सातपाटील कुलवृत्तांत


काही दिवसांपासून सुरू असलेले तब्बल 796 पानी सातपाटील कुलवृतांत अखेर वाचून पूर्ण झाले. सुरुवातीच्या प्रकरणापासून उत्कंठा क्रमाक्रमाने वाढत जाते. जवळपास सातशे वर्षाचे उत्खनन अथवा वंशवृक्षाचा शोध लावत जातांना कादंबरी एखादी कुटुंब,कुळ,गाव, समाज वा जात यापुरती मर्यादित न राहता व्यापक होते, एखाद्या मोठ्या नदीने आपल्यासोबत सर्वच वाहून न्यावे तसे हा वंशाचा शोध आपल्यासोबत त्या त्या काळातील समाज, चाली-रिती, राज्यकर्ते आणि खूप काही बिट्विन द लाईन्स आपल्याला सांगत जातो. आपले बोट धरून त्या काळातून आपल्याला फिरवून आणतो.
श्रीपती हा पहिला नायक  जो अल्लाउद्दीन खिल्जीच्या पैठनच्या आक्रमणाच्या आसपासच्या काळात आहे व त्यानंतर येणारा साहेबराव जो निजामशाहीतील 1490 च्या काळाच्या आसपास आहे. त्यानंतर येणारा दशरथ हा नायक 1760 च्या आसपासचा, पानिपतच्या अनकही.. इतिहासातील काळपुरुष. ही तिन्ही प्रकरणे माझ्या आवडीची.  हे वाचत असतांना पठारे सरांनी जी भाषा, ज्या व्यक्ति व जी गावे त्यांची वर्णने केली आहेत ती वाचून आपल्या समोर ते सर्व उभे आहे आहेत असे न वाटता त्या सर्वांचा आपण एक भाग आहोत असे सारखे वाटत राहते.
ऐतिहासिक कालखंडाबाबतचा अंदाज येण्यासाठी व तत्कालीन वास्तव कळण्यासाठी प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीची दोन-चार पाने त्याची माहिती दिली आहे ती देखील सरधोपटपणे न देता अगदी वास्तव व अजून अभ्यासकांशिवाय उजेडात न आलेली माहिती दिलेली आहे. उदाहरणार्थ पेशवेकालीन राज्यावर असलेली खाजगी सावकारांची कर्जे, ती फेडण्यासाठी म्हणून होणार्‍या मोहिमा, युद्धे पर्यायाने होणारा राज्याचा विस्तार. त्यातही मनापासून व निष्टेने राहणारी खूपच कमी माणसे. सामान्य सैनिकांच्या राहण्याच्या जागा, आजूबाजूला असलेली सहन करावी लागणारी घाण हे इतक्या सहज पटत जाते की आतापर्यंत मस्तकात असलेल्या भव्य-दिव्य कल्पना ओघळून बाजूला पडतात व हा साधा-बाधा, रोख ठोक, तुमच्या माझ्या भाषेतला इतिहास चटकन व ठळकपणे पटू लागतो.
महत्वाचे म्हणजे यातील इतिहास भाजीला दिलेल्या फोडनीसारखा  फार फार तर त्यातील मिठासारखा म्हणू कारण त्याचे निम्मित, काळ, घटना घेऊन आपल्या कुळातील पुरुषांचा शोध घेणे त्यांचा विस्तार मांडणे कादंबरी संपेपर्यंत अव्याहतपणे सुरू असते. खर तर हे असे म्हणने देखील फार सिंप्लिफिकेशन होईल. मुळात कादंबरी वाचतांना खूप वेळा माझी भावना अशी झाली की, इतिहासातील देवगिरी, खिल्जी, आदिलशाही, पेशवाई, ब्रिटिश हा सर्व कालपट एकामागून एक सरकत असतांना तो काळ बदलण्याच्या वेळेस अर्थात सातपाटलातील पुढचा नायक सुरू झाला की तितकाच वेळ फक्त कुठल्या काळात अथवा शतकात आपण आलो इतक समजून घेण्यासाठी या विशाल समुद्राच्या वर काही क्षण यायचे व परत आतील पाण्यात गुडुप होत तिथल्या जगात निघून जायचे. हे अस सारखं सुरू होत.
श्रीपती, साहेबराव, दसरथ, जानराव, रखमाजी आणि पिराजी, शंभुराव या क्रमाने शेवटचे प्रकरण देवनाथ आहे. अर्थात यात रखमाजी व पिराजी हे वेगवेगळे केले तर शंभुराव हे शेवटचे सातपाटील ठरतात. पण त्यांना एकत्र केल्याने देवनाथ हे शेवटचे सात पाटील आहेत. अर्थात कादंबरीत या प्रकरनाच्या नायकांना सातपाटील असे समजले तर मुळात कादंबरीचा शेवटचा नायक ज्याचा शोध घेत असतो ते सातपाटील हे नाव धारण करणारे मूळ सातपाटील हे एडके,डुकरे, पठारे असे एकूण सात जंनांमध्ये वाटलेल्या पाटीलकीची गोष्ट देखील पुढे येते. असो मुळात हे सर्व वाचून समजून घेण्यात अधिक आनंद आहे.
वाचतांना अजून काही बाबी जाणवल्या. त्या सांगण्याआधी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मी हे जे काही लिहीत आहे ते बिलकुलच समीक्षा या सदरात मोडणार नाही कारण समीक्षक हा मराठी साहित्यातील फार मोठा व थोर प्रकार आहे असे मी मानतो. मी आपल एक सामान्य वाचक म्हणून काय वाटलं ते लिहिलं आहे. खूप दिवसांनी ब्रेनस्टोर्मिंग अस काही वाचायला मिळालं. एखादी कादंबरी वा पुस्तक वाचतांना व वाचल्यावर काय वाटलं ते कालांतराने आपण विसरून जातो. ते तसं होण व्यक्तिशः मला तितक पसंत नाही म्हणून ही उठाठेव. एखादी चांगला चित्रपट, पुस्तक वा व्यक्ति वाचण्यात आली की मी आवर्जून त्यावर लिहिण्याचा प्रयत्न करतो. केव्हा ते शक्य होते केव्हा होत नाही. हा त्यातीलच एक शक्य झालेला प्रयत्न. 
तर असो शंभुराव व अर्ध्या देवनाथ पर्यन्त कादंबरीची पकड कायम आहे. देवनाथ हे शेवटचे प्रकरण. अँथनीची व देवनाथ ची भेट झाल्यावर हळूहळू कादंबरी संथ होऊ लागते. पुढे पुढे ती इतकी संथ होते की समुद्रात मिळण्याआधी विस्तृत डेल्टा धारण केलेल्या नदीचा मूळ प्रवाह हरवून जातो की काय असे वाटत राहते. माहितीची रिपिटिशन होते. मराठा, मरहट्ट, महार, महाराष्ट्र हा सर्व परस्परसबंध सांगत असतांना ती लांब झालेली रेषा आसाम, सिंधु संस्कृती पर्यन्त जाते. इथे आणि फक्त याच ठिकाणी संदर्भ ग्रंथ व माहितीची व्यापक उणीव जाणवत राहते. पार राजवाडे, इरावती देवी, राजाराम शाश्री पासून महाराष्ट्रातील अनेक इतिहास संशोधकांचा संदर्भ येत असतांना अखिल भारतीय स्तरावर झालेल्या उत्खनन व संशोधंनाचा  उल्लेख वा विचार केलेला दिसत नाही. आणि म्हणून याच ठिकाणी नेमाडे सरांच्या हिंदू ची आठवण येते. हिंदू ची सुरुवातच रोमिला थापर, कोशंबी, बाशम, यांच्या सारख्या प्राचीन भारताच्या इतिहासावर विपुल लिखाण केलेल्या इतिहासकारांच्या संदर्भाचा नेमका वापर करत झालेली आहे. हे माझे मत मी नेमाडे सरांना देखील बोलून दाखवल्यावर त्यांनी यास दुजोरा दिला होता व त्यावर आम्ही चर्चा देखील केली होती.
कदाचित सातपाटील यांचा कुलवृतांत हा महाराष्ट्राच्या परिघावर वसलेला असल्याने तसेच मूळ गाभा प्रादेशिक, जातीय विस्तारीकरण असल्याने अखिल भारतीय स्तरावरील झालेल्या संशोधन व संदर्भाकडे दुर्लक्ष होऊ शकते.
जगातील कुठलीही जात, धर्म वा वंश हा एकाच रक्ताचा व बहुचर्चित शब्दात सांगायचे झाल्यास शुद्ध रक्ताचा राहिलेला नाही (सबब आपल्या जाती-धर्माचा फुकाचा अभिमान बाळगण्यात काहीच मजा नाही....हे माझे addition) हे काही वर्षांपूर्वीच मानववंशशश्र्ज्ञांनी सिद्ध केलेले तत्व या कादंबरीत अगदी अंजन घालावे इतक्या प्रखर पद्धतीने सांगितले गेले आहे. आमचे लेखकमित्र राकेश वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी दिव्यमराठीच्या पुरवणीत याच कादंबरी वर समीक्षा लिहिली होती. त्यात सोंनाराकडून कान टोचले जाणे अपेक्षित होते ते यानिमित्ताने झाले अशा आशयाचे वाक्य आहे. ते तंतोतंत.
देवगिरि ते इंग्रज व्हाया निजामशाही व पेशवाई असा विस्तृत कालपट लेखक मांडत असतांना व त्यानिम्मित पार अफगाणिस्तान ते ब्रिटन पर्यन्त विस्तारलेली मूळ अभ्यासत असतांना छत्रपती शिवाजी महाराजांचा कालावधी वा त्या संदर्भातील घटना याबाबत अर्थात त्या काळाशी सबंधित एकही कुलपुरुष असू नये याचे थोडे आश्चर्य वाटते. किंबहुना नसेलही. असो.
एकूणच आडदांड, पराक्रमी पुरुषांच्या या कुलवृत्तांतचा अंतः प्रवाह हा स्त्रीयांनी घेतलेल्या स्वतंत्र व धाडसी निर्णयांचा आहे. याबाबतीत आधुनिक काळापेक्षा तेव्हा स्रियांना असणारे निवड स्वातंत्र्य चांगलेच जाणवते.
एकूणच पठारे सरांच्या आवडलेल्या कादंबर्‍यांमध्ये आता सातपाटील कुलवृतात चा क्रमांक वरचा आहे.
(रंगनाथ पठारे सर हे माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक आहेत. माझ्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी उपस्थित राहून माझ्या पाठीवर ठेवलेल्या त्यांच्या हाताची ऊब मला कायमच लिखाणाची प्रेरणा देत राहते.)
- समाधान महाजन 

No comments:

Post a Comment