टेकडीवर व दाट झाडांमध्ये लपलेले ते छोटेसे गाव, गाव कशाला वाडी देखील मोठी असेल अशा काही घरांची वस्ती. आदिवासी भाषेत पाडा. नीट लक्ष देऊन पाहिले तर बस जातेय त्याच्या खिडकीतून उजव्या हाताला थोड वर झाडांमधून चमकणारे कौलारू छत दिसतील तेच हे गाव अर्थात पाडा. पाऊस पहिल्यांदा इथेच भेटला. जाणवला. अंगाखांद्यावर मुसळधार बरसला. ओलेचिंब कपडे, केसातून, चेहर्यावरून व कपड्यातून नितळणार पानी, चिखलाने भरलेले पाय आणि मऊशार हिरव्यागार, पोपटी गवतावरून उड्या मारत लोळत मित्रांसोबत घरी येत असलेला मी. सागाची मोठ-मोठी झाडे, त्याची मोठे पाने, त्यावरून ओघळणारे पावसाचे पानी, पावसाच्या पांढर्याशुभ्र धारांमध्ये झाकला गेलेला आडवा-तिडवा डोंगर. चिंब पावसात अंग चोरून उभी असलेली मोठ-मोठी झाडे. भातशेतीची खाचर, त्याच्या काना-कोपर्यात गवताच्या काडीला काहीतरी बांधून आनंदाने खेकडे पकडणारे मित्र. मग घरी येऊन त्या भाजलेल्या खेकड्यांवर मारलेला ताव. वरुन झिमझिमणारा पाऊस, कौलातून बाहेर निघत असलेला चुलीचा धूर. मातीचा रस्ता, त्यावर साचलेल्या पाण्यात पुन्हा वरुन पडणारे पावसाचे मोठ-मोठे थेंब. पाऊस बंद झाल्यावर त्यावर सोडलेल्या कागदाच्या होड्या. अशा खूप काही न विसरणार्या फ्रेम्स या गावाने पुरवल्या आहेत. इथे एक नदी होती. मुलांसोबत पोहायला जायचो. कोकणातील नद्या मुसळधार पावसाळ्यात दुथडी भरून वाहत, गणपतीच्या आसपास स्थिर होत. मग आम्हाला परवानगी मिळे. वाहत्या पाण्याचा पहिला स्पर्श इथेच झाला. सोबतचे आदिवासी मित्र मुख्य धारेत जाऊन पोहत, त्याची भीती वाटायची. नंतर त्यांनी त्या नदीवर असणार्या पूलावरून नदीत उड्या मारायला सुरुवात केल्यावर भरीस पडून मी पण पुलावर गेलो. इथे देखील आपली उडी जास्त पाण्यात जाऊ नये म्हणून थोडे अलीकडे उडी मारायचा प्रयत्न केला ते थेट दगडावर कपाळ आपटले. पाण्यात रक्त पाहून सर्वच घाबरले. सुदैवाने डोळा वाचला होता व घाव तितकसा खोल नव्हता. पुन्हा घरच्यांनी पोहायला जाऊ दिले नाही. पण पोहणे सोडून बाकी सर्व उनाडक्या करायला मित्र सोबतच होते. गावाच्या आजूबाजूला अस्ताव्यस्त पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगा. जंगल, झाडी व अध्येमध्ये दिसणारी शेती, नदी व पाऊस. आमचे घरमालक स्थानिक आदिवासी. त्यांच्या भातशेतीत अनेकदा गेलेलो. त्यांची दोन मुले. माझ्या वयाच्या आसपासची. नावेही किती सोपी. लहाण्या व मोठ्या, विशेष म्हणजे त्यांची नावे शाळेत पण हीच होती. या लहाण्या-मोठ्याने त्यांचे जग मला दाखविले. मी त्यांच्याच जगात वावरत होतो. त्यांचीच भाषा अस्खलित बोलत होतो. कदाचित ती वारली किंवा कोकणी असावी. पण मला नीटस मराठी येत नव्हते हे नक्की आणि खांदेशातील असून अहिराणी भाषा काय असते हे देखील माहीत नव्हते.
जीवनातील पहिली अक्षरे मी येथे गिरवली. शिकायला सुरुवात झाली. वडील त्या आश्रमशाळेत शिक्षक होते. तेव्हा सर्व आश्रमशाळेतील शिक्षक त्याच गावात मुक्कामी राहत अगदी बदली होईस्तव. त्यामुळे आमचे शिक्षण पण त्याच आदिवासी आश्रम शाळेवर सुरू झाले. शाळा लहान होती. कदाचित सातवी पर्यन्त. आमचा तो पहिलीचा वर्ग होता,ज्याला पत्र्याच्या भिंती होत्या. दोन इमारतींमधील तो वर्ग होता. बर्याचदा अंधारच असायचा. वाढू नावाचे सर होते. ते खूपच कडक होते.. ते चुकल की शिक्षा करत ती पण विचित्र पद्धतीने. पोटात चिमटा धरत व चिमटा धरलेला हात गोल फिरवत तसा त्यांच्या तावडीत सापडलेला मुलगा वाकलेला असतांना कळवळून मोठयाने रडत-ओरडत असे. जमलच तर पोटात गुद्दा देत असत. हे सर्व प्रकार बघून खूप भीती वाटायची. पहिल्या दिवशी तर मी घरीच आलो, नंतर पण अनेक दिवस मी शाळेला जायला घाबरायचो. जायचो नाही... नंतर कस ते आठवत नाही पण मग रोज जायला लागलो.
कुडाच्या भिंती, कौलाचे छत, शेणाने सारवलेली जमीन. हे आमचे तिथले घर असे तुकड्या तुकड्यात आठवते. तो साखरे पाडा जव्हारवरुन विक्रमगड जाण्याच्या मार्गावर असल्यामुळे तेथून वडिलांसोबत जव्हार किंवा विक्रमगड कधीतरी जायला भेटायचे. खूप मोठी गावे वाटायची ती. रस्ते काळे-कुळकुळीत, मोठ्या इमारती, रस्त्यांवर गाड्यांची गर्दी. खूप मस्त वाटायचे. पण परत फिरून आले की आमचेच घर मस्त उबदार सुरक्षित वाटत असे.
चार-पाच वर्षांपूर्वी कामानिमित्त त्या मार्गे गेलो तेव्हा आवर्जून त्या पाड्यावर गेलो. 35-40 वर्षांपूर्वी ते जसे होते तसेच आजही तितक्याच झाडांमध्ये आहे. आजही तो पाडा तिथे आहे हे त्या रस्त्यांवरून जाणार्या गाड्यांच्या पटकन लक्षात येत नाही. शाळा बदलली होती. शाळेच्या बर्याच पक्क्या इमारती झाल्या होत्या वॉल कंपाउंड झाले होते. पूर्वी गाव व शाळा यांच्यातील फरक चटकन लक्षात येत नसे. आता तो डोळ्याला जाणवेल इतका दिसत होता. गाव तेच होते. तितकेच होते, पूर्वीची मातीची रस्ते आता मात्र पक्क्या सीमेंटमधील दिसत होती. काही घरांचे रंगरूप बदलले होते. जुन्या प्रकारातील मोजकीच घरे आपले अस्तित्व कसेबसे टिकवून होती. त्या काही घरांवर डिश आलेले होते. लहान असतांना याच गल्ल्यांमध्ये ऐकलेले रेडियोचे स्वर कानात येत होते. आम्ही राहत होतो ते घर शोधण्याचा प्रयत्न केला. अधीरतेने मी तिकडे गेलो...हो ते तेच घर होते. आता खूप बदलले होते. मोठे झाले होते. आता तिथे कौले नव्हते. अर्धा स्लॅब व अर्धा पत्रे दिसत होते. मी माझे मित्र लहान्या-मोठ्याला शोधत होतो. घरात आवाज दिला एक मध्यम वयीन स्रि पुढे आली. घरात कोणीही पुरुष नव्हता. मी लहाण्या-मोठ्याची नावे विचारली तिच्या चेहर्यावर थोडे परिचयाचे हसू दिसले पण ते गावी गेल्याचे ती म्हटली. मला आता ती भाषा येत नव्हती. साफ विसरलो होतो मी. त्यामुळे तिला समजेल असे मला बोलता येत नव्हते व माझी भाषा तिला पूर्ण समजत नव्हती. कसेबसे बोलून पुढे आलो. आम्ही ज्या रस्त्याने घसरगुंडी करत मुख्य रस्त्याला लागायचो तो आंब्याच्या झाडाखालचा रस्त्यावर आता पायर्या झाल्या होत्या. ते जुने झाड मात्र आता तिथे नव्हते त्याऐवजी दुसरी छोटी तीन-चार झाडे दिसत होती. तेथून मुख्य रस्त्यावर येऊन नदीकडे गेलो. ती नदी-तो पूल तिथेच होते. आता तो पूल फारच छोटा वाटत होता. नदीला थोडे पानी होते. बालपणीच्या विश्वात त्या नदीला सीमा नव्हती, नजर जाईल तिथपर्यन्त पानी दिसायचे. आता नदीचे किनारे दिसत होते, पलीकडील शेती दिसत होती. त्या पलीकडे पसरलेला डोंगर दिसत होता. एकूणच माझ्या त्या लहानपणी पाहिलेल्या गावाला क्षितिजरेषा नव्हती. अस मान वर केली की हात टेकेल असे झाडे, निळे आभाळ, गच्च पाऊस, हिरवा रंग आणि धमाल. पण आता तसे नव्हते मुळीच. नुकताच हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागत होती. शुष्कता पसरली होती. पानगळ काही प्रमाणात झालेली होती. मी शोधत असलेले ते अमूल्य क्षण तेथीलच वातावरणात विखूरलेले असतील. ते आता माझ्या हाती लागणार नव्हते. मला तेच परत जगता येणार नाही, पण ही अक्षरे जी आता मी लिहिली आहेत ती तीच आहेत जी मी इथे गिरवली होती. कोण कुठले गाव-कोण कुठला मी आणि हे असे जन्मो-जन्मीचे नाते.
नंतरची आठवण तेथून जवळच असणाऱ्या दुसऱ्या गावाची. आता दिशा व अंतर स्पष्ट आठवत नाही फक्त या दोन्ही गावांना रस्ता होता जव्हारहूनच. या गावासाठी एका अवघड व तीव्र उतारावरून बस खाली उतरत असे. ते तितकं वळण लक्षात आहे. पुढे मग पुढचा रस्ता आठवत नाही. आठवते ते थेट गाव जवळ आल्यानंतर ची दृश्य. जिकडून बस येत असे त्याच रस्त्याला प्रथम शाळा लागत असे, मग आमचं ते गाव. अर्थात हा पण पाडाच. याला बरीच नावे होती. घोडंखिंड, गाढवखिंड, साखरे न अंजून काय काय. हा पाडा मात्र त्याच्यासारखा मेन रस्त्यावर नव्हता. या ठिकाणीं गावात दोन टाईम एस.टी. बस येत असे तितकीच काय ते कनेक्टिव्हिटी. तेव्हा तर बाईक वा कार असे काही कोणाकडे नसायचे. त्यामुळे बस हाच जगाशी संपर्क ठेवण्याचा मार्ग होता. इथे जरा अवकाश मोकळे मोकळे होते. शाळा राहायच्या ठिकाणापासून लांब होती. या ठिकाणी पहिल्यांदा आठवते ते म्हणजे आमच्या सामानाची आलेली गाडी. गाडी असेल एखादी टेम्पो. पण लक्षात राहिली ती गाडीच्या समांतर पळणारी वडिलांच्या शाळेतील वर्गातील मुले. वडील म्हटले आधी आलो होतो तेव्हा सांगून आलो होतो त्यामुळे ही मुले आपला सामान उतरवायला आलेली आहेत. गाडी थांबली. तिथे लगेचच दहा-बारा मुले जमा झाली. भरभर सामान उतरवू लागली. तेव्हा वडिलांविषयी खूपच आदर व अभिमान दाटून आला. अर्थात तेव्हा फक्त भावना दाटून आल्या होत्या त्यांची ही नावे आताची.
या शाळेवर जातांना रस्त्यात एक मोठे गोडाऊन लागायचे. ते कदाचित धान्य भरण्यासाठी पूर्वी वापरले जात असे. पण मी कधीच त्याला उघडे पाहिले नाही. त्याचा उडालेला रंग फिकट पिवळसर होता. त्याच्या त्या एका बाजूच्या भिंतीवर एक भला मोठा हाताचा पंजा काढला होता. त्याखाली असलेले ‘ताई,माई अक्का… हे शब्द मला वाचता येऊ लागले होते. पुढील शब्द पुसलेले होते. हे असे काय लिहिले आहे त्याचा अर्थ तिथे असेपर्यंत मला मात्र कळला नव्हता व ते कुणाला विचारव इतक ते महत्वाचं वाटलं नसावं. पण तो भला मोठा पंजा बरेच दिवस लक्षात होता. ते गोडावून व शाळा जव्हारवरुन येणार्या रस्त्याच्या उजव्या बाजूला होते तर डाव्या बाजूला एक मोठ्या मैदानासारखी जागा होती. आम्ही गेल्यानंतरच्या काही दिवसात तिथे मोठी हालचाल सुरू झाली. काही मोठ्या मशिनी येऊन पडल्या. बर्याच मोठ्या डंपर सारख्या गाड्या आल्या त्यातून मग गवत आले. हो ते गवताचे मोठ मोठे भारे होते. हे असे गवत होते जे येथील जंगलात बर्याचदा दिसत असे. त्या गवताचे कटींग करून मोठे गोल आकाराचे पॅकिंग केले जात होते. ते परत दुसर्या गाडीतून पाठवले जात होते. येणारे गवत कुठून येत होते व ते परत पॅकिंग करून कुठे जात होते हे आम्हा मुलांना काहीच माहीत नव्हते. पण अशा ठिकाणी माणसांची व गाड्यांची गर्दी होतेय हेच आमच्यासाठी अप्रूप होते. संध्याकाळी व सुट्टीच्या दिवशी इथे यायचे, खेळायचे व तेथील लोकांची नजर चुकवून त्या गवताच्या गंजीवर लोळून घ्यायचे, उड्या मारायच्या हा आमचा आवडता उद्योग होता.
या गावात आल्यामुळे एका अद्भुत गोष्टीशी माझा परिचय झाला तो म्हणजे टीव्ही. त्यातही त्या काळात सुरू झालेले रामायण. हे रामायण पहाण्यासाठी त्या पूर्ण पाड्यावर फक्त एकाच घरात टीव्ही होता. रामायण लागायच्या आधी बराच वेळ आम्ही तिथे जाऊन बसत असू. त्यांचा पुढचा दरवाजा बंद असायचा. घराच्या उजव्या बाजूला त्यांचा एक दरवाजा होता. तेथून जावे लागत असे. त्या दरवाज्यात जाण्यासाठी त्यांच्या गार्डनच्या गेटमधून जावे लागत असे. त्याच गार्डन मध्ये त्यांनी मोठा गोबर गॅस प्लांट तयार केला होता. त्याचे खोदकाम व नंतरचे बांधकाम पाहण्यासाठी देखील आम्ही बराच वेळा जात असू. ज्या दिवशी प्लांट सुरू झाला त्या दिवशी देखील पाहण्यासाठी आम्ही मुले गेलो होतो. त्या गॅसच्या निळ्या लाल ज्वाला व त्यावर भांडे ठेऊन तेथील आजींनी पाजलेला चहा त्यासोबतच पहिल्यांदाच घेत असलेला गोबर गॅसचा वास सर्व घर व आवरभर पसरलेला होता. त्या काळात सगळं कस नवीन नवीन वाटत होते, त्याचे अप्रूप असे. हे घर एका सभापतीचे होते असे वडीलधार्यांच्या बोलण्यातून कळत असे. त्यांच्याकडे एक जुनी जीप होती ती त्यांच्या घरासमोरच्या मोठ्या पडवीत लावलेली असे. पडवीत थंड वातावरण राहत असे. कंपाऊंड म्हणून पुन्हा छोट्या झुडपांचा वापर केलेला होता. ते सभापती व्हरांड्यात एका खुर्चीवर बसलेले असत. त्यांचे ते तिथे बसलेले असणे हे माझ्यासाठी एक स्टीलफ्रेमसारखे होते. कारण मी फक्त त्यांना तिथेच पाहिले होते. एक पांढरी खादीची बंडी व पांढरा पायजमा घालून ते बसत असत. त्यांच्या डोळ्यावर एक चश्मा असे ज्याच्या कडा तपकिरी रंगाच्या होत्या. त्या माझ्यासाठी वेगळ्या होत्या कारण मी आतापर्यंत असे वृद्ध बाबा पाहिले होते ज्यांच्या चष्म्याचा रंग काळा होता. ते त्यांच्या जीपवर कधी जातांना दिसले नाहीत. घरात आम्ही सर्व जन टीव्ही पाहतांना गुंग असतांना कदाचित मागे ठेवलेल्या पलंगावर ते येऊन बसत असतील. माहीत नाही. त्या सभापती बाबांची मोठी शेती होती. आमच्या घराच्या मागच्या बाजूला थोड्या अंतरावर ती शेती दिसत असे. शेती लक्षात राहण्याचे कारण म्हणजे जसे ऊन वाढत असे तसे सगळीकडे हिरवा रंग नष्ट होत असे, डोंगरावरील हिरवळ नष्ट झालेली असे. पण ओसाड व मोकळ्या जागेच्या पलीकडील त्यांच्या शेताचा पट्टा मात्र हिरवागार चमकत असे. आमच्या घरातून दिसणारे ते शेताचे कंपाऊंड तारेचे असले तरी त्यावर लटकलेल्या विविध वेली, झुडपे, अध्ये-मध्ये असणारी मोठी झाडे यामुळे आतील पिके दिसण्याऐवजी ही हिरवीगार भिंत दिसत असे. सोबतचे त्याच गावातील माझ्या वयाचे मुले सांगत की त्या शेतात खूप फळे आहेत, मोठी विहीर आहे, सगळीकडे पानी देण्यासाठी पाईपलाईन आहे तसेच त्या बाबांचे दोन्ही मुले शेती पाहतात.
त्या मुलांपैकी एक मुलगा माझ्यासाठी खासच होता. त्याचे नाव तेव्हाही माहीत नव्हते. पण ते माहीत नसण्याने फार पडणार नव्हता. तो करत असलेले काम भारीच होते. त्याच्याकडे एक मोठी रजिस्टर वही होती. त्यात व्यस्थित पट्टीने रेषा वैगेरे मारून तो काय लिहीत असे माहितीय?!... तर तो लिहीत असे दर आठवड्याला दूरदर्शनवरून एकदाच प्रसिद्ध होणारी साप्ताहिकी. त्यामुळे या रविवारी कोणता चित्रपट आहे. किती वाजता काय दाखवणार आहेत याची वेळेसहित नोंद तो घेत असे. अभिलेख वा दस्ताऐवजाची नोंद करून ठेवणारा तो माझ्यासाठी मोठा बखरकारच होता. अगदी जो चित्रपट असेल त्यात काम करणार्या
आम्ही राहत होतो त्याच्या समोर बरीच मोठी रिकामी जागा होती. पुढे थोड्या पायर्या होत्या व मग खाली रस्ता होता हाच रस्ता पुढे शाळेच्या बाजूने जव्हारला जात होता. त्या पायर्या उतरायच्या आधी उजवीकडे एक घर होते तिथे एक बाबा राहत होता. त्याचे सारखे एक काम चालायचे. कागदाच्या लगद्यापासून तो मुर्त्या तयार करत असे. एका मोठ्या पातेल्यात रद्दी,पृष्टे न काय काय तो भिजू घालत असे. नंतर ते सर्व एकत्र करत असे त्यात चिकटपणा यावा म्हणून जंगलातून गोळा करून आणलेला डिंक टाकत असे. आणि त्या सर्व मिश्रणातून सुंदर सुंदर मुर्त्या बनवीत असे. मुखवटे बनवट असे. त्या मुर्त्या व मुखवटे दूरदूरपर्यन्त प्रसिद्ध आहेत असे बोलण्यातून समाजत असे. एकदा तर विदेशातून आलेल्या 10-15 मुली त्या गावात आल्या होत्या. तेव्हा बाबाची ती कला बघण्यास खूप वेळ त्या तिथेच बसून होत्या त्याची सर्व माहिती घेतली, फोटो काढले. त्यानंतर मात्र तो सर्वग्रुप आमच्या घरी पण आला होता. विदेशातील लोक आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. आमचे वडील व त्यांच्यात काहीतरी संवाद होत होता. कोणाला काही तरी कळत होते. मग सर्वांना आनंद होत असे. मग अनावश्यक आम्हीही हसत होतो.
एकदा तालुक्याहून पांढर्या शुभ्र ड्रेसमधील बरीच मुले-मुली आमच्या शाळेच्या कॅम्पस मध्ये दिसली. ते आमच्यापेक्षा मोठे होते. कदाचित कॉलेजमध्ये असावीत. ते क्रिकेट खेळत होते. इतक्या नीटनेटक्या कपड्यातील मुले आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो. विशेष म्हणजे त्यातील मुले व मुली यांचा एकदम मोकळा संवाद होत होता. ते पण अप्रूप वाटत होते. त्यातील दोन-तीन मुली मुलांसोबत क्रिकेट पण खेळत होत्या. आमची सर्व शाळा जागा मिळेल तिथून हे अभूतपूर्व दृश्य पाहत होती. त्यांचे क्रिकेट झाल्यानंतर सर्व एकत्रित पटांगणात बसले. त्यांच्यातील एका मुलाने हम बने तुम बने एक दुजे के लीये हे गाणे म्हटले... सर्वांना खूप आवडले त्यानंतर आमच्या शाळेतील एक मुलीने तेव्हा प्रसिद्ध असलेले नगिनामधील ‘मै तेरी दुश्मन’.. हे गाणे अगदी नृत्यासह सादर केले तेव्हा आम्ही जोरदार टाळ्या वाजवत मैदान डोक्यावर घेतले. पण त्यानंतर त्यांच्यातील एका मुलीने तेच गाणे पुन्हा म्हनण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ती मुलगी टी शर्ट व पॅंटवर होती. तिने बसायला एक खुर्ची मागितली. माइक हातात घेतला व पुन्हा तेच गाणे इतक्या टेचात म्हटले की, गाण संपल्यावर आम्ही कोणीच टाळ्या वाजविल्या नाहीत, त्या पोरांनी जोरदार टाळ्या व शिट्ट्या वाजविल्या पण त्यांची संख्या कमी असल्याने आमच्यापेक्षा त्यांचा आवाज कमीच होता. त्या शहरी मुलीने ते गाणे मुद्दाम म्हटले असे आम्हा सर्वांना वाटत होते. एक प्रकारे तिने आमच्यातील एक कलाकार मुलीचा अपमान केला होता म्हणजे आमचा सर्वांचा अपमान केला होता. त्यामुळे आम्ही सर्व जन अत्यंत नाराज झालो होतो. शेवटी हे शहरी लोक असेच करतात अशा निष्कर्षाप्रत आम्ही आलो होतो आणि इकडे आमच्या शिक्षकांवर कोणताही फरक पडलेला नव्हता हे अजून एक विशेष वाटत होते.
आम्ही सहकुटुंब जव्हारचा राजवाडा पाहायला गेलो होतो. आदिवासी संस्थानचे हे राजधानीचे ठिकाण होते. भिंतीवर तलवार बंदुका टांगलेल्या दिसत होत्या. इथे आत प्राण्याच्या कातडीत भुसा भरून ठेवलेले जतन केलेले होते. वास्तु भव्य वाटत होती. राजवाड्याच्या बाहेर काजूचे भरपूर झाड होती. जव्हार खूप मोठे शहर वाटत होते. ते देखील आजपासून 40 वर्षांपूर्वी. किराणा कपडे चप्पल असे काही घ्यायचे असल्यास आम्ही इथेच येत असू.
या पाड्यावरील अवकाश मोकळं होत. शाळेतून बाहेर आले की लगेच एक उतरती लागत असे. पावसाळ्यात त्यावर फार वेगाने पानी वाहत असे. मुद्दाम त्या पाण्यातून पाय टाकत आम्ही खालून वर व वरून खाली उतरत असू. एकदा आमच्या तिसरीच्या वर्गात एक नवीन मुलगी आली. ती शेजारच्या गावात कोणाकडे तरी पाहुणी म्हणून आलेली होती असे नंतर कळले. तिचा आवाज पण वेगळाच होता. थोडा भीती वाटत असल्यासारखा. ती थोडी अर्धशहरी वाटायची. सरांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात ती व मीच पुढे असायचो. त्या मुलीचे गाल लालसर होते व टपोर्या डोळ्यात कायम पानी असल्यासारखे दिसायचे. मला कायम असे वाटायचे की, तिच्या गालाला हात लावावा व तिच्या डोळ्यात पानी येते का ते पहावे. तिच्याशी बोलावे असे वाटायचे.
एका रात्री आमच्या पाड्याच्या रस्त्यावरून एकदम भरधाव वेगाने गाड्या जाऊ लागल्या. अंधारात दाटलेल्या त्या आदिवासी पाड्यांवरील कायम काळोखात बुडालेल्या रस्त्यांवर इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्यांचे तितके लाइट्स पहिल्यांदाच चमकत होते. एक पाठोपाठ एक वेगाने त्या गाड्या जात होत्या कधी एखाद्या गाडीत एकच माणूस बसलेला दिसत असे तर कधी दोन तर कधी आतील अंधारात काहीच दिसत नसे. खूप गर्दी रस्त्याच्या बाजूने जाऊन उभी राहिली आम्ही पण गेलो. अस समजलं की कुठल्याशा कार कंपनीने ही कार रेस ठेवली आहे. कोणी म्हणे की गाड्यांचे टायर चेक करण्यासाठी ही टेस्टिंग आहे. काहीही असो पण शांत असलेल्या पाड्यावरील वातावरण मात्र या गाड्यांमुळे ढवळून निघाले होते. पाड्याच्या थोडे पुढे गेले की सुरू होत असलेल्या डोंगरावरून ते लाइट्स रस्त्याच्या वळनाप्रमाणे फिरतांना दिसत होते. पुढे पुढे तर गाड्या ऐवजी लाइट्सच दिसत होते. हा रस्ता त्या डोंगराच्या पलीकडे कोणत्या गावाला जातो माहीत नव्हते.
अशा अनेक उत्सुकता मनात तशाच असतांना पुन्हा आमची बदली झाली होती. ती टपोरी डोळ्यांची मुलगी पाहण्यासाठी म्हणून शेवटच्या दिवशी शाळेत गेलो होतो पण ती आलीच नव्हती. ती पाच-सहा दिवसांपासून शाळेतच नव्हती. म्हणजे ती आता भेटणारच नव्हती. पोटात कससच झालं. भूक लागली परत घरी आलो. बदलीमुळे मी जास्त नाराज झाल्याचे समजून आई मला समजावत राहिली.
परत कधी तिथे जाण्याचं जमल नाही. आता कधी गेलोच तर तो सभापती बाबा व तो मूर्ति बनवणार्या बाबांना भेटेल. ते तिथे नसतील नक्कीच. पण त्यांच्या आठवणी चाळ्वणार्या घरच्या लोकांना भेटेल. त्यांच्याशी बोलेल त्यांना सांगेन मी अजूनही तुमची आठवण काढतो. मी त्या बाबांच्या मुलाकडे ते रजिस्टर मागेल ज्यावर त्याने 86-87 च्या काळातील दूरदर्शनची साप्ताहिकी लिहिली होती. त्याला ते लगेच आठवणार नाही पण इतके नक्की की तो विसरलेला नसेल. मी त्याला अजून एक गुपित सांगेल की त्याचे किशोर कुमारच्या गाण्यांचे पुस्तक जे त्याने मला सहज म्हणून पाहायला दिले होते ते मी अनेक वर्ष सांभाळून ठेवले होते. नंतर ते कुठेतरी हरवले. त्यांच्या शेतात जाऊन ते पूर्ण शेत पाहिल. गावाच्या मागच्या डोंगराच्या पलीकडे कोणती गावे आहेत हे मी विचारेल. जमल्यास फिरून येईन. ती टपोर्या डोळ्यांची मुलगी परत दिसणार नाही. आसपासच्याच गावात कुठे असेल तरी कळणार नाही. कदाचित आता तिच्या डोळ्यातील ते पानी संपून पण गेले असेल. कदाचित ... जाऊदे पण नक्कीच मी तो वर्ग बघून येईल जिथे आम्ही सोबत शिकत होतो. जव्हारला जाऊन मी ती जुन्या थिएटरची जागा शोधून काढेल जिथे वडील मला चित्रपट पहण्यास घेऊन गेले होते. ते नक्कीच आता बंद झाले असेल. चालू असेल तर तिथेच बसून जो सुरू असेल तो चित्रपट पाहिल व मनातल्या मनात वडिलांना सांगेल yes i complete your dreams… हे थोड मूर्खपणासारखे वाटू शकते पण शेवटी माणसाचे जीवन म्हणजे तरी काय असते? काही प्रश्नांची उत्तरे कुठे एका वाक्यात देता येतात. अनेक क्षण, अनेक अनुभव, अनेक व्यक्ति, अनेक गावे, अनेक घटना व अनेक अनुभवांचे एकत्रीकरण म्हणजे जीवन असते. ही अशी अनेक दुरावलेली गावे व माणसे आपल्याला समृद्ध करून गेलेली असतात.
- समाधान महाजन




































