महासम्राट


  विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक मोठे नाव. त्यांच्या अनेक कादंबऱ्या बेस्ट सेलर आहेत. वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.  शाळेत असतांना पहिल्यांदा मी विश्वास पाटील हे नाव वाचले होते. तेव्हा काहीतरी सातवी आठवीत असेन.  क्विझ कॉम्पिटिशन साठी तयारी करत असतांना झाडाझडतीसाठी तेव्हा त्यांना साहित्य अकादमी मिळाला होता हे समजले. तेव्हा वृत्तपत्रात त्यांच्याविषयी भरपूर काही लिहून आल्याचेही आठवते. प्रशासनात काम करत असतांनाच अनेक कादंबऱ्याचे लोकप्रिय लेखक व साहित्य अकादमी सारखे पुरस्कार यामुळे त्यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले. 
  नंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजे जवळपास नोकरी लागल्यानंतर त्यांच्या झाडाझडती, पांगिरा, महानायक, पानिपत या कादंबऱ्या माझ्या वाचण्यात आल्या. नुकतीच महासम्राट नावाची त्यांची कादंबरी प्रकाशित झाली. कादंबरी १ ऑगस्ट रोजी प्रकाशित झाली व 5 ऑगस्टला माझ्या हाती आली. जसा मिळेल तसा वेळ काढत आज 15 ऑगस्ट रोजी मी ती 442 पानांची कादंबरी वाचून पूर्ण केली. हे असे माझ्याबाबतीत पहिल्यांदाच झाले कि पुस्तक प्रकाशित झाल्या झाल्या पंधरा दिवसांच्या आत ते वाचून पूर्ण झाले. 
शालेय वयात एक कालखंड असा गेला कि तेव्हा एकामागोमाग एक ऐतिहासिक कादंबऱ्या वाचण्याचा सपाटा मी लावला होता. स्वामी, राऊ, मंत्रावेगळा, राजश्री, जरीपटका, श्रीमान योगी असे लागोपाठ वाचत  असतांना भारावल्यासारखा तो काळ मी जगत होतो. अल्लड वय व त्या कादंबरयाच्या शब्दातील भावविश्व व मोठा भव्य पट उभा करण्याची कादंबरीकराची ताकद  यामुळे शिवकाळ, मराठा साम्राज्य, त्यातील भाषा, व्यवहार, काळ असा जिवंत उभा राहत असे. दुर्दैवाने त्या काळात पानिपत किंवा संभाजी वाचण्यात आली नाही. 
पण आज अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा मला त्या झपाटलेपणाचा प्रत्यय आला जेव्हा मी महासम्राट वाचत होतो. छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील कादंबरीमालेतील हा पहिला खंड आहे ज्याचे नाव आहे झंझावात. यानंतर येणाऱ्या दुसऱ्या भागाचे नाव रणखैंदळ असेल असे लेखकाने प्रस्तावनेत म्हटले आहे. किती भाग येतील ते स्पष्ट केले नाही. झंझावातची सुरुवात जुलै 1629 मध्ये होते व 1659 मध्ये अफझलखानाच्या वधापर्यंत येऊन थांबते. सदरील पुस्तक विश्वास पाटील यांनी स्वरदेवता लता मंगेशकर यांना अर्पण केले आहे. 
विश्वास पाटील यांच्या कादंबर्याचे बरेचसे विषय ऐतिहासिक असतात. विशेष म्हणजे त्यातील प्रत्येक विषयावर सखोल अभ्यास व संशोधन ते करतात. मग ती पानिपत असो कि महानायक असो कि संभाजी. त्यांच्या कादंबऱ्या वाचतांना त्यातील त्यांचा अभ्यास, व्यासंग व संशोधन याची जाणीव होते. पण कादंबरीच्या विस्तारात व भाषेत ते fact इतक्या बेमालूमपणे मिसळतात कि वाचक कोणत्याही ठिकाणी अडखळत नाही, लिंक तुटत नाही किंवा ग्रीप सुटत नाही. ती त्यांच्या लिखाणाची ताकद आहे. 
लिखाणाची शैली चित्रमय आहे. प्रसंग, व्यक्ती  व ठिकाण आपल्या डोळ्यापुढे उभे राहतात. सह्याद्रीच्या पर्वतरांगा, विविध घाट, जंगल. प्राणी, शेती शेतकरी ... कोसळणारा पाउस व या सर्व पार्श्वभूमीवर आकाराला येत असते पहिल्या स्वराज्याची स्थापना. 
या कादंबरीत शाहजी राजांच्या कामगिरीवर विशेष प्रकाश टाकला आहे. शहाजी राजे, जिजाऊ व शिवबा यांच्या एकमेकांच्या आयुष्यातील घटनाची सांगड इतक्या विस्ताराने व अभ्यासाने कदाचित पहिल्यांदाच मराठी कादंबरीविश्वात येत आहे. 
प्रस्तावनेतच लेखक म्हणतात कि, "शहाजीराजे उठसूट दुसऱ्यांच्या चाकर्या करत होते, असे धोपटमार्गाने व चुकीच्या पद्धतीने आजवर जे मानले गेले आहे ते अवास्तव आहे. उलट त्या वेळच्या काही अद्भुत घटनांनी व इतिहास प्रवाहाच्या रेट्यामुळेच त्यांना काही ठिकाणी सेवा पत्करावी लागली. त्या सर्व घटनांचे धडधडीत कागदोपत्री पुरावे आज उपलब्ध आहेत. शहाजीराजे भातवडीच्या लढाईत मुघल बादशहा जहांगीर यांच्या फौजेशी तर १६३५ मध्ये बादशहा शहाजहांशी प्रत्यक्ष लढले होते"
स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहणे व ते प्रत्येक्षात आणणे हे शिवछत्रपतींनी केले असे आपण मानतो व इतिहास आजपर्यंत आपल्याला तेच सांगतो... या कादंबरीत कळते कि ते स्वप्न पाहणे व  त्यासाठीचा पाया रचणे हे तर शहाजी राजांनी केले होते. 
शहाजीराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी उभारली होती ती म्हणजे पेमगड. जी आजच्या संगमनेर पासून फक्त २८ किलोमीटर अंतरावर आहे. सह्याद्रीच्या रांगेतील बाळेश्वर डोंगराजवळ हा प्राचीन किल्ला होता. तिथे सातवाहन काळातील पाण्याच्या जुन्या टाक्या व कुंडे होते. 1632 ते 1635 या काळात एका नामधारी निजामपुत्राला (मुर्तुजा निजामशाह) तख्तावर बसवून येथून शहाजीराजांनी नाशिकच्या गोदावरीपासून ते पुणे परिसरातील भीमेपर्यंतच्या 64 किल्ल्यांवर स्वतः कारभार चालविला होता.  त्यावेळी शिवराय अडीच तीन वर्षांचे असतांना जिजाऊमाता त्यांना घेऊन येथे राहिल्या होत्या

अजून एक महत्वाचा खुलासा या ठिकाणी होतो कि,  "शिवरायांना त्यांच्या पित्याने गनिमी काव्याची दीक्षा आणि स्वलिखित राजमुद्रा दिली होती. जी राजमुद्रा वयाच्या बाराव्या वर्षापासून राजांनी आपल्या कागदपत्रांमध्ये सन्मानपूर्वक वापरायला सुरुवात केली होती. हि राजमुद्रा स्वतः शहाजीराजांनी रचली होती"
याशिवाय कादंबरीतील पानापानांवर अनेक तथ्ये (facts) विखुरलेले आहेत. अलीकडच्या काळातील ही एक महत्वाची ऐतिहासिक  कादंबरीमाला ठरेल.  

- समाधान महाजन 

No comments:

Post a Comment