- न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे आत्मचरित्र ‘आठवणीतील दिवस’ २०१८ मध्ये मौज तर्फे प्रकाशित करण्यात आले. त्यांचा जन्म व बालपण बीडमध्ये गेले. १४ जुलै १९३८ या दिवशी त्यांचा जन्म झाला. सोलापूर जिल्ह्यातील चपळगावचे हे मूळ घराणे. पणजोबा नोकरीनिमित्त बीड मध्ये स्थायिक झाले. १९४२ मध्ये सुरु झालेल्या चंपावती शाळेत त्यांचे शिक्षण झाले.
- पेठेच्या पलीकडे मन्सूरशाह वली आणि शहेनशहा वली असे दोन दर्गे होते. मन्सूरशाह हे महादजी शिंदे यांचे गुरु होते. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडून या दर्ग्याच्या व्यवस्थापनासाठी अनुदान मिळे.
- निजामी राजवटीत इमदादे बहामी म्हणजे जिल्हा सहकारी बँका आणि टाका म्हणजे तालुका शेतकरी सहकारी संघ.
- हैद्राबाद मुक्ती लढ्यात त्यांचे काका तुरुंगात गेले होते. नरेंद्र यांचे मामा नाशिकचे होते त्यामुळे येथील पेठे हायस्कूल मध्ये देखील ते काही काळ शिकले. ते नाशिकला असतांना गांधींची हत्या झाली होती. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते रामकुंडात गांधींच्या रक्षेचे विसर्जन करण्यात आले होते. तसेच गांधींच्या शवावरची दोन फुले शाळेच्या काचेच्या सूचनाफलकात लावलेली होती. सर्वजण त्याला नमस्कार करत होते असे त्यांनी लिहिले आहे.
- नाशिकनंतर पाचवीला पुन्हा बीड मध्ये सरकारी शाळेत प्रवेश घेतला. मध्यम उर्दू. सर्व पुस्तकांच्या मुखपृष्ठावर निजाम मीर उस्मान आलीखान याचे चित्र छापलेले असे. शाळेत निजामाला दीर्घायू चिंतणारी प्रार्थना होत असे,
“ताबदे खालीके आलम यह रियासत रक्खे
तुझको उस्मा बसद इजलाल सलामत रक्खे”
- शाळेत असतांना विद्यार्थी नावाचे हस्तलिखित वार्षिकी त्यांनी काढले होते. इंटरपर्यंतचे शिक्षण अमरावतीत घेतले व नंतर औरंगाबादमध्ये. 1959 मध्ये मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले. तिथे त्यांनी एम.ए केले त्यांचे शिक्षक म्हणजे वा.ल. कुलकर्णी, यु.म.पठाण, सुधीर रसाळ.
- १९५१ साली बीडला मोठे फौजदारी खटले चालवणारे सत्र न्यायालय स्थापन झाले होते. त्यांचे काका हे बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. वडील देखील चळवळीत सक्रीय होते. वकील होते. १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत नरेंद्र यांचे वडील अंबाजोगाई मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे विधानसभेची निवडणूक लढवत होते. हरले. नंतरच्या वर्षी म्हणजे १९५३ मध्ये कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन हैद्राबाद येथे भरले तेव्हा नरेंद्र यांचे वडील जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाला ते वडिलांसोबत हजर होते. यावेळी त्यांना अनेक राष्ट्रीय नेते पाहण्यास मिळाले. शेख अब्दुल्ला यांचे वाक्य “जहा जवहार का कदम होगा वहा अब्दुल्ला का दिल बिछा होगा”.
- १९५९ मध्ये तेव्हाचे मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले. ते म्हणतात १९५७ साली औरंगाबादला साहित्य संमेलन झाले तेव्हापासून त्याबद्दल त्यांन आकर्षण निर्माण झाले. जानेवारी १९६१ मध्ये दहावे मराठवाडा साहित्य संमेलन बीडला झाले त्याच्या आयोजनात चपळगाव्कारांचा मोठा वाटा होता.
- साहित्य संमेलनात अनेक वेळा त्यांनी भाग घेतला काही परिसंवादाचे ते अध्यक्षही होते. मराठवाडा या साप्ताहिकात गोफणगुंडा हे सदर काही काळ लिहिले.
- जालन्याजवळ बेथेल नावाचे एक गाव आहे. बायबलमध्ये नाव असल्यासारखे हे गाव मराठवाड्यात कसे याचा शोध त्यांनी घेतला तेव्ह असे समजले कि, नारायण शेषाद्री हा परळीचा ब्राम्हण ख्रिस्ती झाला. त्याने नवख्रिस्त्यांची वस्ती करण्यासाठी हैद्राबादचे पंतप्रधान सालारजंग यांच्याकडून मोठी जमीन मिळवली. त्यानेच हे गाव वसवले होते.
- लातूरला एक वायर गिरणी नावाने ओळखली जाणारी बंद गिरणी होती. लोकमान्यांनी ब्रिटीश हद्दीबाहेर ती मुद्दाम काढली. टिळकांचे भाचे विद्वांस तिचे व्यवस्थापन करत असे लेखकाने टिळक चरित्रात वाचले होते. र्रीकाम्या पडलेल्या या गिरणीच्या जवळ वस्ती झाल्यास त्याला टिळकनगर असे नाव द्यावे अशी सूचना नरेंद्र चपळगावकर यांनी केली होती. आज लातूरमध्ये टिळकनगर अस्तित्वात आहे.
- जून १९६० मध्ये ते मराठीचे प्राध्यापक म्हणून लातूरच्या दयानंद महाविद्यालात काम करू लागले. तेथेच ते मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. जानेवारी १९६३ पासून त्यांनी बीड येथे वकिली सुरु केली. १९६७ साली बीड नगरपालिकेचे सभासद म्हणून ते निवडून आले.
- १८५७ च्या उठावात सामील झालेल्या औरंगाबाद परिसरातील काही सैनिकांना फाशी देण्यात आले होते. त्यांच्या स्मरणार्थ एक काळा चबुतरा औरंगाबादच्या क्रांतीचौकातील एका कोपरयाजवळ तयार करण्यात आला होता. तो नंतर काळाच्या ओघात नष्टच झाला.
- २००५ साली माजलगाव येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जून २०१० मध्ये स्थापन झालेल्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. मार्च २०११ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला.
- नरेंद्र चपळगावकर यांची प्रकाशित झालेली पुस्तके - १. कर्मयोगी संन्यासी २. राज्यघटनेचे अर्धशतक ३. सावलीचा शोध ४. मनातली माणस ५. संघर्ष आणि शाहणपण ६. ना. गोखले यांचा भारत सेवक समाज ७. तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ ८. विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन
- समाधान महाजन
१३ नोव्हेंबर २०२२


No comments:
Post a Comment