९० च्या दशकात अशी एक पिढी होती जी नोकरीधंदा, रोजगार, पोटपाण्यासाठी शहरात जायची. त्यात choice पेक्षा option नसण्याचे प्रमाण जास्त होते. त्यांना दिवाळीत गावी घरी जाण्याची वेळ आली कि पोटात गोळा यायचा. सायकॉलॉजीत असले नसलेले सर्वच कॉम्प्लेक्स त्याच्या डोक्यात थयथय नाचायचे. गावात गेले कि घरातील, शेजारील, नात्यातील, गल्लीतील त्या नजरा, ते प्रश्न, अपेक्षा याच्या मानसिकतेपल्याडच्या असायच्या.
शहरात गेले कि एलीयट गटात गेले. सधन झाल्याचे लोक समजत. हा इकडे कामगार वस्तीत, एका खोलीत, चहाचेही पैसे वाचवून महिना काढत असतांना हा शहरातून गावातल्यासाठी दिवाळीत काही तरी घेऊन येईल. त्याही पुढे जाऊन इथे पडीक असलेल्यासाठी काही काम बघ किवा याला इथून घेऊन जा अशाही अपेक्षा झेलाव्या लागत. लग्न झालेल्यांचे वेगळेच प्रश्न. Stand वर उतरल्यापासून गल्लीभर स्कॅनर बसवलेले असत. त्याची बायको कशी, मुले कशी कोणती कपडे घालतात काय बोलतात कसे वागतात... यासाठी पुढे काही दिवस उपहास, उपेक्षा, अपमान अस काही बाही सहन करत.. दिवाळी साजरी पेक्षा सहन केली जाई. पटणार नाही पण ही एक प्रकारची गावातील क्रूरता होती फक्त कनेक्ट राहणे वाळीत न टाकणे यासाठी तो हे सारे करायचा.
यातून जे जगले वाचले ते adjust झाले बाकी मात्र तुटून वेगळे झाले ते परत येईनाशे झाले. त्यांच्या गावातील व शहरातील पुढच्या नव्या पिढीला या अंतरजाणीव व वेदना कदाचित माहितीही होणार नाहीत. आता बऱ्यापैकी गावांनी शहरी रूप धारण केलेत. इंग्लिश मिडीयमच्या शाळा खेड्यात पसरल्या. त्यामुळे किमान मराठीत बोलणाऱ्याला हसणे बंद झाले. चांगले कपडे घालणे, चांगले राहणे, घरात फर्निचर असणे अशा बारीक सारीक बाबी गावानेही स्वीकारल्या. काही ठिकाणी आता ते दिवाळीचे चार पाच दिवस विलेज टूर ला गेल्यासारखे जाऊन ‘its my farm...river..village अशा सेल्फ्या टाकण्याची सोय झाली. त्याकडे गावातील आजी बाबा कौतुकाने बघतात....यात मुल किंवा नातवंडाच्या हट्टाने गावात अनेक वर्षांनी परतलेला त्या पिढीचा तो बाप किंवा बाबा अजूनही ते व्रण काही केल्या विसरत नाही.... त्याचे काही मित्र शहरातच राहून तेथील झगमगत्या वातावरणात त्या दिवाळीतील पणत्यांखाली पसरलेला इवलासा अंधार अजूनही जपून असतात...
अर्थात यातील प्रत्येक बाबीला अपवाद आहेत जे मान्य आहेत.
लिहिले ते सहजच ....
- समाधान महाजन
#Happy Diwali
No comments:
Post a Comment