विश्वास पाटील हे साहित्यातील मोठे नाव. त्यांचे आतापर्यंत प्रकाशित झालेले अपवाद वगळता सर्व साहित्य माझ्या वाचनात आले आहे. पण विश्वास पाटलांनी अण्णा भाउंवर लिहिलेले हे पुस्तक मला जास्त आवडले. यात संशोधन आहे. स्वतः लेखकाला असलेली आस्था दिसते. अण्णा भाऊंच्या अनेक कादाबार्यांचा आढावा आहे. त्याचे रसग्रहण आहे.
या पुस्तकातून अनेक गोष्टी कळतात. ज्या मला महत्वाच्या वाटल्या त्या अशा-
- 1930-31 च्या काळात अण्णांचे वडील भाऊ साठे आपले कुटुंब घेऊन वाटेगाव ते मुंबई हा प्रवास पायी करतात. हा प्रवास जीवघेणा आहे त्या काळात तो खूपच बिकट होता शिवाय परिस्थिती गरिबीची. तेव्हाचे वाटेगाव हे कुरुंदवाडी संस्थानात होते.
- फकीरा ही कादंबरी अण्णांनी 1959 मध्ये लिहिली. व्यक्तिरेखा राधा व विष्णूपंत कुलकर्णी या व्याक्तीरेखांबद्द्ल खांडेकरांनी देखील कौतुक केले होते.
- 14 मार्च 1931 रोजी प्रदर्शित झालेला पहिला बोलपट आलमआरा. गिरगावच्या मेजेस्टीक सिनेमात अण्णांनी पाहिला होता. तेव्हा पालव नावाच्या एका तरूणाकडून त्यांनी तिकीट मिळविले होते. कालांतराने तो पालव नावाचा तरुण पैलवान 'मास्टर भगवान' या नावाने मोठा नट बनला.
- 1938 मध्ये अनेक दिवस चाललेल्या संपामुळे अण्णांनी मुंबई सोडली. गावी आले. 1925 च्या कायद्याने मांग जमातीला गुन्हेगार जमातीच्या यादीत टाकले होते. त्यामुळे आता जगणे अधिकच वाईट झाले होते.
- अण्णांच्या आईचे नाव वालूबाई साठे, मोठ्या भावाचे नाव शंकर व दोन बहिणी होत्या. मे 1940 मध्ये त्यांचे लग्न झाले. कोंडूबाई उर्फ कोंडाबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अण्णांचा दुसरा विवाह जयवंताबाई दोडके यांच्याशी झाला होता. गायन आणि अभिनयाच्या आवडीसोबतच दांडपट्ट्यासारखा मैदानी खेळ ते खेळत असे. त्यात त्यांना आवड होती. शंकर भाऊ साठे त्यांच्या मुलाखतीत म्हणतात अण्णा भाऊ स्वतः जिवंत नाग पकडत व त्यांना खेळवतसुद्धा.
- अण्णाभाऊ म्हणतात 'मी फार वाचतो. कारण वाचन हे लेखकाच्या उद्योगाला पोषक असते. ते जर नसेल तर चांगली साहित्यनिर्मिती शक्य नाही.'
- 1938 मध्ये वाटेगावला आलेले अण्णा 1942 मध्ये पुन्हा मुंबईत गेले. या मधल्या काळात त्यांनी प्रचंड वाचन केले.
- एक मे 1942 या जागतिक कामगार दिनाच्या दिवशी मुंबईत जन नाट्य परिषदेची अर्थात ईपटाची IPTA ची स्थापना झाली. ( IPTA - Indian people's Theater Association. ) मे 1943 मध्ये तिला भारतीय स्वरूप देण्यात आले. मुंबईतील इपटाच्या संस्थापक सदस्यांमध्ये लेखक ख्वाजा अहमद अब्बास, शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा, अण्णाभाऊ साठे, अली सरदार जाफरी, श्री सरमाळकर आणि अनिल डिसिल्वा यांचा समावेश होता. लवकरच रांगडा ढोल वादक हे या संस्थेचे मानचिन्ह बनले. पुढे सांस्कृतिक जगाला जाग आणणारी ही देशातील अग्रगण्य संस्था बनली. काही वर्षातच हिंदी कवी कैफी आझमी, मजरुह सुलतानपूरी, साहिर लुधियांवी, बलराज सहानी, ईस्मत चुगताई, शैलेंद्र, सलील चौधरी आदी मंडळी IPTA मध्ये शामिल झाली.
- इप्टाच्या अभ्यासमंडळाची शिबिरे अलाहाबाद, कानपूर, कलकत्ता आदि ठिकाणी होत त्यांचे सन्मानाचे अध्यक्षस्थान अण्णा भाऊकडे राहत असे. अण्णाभाऊ साठे तेव्हा फक्त तेवीस चोवीस वर्षांचे होते.
- कम्युनिस्ट पक्षाचे तेव्हाचे नेते श्रीपाद अमृत डांगे हे अण्णांसाठी दैवत होते. त्यांचा मोठा प्रभाव अण्णांवर होता. अण्णा भाऊंना लिहिते ठेवण्यासाठी कम्युनिस्ट पक्षाकडून लेबर कॅम्पात त्यांच्या भाडेकरू संघाच्या ताब्यात असलेली खोली उपलब्ध करून देण्यात आली होती. पार्टीला फंड साठी दोन लाखांची रक्कम उभी करायची होती तेव्हा माझ्याकडे पैसे नाहीत, मात्र पोवाडा आहे असे अण्णांनी वरिष्टांना सांगितले होते.
- तिसरी कसम व इतर प्रसिद्ध हिंदी गाण्यांचे गीतकार कवी शैलेंद्र हे अण्णा भाऊंचे चांगले मित्र होते. शैलेन्द्र हे सुरुवातीला रेल्वेच्या माटुंग्याच्या मेकेनिकल विभागात एक शिकाऊ उमेदवार म्हणून दाखल झाले होते पण त्यांचे मन तिथे रमले नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अण्णांच्या आग्रहासत्व कवी शैलेन्द्र यांनी 'जाग मराठा आम जमाना बदलेगा' हे गीत लिहिले जे शाहीर अमर शेख यांच्या आवजात म्हटले जायचे.
- तीसच्या दशकात मुंबईत अनेक आंबेडकरी जलसे स्थापन झाले होते. ज्यात अडागळे, साळवे, केरुजी बेगडे, भीमराव दादा कर्डक, जगताप, भालेराव मंडळींचे जलसे होते. आंबेडकरी विचार सामान्य अशिक्षित जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम या जलशांनी केले. पूर्वीचे सत्यशोधकीय जलसे हे आंबेडकरी जलशांचे प्रेरणा स्थान होते.
- 1946 मध्ये अण्णाभाऊ दोन महिने तुरुंगात होते. आजारातून बरे झाल्यावर फेब्रुवारी 1968चा महिना अण्णा भाऊंनी जळगावमध्ये काढला. त्यांच्या वडिलांचे मित्र साधू साठे यांचे चिरंजीव दिनकर साठे विक्रीकर विभागात होते ते आग्रहाने अण्णांना जळगावला घेऊन गेले.
- अण्णा भाऊ साठे यांचा मृत्यु 18 जुलै 1969 ला हृदय विकाराच्या धक्क्याने झाला. त्यांना अवघे 49 वर्षांचे आयुष्य लाभले. अण्णांच्या अंत्य यात्रेत दया पवार, नारायण सुर्वे, अर्जुन डांगळे, वामन होवाळ आदी मंडळी उपस्थित होती.
- त्या आधी आचार्य अत्रे यांचे 13 जून 1969 रोजी निधन झाले होते. अण्णांच्या मनावर त्याचा मोठा परिणाम झाला होता. ते अधिकच हळवे झाले. अत्रे गेल्यानंतर शिवाजी पार्क च्या त्यांच्या घराच्या परिसरात अत्र्यांच्या सदनाकडे डोळे लावून घळाघळा रडत राहायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लढतांना ते अत्रेंना मोठ्या भावा प्रमाणे मानायचे. " भाऊ गेला आता आमची मराठी भाषा पोरकी झाली" असे ते म्हणत. अत्रेंच्या निधना नंतर शासनाने त्यांची कदर केली नाही याचे अण्णांना प्रचंड दुःख होते. अर्थात अण्णांनंतर देखील वेगळे काय झाले होते.
- 29 ऑगस्ट 1969 रोजी पुणे सोलापूर रस्त्यावरील इंदापूर जवळ शाहीर अमर शेख यांचे मोटार अपघातात निधन झाले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ गाजविणाऱ्या या तीन महनीय व्यक्तींचा मृत्यु एकाच वर्षी जून जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात एका पाठोपाठ एक झाला.
अण्णा भाऊंचे साहित्य-
- अण्णा भाऊंच्या एकूण कथांची संख्या 170 च्या आसपास भरते. त्यातील जवळपास 55 कथा स्रीविश्वावर आहेत असे लेखकाचे म्हणणे आहे.
- आधुनिक अश्वथामा नावाची कथा त्यांनी भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नावरून मराठी व गुजराथी समाजात उद्भवलेल्या उद्रेकावर लिहिली आहे.
- अण्णा भाउंनी मक्झीम गॉर्कीला आपले साहित्यातील गुरु व आदर्श मानले होते. त्यांच्या टेबलावर गॉर्कीचा पुतळा ठेवलेला असायचा.
- संयुक्त महारष्ट्र चळवळीचे गीत बनलेली लावणी 'माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतीय काहिली' हि अण्णा भाउंनी 1955 मध्ये लिहिली. शाहीर अमरशेख यांनी ती जानेवारी 1956 मध्ये पहिल्यांदा लोकांपुढे म्हटली.
कादंबऱ्या
- चित्रा (1951)
- चंदन (1959)- कामगारनायिका म्हणून चंदनचे चित्रण.
- वैजयंता (1959)- यावर चित्रपट आला ज्याचे दिग्दर्शक गजानन जहागीरदार हे होते. नायिका जयश्री गडकर या होत्या तर गाणी माडगुळकर यांनी लिहिली होती व वसंत पवार यांनी संगीत दिले होते.
- आवडी (1961)- या कादंबरीवर 'टिळा लावते मी रक्ताचा' हा चित्रपट आला. तो २८ जुलै 1969 रोजी प्रदर्शित झाला. त्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
- आग (1962)
- माकडीचा माळ (1963)
- फुलपाखरू (1967)
- आघात (1968)
- वारणेचे खोरे
- फकीरा- 1961 मध्ये महारष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. तसेच दिग्दर्शक कुमार चंद्रशेखर यांनी त्यावर चित्रपट केला होता. सुर्यकांत मांढरे प्रमुख भूमिकेत होते. तसेच हिंदी अभिनेते जयराज व सुलोचनाबाई फकिराच्या आई वडिलांच्या भूमिकेत होते. तसेच सावळारामची भूमिका स्वतः अण्णांनी केली होती.
कथासंग्रह
- चिरागनगरची भुते (1958)
- गजाआड (1959)
- बारबाद्या कंजारी (1960)
- नवती
- ठासलेल्या बंदुका (1961)
वरील सर्व संदर्भ हे विश्वास पाटील यांच्या अण्णा भाऊंची दर्दभरी दास्तान या पुस्तकातील आहेत.
- समाधान महाजन

खूप छान सर
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखरा लोककलावंत
ReplyDelete