यावलचा(जिल्हा, जळगाव) वैभवशाली इतिहास

यावल हा जळगाव मधील एक महत्वाचा तालुका आहे.  अंकलेश्र्वर शिरपूर रावेर बऱ्हानपुर महामार्गावरील यावल हे महत्त्वाचे गाव आहे पूर्वी यास यावल साखळी किंवा व्यावल असेही म्हणत. रावेर, फैजपुर, सावदा व यावल या भागात केळीचे महत्वपूर्ण पीक घेतले जाते. त्यास अनुकूल अशी इथली जमीन व वातावरण आहे. यावल मध्येच सातपुडयाच्या कुशीत  पाल हे थंड हवेचे व पर्यटनाचे ठिकाण आहे. या तालुक्याचा काही भाग हा सातपुडा पर्वताच्या परिसराने व्यापला आहे. यावल पूर्वी नीळ व हातकागद निर्मितीसाठी प्रसिद्ध होते. याच ठिकाणी आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प कार्यालय आहे.  यावलच्या चहूबाजूंनी तटभिंती व चार दिशांना चार प्रमुख दरवाजे होते. दक्षिणेकडील दरवाजा अजूनही शाबूत आहे. उत्तरेकडील दरवाजाचे बुरूज अस्तीत्वात आहेत. शहराजवळ एक मोठी जुनी मशीद आहे.  
यावल मध्येच निंबाळकरांची गढी वा किल्ला असल्याचे ऐकले होते. जळगावला असेपर्यंत किमान तो पहावा अशी इच्छा होती. या रविवारी तो योग आला. इथली ही गढी वा किल्ला शोधण्यास फारसा वेळ लागला नाही. जवळपास गावाबाहेर पश्चिम बाजूला असलेल्या नदीच्या पलीकडील किनार्‍यावर ही गढी आहे. इथले कोर्ट कुठे आहे? असे जरी कोणाला विचारले. व तुम्ही कोर्ट पर्यन्त पोहचलात  तरी तुम्ही आपोआपच गढीच्या पायथ्याशी पोहचता. कारण इथले कोर्ट बरोबर गढीच्या  परिसरात आहे, किंबहुना आता जिथे कोर्ट आहे तो भाग पूर्वी गढीचाच असावा. कारण जेव्हा फिरून तुम्ही अलीकडील नदीच्या बाजूने खाली उतरता तेव्हा लक्षात येते की आताचे कोर्ट हे किल्ल्याच्या आतील बाजूस आहे. बाहेरून तटबंदीची बाजू दिसते. कोर्टच्या दक्षिणेच्या बाजूला उंचच उंच बुरूज दिसतात. त्या बुरूजांपासून व पलीकडील मोठ्या  भिंतीच्या अलीकडील भागापासून मध्येच असणार्‍या एक छोट्या जागेतून वर जाण्यास मार्ग आहे. कदाचित पूर्वी ते मोठे महाद्वार असावे. वर गेल्यानंतर पूर्वी भक्कम असलेल्या तटबंदीचे अवशेष किल्ल्याच्या चारी बाजूला आपल्याला दिसतात. पूर्वी कुठेतरी वाचले होते की किल्ल्यावर खूप कचरा व घाण आहे पण आता तसे काही दिसून येत नाही. बर्‍यापैकी किल्ला स्वच्छ आहे. येथील भव्य बुरूज हा 75.6 मी. लांब, 68.4 मी. रुंद आणि 45 मी. उंच आहे.  किल्ल्याच्या शाबूत असलेल्या भिंती मधून पूर्वीच्या बांधकाम कौशल्यासोबतच त्यांच्या आक्रमण व संरक्षण साठीची सिद्धता लक्षात येते. सुरूवातीला
आढळणार्‍या बुरूजांसोबत  पलीकडे देखील नदीच्या बाजूने एक मोठा बुरूज आढळून येतो. दक्षिण दिशेला गेल्यास यावल शहराचा एरिएल व्यू बघण्यास मिळतो. वरती पाण्याच्या दोन मोठ्या टाक्या आजही बघायला मिळतात. कदाचित मधील काही वर्ष वरती काही नसावे पण अलीकडे लावलेली झाडे आता बर्‍यापैकी वाढल्यामुळे भर उन्हात गेल्यास नक्कीच सावली मिळते व किल्ल्याचा आनंद घेता येतो. या किल्ल्याला अथवा गढीला निंबाळकरांची गढी किंवा निंबाळकरांचा किल्ला  असे म्हणतात. 
या गढीला वा किल्ल्याला निंबाळकरांचे नाव का पडले? कोण होते निंबाळकर?         हा किल्ला गोबादादा निंबाळकर यांचा मुलगा आप्पाजीराव याने बांधला होता.  ग्वाल्हेरच्या शिंदे यांच्या ताब्यात असताना यावल हे परगण्याचे मुख्य ठिकाण होते. सन 1788 मध्ये शिंद्यांने राव धार निंबाळकर यास या परगण्याचा अधिपती नेमले होते. निंबाळकर घराण्याकडे ही सत्ता कित्येक वर्ष राहिली. यावल परगण्यास लागून असलेले रावेर, थाळनेर व उंबर हे होळकरांच्या ताब्यात होते.
निंबाळकरांनी होळकरांना 3,50,000 रुपये देऊन हे भाग यावल परगण्यात समाविष्ट केले. राव धार निंबाळकरांचा
मुलगा सुराजी राव निंबाळकर याने कर्नाटकी (नाईकडा) शिबंदी ठेवली होती. या कर्नाटक शिबंदीचा उपयोग त्याने शेजारच्या जमीनदारांच्या प्रदेशात केला होता. सन 1821 मध्ये त्याने या शिबंदीचा ताबा ब्रिटीशांकडे हस्तांतरित केला.  काही काळ यावल परगणा कठीण परिस्थितीतून गेला. त्यावेळी सुराजीराव निंबाळकरने आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भिल्ल व पेंढार्‍यांना  सक्रिय मदत केली. 1837 ते 1843 यावल हे शिंदेंच्या ताब्यात होते. सन 1843 मध्ये ब्रिटीशांनी हा परगणा ताब्यात घेतला. ब्रिटिश काळात या किल्ल्याचा उपयोग महालकारी कार्यालय म्हणून करण्यात आला होता. गडावर दोन मोठ्या इमारती होत्या. त्यातील एक जुनी कचेरी व दुसरी दुमजली इमारत ही निंबाळकरांचे निवासस्थान होती. पुढे तिला निमकचेरी असे संबोधण्यात जाऊ लागले. 
या गढीचे ठिकाण हे हडप्पासमकालीन/ ताम्रपाषाण वा मध्ययुगीन काळातील साईट आहे का? 
आज नेहमीप्रमाणे माझ्यासोबत इतिहासकार मित्र श्री भुजंगराव बोबडे होते. आम्ही किल्ल्यात प्रवेश करण्याच्या वेळेसच बोबडे सरांचे लक्ष खाली विखुरलेल्या पॉटरी/खापरांच्या तुकड्यावर पडली. सरांनी ती आम्हाला दाखविली. नंतर आम्ही व्यवस्थित पाहिले असता तशा प्रकारची अनेक खापरे त्या भागात पसरलेली दिसली. बोबडे सरांच्या म्हणन्यानुसार यांचा कालावधी प्रागैतिहासिक वा प्राचीन असू शकतो.  तसेच इथे मध्ययुगीन काळातील देखील काही खापरे आढळतात. यावर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. कारण या गढीला आजपर्यंत अशा अर्थाने कधी पाहिले गेले नाही. मुळात ही गढी  नदी किनारी आहे व पांढर्‍या मातीचा वापर करण्यात आला आहे. होऊ शकते की आधीच्या अस्तीत्वात असलेल्या पुरातत्वीय साईट वर या किल्ल्याचे बांधकाम झाले असावे किंवा
त्याची माती किल्ल्यासाठी वापरण्यात आली आसावी. कालांतराने किल्ल्याच्या भिंती व बुरूज ढासाळल्याने ही जुनी अवशेष वर आली असावीत. पण हे सर्व अंदाज आहेत. यावर पुरातत्व खात्यानेच अधिक प्रकाश टाकणे गरजेचे आहे.  आम्हाला त्या दिवशी जे काही आढळले त्यावर  खालील मीडियात आलेल्या बातम्यांच्या लिंक मी येथे शेअर करतो.                                                    1)https://m-tribuneindia-com.cdn.ampproject.org/v/s/m.tribuneindia.com/news/nation/late-harappan-era-artefacts-found-at-virgin-site-in-jalgaon-281570?amp_js_v=0.1&usqp=mq331AQKKAFQArABIIACAw%3D%3D#origin=https%3A%2F%2Fwww.google.com&prerenderSize=1&visibilityState=prerender&paddingTop=32&p2r=0&csi=1&aoh=16260660939334&viewerUrl=https%3A%2F%2Fwww.google.com%2Famp%2Fs%2Fwww.tribuneindia.com%2Fnews%2Fnation%2Flate-harappan-era-artefacts-found-at-virgin-site-in-jalgaon-281570&history=1&storage=1&cid=1&cap=navigateTo%2Ccid%2CfullReplaceHistory%2Cfragment%2CreplaceUrl%2CiframeScroll


व्यास मंदिर - याच निंबाळकर किल्ल्याच्या पुढे त्याच नदीकाठी सुंदर  व्यास मंदिर आहे. अलीकडे दक्षिण
भारतातील शैलीप्रमाणे एक मोठे प्रवेशद्वार मंदिराच्या समोर बांधण्यात आले आहे. तसेच मंदीरापर्यन्त जाण्यासाठी नदीवर सीमेंटचा एक छोटा पूल देखील बांधण्यात आला आहे. अलीकडे सुंदरसे गार्डन देखील आहे. मंदिराच्या पुजारी व सेवेकर्‍यांना विचारले असता त्यांनी सांगितले की भारतात महर्षि व्यासांची फक्त तीन मंदिरे आहेत त्यातील हे एक आहे. या ठिकाणी व्यासांचा निवास होता असे म्हणतात. दरवर्षी व्यासपौर्णिमेला इथे मोठी यात्रा भरते असे त्यांनी सांगितले. 

- समाधान महाजन 



No comments:

Post a Comment