लोणार सरोवर

लोणारचे जगप्रसिद्ध सरोवर महाराष्ट्र राज्यामधील बुलढाणा जिल्ह्यातले खाऱ्या पाण्याचे एक सरोवर आहे. आम्ही 2021 मध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी या ठिकाणी गेलो. या आधी 2003-04 मध्ये मी गेलो होतो त्यापेक्षाआता खूपच सकारात्मक बदल या ठिकाणी झालेले मला दिसले. पूर्वी सरोवराच्या कोणत्याही ठिकाणाहून लोक खाली उतरत असत. त्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने खाली कचरा घाण देखील होत असे. ज्या गोमुखातून पानी पडते व सरोवरात जाऊन मिळते तिथे लोक आंघोळ करत कपडे धुवत आता या सर्व प्रकारांवर बंदी आलेली आहे. ठीकठिकाणी सुरक्षारक्षक व फॉरेस्ट ची लोक असतात. त्यामुळे आता खाली देखील स्वच्छता आहे. 20 नोव्हेंबर 2015 मध्ये लोणार हे वन्यजीवसंरक्षक अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले तसेच नोव्हेंबर 2020 मध्ये या ठिकाणाचा समावेश रामसेर साईट मध्ये करण्यात आला आहे.

सत्ययुगात लोणार सरोवर वैरज तीर्थ (वैरज तीर्थ) या नावाने ओळखले जात असे. लोणासुराच्या कथेनुसार विष्णूने लोणासुराचा वध केला व या सरोवराच्या खोलगट भागात त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या रक्तापासून येथील सरोवरातील पाणी तयार झाले, अशी आख्यायिका आहे. भोगावती कुंडात भगवान रामाने स्नान केले होते. पांडवांच्या काळात युधिष्ठिराने येथे वडिलांचे श्राद्ध केले होते , असेही सांगितले जाते. भारतीय पुराणात लोणार सरोवर आणि परिसराला कपिलतीर्थ , विरजतीर्थ , धारातीर्थ , नाभीतीर्थ , तारातीर्थ , पवित्रतीर्थ , पद्मसरोवर , पंचाप्सर आदी विविध नावे आहेत. स्कंद पुराणात ब्रह्मदेव , नारदमुनी , कपिलमुनी , अगस्तीऋषी , भृगुऋषी , याज्ञवल्क , शुक्राचार्य आदी ऋषीमुनींनी लोणार सरोवर परिसरात तपश्चर्या केल्याचा उल्लेख आहे.  कृतयुगात लोणार  या गावाची स्थापना झाली, अशी दंतकथा आहे. त्याचे जुने नाव ‘विरजक्षेत्र’ असे होते. स्कंदपुराणात वर्णिलेल्या लोणासुराची (लवणासुराची) कथा याच ठिकाणाशी निगडित असावी. विरजमाहात्म्यात याचा तीर्थ म्हणून उल्लेख आहे. प्राचीन भारताचा इतिहास पाहता ही सरोवराची भूमी दंडकारण्याचा भाग होती याचे संदर्भ मिळतात. म्हणून या भूमीला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. 

लोणार सरोवराचा शोध १८२३ साली ब्रिटिश लष्करी अधिकारी सर सी. जी. ई. अलेक्झांडर यांनी लावला आणि त्यानंतर जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली असे म्हणतात. 

शास्त्रज्ञांच्या मते दहा लाख वर्षापूर्वी ६९ मी. रुंदीच्या व वीस लक्ष टन वजनाच्या अशनी पडल्याने १,९००  मी. व्यासाचे व १९०  मी. खोलीचे विवर निर्माण होऊन तेथेच या गोलाकार सरोवराची निर्मिती झालेली असावी. या सरोवराचा बाह्य परिघ ६ किमी. अंतर्परिघ ३.५ किमी. व खोली ९० ते १९० मी. आहे. सरोवराच्या कडा १३० मीटरपर्यंत उंचावलेल्या आहेत. कडांवर काचेच्या छोट्या कणांपासून १० ते १५ सेंमी.पर्यंत आकाराचे काचेचे तुकडे पडलेले आढळतात. सरोवराचे पाणी अत्यंत खारट व मचूळ आहे. मात्र काठावरील व आजूबाजूच्या विहिरींमधील पाणी गोड आहे. सरोवराच्या पाण्यात आढळणारे क्षार, मीठ आणि अन्य पदार्थ अन्यत्र कोठेही न सापडणाऱ्या प्रकारचे आहेत. काहींच्या मते चुनखडीयुक्त विवराचे प्रचंड छत कोसळून तेथे या सरोवराची निर्मिती झाली असावी तर दख्खनच्या पठारावरील ज्वालामुखीउद्रेकाच्या वेळी जोराच्या वायुरूप स्फोटामुळे ज्वालामुखीच्या खोलगट भागात हे सरोवर निर्माण झाले असावे, असेही काहींचे मत होते. परंतु अलीकडील काळात केलेल्या संशोधनावरून उल्कापातामुळेच हे सरोवर तयार झाले असावे, असे शास्त्रज्ञांच निश्चित मत बनले आहे. बेसॉल्ट खडकरचना(अग्नीजन्य) असलेल्या प्रदेशातील अशा स्वरूपाचे हे जगातील एकमेव विवर असावे. अशाप्रकारचे बेसॉल्ट खडका पासून तयार झालेले सरोवर मंगल ग्रहावरच सापडत असल्याने  लोणार सरोवराचे महत्व वाढले आहे. जगातील उल्कापाषाण पतनामळे निर्माण झालेल्यांमध्ये हे तिसऱ्या क्रमांकाचे मोठे विवर आहे. एकूण चार सरोवरांमध्ये अॅरिझोना (अमेरिका) , ओडेसा (अमेरिका) , बोक्सव्होले (ऑस्ट्रेलिया) आणि लोणार (भारत) यांचा समावेश आहे. लोणारच्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या निमिर्तीबाबत विविध मतप्रवाह आहेत. या विवरात दडला गेलेला उल्कापाषाण साधारण ६००  मी. खोलीवर रुतून बसला असावा, असा अंदाज आहे.

सरोवराची निर्मिती ५२,००० ± ६००० वर्षांपूर्वी झाली असे मानले जाते. पण २०१० साली प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात सरोवराचे वय ५,७०,००० ± ४७,००० वर्ष इतके वर्तवण्यात आले आहे. अमेरिकेतील स्मिथसोनिअन संस्था, युनायटेड स्टेट्स जिओग्राफिकल सर्व्हे तसेच भारतातील जिओलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यासारख्या संस्थांनी या सरोवरावर बरेच संशोधन केले आहे. सरोवराच्या वयाचे अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. थर्मोल्युमिनेसेन्स तंत्रज्ञानावरून काढलेले वय अंदाजे ५२,००० वर्ष आहे. अलीकडील अरगॉन डेटिंग वापरून काढलेले वय ५,४७,००० आहे. वयाचा नवीन अंदाज सरोवराच्या कडेला झालेल्या झिजेशी सुसंगत आहे.

जून २०२० या महिन्यात लोणार सरोवराचे पाणी लाल रंगाचे झाले होते. तज्ञांच्या मते हे पाणी तलावाच्या तळाशी काही रासायनिक क्रिया घडून आल्यामुळे किंवा हॅलो बॅक्टीरिया व ड्युनोलीला या  बॅक्ट्रियामुळे झाला असावा असे म्हणतात.परंतु या घटनेमुळे लोणार सरोवर पुन्हा एकदा जगभरात चर्चेत आले होते.     

लोणार सरोवराभोवती अनेक मंदिरे असून ती बव्हंशी मोडकळीस आलेली आहेत.  लोणार सरोवराच्या काठावर दहाव्या शतकापासून तर तेराव्या शतकापर्यंतचे जवळपास २७ मंदिरे आहेत. त्यातील अनेक मंदिरे हे यादव काळात बांधली आहेत. या मंदिरामध्ये  महादेव मंदिर, राम मंदिर, देवीचे मंदिर, सूर्य मंदिर कृष्ण मंदिर इत्यादी मंदिरांचा समावेश आहे.यातील अनेक मंदिर नामशेष झालेले आहे. या सरोवरात प्रवेश करतांना सुरवातीलाच विवर सारखा दिसणारा खड्डा आहे. येथेच हनुमानाचे मंदिर आहे.कमळजा देवी मंदिर , दैत्यसूदन मंदिर , शंकर गणेश मंदिर , रामगया मंदिर , विष्णू मंदिर , वाघ महादेव मंदिर , मोर मंदिर , अंबरखाना मंदिर , कुमारेश्वर , पापहरेश्वर , सीता न्हाणी , शुक्राचार्याची वेधशाळा , याज्ञ वल्केश्वर , धारेजवळील मंदिर , ब्रह्मकुंड , यमतीर्थ , लोणारची धार , उंबरझिरा (औदुंबरतीर्थ) , सोमतीर्थ , लिंबी बारव (वायूतीर्थ) , अगस्तीतीर्थ , त्रिपुरुषांचा मठ , आडवा मारोती आदी मंदिरांनी लोणार नगरी समृद्ध आहे. सम्राट अशोक , वाकाटक , सातवहन , चालुक्य यांच्या काळात या सरोवर परिसरातील विविध मंदिरांची निर्मिती झाली. जैन राजांनीसुद्धा मंदिरे बांधली आहेत. यादवांनी मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी पुढाकार घेतला.

लोणार गावाच्या मध्यभागी विष्णूने ज्या ठिकाणी लोणासुरावर विजय मिळविला असे मानले जाते, तेथे दैत्य-सूदन हे सुंदर व प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे यादवकालीन हेमाडपंथी वास्तुशिल्पाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. याशिवाय नरसिंह, गणपती, रेणुकादेवी, कुमारेश्वर व मारुती यांची अन्य उल्लेखनीय मंदिरे आहेत. निझाम व पेशव्यांच्या काळातही लोणारचा विकास झाला. ब्रिटिश काळात कर्नल मॅकेन्झीने लोणारचा सविस्तर अभ्यास केला. त्याच्या नोंदीनुसार , तेव्हा लोणारला ३२ मंदिरे , १७ स्मारके , १३ कुंड आणि पाच शिलालेख होते.

- समाधान महाजन 

संदर्भ - 

1) वर्‍हाडचा इतिहास - या.मा.काळे

2) मराठी विश्वकोश

3) www.wikimapia.org

4) www.buldhana.nic.in

No comments:

Post a Comment