गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऑरवेलच्या दोन्ही कादंबर्यांचा उल्लेख कुठे न कुठे यायचा. त्यातील ॲनिमल फार्म नुकतीच वाचली. 'टाइम' मॅगझिनने निवडलेल्या इंग्रजी भाषेतील १०० सर्वोत्तम कादंबऱ्यांमधील एक आणि विसाव्या शतकातील राजकीय उपहास असलेली सर्वाधिक प्रसिद्ध कादंबरी म्हणजे ॲनिमल फार्म. ही कादंबरी म्हणजे तत्कालीन सोवियत रशियातील परिस्थितीवर केलेलं उपहासात्मक रूपक आहे. जॉर्ज ऑरवेलचे ॲनिमल फार्म व १९८४ हे दोन्ही पुस्तके जगप्रसिद्ध आहेत. त्याच्या ४६ वर्षाच्या आयुष्यात(१९०३-१९५०) या दोन कादंबर्यांमुळे त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.
मुळातच ऑरवेलचे भारताशी असलेले सबंध या कादंबरीच्या निमित्ताने मला समजले. त्याचा जन्मच मुळात भारतात झाला. १९०३ साली बिहारमधील मोतीहारी येथे त्याचा जन्म झाला. त्याचे खरे नाव एरिक ऑर्थर ब्लेअर असे होते. त्याचे वडील ICS अधिकारी होते. त्याचे शिक्षण झाल्यानंतर १९२२ मध्ये परंपरेप्रमाणे बर्मा येथे पोलीस दलात डिस्ट्रिक्ट सुपरिंटेंडेंट म्हणून त्याने नोकरीस सुरुवात केली.
१९२७ मध्ये सुटीसाठी इंग्लंडला आल्यावर बर्माला परत न जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुमारे दीड वर्ष त्याने पॅरिसमध्ये भ्रमंती आणि लेखन करण्यात घालविले. नंतर ईस्ट ॲजिलीया मधील ऑर्वेल या नदीवरून आडनाव घेऊन जॉर्ज ऑर्वेल ह्या टोपणनावाने तो लिहू लागला.
ॲनिमल फार्म त्याने १९४५ साली लिहिली. तर १९४८ ला त्याने १९८४ हि कादंबरी लिहिली. त्याने लिहिलेल्या कादंबर्यातील भयकारी विश्व हे 'ऑरवेलचे विश्व' म्हणून ओळखले जाऊ लागले. २०१५ साली मोतीहारी या ऑरवेलच्या जन्मस्थानी एक स्मारक बांधण्यात आले. २०१७ साली बीबीसी लंडनच्या कार्यालयासमोर त्याचा पुतळा उभारण्यात आला.
या कादंबरीत प्राण्यांचे रूपक वापरले आहे. एकदा एका फार्म मध्ये(manor farm) राहणारे सर्व प्राणी एकत्र येऊन तेथील जुलमी मालकाविरुद्ध बंड करतात. त्याला तेथून पळवून लावतात. त्यानंतर नेपोलियन व स्नोबॉल या प्रभावी डुकरांच्या हाती तेथील सत्ता येते. ते तेथे समता व शोषणविरहीत समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. फार्मचे आधीचे नाव बदलून ॲनिमल फार्म असे नाव दिले जाते. सर्व प्राणी मिळून काम करतात. भरपूर काम करतात भरपूर धान्य पिकवतात. ते स्वतःसाठी सात सूचना तयार करतात ज्या त्यांना पाळायच्या असतात. सर्व दोन पाय असलेले अर्थात मनुष्यप्राणी हे आपले दुश्मन असल्याचे त्यांना पटवून दिले जाते.
सर्व मस्त चाललेले असतांना हळूहळू असे होते कि नेपोलियन व स्नोबॉल यांच्यात मतभेद सुरु होतात आणि एक दिवशी नेपोलियन आपल्या शिकारी कुत्र्यांमार्फत स्नोबॉलवर हल्ला करून त्याला तेथून पळवून लावतो. बसलेल्या प्राण्यांना एक दहशत तयार होते. त्यांना पटवून दिले जाते कि स्नोबॉल हा गद्दार होता आणि तो आपल्या मळ्याच्या आधीच्या मालकाच्या संपर्कात होता. इथल्या बातम्या तो तिकडे सांगत होता. त्याने जे जे केले ते सर्व फिरवून तो कसा चुकीचा होता हे सांगितले जाते. सर्व प्राणी व त्यांची बुद्धी तल्लख नसते. त्यांना काहीसे आठवते कि स्नो बॉल कसा वागला होता पण त्याचे अत्यंत वेगळे अर्थ त्यांना सांगितले जातात.
आता नेपोलियन तिथला सर्वाधिकारी होतो. डुकरांना झुकते माफ मिळते कारण ते सत्ताधारी असतात. ज्या प्रथा परंपरा बंद केलेल्या असतात त्या पुन्हा काहीना काही बहाने करून पुन्हा सुरु केल्या जातात. त्याचा लाभ हे सत्तेतल्या लोकांना अर्थात डुकरांना मिळतो. या वेळी. “सर्व जन समान आहेत पण काही जन इतरांपेक्षा अधिक समान आहेत”, असे जॉर्ज ऑरवेलने वापरलेले वाक्य नंतर जगप्रसिद्ध झाले.
यातील स्नोबॉल म्हणजे ट्रोट्स्की व नेपोलियन म्हणजे स्टालिन असे म्हटले जाते. त्यातील घोड्याचे एक पात्र आहे, बॉक्सर नावाचे तो अत्यंत कष्ट करतो व नेपोलियन वर त्याचा विश्वास असतो. त्याच्या वागणुकीने आपण पण प्रभावी होतो. पण नंतर जे घडते त्यामुळे त्याचा विश्वास डळमळीत होत असतांना नेपोलियन कडूनच त्याला मारले जाते.
नेपोलियनचा सेक्रेटरी स्क़्विलर लोकांना कायम नेपोलियनचि चांगलीच बाजू सांगत जातो. अडाणी अज्ञानी प्राणी खाली मान घालून काम करत असतात त्यांना सत्ता कोणाचीही आली तरी त्यांचा त्रास कमी होत नाही.
कोणत्याही काळात relevant असलेली अशी हि कादंबरी आहे. तेव्हा ती जरी साम्यवादी रशियावर रुपकात्मक असली तरी नंतरच्या कोणत्याही काळात कोणत्याही देशाला ती लागू होईल इतकी वैश्विक ती आहे. आणि म्हणूनच आजही बेस्ट सेलर आहे.
- समाधान महाजन
४ मे २०२३