पार्ट 3- डी.एड चे दिवस

काही व्यक्ती भेटतात अन ते कायमस्वरूपी लक्षात राहून जातात, नंतरच्या आयुष्यात त्यांचा कदाचित परत कधी संबंध येत नाही पण ते आपला ठसा उमटवून जातात आपल्या आयुष्यावर. डी. एड च्या दोन वर्षाच्या काळात काही जण भेटले ते असेच  लक्षात राहिले. त्यातील काही तर बॅचमेट पण नव्हते.
उदाहरणार्थ मी व प्रकाश आम्ही सुरुवातीला जी रूम केली. त्या रूमवर राहत असलेला एक डॉक्टर आमचा पार्टनर होता. त्या वेळी मेडिकलच्या डिगऱ्या फारशा कळायच्या नाहीत. हा पांढरा अप्रेन घालून बाहेर जातोय व तो स्वतः म्हणतोय म्हणून डॉक्टर. एकदा अंगात ताप  असतांना आपल्या मध्यमवर्गीय संस्काराप्रमाणे अंघोळ न करायचे ठरवले तर हे डॉक्टर महाशय म्हणे 'सर तुम्ही बिनधास्त अंघोळ करा, कुछ भी नही होता. पुरा सर पे से लेके पाँव तक पानी डाल लो ... पानी से temperature भागता है... च्यायला विश्वास बस बाकी काही नाही, घेतली न अंघोळ करून, रोज एक बादलीत आंघोळ व्हायची त्या दिवशी मुद्दाम एक एक्सट्रा  बादली डोक्यावरून ओतली अन संध्याकाळ पर्यंत सनकुन ताप आला, इतकंच नाही तर जोरदार थंडी पण वाजायला लागली. शेवटी संध्याकाळी रेग्युलर डॉक्टर कडे जाऊन ट्रीटमेंट घेतली. त्या वेळी हे महाशय चक्क गावी निघून गेले होते. तेव्हा पासून ठरवलच  आजारी पडलं तर काय करायचे, तर काहीच विशेष प्रयोग न करता व कोणत्याही शिकाऊ डॉक्टर चा सल्ला न घेता  गुपचूप  आपल्या नेहमीच्या डॉक्टर कडे जायचे. आमचा हा डॉक्टर एकदम अवलिया माणूस होता. त्याला बरेच जण ओळखायची कारण आम्ही सोबत रस्त्याने जाऊ लागलो कि बरेच मुक्काम पडायचे.  कदाचित हा दरवर्षी एक दोन विषय नापास होत असेल म्हणून शिरपूर मधील याच्या ओळखी वाढण्याच्या शकयता नाकारता येत नाही.
माझ्या आयुष्यात मात्र पहिल्यादा चाकोरी बाहेरचे जगन काय असत ते मी याच्यामूळे पाहत होतो. कारण हा पटठ्या अगदी मोकाट  जगत होता. कदाचित घरची परिस्थिती जरा बरी असावी म्हणून मन मानेल तसे जगण्यासाठी पैसे त्याला उपलब्ध  असायचे. हिंदी बोलायचा. गाणी ऐकायला त्याच्याकडे छोटा टेपरेकॉर्डर होता. त्याला डॉक्टर फार जीव लावायचा. त्याच्याकडून त्या काळात येसुदास व मुकेश ऐकायाला भेटले. मुकेश तर माहित होता पण येसुदास चा फॅन असणारा हा पहिला व्यक्ती मी पाहत होतो. 'आज से पहले आज से ज्यादा.....' 'दिल के टूकडे, टुकडे करके मुस्काराके चल दिये' , गोरी तेरा गांव बडा प्यारा ... हि गाणी म्हणणारा येसुदास या काळात मनावर कोरला गेला. कारण तो पहिल्यांदाच मी ऐकत होतो.
 डॉक्टर बेडर पणे सिगरेट ओढायचा व तितक्याच बिनधास्त पणे चालत आपल्याच मस्तीत जगायचा. आपल्याच जगात राहून आपल्या आसपास आपल्याला न कळणाऱ्या अनेक बाबी असतात त्या तो मला नेमके पणे दाखवायचा किंवा सांगायचा. मला बऱ्याचदा ते पटायचे नाही मग अशा वेळी तो माझी संभावना बुकीश म्हणून करत असे, 'सर समजेगा एक दिन आपको' अस म्हणायचा. मग नंतरच्या जीवनात बऱ्याचदा तो समजत गेला.

असाच सुनील पाटील म्हणून एक अवलिया होता, आमच्या आधीचा बॅच मध्ये. कदाचित याची ओळख विजय पोतदार मुळे झाली असावी. हा म्हणजे एकदम अष्टांगीं माणूस वाटायचा. तो सर्वच करतांना दिसायचा. कधी एखादी पुस्तक वाचतांना गढून गेलेला असायचा. कधी अत्यन्त तन्मयतेने बासरीतुन सुरेल धून काढतांना दिसायचा. तर केव्हा हातात मोठी ट्रॉफी असतांना कालची वक्तृत्व सभा कशी गाजवली हे सांगतांना दिसायचा. त्याचे मित्र म्हणायचे कि सुन्याला उपाशी ठेवा व मग स्टेजवर पाठवा अक्षरशः खाऊन टाकतो तो सभेला.  हाच माणूस कॉलेज सुटल्यावर संध्याकाळी आमच्यासारख्या पाच सहा सडफटिंग लोकांना घेऊन कराटे शिकवतांना पण दिसायचा. का करायचा हे तो सर्व? तेव्हा विचारता नाही आले किंबहुना एक्सप्रेस होण्याइतके शब्द असतील पण ते बाहेर फुटायचे नाहीत. आतल्या आत बुमरँग सारखे उलटून मलाच छळायचे. पण एक नक्की होते कि मला मनातून जे जे करावं वाटायचं ते ते सुनील करायचा त्यामुळे संपूर्ण कॉलेज मध्ये माझ्यासाठी तो एकमेव आदर्श बनला. रेनिसन्स इरा मध्ये लिओनार्दो मायकेलेन्जोलो सारखे काही परिपूर्ण व्यक्ती मानले जातात ज्यांच्यात अनेक गुणांचा संमुच्चय असे. सुनील मला त्यांच्यापैकी वाटायाचा. अर्थात त्याच्या काही अवगुणांवर टीका करणारे भले असतील हि पण मला ते कधी कानावर आले नाही किंबहुना चांगल्या नजरेचा स्पॅन मोठा असला कि, बाकी कोण काय म्हणत ते काही कळत नाही व त्यामुळे आपला फायदा होतो.

हा सुनील शिरपूरच्या बाजारात मला एकदा घेऊन गेला माळी सरांकडे. हे माळी सर आम्हाला संगीत शिकवायचे. त्यांचा एक गाळा होता बाजारात तिथे पेंटिंग चे मोठमोठे कॅनव्हास लावलेले होते, पीओपी चे अर्धकृती स्कल्पचर होते व अजून भरपूर काही कलात्मक साहित्य तिथे पडून होते. बाजारात येणाऱ्यांची  गर्दी सुरु असे. त्या गाळ्याच्या नंतर बाकीच्या ठिकाणी भाजीपाल्याची दुकाने असल्यामुळे त्यांचा वास यायचा. अजून बरेच काही काही व्यत्यय आणणारे घटक होते. पण या सर्व गोंगाटात माळी सर व सुनील दोन्ही जण बासरी वाजवायला बसले कि ते अगदी तल्लीन होऊन जात. मला हे वाद्य नवीनच होते,  ती मोठी बासरी हातात घेतल्यानंतर त्या सुरांवर बोटे कशी ठेवायची हे सुनीलने मला अगदी शब्दशः बोट पकडून शिकवले. सुरुवातीला बासरी हातात घेऊन सुरांवर बोट ठेवून फुंक मारण्यात पाहिजे तो आवाज येईपर्यंत हात दुखायला लागत. मग सोपे सोपे एक दोन गाणे सुनीलने शिकवली मग हळूहळू स्वतःला सूर सापडले कि मनस्वी आनंद होत असे.  याचवेळी त्याच्याचकडे एक दिवस माऊथ ऑर्गन पण दिसला,  जो आतापर्यंत फक्त चित्रपटात मी पाहिला होता. झालं मग आमच्या पण हातात माऊथ ऑर्गन आला, हे वाजवणं म्हणजे प्रचंड दम घ्यायचे काम. पण तरी भारी वाटायचे. कारण डोक्यात शोलेतील सीन फिट बसलेला, जया भादुरी हवेलीतील  एक एक लाईट बंद करत जातेय व आपला जय ऑर्गन वर गाणं वाजवतोय. म्हणजे मग ऑर्गन वाजवणं एक गुड स्टेट्स पण वाटायचं. तर अस त्या भारावलेल्या काळात सुनील सारखी भारावलेली लोक भेटली व जगण अधिकच हलकं होऊन गेलं.

वरती उल्लेख केलेले माळी सर कॉलेज मध्ये पण सर्वांना आवडायचे. मध्ये नंतर काय झालं कळलं नाही, पण सर कॉलेज सोडत आहेत इतकं  कळलं, वाईट वाटलं , इतका चांगला माणूस आता परत आपल्याला शिकवायला येणार नाही  हे चांगलं वाटत नव्हतं. पण याही काळात अजूनही लक्ख आठवणारी घटना म्हणजे सरांचं सेंडऑफ चे भाषण जे  अत्यन्त प्रभावी, धारदार व मुद्देसूद होते.  त्या आधी केव्हाही सर इतकं प्रभावि बोलले नव्हते. पण तो दिवस सरांनी खाऊन टाकला. कार्यक्रम झाल्यावर लगेच कि नंतर ते आता आठवत नाही पण सरांना भेटून मी सांगितलेलं कि,  ' सर तुम्ही खूपच छान बोललात.' यावर सरांनी जे उत्तर दिले ते मला इतकं भावलं कि पुढे अनेक वर्ष या माणसाच्या त्या उत्तराला मी प्रेरणा मानत राहिलो, ते फार काही महान किंवा आदर्शवत बोलले नाही उलट ते जे बोलले ते खूप साध्या शब्दात होते पण नितळ प्रामाणिक व सत्य होते.  सर म्हटले होते, ' मला स्टेजवर चांगलं बोलता येत नाही हि भावना मनाला इतकी खात होती कि त्यामुळे त्याचा परिणाम इतर कामांवर व्हायचा म्हणून मी ठरवलच कि आपल्याला बोलता आलंच पाहिजे, चांगली दोन तीन दिवस तयारी केली व बोललो बस.'
कदाचित मी सेम प्रॉब्लेम मधून जात असेल म्हणून असेल कदाचित पण आपल्याला एखादी बाब येत नाही व त्याचा मनावर परिणाम होऊन इतरही बाबी त्यामुळे हॅमर होतात  हे कबूल करणारा माणूस मला भेटला होता व इतकंच नाही त्यावर मात करून त्याने  यशही मिळवलं होतं, खरच छोट वाटू शकत पण ते खूप मोठं यश होते. माझ्या साठी. अशा लहान गोष्टी मला खूप काही आयुष्यात देऊन गेल्या. त्यात माळी सरांची ती पंचलाईन.

असाच अजून एक मित्र आपला ज्युनियर होता. तेव्हा त्याचा  स्वतः शीच एक संघर्ष चालला होता अन तो संघर्ष म्हणजे इंग्रजी शिकण्याचा. मी पाहिलं होत त्याच वेड इंग्रजी शिकण्याचे व बोलण्याचं, खूप प्रयत्न त्याचे सुरु होते, मी कसा त्याच्या जवळ गेलो कळलं नाही पण तो मला पण सांगायचा सर आपण अस करू तस करू, तो स्वतः सोबत मोठ्याने इंग्रजीत बोलायचा  जिथे जिथे त्याला शक्य आहे तिथे तो इंग्रजीत भाषण द्यायचा, लिहायचा, बऱ्याच छोट्या मोठ्या वह्या , डिक्शनरी अशी सामग्री त्याच्या सोबत असायची.

आमचा एक घरमालक होता, निमझिरी नाक्याकडे वरच्या मजल्यावर आमची रूम होती. ईश्वर, प्रकाश, अरुण, विजू व मी असे आम्ही पार्टनर होतो. त्या घरमालकाच नाव येनुरकर कि अस काहीतरी होतं, कुठल्यासशा कॉलेज मधून निवृत्त होऊन त्यांना बरेच वर्ष झाले होते,  म्हातारा चांगलाच कडक होता. घरातील सर्व जण त्याला वचकून असायची तेव्हा आमची काय गत. असंच एकदा रूम आवरताना कि कुठल्यातरी निमित्ताने त्यांची एक जुनी वही माझ्या हाती आली. त्या वहीत काय होतं तर त्या काकांच्या काळातील चित्रपटातील गाणी त्यांनी लिहून ठेवलेली होती , पूर्वीच्या शाईच्या पेनाने. अगदी चित्रपटाचं नाव, कोण अभिनेता/नेत्री, गायक संगीतकार सर्वच. मला तर तो खजिनाच हाती लागला होता त्यातील काही गाणे ऐकलेली पण म्हणतांना कुठं आठवतात त्यामुळे या वहीतून  ती म्हणतांना जाम आनंद वाटायचा. मी विचार करायचो इतक्या कडक स्वभावाच्या काकांना इतका सेन्सिटिव्ह टच कस काय बुवा, यांच्या कॉलेजच्या दिवसात यांना आवडलेल्या मुली साठी तिच्या आठवणी जपण्यासाठी कदाचित हि गाणी अशी लिहून ठेवली असतील का? ते काहीही असो पण पुढे शिरपूर सुटल्यावरही अनेक वर्ष ती वही माझ्याजवळ होती. पुढे सततच्या बदल्यात ती कुठंतरी गहाळ झाली. पण नंतर आता जेव्हा धो धो वाहणाऱ्या इंटरनेटच्या जमान्यात गुगलून अनेक जुनी गाणी व्हिडिओ सह पाहण्याची सोय असतांना येनुरकर काकांची ती वही अगदीच आऊट डेटेड झालेली वाटत असली तरी त्या जीर्ण पडलेल्या पिवळ्या पानांतून काकांचे मंतरलेले दिवस मात्र आपण हिरावू घेऊ शकत नाही.

गाण्यांचा विषय निघालाच म्हणून ईश्वर भावसार ला विसरण शक्य नाही. माझ्या आयुष्यात अल्ताफ राजा, सोनू निगम चा दर्द भरा आवाज, गम ए जुदाई, जख्मी दिल हे नावे कोण घेऊन आलं असेल तर ईश्वर. त्याचा तो टेपरेकॉर्डर त्या कॅसेट्स व ती गाणी अख्खा आयकॉन कोरून ठेवलाय डोक्यात. सकाळी सकाळी कॉलेज ला जात असतांना कोणी भक्ती गीते, भाव गीते ऐकून जात असतील किंबहुना काही रोमँटिक गाणी ऐकून जात असतील, पण आम्ही ..... छे अगदीच सांगायच म्हटलं तर
' छत पर न सुला देना हम नींद में चलते है' , ' तुम आज तो पत्थर बरसा दो, कल रोवॊगी इस पागल के लिये' , 'पहिले तो कभी कभी गम था अब तो हर पल ये जुदाई का'  व अगदीच कहर म्हणजे ' अच्छा सीला दिया तुने मेरे प्यार का'  हि गाणी ऐकत तयारी करायचो व मग कॉलेजला जायचो. एक अलिखित नियम म्हणतो कि सकाळी सकाळी तुमच्या ओठी जे गाणे असते ते तुम्ही दिवसभर गुणगुणत असतात. आता विचार करा आम्ही काय गुणगुणत असू. म्हणजे काहीच बादरायण संबंध नसतांना देखील प्रकाश सारखा गुणी मुलगा 'जा बेवफा जा .... ' अस म्हणायला लागला तेव्हा, हसावं कि रडावं ते कळायचं नाही.
बर ईश्वर फक्त ते गाणे ऐकायचा नाही त्याची ती तोंडपाठच असायची. चिखलदऱ्याला सहल गेली तेव्हा धर्माधिकारी सरांनी त्याला ' तुम तो ठहरे परदेशी' म्हणायला लावलं होत गाडीत तेव्हा एकही ओळ इकडे तिकडे न होऊ देता ईश्वराने ते गाणं पूर्ण म्हणतानाचा क्षण आजही डोळ्यापुढे जिवन्त आहे.
आताही एक अख्खी हार्ड डिस्क भरेल इतकं कलेक्शन माझ्याकडे गाण्यांचे असतांना केव्हा केव्हा बदल म्हणून मी अल्ताफ राजाची गाणी लावली कि ईश्वरची मूर्ती डोळ्यापुढे येते.


अशा अनेक लहान मोठ्या व्यक्ती आपल्याला खूप काही देऊन जातात. गरज असते आपल्यातील सकारात्मक नजरेची.  मी जरी काहीच नावांचा उल्लेख केला असला तरी खर सांगायच म्हणजे शिरपूरच्या त्या दोन वर्षाच्या डि एड च्या कालावधीत भेटलेल्या सर्वच  मित्र परिवारामुळे आयुष्य समृद्ध झाले. प्रत्येक मित्र एक पुस्तकासारखा आहे.

- समाधान महाजन 

4 comments: