शिवरायांच्या आयुष्यातील हा सर्वात धावपळीचा काळ होता. अनेक लढाया या काळात झाल्या. अनेक प्रसंग या काळात झाले. अगदी रणखैंदळ माजली होती. याच काळात २५ नोव्हेंबर १६६४ ला सिंधुदुर्ग किल्ल्याची उभारणीस सुद्धा सुरुवात झाली होती. फक्त पाच वर्षाच्या काळात स्वराज्याची एका नव्या अर्थाने बांधणी होत होती. इतक्या कमी कालावधीत इतक्या घटना महाराजांच्या आयुष्यात व एकूणच महाराष्ट्राच्या इतिहासात घडून गेल्या कि अनेक पाने त्यावर खर्ची पडावीत. पण अवघ्या ४४२ पानांमध्ये विश्वास पाटील यांनी समर्पक शब्दात हा भव्यदिव्य पट आपल्यापुढे त्यांच्या नेहमीच्या चित्रमय व ओघवत्या शैलीत मांडला आहे. वेढ्यात अडकलेले शिवाजी महाराज, त्यांची मनोभूमिका, उंबरखिंड, पन्हाळा ते विशाळगड हा प्रवास, हे सारे इतक्या ताकदीने लेखकाने मांडले आहे कि आपण त्या काळात आहोत व आपल्यापुढे हे प्रसंग घडत आहेत इतक एकरूप माणूस वाचतांना होऊन जातो.
![]() |
| विश्वास पाटील यांच्यासोबत.. |
सातत्याने आपल्या पुढे शिवाजी महाराज येतात त्यांच्या विविध पराक्रमी प्रसंगातून. पोवाडे, जयंती निम्मित होणारे व्याख्याने यातून प्रभावीपणे महाराजांचे पराक्रम सांगितले जातात. एक मोठी प्रतिमा नकळत निर्माण होते. आणि अर्थात त्यात काही वावगे आहे असे नाही. पण विश्वास पाटील यांनी महासम्राट मधून शिवाजी महाराजांचे जे चरित्र मांडले आहे ते अधिक वास्तवाशी भिडणारे, जिवंत वाटते. आपल्या सारख्या हाडामांसाचा माणूस या सह्याद्रीच्या रानावनात राहून जे काही बेफाम जगलाय ते अधिकच प्रेरणा देणारे आहे.
एखादा चित्रपट पाहतांना किंवा व्याख्यान ऐकतांना अगदी रोमांच उभे राहतात. पण त्याच वेळी हे सर्व दैवी आहे कि काय असे वाटत राहते. या उलट महासम्राट वाचतांना महाराज हे माणूस वाटतात. यश, अपयश, जय पराजय, मान अपमान, राग, आनंद, चेष्टा, मस्करी, कडकपणा, हळवेपणा हे सामान्य माणसाला वाटणाऱ्या भावना त्यांना पण आहेत व ते सर्व असून त्याच्यासहित ते जे काही आयुष्य जगतात. जे काही निर्णय घेतात ते जास्त भावते. हि लेखकाची ताकद आहे.
माझ्यासारख्या सामान्य वाचकाला या पुस्तकातून अनेक बाबी नव्याने समजल्या.
अफजलखानच्या वधानंतर चौथ्याच दिवशी नेताजी पालकर यांनी विजापूर गाठून वेढा दिला होता. शिवाजी महाराजांच्या सैन्याची चपळाई इतकी होती कि तोपर्यंत अफजलखान सोबत असलेले पराभूत सैन्य देखील त्यांच्या विजापूर या राजधानीत तोपर्यंत पोहचले नव्हते. तिथे नेताजी आपल्या सैन्यासहित जाऊन पोहचले होते.
मिरजेच्या किल्ल्याची लढाई. ज्यात स्वतः महाराज सहभागी होते. वानरवळ काय आहे हा प्रकार देखील कळतो. गुणवंता मावशीने केलेली मदत व ते मावशीचे पात्र देखील पहिल्यांदाच समजले. चाकणच्या किल्ल्यातून फिरंगोजी नरसाळा याने दिलेली कडवी झुंज समजली. कुंवारखाम्बीची खिंडीच्या नावामागची दंतकथा समजते. रायबाघन कोण होती व ती तिकडे कशी गेली हेही समजले.
औरंगजेब व शायीस्तेखान हे मामा भाचे किंवा शहाजी राजे व बडी बेगम किंवा आली आदिलशाह व त्याचा दरबार किंवा तानाजी, येसाजी, बाजी, नेताजी व महाराज यांच्यातील संवाद कसे असतील किंवा प्रत्यक्ष झालेला पत्रव्यवहार कसा होता या सर्वांची सांगड घालत उभे केलेले प्रसंग नाट्यमय न वाटता वास्तव वाटतात.
मराठेशाहीतील भाऊबंदकीबाबत बडी साहिबा जे शाहजी राजांना सांगते ते सत्य ऐकून काही क्षण शहाजी राजे देखील आवाक होतात.
मुधोळच्या बाजी घोरपडे याचे निर्मुलन महाराजांनी स्वतः कसे केले याचे वर्णन चित्तथरारक आहे. त्याहून अधिक महत्वाचे वाटते महाराजांनी फिरंगी/टोपीवाले यांचा ओळखलेला कावा. त्यांना दिलेली मात व त्या काळात जे भल्या भल्या राजांना जमले नाही तो विचार महाराजांनी प्रत्यक्ष कृतीत आणला तो म्हणजे सागरी संरक्षण. काळाची पावले व महत्व ओळखावे ते असे. या संपूर्ण सागरी सिद्धतेची तयारी व सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी हे सर्व प्रसंग कदाचित इतक्या सविस्तरपणे पहिल्यांदाच विश्वास पाटील यांनी मराठी साहित्यात आणले असावेत असं माझा अंदाज आहे.
पन्हाळा ते विशालगड या प्रसिद्ध मार्गासहित शिवाजी महाराजांसंदर्भात असलेल्या अनेक ठिकाणी गड, किल्ले, खिंडी, डोंगरी वाटा, यावर लेखकाने स्वतः चालून प्रवास केलेला आहे. त्यामुळे लिखाणात विविध भौगोलिक बारकावे जाणवतात. सह्याद्रीतील पावसाची विविध रूपे. तेथील स्थानिक आदिवासी व इतर समाज यांचा स्थानिक संदर्भ लिखाणात जाणवतो.
या पुस्तकातील काही वाक्य सरळ मनाला भिडणारी आहेत. जसे-
1. मनुष्याने गुदरलेला प्रसंग बघून आपला डामडौल, राजचिन्ह, सार विसरावं. आल्या प्रसंगाशी हुशारीने दोन हात करावेत. आधी ध्येय, मग देह आणि नंतर दौलत अशा मनुष्यजन्माच्या पायऱ्या खूप महत्वाच्या आहेत.’
2. मनुष्याने मस्तकात सतत हा मुसलमान, तो ख्रिश्चन, तो पलीकडचा कोण्या फलाण्या जातीचा, अशा जातीधर्मांच्या उतरंडी मानून भेदाभेद कशासाठी करत राहावे? जीवनाचा खरा अर्थ मनुष्याने बागेत कष्टनाऱ्या एखाद्या साध्या माळ्याकडूनही शिकावा- मातीत खुरप चालवणारा तो बागवान बगीच्यात फुलणारे गुलाब, केवडा, प्राजक्त यांच्यात तरी कधी करतो का हो भेदाभेद? तिथे फक्त सुगंध महत्वाचा. आमच मन कोणाच्या जातीपातीकडे नाही, त्याच्या कर्तबगारीच्या सुगंधाकडेच भ्रमरासारखे धाव घेते.’
3. एका मराठ्याला जन्मातून उठवायचे पवित्र काम फक्त दुसरा मराठाच चोखपणे पार पाडू शकतो.. ...आम्हा मराठ्यांच्या रक्तातला परस्पर द्वेष हाच आमचा खरा सद्गुण आसतो. साक्षात प्रभू रामचंद्र आयोध्येऐवजी आम्हा मराठ्यांच्या मुलखात जन्माला आले असते, तर त्या लंकापती रावणाने रामाच्या बरबादीची सुपारी मोठ्या भरवशाने लक्ष्मणाच्या कनवटीला बांधली असती.’
‘सुरतेच्या मुलखातला अंधार एखाद्या जीर्ण झिरझिरीत कापडासारखा फाटत गेला’ असे लयदार वाक्य मध्येच आपलं लक्ष वेधून घेते.
काही वस्तुनिष्ठ निरीक्षणे जे लेखकाने लिहितांना मजकुरात ओघवते मांडले आहेत ती अशी –
1. पन्हाळा किल्ला हा शिलाहार भोज राजाच्या काळात चारशे वर्षांपूर्वी बांधला होता. नंतर तो यादवांच्या ताब्यात गेला. नंतर बहामनी नंतर विजापूरचा आदिलशाह कडे असं किल्ला राजांनी जिंकला होता.
2. सिद्धी जोहरचा जावाई सिद्दी मसूद होता. वारणेच्या काठी माले गावी त्याने आपला तळ काही काळ ठोकला होता. नमाजासाठी त्या गावात एक मस्जिद उभारण्यात आली होती. त्या गावाचे नाव मशिदीचे माले म्हणत ‘मसूदमाले’ असे पडले होते.
अशा अनेक वास्तव बाबी कादंबरीत ओघाने येतात. त्या सर्व कळण्यासाठी महासम्राट वाचणे महत्वाचे. शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीवर व आयुष्यावर महासम्राट मधून येत असलेला इतिहास हा अलीकडच्या काळातील एक महत्वाचा दस्ताऐवज आहे आणि म्हणून महासम्राटच्या पुढील भागांची देखील उत्सुकता आहे.
चुकीची मांडणी, चुकीचा इतिहास पसरवला जाण्याच्या काळात कागदपत्रे, प्रत्यक्ष भेटी, पुरावे, वास्तूंचा अभ्यास, लोककथा व परंपराचा अभ्यास या साऱ्यातून आकाराला आलेली महासम्राट ही कादंबरीमाला अत्यंत महत्वाची आहे. तसेच प्रत्येकाने वाचावी व संग्रही ठेवावी अशी आहे.
- समाधान महाजन
.jpeg)

छान परिक्षण.. इतिहासलेखनात लोकपरंपरेतून आलेले बरेचसे मुद्दे तकलादू असतात. विश्वास पाटील हे सिद्धहस्त लेखक आहेत. त्यांच्या लेखनात भाषासौंदर्य आहे, अभ्यास आहे. तथापि बरेचदा त्यांच्या लेखनात अतिशयोक्ती सुद्धा आढळून येते. त्यामुळेच कादंबरी आणि इतिहास यात भेद ठेवावाच लागतो..कादंबरी म्हणून त्यांना वाचणे हीच रंजकता आहे..इतिहास म्हणून नाही.
ReplyDelete