरण आहेत. काही स्वानुभव आहेत. समाजाचा स्वतः घेतलेला अनुभव आहे. इतरांच्या नजरेतून अभ्यासलेला समाज आहे. शिवाय हार्वर्ड व ऑक्सफोर्डच्या इमारतीत बसून आपल्याला योग्य ती खिडकी उघडून भारताकडे व इथल्या जाती व्यवस्थेकडे सोयीने पाहणार्‍यांचा घेतलेला परखड समाचार आहे. आवश्यक तिथेच आकडेवारी आहे. 

इथे आलेले डॉ. बाबासाहेब व्यक्ति म्हणून आलेले आहेत. प्रतिमा व देव म्हणून नाहीत. स्वामी चक्रधर, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब, यांचा देखील वस्तुनिष्ठ संदर्भ आहे. त्याला संदर्भ ग्रंथांची जोड आहे. 

जर कास्ट मॅटर्सची रचना करायची असती तर दुसर्‍या समाजाला नावे ठेऊन ती सोपी झाली असती पण हे अति सुलभीकरण होईल हे मुळात हार्वर्ड मध्ये शिकणार्‍या व एकुणच सामाजिक रचनेचा चांगलाच अभ्यास असलेल्या सुरजला माहिती आहे. त्यामुळे सत्यच्या अधिक जवळ जात त्याने एकूण सामाजिक मांडणी आहे ती दर्शवितांनाच दलित समाजाचे दोष देखील ठळकपणे अगदी त्यांचे प्रकार पाडून लॉजिकल मांडणी केली आहे. ब्राम्हण यातही सुधारक व भेदक दोघांचाही आढावा आहे. 

दांभिक भारतीय समाजरचनेची व्यवस्थित चिरफाड करून त्याचे अंतरंग दाखवण्याचा प्रयत्न सूरजने केलेला आहे. त्यामुळे जे आहे ते असे आहे असं तो आरशासारखं आपल्यापुढ उभे करतो. पुस्तक वैचारिक असल्याने व अनेक बाबी नव्याने कळत असल्याने हळूहळू वाचल्यास उत्तम. ते तस भिनत जाते. 

मी समीक्षक नाही त्यामुळे एका वाचकाच्या नजरेतून हे लिहिलं आहे. 

- समाधान महाजन    

8 एप्रिल 2023


No comments:

Post a Comment