"बरसात" चे दिवस


रंगीबेरंगी फुलपाखरे मनात उडण्याचे दिवस. रोजचे ऊन नव्यानेच शरीराला बिलगून जाणवण्याचे दिवस. अंगावरच्या कपड्यांना रंग असतात असे कळण्याचे दिवस. स्वतःच स्वतःत अधिकच गुरफुटून जाण्याचे दिवस. होते ते दिवस असे काही बाही. तरीही  परीक्षेसाठी मात्र रात्र रात्र जागण्याचे दिवस. 

 ‘तूम निगाहों में, तूम खयालो में 
हाल है बुरा हमारा ऐसी हाल मे...

 असे उगाचच जीवनावर नाराज असलेल्या दिवसांचे ते दिवस. बरसात नुकताच रिलीज झालेला.  या ओळी गावात कुठेही फिरले तरी ऐकू येणार्‍या नक्कीच होत्या. ते दिवस मोबाइलचे नव्हते, न पेन ड्राईव व न सी.डी. चे.  ते आपले कॅसेटचे दिवस होते.  कोणत्याही टपरीवर उभे राहिले तरी बरसातची गाणी व  त्याची ती कॅसेट हमखास दिसायची.  बॉबी देवल व ट्विंकल खन्नाचा हा पहिलाच चित्रपट. स्टार किड्स म्हणून चित्रपट येण्याआधी अनेक पेपर मधून बातमी वाचलेली. पण नक्की काय ? केव्हा?  इतक काय माहिती नसायचे. रोजची कॉलेज, प्रॅक्टिकल व क्लास मध्ये बुडून गेल की आवडणार्‍या पोरींकडे पण पाहायला वेळ नसायचा. (आस कुठ म्हटलं मी😜)
गावात इन मीन दोनच थिएटर. कोणता पिक्चर आला ते रस्त्याने लागलेल्या पोस्टरवरुन हमखास कळायचे. ते दिवस असे उगवलेले की मावळायचे नावच घ्यायचे नाही. सकाळी सकाळी सुरू होणार्‍या क्लास पासून तर दुपारचे पाच पर्यंतचे लेक्चर संपता संपायचे नाही. कॉलेज च्या परिसरात असलेलेल्या एक-दोन चहाच्या टपर्‍यावरून येता जाता गाण्याचे  ऐकू आलेल्या एक-दोन ओळी ..... थोडा जगण्यातला रस वाढवायच्या....  त्या ऐकत जायचो पण पुढे वर्गात बसलो की, मात्र sin,cos, थिटा.. ब्रायोफायटा, टेरिडोफायटा...किंवा केमिस्ट्री चे पान पान भर reactions…. याने जीव व्याकुळ व्हायचा.  याच्याने जीवनात काय असा घंटा फरक पडणार आहे हे कळायचे नाही. (अजूनही कुठ काय कळलं म्हणा)
एक गडद हिरवागार गरम वास आमच्या कॅम्पस मध्ये भरलेला असायचा.  त्यातही पावसाळ्यात तो जास्तच जाणवायचा. दिवाळीपर्यंत आजूबाजूची पूर्ण भरलेली शेती व आतील मैदानात असलेली उंच झाडी... .. मैदानावरचे गवत. असा रोमांटिक फील वातावरणात असायचा. पण तो वर्गाच्या बाहेर आल्यावरच जाणवायचा. आत कधी कधी केमिस्ट्रीच्या लॅब  मधील रसायनांचा उग्र वास यायचा किवा वरच्या मजल्यावर गेलो तर बायोच्या बेडकांची किळस वाटायची. मराठी विषय  आवडायचा पण त्या लेक्चरचे पोरांना  काहीच वाटायचे नाही याचे मला भलतेच वाईट वाटायचे. असो तर त्या सर्व रटाळ वातावरणात कधी कधी मागच्या शेतातील झोपडीत राहणारा एक माणूस भलतीच रंगत आणायचा. त्याला मी कधी प्रत्येक्ष पाहिले नाही. पण अगदी लहर आल्यासारखे मध्येच तो कोणतेही गाणे भल्या मोठ्या आवाजात लावत असे. 
त्याचे फेवरेट म्हनजे करण-अर्जुनची गाणी , ‘सूरज कब दूर गगनसे ... आदि. पण एक दिवस गड्याने कदाचित नवी कोरी कॅसेट आणली आसावी. अशाच एका पेंगुळलेल्या भर दुपारी लेक्चर मध्ये झोप लागत असतांना .... कुमार सानुचा तो एकदमच ताजातवाना व स्वप्नांना अधिकच रंगीत करणारा आवाज कानावर आला. 

ढूंढते हैं हम तुमको दर-ब-दर
जाने कब कहाँ मिलोगे हमसे हमसफ़र
कैसी दूरियां, कैसा फ़ासला
हम यहाँ पे आए सुन के प्यार की सदा
अब ना तुमसे दूर होंगे हम
तुमपे दिल क्या जां निसार है
हमको सिर्फ़ तुमसे प्यार है ...

अन नंतर बरेच दिवस त्या ओळी ओठांवरून जाईचनात. तशातच एक दिवस असाच निरुद्देश रूमच्या रस्त्याकडे दिवस तुडवत जात असतांना तिकडून गाडीवर येतांना स्वप्नील दिसला. संध्याकाळची वेळ....  सूर्याची तिरपी किरणे त्याच्या चेहर्‍यावर सांडत जात असतांनाच निळ्या-जांभळ्या रंगाचा चश्मा(पक्षी-गॉगल) चमकला.  हा तर पोस्टरवर पाहिलेल्या बॉबी देवलच्या गॉगलसारखाच होता. मी स्वप्नीलला आवाज न देता त्याच्याकडे पाहतच राहिलो. तसा पायी पायी सगळीकडे फिरणारा मी व सतत वेगवेगळ्या गाड्यांवर दिसणारा स्वप्नील: आमच्यातील परिस्थितीची ही फार मोठी दरी त्याला आवाज न देण्यामागे मनात रुतून बसलेली होती. त्यामुळे तो अगदी मोठी जीप जरी घेऊन आला तरी मी लांबूनच ती पहायचो. तर असो हे तेव्हाच वाटण होत.
असच एक दिवस अमर रूमवर आला. बरसात बघायला जाऊ म्हटला. मनातून मी अनेक उड्या मारल्या. कारण एव्हाना त्यातील सर्व गाणे पाठ झालेले होते. सुहास ला सोबत घेऊन आम्ही निघालो. दुपारची वेळ होती अर्थात सुट्टी असेल (कॉलेजच्या दिवशी चित्रपट पाहण्याएव्हढे धाडस तेव्हा नक्कीच नव्हते. ) थिएटर बर्‍यापैकी रिकामे होते. बिनधास्त समोरच्या खुर्चीवर पाय टाकून बसलो. सुरुवात तर चांगली होती. स्टोरी तितकी आवडत नव्हती पण गाण्यांनी पार जीव खाऊन टाकला होता. ते म्यूझिक, तो आवाज, ती ट्विंकल, तो थिएटरचा अंधार ...त्या इमेजेस अजूनही तशाच डोक्यात आहेत. त्यानंतर बरेच रात्र ती गाणी ...तो आवाज ... डोक्यात घुमत होता. 


जागते रहे हम तो रात भर
एक लम्हां एक पल भी सोई ना नज़र
तुम निगाह में, तुम ख्याल में
हाल है बुरा हमारा ऐसे हाल में
यूं तो हमपे ना करो सितम
हमको तुमपे ऐतबार है
कह रही है दिल की बेखुदी...

- समाधान महाजन 

(हे वाचून ट्विंकल अथवा बॉबी अथवा बरसात हे मला आवडत असतील असा कुणाचा गैरसमज होत असल्यास त्याला मी जबाबदार नाही.😍)

12 comments:

  1. तुला अजुन ते दिवस आठवतात मित्रा ...मी खरच 12च्या दिवसात गेलो ...bobydevol चा blue sadede google.मला ही आठवला ..😀😀😀

    ReplyDelete
    Replies
    1. मी तोच स्वनिल

      Delete
    2. धन्यवाद
      ...मित्रा पण यावर तुझं नाव नाही आले...कोण ते कळेल का

      Delete
  2. स्वप्नील द ग्रेट 😂🤣

    ReplyDelete
  3. क्या बात है... वाहह

    ReplyDelete
  4. Very well written Samadhan.
    Time machine rewind.

    ReplyDelete
  5. तुझ्या जुन्या स्मृती रोमांचित करणाऱ्या आणि डोळे पानवणाऱ्या आहेत मित्रा..!!!!
    Thanks to the days of peak level of testesteron...♥️

    ReplyDelete
  6. पुन्हां कॉलेजमध्ये गेल्यासारखे वाटले,सर खूपच सुंदर

    ReplyDelete