काळेकरडे स्ट्रोक्स

 

प्रणव सखदेवची काळेकरडे स्ट्रोक्स हि कादंबरी वाचली. तिला २०२१चा युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. खरे तर मागे काही वर्षांपूर्वी ‘निळ्या दाताची दंतकथा’ हा प्रणवचा कथासंग्रह वाचला तेव्हा त्याच्याच भाषेत सांगायचे म्हटले तर मला वाटले हा कथासंग्रह लिहिणारा लेखक ‘मजबूत’ मच्यूर,वयस्क असावा. पण नंतर त्याला युवा साहित्य अकादमी घोषित झाला तेव्हा कळले तो तर below 35 आहे. आणि मग अतीव कुतूहलाने मी ‘स्ट्रोक्स’ घेऊन आलो. मिळेल तशी दोन दिवसात वाचून संपवली. साठ सत्तर पेजेस झाले असतील मला अचानक लेखकाशी बोलावे वाटू लागले. तेव्हा न राहवता मी नामदेव कोळी या मित्राकडून प्रणवचा नंबर मागितला. नामदेवने लगेच पाठवला. प्रणवशी थोडा वेळ बोललो मग बर वाटले. 

अलीकडे नको म्हणत असतांना काही कथासंग्रह, कादंबऱ्या मी वाचण्यास घेत असतो. आणि नेमक्या त्या इतक्या अफलातून निघतात कि पूर्ण झाल्याशिवाय सोडाव्या वाटत नाहीत. त्यातच स्ट्रोक्स मोडते. सुरुवातीला नायक समीर व त्याचा मित्र अरुण यांच्यातलं संभाषण सुरु असतांना थोडी पार्टनरची आठवण आली. पण ती तितकीच नंतर त्यात इतके चढ उतार ...आलट...पालट...झाले कि एकदम दणदणीत बाकी शून्य समोर आली....मध्येच कोसलाचा पांडुरंग सांगवीकर उभा राहिला....पण नाही हे सर्व प्रवाह पार करत स्ट्रोक्स वेगळ्याच मार्गाने घेऊन जात राहिली. 

भाषा बोल्ड झाली म्हणजे कादंबरी दर्जेदार असतेच असे नाही...कादंबरीतील अरुणच्या भाषेत सांगायचे म्हणजे ... ‘फकून टाका. बरेच प्रश्न सुटतील. स्वच्छ नजर होईल तुमची.’ रोजचे जगणे, सेक्स व त्यापलीकडे जाऊन जे गुंतागुंतीचे जग व त्यातील प्रश्न असतात ते यात आहे. 

नवीन कुठे काय लिहिले जाते? मराठीत relevant काहीच लिहिले जात नाही किंवा नवीन पिढी कुठे काय काही लिहिते किंवा स्वतःचे प्रश्न मांडते? असे विचारण्याआधी प्रणव सखदेवचे ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ हि कादंबरी वाचायला हवी. 

-समाधान महाजन 

३१/०८/२०२२


No comments:

Post a Comment