राजदेहेरे किल्ला (चाळीसगाव, जिल्हा-जळगाव)

चाळीसगावपासून साधारण 20-22 किलोमीटर असलेला हा एक बळकट डोंगरी किल्ला आहे.नाशिक जिल्ह्यात माणिकपुंज या छोट्या टेकडीवजा गडाजवळ सातमाळा रांग संपते आणि अजिंठा रांग सुरु होते. या रांगेतील पहिला मानकरी म्हणजे हा "राजधेर उर्फ ढेरी". वास्तविक सातमाळा रांगेत राजदेहेर, कोळदेहेर आणि ईंद्राई असे किल्ल्यांचे त्रिकुट आहे. बरेच ट्रेकर्स तिकडे भेट देतात. पण त्याच राजदेहेरेशी नामसाधर्म्य असणारा हा राजदेहेर किल्ला मात्र तुलनेने उपेक्षित आहे.

किल्ल्यावर जाण्यासाठी दगड फोडून अतिशय अरुंद अशी पायवाट केली आहे. हा किल्ला दोन टेकड्यांचा असून दोन्ही टेकडया जोडणार्‍या घळईतून किल्ल्यावर जाण्यासाठी मार्ग आहे. किल्ल्याचे दरवाजे ढासळलेल्या स्थितित असले तरी तरी ते दौलताबाद किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे भासतात. किल्ल्याच्या पायथ्याशी राजदेहरे गावाचे काही अवशेष, पांढर्‍या मातीच्या भिंती व तळे दिसून येते. येथील तळ्याला श्रावण तळे असे नाव होते. तळ्याच्या काठावरील महादेव मंदिरात एक शिलालेख आहे. त्याचा बराचसा भाग नष्ट झाल्याने वाचने कठीण आहे. मंदीराबाहेर भग्न शिवपिंडी पडल्या आहेत. 

वर जातांना पश्चिमेकडील भागास लहान किल्ला म्हणतात. लहान किल्ल्याच्या डोंगरकपारीत एक गुहा असून ती बौद्ध लेणी असावी असा अंदाज आहे. तिला टेहळणी चावडी असे म्हणतात.लेण्याच्या समोरील ओट्यावर बसले म्हणजे संपूर्ण राजदहरे परिसर नजरेच्या टप्प्यात येतो.  याच्याजवळ एक मुख्य दरवाजा असावा. येथे भग्न मंदिराचा पाया व मंदिराजवळ आयाळ असलेल्या सिंहाच्या नक्षीचे दोन खांब दिसतात. दरीच्या बाजूस उत्तरेस प्रचंड खडक आहे. खडकात खांब रोवण्यासाठी खोल खड्डे आहेत. याचा अर्थ तिथे इमारत असावी. याच खडकावर एक पिंड व पादुका कोरल्या आहेत. पलीकडील चौथार्‍यावर भग्न नंदी असून पुढे दरबाराच्या दरवाजाचे 3/4 फुट उंचीचे अवशेष आहेत. येथून पूर्वेकडील अवघड वाटेने जुन्या महादेव मंदिरास जाता येते. तिला आडाई शिडी म्हणतात.दीपमाळेचा उपयोग किल्ल्यावर इशारा देण्यासाठी केला जात होता असे सांगितले जाते. कारण देवगिरीकडील सपाटीचा प्रदेश येथून बर्‍याच लांबपर्यन्त स्पष्ट दिसतो. 

किल्ल्याच्या दोन्ही टेकड्यांमध्ये जी प्रचंड दरी (घळई) आहे तिला गावदरी आणि बाजूच्या खोल दरीस पाताळ दरी असे म्हणतात. किल्ल्याच्या पूर्वेकडील दरीस  भवानी दरी असे म्हणतात. ही दरी म्हणजे एक प्रचंड दगडी कडा असून त्याच्या मध्यभागी एक भुयार आहे. ते पाटणा देवीजवळ निघते असे सांगतात. 

या किल्ल्यात पाण्यासाठी जवळपास सहा टाके कोरलेले आहे. पूर्वी सर्वांमध्ये पानी होते आता फक्त एकाच टाक्यात पानी आहे. किल्ल्याच्या दरवाजाचे अवशेष, काही संरक्षक भिंती व त्यावरील जंग्या, पडका बुरूज, पाण्याचे टाके, काही इमारतींचे अवशेष याशिवाय आता काहीही शिल्लक नाही. 

राजदेहेर हा किल्ला गवळीकालीन किंवा यादव पूर्वकालीन असावा. इ.स. १००० ते १२१६ पर्यंत निकुंभांची या भागावर सत्ता होती असे पाटणेदेवी मंदिरातील शिलालेखानुसार सिद्ध होते. पाटणे या राजधानी जवळच हा किल्ला असल्यामुळे लष्करीदृष्ट्या महत्वाचा असावा. इ.स. १२१६ - १७ च्या सुमारास यादवांनी हा किल्ला ताब्यात घेतला. यादवानंतर अल्लाऊद्दीन खिलजीकडे व त्यानंतर फारुकींकडे हा किल्ला होता. इ.स. १६०१ मध्ये खानदेश सुभा मुघलांकडे गेला त्यावेळी भडगावच्या रामजीपंतांनी अशिरगडच्या वेढ्यात चांगली कामगिरी केल्याबद्दल त्यांना जहागिरी देण्यात आली, त्यात राजदेहेर किल्ल्याचा समावेश होता. शिवकालीन पत्रात या किल्ल्याचा उल्लेख नाही, पण १०९ कलमी बखरीत शिवाजीमहाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत या किल्ल्याचा समावेश केला आहे यावरून कदाचित १६७० च्या दरम्यान हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला असावा. पुढे १७५२ च्या भालकीच्या तहात निजामाकडून हा भाग पेशव्यांनी घेतला. इ.स. १७६२ मध्ये माधवराव पेशव्यांनी राजदेहेर किल्ला विठ्ठल शिवदेव विंचुरकर यांच्याकडे सोपवून १० हजार रुपयांचा सरंजाम किल्ल्याला मंजूर केला. हि सनद देताना अशी अट ठेवली होती कि शिबंदीचा खर्च शक्य तितका कमी ठेवावा किमान मागील खर्चापेक्षा वाढु नये. या दहा हजार रुपयातच गडाची डागडु़जी करावी. यासाठी वेगळा खर्च दिला जाणार नाही. पुढे १६६४ मधे पेशव्यांनी खानदेशचा सरसुभेदार नारो कृष्ण याला पत्र पाठवून, " राजदेहेर किल्ला कोणत्या अवस्थेत आहे तसेच त्यावर कोणत्या वस्तु आहेत याची यादी पुण्याहून पाहणी करण्यासाठी आलेल्या कारकुनास देण्यास सांगितले होते. इ.स. १७६४ मध्ये चाळीसगावचे जहागिरदार जगजीवनराम व माधवराव या पवार बंधूंनी बंड केल्यावर दुसर्‍या बाजीरावाने विठ्ठलराव विंचूरकर यांना चाळीसगावावर पाठविले. त्यांनी पवारांचे बंड मोडून राजदेहेर ताब्यात घेतला.

१७९६ नंतर १८१८ पर्यन्त हा किल्ला नाममात्र मराठ्यांच्या ताब्यात होता. हा काळ अस्थिरतेचा गेला. १८१८ मध्ये मराठ्यांना राज्य गमवावे लागले. कर्नल मॅकडॉवेल हा औरंगाबादमार्गे एप्रिल १८१८ मधे चांदवड येथे आला व १० एप्रिल १८१८ ला चांदवडचा किल्ला त्याने घेतला. त्यानंतर त्याने आपला मोर्चा राजदहरेकडे वळविला. त्यावेळी किल्ल्यावर मराठ्यांची अरब शिबंदी होती. १८१८ मध्ये हा किल्ला मराठ्यांचे सरदार पाटण्याच्या निकम कुलातील देशमुखांच्या ताब्यात होता. हे निकम देशमुख निकुम्भांचे वंशज असल्याचे सांगितले जाते. 

कर्नल मॅकडॉवेल या किल्ल्याच्या पायथ्याशी आला व मुकाट्याने गड ताब्यात देण्याचा निरोप त्याने किल्लेदाराला, निकम देशमुखांना पाठवला. पण हा निरोप किल्लेदार व आतल्या अरबी सैनिकांनी  धुडकावून लावला व आतून गोळीबार व जेजल्याचा मारा सुरु केला. दरवाजावर व  कड्यांच्या बाजूला दगडांच्या राशी रचून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे मराठा सैन्यास पुष्कळ प्रतिकार करता आला. नाईलाजाने ईंग्रजांना लढाईची तयारी करावी लागली. ठिकठिकाणी मोर्चे बसवून ११ एप्रिलला ईंग्रजानी तोफा डागायला सुरवात केली. १२ एप्रिलला ते आणखी पुढे सरकले. किल्ल्यावरच्या सैनिकांनी पुढे येउन ब्रिटीशांवर मारा सुरु केला, पण फारसा उपयोग झाला नाही. म्हणून मराठ्यांनी ब्रिटीशांकडे निरोप पाठवला कि ते जर सैनिकांचे थकलेले पगार देणार असतील तर किल्ला त्यांच्या हवाली केला जाईल. मात्र ब्रिटीशांनी हि अट नाकारली,  फक्त खाजगी चिजवस्तू घेऊन पळून जाण्याची मुभा आक्रमकांनी देण्याचे मान्य करून दोन तासांचा अवधी विचारासाठी दिला. फक्त सैनिकांचे वैयक्तिक धन घेउन जाण्यास परवानगी दिली. व आतील सैनिकांना निर्णय घेण्यास दोन तासाचा अवधी दिला. याचा काही उपयोग झाला नाही. म्हणून ईंग्रजांनी शेजारच्या टेकडीवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करायचे ठरले. यापुर्वी हा प्रयोग बर्‍याच ठिकाणी यशस्वी झाला होता. मात्र टेकडीवर तोफ नेणे अवघड होते. यासाठी तोफेचे सुट्टे भाग करुन टेकडीवर नेले व तिथे जोडून रात्री नउ वाजता तोफ मार्‍याला सज्ज झाली. सर्व तयारी झाल्यानंतर तोफगोळ्यांचा मारा सुरु झाला. एक तोफगोळा दारुकोठारावर पडला आणि ज्याच्या जीवावर गड लढवायचा तेच नष्ट झाले. सहाजिकच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेउन सैनिक निघून गेले. दुसर्‍या दिवशी म्हणजे  १५ एप्रिल १८१८ला जेव्हा ब्रिटीशांच्या ताब्यात गड आला तेव्हा जिवंत ४० माणसे, पाच मृत व्यक्ती, १२ तोफगोळे आणि खजिना हातात पडला.

राजदेहेरे जिंकल्यावर इंग्रजांनी राजदेहेरे ऐवजी चाळीसगाव हे मुख्य ठिकाण केले व मिर फास्त आली जहागीरदार याला चाळीसगावची जहागिरी दिली. नंतर त्याचीही जहागिरी काढून घेतल्याचे दिसते. तेव्हापासून राजदहरे गाव ओस पडले. 

- समाधान महाजन 


संदर्भग्रंथः-

१) जळगाव जिल्हा गॅझेटियर

२) उपेक्षित दुर्गांचा ईतिहास- प्रा.डॉ. जी.बी. शहा.

३) जळगाव जिल्ह्यातील किल्ले व गढया- नी. रा. पाटील 




No comments:

Post a Comment