सचिन कुंडलकरांचे नाईण्टिन नाईण्टी हे
पुस्तक वाचून झाले. त्यांनी लिहीलेल्या लेखांचा तो संग्रह आहे. त्यामुळे
सुरूवातीचा लेख वाचून जे मला वाटले होते की ते आत्मचरित्र असावे तर ते असे काही
नसून अनेक लेखांचा तो कॅलेडिस्कोप आहे व त्यात आत्मचरित्राचे अनेक तुकडे आहेत. पुस्तक
तर चांगलेच आहे पण महत्वाचे म्हणजे ते वाचत असतांना या पुस्तकाने माझ्या अपूर्ण
राहिलेल्या लेखन संकल्पनांना चांगलेच जागे केले. यातील बरेच लेख वाचत असतांना ‘अरे हे
तर मला लिहायचे होते!’ ‘किंबहुना या विषयावर मी
किती छान लिहू शकलो असतो’, ‘यावर कितीतरी
होते माझ्याजवळ सांगण्यासारखे’, असे सारखे वाटत होते.
खर तर प्रथम मी कुठेतरी या पुस्तकाचे नाव
वाचले होते पण किरणसोबत बोलतांना त्याने एकदा संगितले की, तो
नाईण्टिन नाईण्टी वाचत आहे त्याचवेळी या नावाकडे मी आकर्षिलो गेलो होतो. लेखक कोण
या पेक्षा नाव खूप आवडले होते पुस्तकाचे. कारण खर तर ही माझी पिढी, नव्वद्च्या दशकातील व शतकाच्या उंबरठ्यावरील. त्यामुळे 90ज नावाचे काहीही
आले की मी त्यावर तुटून पडतो(90-90 सोडून) त्यात मग नव्वद्च्या चित्रपटावरील लेख
असो वा त्या काळासंदर्भात असलेले कुठलेही लिखाण असो.
मी अनेक दिवसांपासून ठरवतोय या काळावर, या
काळातील माझ्यावर, माझ्या भोवतालवर व माझ्यावर परिणाम करणारे
पुस्तके, चित्रपट, गाणी, व्यक्ति, प्रवास, गावे अशा
सार्यांवर लिहायचे पण ते होत नाहीय. असे काही वाचले की वाटते ते लिहून काढावे
नाहीतर ते सर्व विरून जाईल मनातल्या मनात. अन मग कधीच लिहिता येणार नाही.
कधी कधी वाटत मी जे लिहिल ते चांगले होईल का? आवडेल
का कोणाला? की उगाचच आपल्या आठवणींचा सोस आपणच का मांडावा? ते खूपच पाल्हाळीक होईल का? असे असंख्य प्रश्न मनात
उभे असतात. मग मी स्वतःला बरीच किलोमीटर मागे ओढून नेतो व लिखाणाची रेषा माझ्यापुरती
धूसर करून टाकतो.
केव्हा केव्हा वाटते की कमीतकमी आपण लिहून
तर काढू नंतर बघू त्याच काय होईल. हे लिहू की नको हा संभ्रम व ही अवस्था नेमकी कोणाजवळ
बोलून व्यक्त करावी हा दूसरा संभ्रम. कारण यात फक्त साहित्यिक क्षेत्रातील माहिती असणारे
चालणार नाही ते मला व माझ्या दिवसाला ओळखणारे देखील असावेत. ही चाळणी लावली तर जे काही
मोजकीच उरतात त्यांनी फार पूर्वीच एका ओळीत सांगून ठेवले होते की, ‘तू लिही तर खर’.
तरीही ते लिहून होत नाहीय हे जास्त खरे व वेदनादायी
आहे.
- समाधान महाजन

No comments:
Post a Comment