नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य

 
नाभितून उगवलेल्या वृक्षाचे रहस्य हा प्रणव सखदेव यांचा कथा संग्रह नुकताच वाचला. निळ्या दाताची दंत कथा, काळे करडे स्ट्रोक्स व चतुर यानंतर मी त्याचे वाचलेले हे चौथे पुस्तकं. अर्थात या सर्व पुस्तकांचे प्रकाशित वर्षांच्या अनुक्रमे ते मी वाचले नाहीत. पण एक नक्की की प्रणवच्या कथा कादंबरी या आजची भाषा बोलतात. आजचे प्रश्न मांडतात. उगाच तत्व, नैतिकता वा मूल्य निष्ठा असल्या बाबी ते वाचकांवर थोपवत नाहीत. आजचा दिवस, आजच्या जगण्यातील गुंतागुंत बारकाव्या निशी मांडतात. उगाच अभिनिवेश बाळगत नाहीत. त्यामुळे सेक्सुएलl कंटेंट  व संवाद वाचतांना देखील त्यात ओघवते व सहज पणा आहे. 

 या कथासंग्रहातील सर्वच कथा छान आहेत. आजच्या काळाची भाषा बोलतात. आजचे प्रश्न मांडतात. 

यातील अबॉर्षण कथा एका वेल सेटेल्ड फॅमिलितील. आर्थिक प्रश्न नसलेली. माणसाला पोटाची व थोड्या सुख्वस्तू पानाच्या गरजा संपल्या की दुसरेच प्रश्न सुरू होतात. नवरा बायकोच्या नात्यात काळानुसार होत गेलेले बदल. लग्न झाले .सुरुवातीची उत्सुकता आवेग संपला. कमवायचे काय तेही संपले. एक मेकांच्या आयुष्यात आपण का आहो ? का राहायचं सोबत? माझी तिला किंवा त्याला काळजी आहे का? तीच कीव त्याच माझ्यावर प्रेम आहे का? याची उत्तरं मिळत नाही. संवाद कमी होत जातो. गरजा भागवल्या जातात...

या सर्वांवर नितांत सुंदर भाष्य करणारी कथा आहे ही. ..


काळ करड आकाश हा शब्द येत राहतो. प्रणव च्या कथेत. 

ग्लोरिया मधील अलंक्रिता व सीसीडी मध्ये नेहमी येणारे सर. त्यांची एक इच्छा जशी डोंबिवली फास्ट मध्ये लोकल ट्रेन ने कायम प्रवास करणाऱ्या माणसाला शेवटची सीट मिळणे एक स्वप्न असते तसे. इतक्या मोठ्या आयुष्यात मानसिक उलाढालीत कधी कधी मनाच्या किती छोट्या गरजा असतात. 

ट ची गोष्ट वाचतांना मुंबई व मुंबईची लोकल डोळ्यापुढे उभी राहते. 

प्रत्येक कथा विश्व दर्जेदार आहे. वाचनीय आहे. 

- समाधान महाजन 

मेलुहा सभ्यतेचा शोध

 
नितीन वाघ यांचे मेलुहा सभ्यतेचा शोध हे पुस्तक वाचतांनाच त्यामागील संशोधन व  चिकित्सक अभ्यास  लगेचच लक्षात येतो. सिंधू संस्कृती म्हणजेच मेलुहा संस्कृती. प्राचीन सुमेरियन भाषेतील क्यूनीफॉर्म लिपीत भारतातील विस्तीर्ण भूभागावर पसरलेल्या सभ्येतेसाठी मेलुहा हा शब्द वापरण्यात आला आहे. नितीन यांनी पुस्तकाचे नाव तेच ठेवले आहे. 

मी आतापर्यंत प्राचीन भारताच्या इतिहासावरील जी पुस्तके वाचली व त्यातून ज्या सिंधू संस्कृतीची ओळख व माहिती मला झाली त्यापेक्षा अत्यंत वेगळी अशी माहिती पहिल्यांदाच मला या संस्कृतीविषयी या पुस्तकातून मिळाली. 

अगदी पुस्तकाच्या नावापासूनच या पुस्तकाच्या वेगळेपण टिकून आहे. आपल्या प्रस्तावनेत नितीन वाघ म्हणतात, " ऐतिहासिक कथनातून वर्चस्व टिकवून ठेवता येतं आणि राबवता येतं, असं एक प्रबळ वैदिक कथानक उभारलेलं आहे, तेसुद्धा समजायला लागलं होतं. या कथनाच्या आधारे सगळ्या इतिहासाची मांडणी केली जाते आणि याच चौकटीच्या आधारे या कथनाला विरोध सुद्धा केला जातो, हेसुद्धा लक्षात आलं.".. आणि हे जसे त्यांच्या लक्षात आले त्यातून या विषयावरचे  वाचन व संशोधन त्यांनी वाढवले. त्यातील विविध कंगोरे आपल्याला पुस्तक वाचतांना सहज लक्षात येतील. 

वैज्ञानिक, पुरातात्विक, भाषिक अशा विविध perspective मधून नितीन वाघ यांनी मेलुहा सभ्यतेचा शोध घेतलेला आहे. या संस्कृतीची अशी वेगळ्या पद्धतीची मांडणी पहिल्यांदाच मराठीतून येत आहे. नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे. 

पुस्तक - मेलुहा सभ्यतेचा शोध (Before Amnesia)  

लेखक - नितीन भरत वाघ 

प्रकाशक - आर्हान बुकस्मिथस( प्रथम आवृत्ती - २०२२)


- समाधान महाजन 

१९/११/२०२२


आठवणीतील दिवस - न्या. नरेंद्र चपळगावकर

  • न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे आत्मचरित्र ‘आठवणीतील दिवस’ २०१८ मध्ये मौज तर्फे प्रकाशित करण्यात आले. त्यांचा जन्म व बालपण बीडमध्ये गेले. १४ जुलै १९३८ या दिवशी त्यांचा जन्म झाला. सोलापूर जिल्ह्यातील चपळगावचे हे मूळ घराणे. पणजोबा नोकरीनिमित्त बीड मध्ये स्थायिक झाले. १९४२ मध्ये सुरु झालेल्या चंपावती शाळेत त्यांचे शिक्षण झाले. 
  • पेठेच्या पलीकडे मन्सूरशाह वली आणि शहेनशहा वली असे दोन दर्गे होते. मन्सूरशाह हे महादजी शिंदे यांचे गुरु होते. ग्वाल्हेरच्या शिंदे सरकारकडून या दर्ग्याच्या व्यवस्थापनासाठी अनुदान मिळे. 
  • निजामी राजवटीत इमदादे बहामी म्हणजे जिल्हा सहकारी बँका आणि टाका म्हणजे तालुका शेतकरी सहकारी संघ. 
  • हैद्राबाद मुक्ती लढ्यात त्यांचे काका तुरुंगात गेले होते. नरेंद्र यांचे मामा नाशिकचे होते त्यामुळे येथील पेठे हायस्कूल मध्ये देखील ते काही काळ शिकले. ते नाशिकला असतांना गांधींची हत्या झाली होती. मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्या हस्ते रामकुंडात गांधींच्या रक्षेचे विसर्जन करण्यात आले होते. तसेच गांधींच्या शवावरची दोन फुले शाळेच्या काचेच्या सूचनाफलकात लावलेली होती. सर्वजण त्याला नमस्कार करत होते असे त्यांनी लिहिले आहे. 
  • नाशिकनंतर पाचवीला पुन्हा बीड मध्ये सरकारी शाळेत प्रवेश घेतला. मध्यम उर्दू.  सर्व पुस्तकांच्या मुखपृष्ठावर निजाम मीर उस्मान आलीखान याचे चित्र छापलेले असे. शाळेत निजामाला दीर्घायू चिंतणारी प्रार्थना होत असे, 

ताबदे खालीके आलम यह रियासत रक्खे 

तुझको उस्मा बसद इजलाल सलामत रक्खे”

  • शाळेत असतांना विद्यार्थी नावाचे हस्तलिखित वार्षिकी त्यांनी काढले होते. इंटरपर्यंतचे शिक्षण अमरावतीत घेतले व नंतर औरंगाबादमध्ये. 1959 मध्ये मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले.  तिथे त्यांनी एम.ए केले त्यांचे शिक्षक म्हणजे वा.ल. कुलकर्णी, यु.म.पठाण, सुधीर रसाळ. 
  • १९५१ साली बीडला मोठे फौजदारी खटले चालवणारे सत्र न्यायालय स्थापन झाले होते. त्यांचे काका हे बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. वडील देखील चळवळीत सक्रीय होते. वकील होते. १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत नरेंद्र यांचे वडील अंबाजोगाई मतदारसंघातून कॉंग्रेसतर्फे विधानसभेची निवडणूक लढवत होते. हरले. नंतरच्या वर्षी म्हणजे १९५३ मध्ये कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन हैद्राबाद येथे भरले तेव्हा नरेंद्र यांचे वडील जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. या अधिवेशनाला ते वडिलांसोबत हजर होते. यावेळी त्यांना अनेक राष्ट्रीय नेते पाहण्यास मिळाले. शेख अब्दुल्ला यांचे वाक्य “जहा जवहार का कदम होगा वहा अब्दुल्ला का दिल बिछा होगा”.  
  • १९५९ मध्ये तेव्हाचे मराठवाडा विद्यापीठ सुरु झाले.  ते म्हणतात १९५७ साली औरंगाबादला साहित्य संमेलन झाले तेव्हापासून त्याबद्दल त्यांन आकर्षण निर्माण झाले. जानेवारी १९६१ मध्ये दहावे मराठवाडा साहित्य संमेलन बीडला झाले त्याच्या आयोजनात चपळगाव्कारांचा मोठा वाटा होता.  
  • साहित्य संमेलनात अनेक वेळा त्यांनी भाग घेतला काही परिसंवादाचे ते अध्यक्षही होते. मराठवाडा या साप्ताहिकात गोफणगुंडा हे सदर काही काळ लिहिले. 
  • जालन्याजवळ बेथेल नावाचे एक गाव आहे. बायबलमध्ये नाव असल्यासारखे हे गाव मराठवाड्यात कसे याचा शोध त्यांनी घेतला तेव्ह असे समजले कि, नारायण शेषाद्री हा परळीचा ब्राम्हण ख्रिस्ती झाला. त्याने नवख्रिस्त्यांची वस्ती करण्यासाठी हैद्राबादचे पंतप्रधान सालारजंग यांच्याकडून मोठी जमीन मिळवली. त्यानेच हे गाव वसवले होते.
  • लातूरला एक वायर गिरणी नावाने ओळखली जाणारी बंद गिरणी होती. लोकमान्यांनी ब्रिटीश हद्दीबाहेर ती मुद्दाम काढली. टिळकांचे भाचे विद्वांस तिचे व्यवस्थापन करत असे लेखकाने टिळक चरित्रात वाचले होते. र्रीकाम्या पडलेल्या या गिरणीच्या जवळ वस्ती झाल्यास त्याला टिळकनगर असे नाव द्यावे अशी सूचना नरेंद्र चपळगावकर यांनी केली होती. आज लातूरमध्ये टिळकनगर अस्तित्वात आहे. 

  • जून १९६० मध्ये ते मराठीचे प्राध्यापक म्हणून लातूरच्या दयानंद महाविद्यालात काम करू लागले. तेथेच ते मराठी विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत होते. जानेवारी १९६३ पासून त्यांनी बीड येथे वकिली सुरु केली. १९६७ साली बीड नगरपालिकेचे सभासद म्हणून ते निवडून आले. 
  • १८५७ च्या उठावात सामील झालेल्या औरंगाबाद परिसरातील काही सैनिकांना फाशी देण्यात आले होते. त्यांच्या स्मरणार्थ एक काळा चबुतरा औरंगाबादच्या क्रांतीचौकातील एका कोपरयाजवळ तयार करण्यात आला होता. तो नंतर काळाच्या ओघात नष्टच झाला. 
  • २००५ साली माजलगाव येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. जून २०१० मध्ये स्थापन झालेल्या भाषा सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते. मार्च २०११ मध्ये त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. 
  • नरेंद्र चपळगावकर यांची प्रकाशित झालेली पुस्तके - १. कर्मयोगी संन्यासी २. राज्यघटनेचे अर्धशतक ३. सावलीचा शोध ४. मनातली माणस ५. संघर्ष आणि शाहणपण ६. ना. गोखले यांचा भारत सेवक समाज ७. तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ ८. विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन 


- समाधान महाजन 
१३ नोव्हेंबर २०२२ 

चतुर

चतुर हे प्रणव सखदेवचे मी वाचलेले हे तिसरे पुस्तक. याआधी काळेकरडे स्ट्रोक्स व निळ्या दाताची दंतकथा हि पुस्तके वाचली.

चतुर वाचतांना ज्या बाबी मला नोंदाव्याशा वाटल्या त्या अशा-  

* या पुस्तकात काही नवीन शब्द जाणवले. जे रोजची भाषा मांडतात. रोजच्या भाषेतील म्हणजे त्याला फार अलंकारिक बनवलेलं नाही. जसे

1. पांढरी पोकळी हा अर्थ कि बोर्ड वरील स्पेस बार दिल्यानंतर दोन अक्षरात पडलेले अंतर यासाठी वापरला आहे.

2. टिश्यू पेपर होऊन टिपून घ्यावे

3. ओल्या सिमेंट मध्ये पायाचा ठसा उमटतो तसे आपल मन टिपत सगळं

4. जेली सारखं स्तब्ध वातावरण ..


चित्रपट व गाणी यांचा चांगला वापर यात आहे. जे आवश्यक असते पण बऱ्याच कथा कादंबरीत तो भाग टाळला जातो. इथे तसे न करता महत्वाचे स्थान दिले आहे.

१.हेमंत कुमार..तुम पुकार लो तुम्हारा इंतजार है

२.तुमसे ही तुमसे ही


पुढे काय होईल ही उत्सुकता तयार होत नाही ...खूप हळूहळू चाळीस पन्नास पेजेस नंतर होते व नंतर चांगलीच पकड घेते. 

या पुस्तकात कोण कधी केव्हा.... कुठूनही प्रकट होईल सांगता येत नाही मग ती  कोणतीही आकृती असू दे, फुल, पाखरू, पतंग ते पार मल्लिका शेरावत. राखाडी ढग, पाण्यातून येणारा माणूस... अगदी कोणीही .. त्यामुळे हि प्रयोगशीलता आवडली. 

imagination मस्त आहे अगदी ..मल्लिका शेरावत वर्गात संस्कृत च्या तासाला येऊन बसते ....आणि पुढे भिगे होठ तेरे...

...वाचण्याचा कंटाळा असणे व तो नवीन मुलांना येणे हे आवडले...श्यामची आई...आजची पिढी नाही रीलेट करू शकत....

पुस्तकाचे अंतिम ध्येय पुस्तकातून बाहेर पडायला लावणं हे आहे.

         “धूप मे निकलो, घटाओ मे नहाकर देखो

           जिंदगी क्या हैं किताबो को हटाकर देखो.”

प्रत्येकाच्या डोक्यावर असा एक ढग असतो ज्याची एक वाळवंट वाट पाहत असते.

हेही दिवस जातील हे कांनफ्युसियास या तत्वज्ञाचे वाक्य आहे. 

यात प्रश्न गाडी महत्वाची आहे.  यात निर्मिती कलाकार यांची मीमांसा छान केली आहे. कलाकार प्रोडक्ट तयार करतो त्याला कच्चा माल म्हणजे त्याला आलेले अनुभव व जीवन.

कलावंताच्या निर्मिती नंतर रसिक वाचकाची कोडींग डीकोडींग होते. तो अर्थ लावतो. आणि त्याचे डिकोडिंग ही त्याची स्वतंत्र निर्मिती असते.

adolescence and puberty well mentioned...त्याच्याबद्दल जे लिहिलंय...शारीरिक बदलांबद्दल ते वास्तव आहे...शेअर करत नाहीत मूल भीतीने. फुलपाखरू..पतंग...फुल ...ही सर्व प्रतीके आहेत. मला तर मुळात पुस्तकाची बेस थीमच पौंगडावास्था आहे असे वाटते.

एकूणच पुस्तकात अनेक नवीन प्रयोग आहेत. लेखक लेखकाची गोष्ट सांगत आहे. तो मेल्यानंतर त्याची बायको ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. एकूण मस्तच आहे. अशा छोट्या कादंबऱ्या मराठीत यशस्वी पण होतात. जसे मिलिंद बोकील यांची समुद्र, एकम, किंवा भाऊ पाध्ये यांच्या काही कादंबऱ्या १५० पेजेसच्या आत असून कंटेन च्या दृष्टीने अव्वल आहेत. त्यातील हि चतुर आहे असे मला वाटते. 

- समाधान महाजन