ताश्कंद फाइल

आज ताश्कंद फाइल पाहिला. जस चित्रपटाचे नाव ऐकलं व त्याविषयी वाचण्यात यायला लागलं तस हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. अनेक मित्रांनी पण सुचवलं कि, किमान इतिहासाशी संबंधित असल्याने तू तर पाहिलाच पाहिजे. असंही वाचण्यात येऊ लागले कि कलंक ची नाराज गर्दी माऊथ पब्लिसिटी ने ताश्कंद कडे वळलीय म्हणून.  Being history student नक्की काय व कस दाखवलं असेल हि उत्सुकता होतीच. त्यातच सध्या स्वातंत्र्योत्तर भारतावरील इंडिया आफ्टर गांधी हे रामचंद्र गुहाचे पुस्तक पण नुकतेच वाचून पूर्ण झाले होते. अजून दोन तीन पुस्तक याच कालावधीच्या इतिहासावर असलेली  घरात नव्याने दाखल झाली होती. त्यामुळे या चित्रपटातून काही नव्याने माहिती मिळतेय का हेही समजणार होते. Afterall चित्रपट हे दिग्दर्शकाचे एकप्रकारे संशोधनच असते असे अनुराग कश्यप सारखे दिगदर्शक दाखवून देतातच.
तर रात्रीचा शो असूनही बरीच गर्दी होती थिएटरला. सुरुवातीला मूळ विषयाकडे नेण्याचा प्रवास चांगलाच होता.  पंतप्रधान शास्त्री यांचा ताश्कंद मध्ये झालेला मृत्यू हा घातपात होता कि नैसर्गिक याचा तपास करण्यासाठी म्हणून जी समिती नेमली जाते  त्यातील विविध स्वभाव व क्षेत्रे असलेल्या व्यक्ती व त्यांचे आपापसातील अंडरकरन्टस पण छान आहेत.
पण या समितीत हळूहळू जी चर्चा पुढे सरकायला लागते ती पुढे इतकी सरकते कि शास्त्रीचा मृत्यू 1966 मध्ये झाल्यावरही 1975 च्या आणीबाणी पर्यंतचा कालावधी यात ओढला जातो. बर यात फार काही वेगळं अस दाखवलं नाही, बर ते जाऊद्या पण यात वेगळ्या पद्धतीने पण दाखवलं नाही. आपण लहानपणापासून ज्या गोष्टी ऐकल्या वाचल्या आहेत त्या गुगल करून पुरावे म्हणून दाखवल्या सारखे वाटतात. त्यातल्या त्यात नायिका पार ताश्कंद ला जाते  तेव्हा होप्स वाढतात कि हि बया नक्कीच काहीतरी वेगळं शोधून आणेल किमान उजबेकिस्तान मधील त्या काळातील जबाबदार व त्या कराराच्या काळातील कार्यरत राजकीय प्रशासकीय लोकांना भेटून काही माहिती घेईल असे वाटते. पण ती भेटते तेव्हा कार्यरत व  आता भूमिगत झालेल्या एक गुप्तहेरला. ती भेट पण इतकी बालिश दाखवली आहे कि, त्या पेक्षा शक्तिमान मधील स्टोरी तरी चांगली वाटेल.
बर शास्त्रीनच्या मृत्यू च्या वेळेसची स्थिती. न केलेले पोस्टमार्टम, मृत्यूनंतर शरीराचा बदललेला रंग, अंगावरील रक्त, झालेल्या जखमा, राहण्याचे ठिकाण, प्रोटोकॉल पाळून डेड बॉडी आणण्याची प्रक्रिया हे सर्व मुद्दे ज्यांचा चित्रपटात पण उल्लेख येतो यावर इतका धारधार व अभ्यास पूर्ण चित्रपट बनवता आला असता कि बस पण इथे तर ते सोडून 1970 नंतरच्या राजकीय कालावधीवरच भाष्य करण्यात धन्यता मानली जात आहे. इंदिरा गांधी हे नाव न घेता पण ते समजेल अशा पद्धतीने सर्वात जुना पक्ष, त्यांचे नेते, आणीबाणीत जेल मध्ये सर्व विरोधी पक्षनेत्यांना टाकून मग घटनेत केलेले बदल, सर्व सत्ता ताब्यात घेण्याचा प्रयत्न असे अनेक उल्लेख येतात. चित्रपटाच्या शेवटी अनेक तथ्ये प्रेक्षकांना वाचण्यासाठी दिली जातात ज्यात पार केजीबी ते अनेक घटना आहेत व शेवटी लहान ओळीत असे लिहिलं आहे कि, हे सर्व ज्या पुराव्यांवर आधारित आहे ते अजून prove झालेले नाही. बर घटनेच्या प्रस्तवानेत secularisam व socialisam हे दोन शब्द घटना दुरुस्ती करून टाकण्यात आले याचा काय संबंध शास्त्रीनच्या मृत्यशी ते कळत नाही. त्यावर हाईट म्हणजे secularisam वर टीका करणारे वाक्य येताच थिएटर मधील लोकांनी टाळ्या वाजवल्या.

बर सर्व समजून थेट असा अर्थ काढला कि हे  सर्व पंतप्रधान बनण्याच्या प्रक्रियेतील टप्पे होते तर हे न पटण्यासारख आहे. कारण सरळ आहे नेहरू असतांनाच इंदिरा गांधी या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष बनल्या होत्या. त्या काळातील काँग्रेसचा अध्यक्ष हा अत्यंत प्रभावी असायचा. किंबहुना सुरुवातीच्या काळात काँग्रेसचे अध्यक्ष असलेले टंडन यांच्या सोबत असलेल्या मतभेदांमुळे चक्क नेहरू राजीनामा द्यायला निघाले होते. तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष असलेल्या इंदिरांनी स्वतः ठरवलं असत पंतप्रधान  व्हायचं तर त्या झाल्याहि असत्या. उलट पंतप्रधान होण्याचा प्रबळ दावा मोरारजी देसाई यांचा होता व त्यांची तशी इच्छा होती त्यामुळे कामराज, स का पाटील या सिंडिकेट गटाने मोररजींच्या हेकेखोर स्वभावामुळे  त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ दिली नाही व अखेर पंडित नेहरूंच्या शेवटच्या काळात पंतप्रधान कार्यालयाचे काम पाहणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांच्या गळ्यात हि माळ पडली.

तेव्हा अनेक बाबींवर अभ्यास पूर्ण  प्रकाश टाकण्याची संधी दिग्दर्शकाने गमावली असेच वाटते. हे सत्यच मांडलं कि  2 ऑक्टोबर म्हटलं कि पटकन गांधी आठवतात  तितक्या पटकन शास्त्री आठवत नाही. आणि हरित क्रांती, धवल क्रांती   चे क्रेडिट शास्त्रीचे आहे हेही आम्ही विसरतो. म्हणायला मिथुनदा चे पात्र छानच आहे , नसिरुद्दीन शाह व इतर सर्व जण मस्तच.
शास्त्री बनवायला पण आपल्याला एखाद्या अँटेनबरो येण्याची वाट पहावी लागेल कदाचित.
- समाधान महाजन

4 comments: