फोर मोर शॉट्स...

फोर मोर शॉटस या सिरीजचा तिसरा सिझन आता आलाय. हे..हे..हे... आता काय त्यावर लिहिणार? अरे ती सिरीज लिहिण्यासारखी तरी आहे का? काहीही आपल. असे प्रश्न पडू शकतात. बट वाटल लिहावं त्याला काय करणार?  

खरे तर पहिले दोन सिझन कधी आले तेहि मला माहिती नव्हते. अर्थात अशी सिरीज आहे असे मी वाचले होते. काही इमेजेस पाहिल्या होत्या. एकदा थोडा वेळ बघितले पण होते पण काही वेळातच मी बोअर झालो होतो.

सारखी सारखी बार व सेक्सची दृश्य व एकदम बोल्ड भाषा त्यातच चारही प्रमुख पात्र स्रिया. यात फार काही वेगळे बघण्यासारखे असेल असे वाटले नव्हते. त्यामुळे सिरीज माझ्याकडे होती पण मी ती पाहत नव्हतो. एक दिवस असाच उगवला. रात्री झोप येत नव्हती. नवीन काही चांगले उरले नव्हते बघण्यासारखे. अलीकडील चित्रपट पाहण्यातही तितका इंटरेस्ट येत नाही. मग नाईलाज म्हणून हि सिरीज सुरु केली. तेव्हा दुसरा सिझन देखील आलेला होता पण पहिल्यापासून पाहू म्हणून पहिल्या सिझनच्या पहिल्या भागापासून सुरु केले. आणि त्या रात्री तो पूर्ण सिझन पाहूनच मी झोपलो. अर्थात नंतरच्या दिवशी त्याचा त्रास झाला. पण जे काही वेगळे विश्व माझ्या डोक्यात या सिरीजने घातले होते. ते पूर्ण नवीन नव्हते पण अनेक विखुरलेले तुकडे एकत्र करून सलग, प्रवाही मांडून व त्यात मला माहित नसलेल्या अनेक बाबी दाखवून या सिरीजने माझ्या मनाची
पकड मात्र नक्की घेतली होती. 

Kriti Kulhari

यात काय आहे. पेक्षा यात काही नाही. जिथे आपल्या टिपिकल मध्यमवर्गीय कल्पना संपतात तिथे खर तर हि सिरीज सुरु होते. कसे असायला पाहिजे. कसे निर्णय घ्यायला पाहिजे, एकट्या स्रीने / मुलीने कसे वागायला पाहिजे किंवा संसारातील प्रश्न कसे असतात. हि यादी खूप मोठी करता येईल. त्यातल्या त्यात अजून स्क्रिप्टच्या जवळ जाऊन सांगयचे म्हटले तर प्रत्येक स्री/मुलीला केव्हा ना केव्हा जगण्याचे पारंपारिक नियम झुगारून देऊन जरा मनासारखे वागायचा विचार तिला येत असेल ना ते या चार जणी अगदी बिनधास्त जगल्या आहेत. कुठलीही भीडभाड न ठेवता. कोणतेही फुकाचे नैतिक बंधन स्वतःवर न लादता व त्या नजरेने दुसऱ्याकडेदेखील न

Sayani Gupta
बघता. निष्ठा, एकपत्नी व एकपती व्रत, लोक काय म्हणतील, कोणाला काय वाटेल? कोण काय म्हणेल असे प्रश्न यांना पडत नाहीत व सिरीज बघतांना आपण पण ते पाडून घ्यायचे नाही. 
Maanvi Gagroo
मे बी आपल्या आजूबाजूला अशा थोड्या सधन व मोकळ्या वातावरणातील मुली नसतील पण यात त्यांना येणाऱ्या ज्या समस्या आहेत, त्यांचे जे प्रोब्लेम्स आहेत, त्यातील बारकावे आहेत, स्ट्रेस आहेत, ते मोकळ करण्याचे मार्ग आहेत हे सर्व पाहून अनेक भारतीय मुली यात स्वतःला रिलेट करत असतील यात वाद नाही. आणि यात दाखवलेले प्रश्न व लाइफस्टाइल काही आता मेट्रो सिटीज मोनोपॉली राहिलेली नाही. अनेक छोट्या गाव शहरांमध्ये हे वारे वेगात वाहत आहेत. किंबहुना याचेच आकर्षण आहे. त्यातून हे अगदीच युनिव्हर्सल दाखवले आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 
VJ Bani
या सिरीजच्या अगदी पहिल्या भागापासून जाणवते कि भाषा व सेक्स यांचे कोणतेच बंधन यांनी स्वतःवर घातलेले नाही. तसे केले असते तर कदाचित या सिरीजचा जीव गुदमरला असता कारण यात घेतलेला प्लॉट व निवडलेली भाषा हे
 match होतात. बघता बघता आपण पण या सर्व बाबी सहज घ्यायला लागतो. आपल्याला ते सर्व आवडायला लागते.   

तिसरा सिझन आल्यावर वाटल आता हे काही नवीन नाही दाखवू शकत. किंवा आता फार काय उरले आहे दाखवन्यासारखे? अर्थात आपण सर्व त्यातील पात्रांना व त्यांच्या बेसिक्सला युज्ड टू झालो असल्यामुळे curiosity नसतांना आपण जरी बघायला सुरु केली तरी पुढील पूर्ण सिझन सहज बघू शकतो. इट्स अगेन वर्थ. 

 Thanks to Pritesh nandy and all related persons that giving such well packed, well scripted, mind-blowing series.   

- Samadhan Mahajan 


नाटक

 कधी कधी कोणाला काय वाटेल हा विचार आपले मुळचे विचार दाबून टाकण्याची शक्यता अधिक असते. पण मी त्यातल्या त्यात माझे मूळ विचार जपण्याचा प्रयत्न करतो कारण माणूस म्हणून आपल्या वाटण्याला दाबून टाकणे तितकेसे बरोबर नाहो. ते नैसर्गिक नाही. फार फार तर नवीन बाबी शिकता येतात. अंगवळणी पडून सवयीच्या होऊ शकतात. पण म्हणून त्यांना पूर्ण नाकारणे चांगले नाही. 

आता हेच पहा खूप खूप दिवसानंतर आज मी नाटक पाहायला गेलो. मुळात माझा आतापर्यंतचा वावर अशा गावांमध्ये होता जिथे नाटक हा शब्द फक्त पुस्तकात, दिवाळी अंकात, मासिकात व वृत्तपत्रात वाचायाला मिळायचा. त्यावर बोलणे त्याहीपेक्षा कोणाशी बोलायचे हा यक्षप्रश्न होता. आजही मला याची जाणीव आहे कि मी नाटक पाहायला बसलो असतांना मी ज्या भौगोलिक परिसरात होतो तिथे आजही त्याबाबत अंधारच आहे.  

पहिले नाटक मी परभणीला मित्रांसोबत पाहिले. त्याहीसाठी तालुक्याच्या गावाहून संध्याकाळी जाऊन पुन्हा रात्री बस नसल्याने ट्रक वर प्रवास करून घरी आलो व पहिल्या नाटक पाहण्याचा सोपस्कार पार पाडला. इतका त्रास घेऊन नाटक पाहणे हा प्रकार मुळातच शक्य नव्हता. आणि तिथेच कशाला पुणे मुंबई नाशिक नागपूर औरंगाबाद कोल्हापूर अशी काही मोजकी शहरे सोडली तर सातपुडा सह्याद्री अजंठा सातमाळा कृष्णा पैनगंगा गोदावरी च्या विशालकाय भौगोलिक परीसराभर पसरलेल्या  महाराष्ट्रातील बहुसंख्य जनता यापासून माझ्याइतकीच कोसो दूर आहे.  

तेव्हापासून तर आतापर्यंत काही नाटके पाहण्यात आली. अर्थात नाटकाबद्दल मी बऱ्याच बाबी तशा पुस्तकातून वाचल्यात. काही नावे चांगलीच परिचयाची झाली. 

पुन्हा नाटक पाहणे हे जसे प्रिव्हिलेज लहानपानापासून मिलाले नाही तसे चित्रपट तरी कुठे आधी उपलब्ध झाले पण त्यातल्या त्यात चित्रपटांशी लिंक पटकन लागते. तेही हिंदी किंवा मराठी. इंग्लिश चित्रपट अनेक पाहिले. अगदी ऑस्कर ची लिस्ट काढून निवडून निवडून पाहिले. पण का कोण जाणे मी त्यांच्याशी स्वतःला जोडून नाही घेऊ शकलो. हिंदी मराठी चित्रपट वेब सिरीज पहातांना जे मी जोडला जातो ते हॉलीवूड मुव्ही व नाटक याबाबत माझे होत नाही.  

# लिटररी नोंदी १८

ताम्रपट व्हाया सातपाटील कुलवृत्तांत

ताम्रपट हि काळाचा मोठा व्यापक व समावेशक पट मांडणारी रंगनाथ पठारे यांची एक दमदार कादंबरी आहे. कादंबरीची प्रथमआवृत्ती १९९४ ची आहे. जेव्हा आम्ही शाळेत होतो. म्हणजे ती जेव्हा आली तेव्हा त्यावर काय ज्या चर्चा झाल्या असतील वा जे काही त्यावर लिहून आले असेल तर ते तेव्हा आमच्या परिघाबाहेरचे होते. ते निश्चितच मला माहिती नाही. १९९९ साली ताम्रपटला साहित्य अकादमी मिळाला तेव्हा पूसटस वृत्तपत्रात वाचल्याचे आठवते. त्यानंतर थेट mpsc चा अभ्यास करतांना साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक व त्यांचे पुस्तक यात ताम्रपटचे नाव पुन्हा वाचण्यात आले. काहीनाकाही कारणांमुळे ताम्रपट वाचण्याची राहून जात होती. दरम्यान रंगनाथ पठारे सरांचे बरीच पुस्तके वाचण्यात आली. मध्यंतरी पठारे सरांच्याच हस्ते माझ्या ‘अस्वस्थ क्षणांचे पाश’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्यालाही आता ८-९ वर्ष होऊन गेली. अखेर या दिवाळीत सर्व दिवाळी अंक बाजूला सारून फक्त ताम्रपट हाती घेतली आणि मराठी कादंबरीतील एक मैलाचा दगड ठरणारी कादंबरी वाचून संपवली. एक समाधान लाभले. काहीतरी भक्कम चांगले वाचून झाल्याचे समाधान होते ते.  कादंबरीच्या प्रकाशनानंतर तब्बल २८ वर्षांनी मी ती वाचली. ही एक विशाल कादंबरी आहे. विशाल या अर्थी कि ती तब्बल ८५१ पानांची आहे.  दोन तीन वर्षांपूर्वी पठारे सरांची सातपाटील कुलवृत्तांत वाचली. ती देखील तब्बल ७९६ पानांची आहे.
 
ताम्रपट व सातपाटील या दोन्ही कादंबरींचे एक वैशिष्ट्य म्हणजे काळाचा दीर्घ पट त्या आपल्यापुढे मांडतात. सातपाटील ईस.१२८९ ते २०१९ या भव्य कालपटावर पसरलेली आहे. तर ताम्रपट १९४२ ते १९७९ या कालपटावर पसरलेली आहे. कदाचित ताम्रपट मध्ये दीर्घ काळाचे कवेत घेतलेले अवकाश सातपाटील मध्ये अधिकच विस्तारलेले दिसते. किंबहुना इतका भव्य पट यशस्वीपणे मांडता येऊ शकतो हा आत्मविश्वास लेखकाला आधीच्याच कादंबरीमुळे मिळाला असणर हे नक्की. 

दोन्ही कादंबरींची दुसरे वैशिष्ट्य म्हणजे- भारतीय इतिहासातील राजकीय सांस्कृतिक सामाजिक ज्या काही घटना झालेल्या आहेत त्यांचा वापर कादंबरीत झालेला दिसतो.
पण तरीही त्यात मला एक नोंद करावीशी वाटते कि लेखक त्या मोठ्या घटना व व्यक्तींचा वापर कादंबरीतील गोष्ट फुलवण्यासाठी करत आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हटले तर इतिहासातील सत्य घटना या एखाद्या background music सारख्या कार्य करतात. त्या tune वर लेखक आपले पात्रांद्वारे त्याच्या मनात असलेली गोष्ट सांगतो. उलट ऐतिहासिक घटना व पट निवडल्यामुळे अधिक ठळकपणे आपली वैचारिकपेरणी करण्यात लेखक यशस्वी होतो. अर्थात विषयाला, पात्रांना व त्यातील अंतरसंबंधांना पुरेपूर न्याय देऊनच लेखकाची गोष्ट पुढे सरकत जाते.
 
दोन्ही कादंबरीची तिसरे वैशिष्ट्य म्हणजे-  एक काळ व त्यातील घटना लिहून झाल्यावर मध्ये अनेक घटना व वर्ष सोडून लेखक काळाच्या पुढच्या टप्प्यात जाऊन तेथील घटना मागच्या पात्रांच्या संदर्भात घेऊन पुन्हा सुरु करतो. आता एकतर या पात्रांच्या आयुष्यात बराच काळ पुढे गेलेला असतो किंवा त्यांची पुढची पिढी आता कार्यरत असते. उदाहरणार्थ ताम्रपटमध्ये १९४२ च्या चळवळीने सुरुवात केल्यावर ते १९४३-४४ ला थांबतात व १९४७ च्या स्वातंत्र्य वर्षावर भाष्य न करता अत्यंत क्रूरपणे सरळ १९५७ पासून सुरु करता. क्रूर या अर्थी कि सामान्य वाचक आता पुढील काळात ज्या घटना अपेक्षित करत असतो त्या न मांडता लेखक सरळ काळाच्या पुढे अनेक वर्षांनी जाऊन काळपटाचा दुसराच तुकडा निवडतो. अर्थात मध्येच चार दोन ओळीत लेखक हा दुवा वाचकाला जोडून देतो. त्यामुळे काळाचे जोडले जाणे शक्य होते. पण वाचतांना तितका धक्का मात्र जाणवतो अर्थात दोन तीन वेळा असे झाले कि मात्र वाचक देखील यात सरावतो. दोन्ही कादंबरीतील हे वैशिष्ट्य विशेष आहेत हे नक्की.    

सातपाटील मधील श्रीपती हा पहिला नायक अल्लाउद्दीन खिल्जीच्या पैठनच्या आक्रमणाच्या आसपासच्या काळात आहे व त्यानंतर येणारा साहेबराव निजामशाहीतील 1490 च्या काळाच्या आसपास आहे. त्यानंतर येणारा दशरथ हा नायक 1760 च्या आसपासचा. इतिहासातील देवगिरी, खिल्जी, आदिलशाही, पेशवाई, ब्रिटिश ते २०१९ हा भव्य काळात ते आपल्या नायकांना व सोबत वाचकाला फिरवून आणतात. त्यामुळे एकूणच हि पात्र खऱ्या इतिहासातच होती कि काय या भावतरंगावर ते वाचकाला आणण्यात यशस्वी होतात. 

सेम प्रकार हा ताम्रपट मध्ये. अर्थात मी आधी सातपाटील वाचली असल्यामुळे हे उलटे वाटू शकते. पण खरे तर ताम्रपट मधील काळ, इतिहास व आपल्या मनातील गोष्ट यांची बेमालूम मांडणी करण्यात सक्सेस आल्याने हा प्रकार पठारे सरांनी सातपाटील मध्ये वापरला असण्याची शक्यता आहे असे माझे आपले भाबडे मत आहे. ते यासाठी कि पठारे सर व त्यांच्या कादंबऱ्या या साहित्यातील उच्च टोकावर आहेत. मी आपला एक सामान्य वाचक म्हणून हे लिहित आहे. समीक्षा हा प्रकार देखील फार थोर आहे. मी हे आपले जे भावले व वाटले ते लिहिले आहे. कोणाला काय वाटेल त्याचा विचार यात नाही. 

असो तर या दिवाळीत मी ताम्रपट वाचली. यात १९४२ च्या चलेजाव चळवळीपासून त्यातही भूमिगत चळवळी पासून सुरुवात होते. तारा तोडणे, पुल उडवणे, स्फोट घडवणे. चळवळीतील लोक त्यांचे एकमेकांशी संबंध... कोठडीतील हाल हे सर्व त्यात येते. पत्री सरकारशी जोडलेली पण तरीही एका जिल्ह्याशी त्यातही नगर जिल्ह्याशी जोडलेली काही पात्र नायक यात आहेत. तत्कालीन राजकारणातील प्रसिद्ध लोक यात कथानकाचा भाग म्हणून येतात. तेही तितक्यापुरतेच. साने गुरुजी येतात, यशवंत राव चव्हाण येतात. एस एम. अच्युत राव पटवर्धन आदी लोक आहेत. 

पण यात मुख्य पात्र आहेत नानासाहेब शिरूर वकील, बापूसाहेब, गोविंदराव, भोईटे पाटील,… यात कोणाचीना कोणाची आपल्याला आठवण येते. उदाहरणार्थ नानासाहेब वाचून मला पत्री सरकारमधील क्रांतीसिंह नाना पाटील आठवतात. बाकी देखील संदर्भ काही स्थानिक राजकारनाचे असू शकतात. देशासाठी घरादाराचा विचार न करणारी ती एक पिढी होती. त्यामुळे “लोक घरी येत ते मोठ्या आदराने बोलत. पण प्रपंचाचा गाडा रेटायला त्याचा काय उपयोग. कितीही मोठ नाव असलं तरी ते काही भाजून खाता येत नाही.” असली वास्तवदर्शी वाक्य मनाला भिडतात.  

१९४४ नंतर कादंबरी एकदम १९५७ सालात येते. आता वातावरण एकदम बदलले आहे. तेव्हाची तरुण असणारी पिढी आता थोडी उताराला आहेत. आता संयुक्त महाराष्ट्र चळवळ व आगामी निवडणुका यावर भाष्य आहे प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी हे सर्व पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात किती प्रभावी होते हे आजच्या पिढीलाच काय आजच्या पत्रकरांना देखील लगेचच आठवणे अवघड आहे. ते या कादंबरीत आहे. राजकारणातील तिकीट देण्यासाठी केलेले डावपेच, पैसा व जातीचा वापर हा स्वतंत्र भारतातील दुसऱ्याच निवडणुकीपासून सुरु झाल्याचे यात दिसते.

पुढचा टप्पा १९६२ चा आहे. हा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा आहे कारण १९६० मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झालेली असते. या भागात साखर कारखाने, शाळा, कॉलेज याच्या आजूबाजूला फिरणारे राजकारण, राज्याच्या केंद्रीय राजकारणातील यशवंतराव चव्हाणांची वाढती पकड. सत्ता व पैसा या ताब्यात ठेवण्याच्या संघर्षात हळूहळू स्वातंत्र्य चळवळीत प्राणाची बाजी लावणारे खरे योद्धे हळूहळू मागे पडत जात असल्याचे चित्र या काळात दिसते. तरीही त्यांची पकड ढिली झाल्याचे दिसत नाही. नानासाहेब शिरूर वकील, बापूसाहेब देशमुख, गोविंदराव, भोईटे पाटील, बुवासाहेब यांच्यातील अंतर्गत राजकारण उमलत आता प्रत्येकाचे मार्ग वेगळे झाले. बापूसाहेब यांच्याजवळ भूजाडीमामा, काशिनाथ ढोरमले, श्रीपतराव ढमाले, भुजंगराव निकम व इंदिराराजे देशमुख. हे तेच बापूसाहेब देशमुख जे ४२ च्या चळवळीत लोक तहसील कचेरीवरील मोर्चात शामिल होऊन अंगावर लाठ्या झेलत असतांना रक्त सांडत असतांना इंग्लिश साहित्याचा आस्वाद घेत वाड्याच्या  खिडकीतून अगदी निवांत पाहात बसत. त्यांनाच आता कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत तिकीट आमदारकीसाठी मिळाले होते. 

नानासाहेब यांच्याजवळ निस्सार मोमीन त्याची पत्नी लीला, शाळीग्राम पाचपुते, आवडाबाई, राधाकिसन, अकबरभाई व जोडलेली असंख्य माणसे.
 
या काळात गरिबी कंठत असलेले गोविंदभाई जे ४२ च्या चळवळीत अग्रभागी होते ते वय व अपंगत्व यामुळे थकून गेलेले होते. पांडुरंग तिकोने नोकरीत असल्याने त्यांच्या राजकारणाच्या वावरावर मर्यादा होत्या. रावसाहेब पटवर्धन यांनी राजकारण सोडले होते. हि सर्व मंडळी ४२ च्या काळात राज्याच्या राजकारणात तळपणारी होती. 
या काळातील एक बाब कादंबरी वाचतांना प्रकर्षाने जाणवते कि ६२ च्या काळात आजच्या सारखी प्रसारमाध्यमे नव्हती तेव्हा नेत्यांच्या येण्याने व त्यांच्या भाषणाने लोकात वैचारिक भूमिका घेतांना बदल होत असत. मते कोणाला द्यायची यात मोठा फरक पडत असे.

१९६२ च्या भारतातील या तिसऱ्या निवडणुकीत प्रजासमाजवादी पक्षाचे नानासाहेब हरतात व बापूसाहेब देशमुख कॉंग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी होतात. यात २६५ पैकी २१४ जागा यशवंतराव चव्हाणांच्या पक्षाच्या अर्थात कॉंग्रेसच्या निवडून येतात. हि निवडणूक काही अंशी जातीवर होते किंवा प्रभावी उमेदवाराला पाडण्यासाठी लोकात भाषणातून जातीची पेरणी करून आधार घेतला जातो.  

कादंबरीतील उल्लेख पुढीलप्रमाणे, “नवे मराठा युग सुरु झाले होते. त्याला मराठी राज्य म्हणणे, जबाबदारीने वागणे असे समजुतीने सुरु झाले होते. ब्राम्हनादी उच्च जातींचा वरचष्मा आधीच संपला होता. आता सरदार, सरंजामदार अशी मंडळीही नगण्य होऊन मध्यम मराठा वर्गाच्या प्राब्ल्याचे युग सुरु झाले होते. एक बहुसंख्य जात म्हणून ते स्वाभाविक होते आणि यशवंतरावांची समतोल दृष्टी असलेले नेतृत्व त्याला लाभलेले होते. इतर मध्यम जाती-जमाती यांचे स्थानही सत्तेत राखले जाईल याची काळजी घेण्यात आली होती. एक बहुमुखी व्यवस्था आकार घेऊ लागली होती.” (पेज४४३-४४४)

१९६२ हे वर्ष असे होते कि पहिल्यांदाच सत्तेच्या विकेंद्रीकरण तत्त्वातून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लागलेल्या असतात. आतापर्यंत नानासाहेब बापूसाहेब यांची कार्यकर्ते म्हणून वागणारी मंडळी झेडपी अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती, सदस्य अशा विविध पदांवर निवडून आलेली होती. दादासाहेब भोईटे पाटील जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवडून आले. बापूसाहेबांची ओळख यशवंतराव चव्हाणांशी ज्या भूजाडीमामांनी करून दिली होती त्यांनाच पंचायत समितीसाठी बापूसाहेब पाठींबा देत नाहीत. खऱ्या अर्थाने ६२ हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे वर्ष होते व कादंबरीत ते चांगलेच उमटून आलेय.

१९६८ चा हा चौथा टप्पा सुरु होतो... दादासाहेब तुकाराम भोईटे पाटील आता खासदार झालेले आहेत. नानासाहेब अजूनही कामगार शेतकरी साठी आंदोलनांच्या तयारीत आहेत. बापूसाहेब महसूल खात्याचे मंत्री झालेले आहेत... भूजाडीमामांची राजकारणातील स्थिती आता अधिकच खराब झालेली. कुठलेही पद नाही. अगदी स्वातंत्र्यसैनिक म्हणून सरकारकडून मिळणारे सन्मानपत्र देखील नाही. त्यासाठी ते बापूसाहेबांना मुंबईला भेटायला जातात. हे अधिकच वेदनादायी. ६० च्या काळात कॉलेज काढण्यासाठी धडपड करणारे शंकरनाना आता स्वतःसाठी पेट्रोल पंप पाहिजे म्हणून दादासाहेब-बापूसाहेब यांच्या घराच्या चकरा मारू लागतात. त्यांना तो मिळतो. बापूसाहेब व त्यांची पत्नी इंदिराराजे यांचे पती-पत्नीनात्यातील ताण मोकळे होऊन प्रकट होऊ लागल्याचे दिसते. इकडे बुवासाहेबांचे राजकारण पद्धतशीरपणे संपवले. अगदी हनी trap करून संपवले.नंतर परत काही वर्षांनी ५१ हजारांची थैली देऊन त्यांचा जाहीर सत्कार पण केला जातो.  नानासाहेब ज्यांच्या नेतृत्वात हि सर्व मंडळी ४२ चा लढा लढली होती ते आता एकाकी होत असल्याचे चित्र दिसते. स्वतःच्या मुलाला जयप्रकाशला इंजिनियरिंगला अर्धा टक्का कमी पडत असतांना नानासाहेब स्वातंत्र्यसैनिक असलेले प्रमाणपत्र घेण्यासही तयार नव्हते. अखेर तो स्वतःच IIT परीक्षा पास होऊन पवईत लागतो. आता भोईटे पाटलांचा चिरंजीव अंकुश भोईटे यांचे पुण्यातील कॉलेज निवडणुकीतून आगमन झाले होते. शरद पवारांचा संदर्भ येतो. 

हिंदू मुस्लीम दंगल व त्यामुळे धार्मिक प्रवृत्तीच्या विचारसरणीला मिळणारे खतपाणी तसेच दलित व सवर्ण यातील जातीय तेढ, अन्यायाचा बदला..मुन्तोडेचे बदला घेणे या बाबी येतात. इकडे नानासाहेब तत्व व विचार यापायी चांगले मित्र तोडत आहेत ..नाकारत जातात अखेर पदमश्री देखील नाकारतात. 

१९७५ ... पाचवा टप्पा -  आणीबाणीचे वर्ष. या भागात पहिल्यांदाच ताम्रपट शब्द वाचायला मिळतो. दादासाहेब भोईटे पाटील यांच्या बंगल्याचे नाव असते ताम्रपट. स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्ष झाली त्यानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांना या वर्षी  पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते ताम्रपट प्रदान करण्यात आले होते. त्यानंतर बंगल्याचे हे नामकरण कार्यकर्त्यांनी केले. ७२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर बापूसाहेबांना मंत्रिपद मिळाले नाही. केंद्रात यशवंतरावांची ताकद कमी होत गेली. इंदिरा गांधींचा प्रभाव वाढत गेला. आणीबाणीत संघाच्या व इतर विरोधी पक्षाच्या लोकांना होणारी अटक. कुटुंब नियोजनाचा सक्तीचा कार्यक्रम, संजय गांधी आदी येतात. आणीबाणीची भीती काही लोकांच्या मनात वावरते. ते सतत पोलीस व अटकेच्या दडपणाखाली वावरतात. तर गोरगरीब सामान्य जनतेला त्याचे काहीच वाटत नाही. त्यांचे प्रश्न व त्यांचे जीवन यात काहीच बदल झालेला नसतो.  दादासाहेबांनी केंद्रात जुळवून घेतले. आता मुलाला राजकारणात  आणण्याची त्यांची तयारी सुरु झाल्याची दिसते. इकडे नानासाहेब यांचा मुलगा आय आय टी करून सामाजिक कामांकडे वळतो. 

१९७९ हा शेवटचा टप्पा- आणीबाणी उठून निवडणुका झालेल्या असतात. बापूसाहेब विधानसभा हरतात. पाचशे मतांनी भोईटे यांचा मुलगा अंकुश निवडून येतो. बाप खासदार, पोरग आमदार बनते. जिल्हाभर भोईटेयांचे वर्चस्व वाढते. जनता पक्षाच्या मदतीने राज्यात पवारांच्या नेतृत्वात पुलोदचे सरकार तयार होते. खासदार भोईटे यशवंतराव चव्हाणांची सोबत सोडून इंदिरा गांधींच्या गटात थांबणे पसंत करतात. तरी इंदिरा गांधींविषयी अर्थात त्यांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीविषयी कायम मनात आशंका असते. केव्हा गेम होईल सांगता यायचे नाही अशी स्थिती. बापूसाहेब पुलोदमध्ये मंत्री होतात. पुन्हा नाराज मंडळी त्यांना जोडली जातात. 
---------

नानासाहेब, दादासाहेब, बापूसाहेब या तिघांचे रस्ते वेगळे, ध्येय एकच पण मार्ग वेगळे. लवकर व कन्फर्म यश देणारा मार्ग निवडायच्या नादात मूल्य, नैतिकता या तडजोडीच्या बाबी तरी ठरतात either त्यांना जागा तरी नसते. सत्तेच्या प्रांगणात संस्थात्मक पातळीवर अगदी कडेकोट बंदोबस्त लाऊन इकडची काडी तिकडे न होऊ देणारे दादासाहेब वैयक्तिक आयुष्यातील घटनांमुळे शेवटी जीवनाच्या तत्वज्ञानात समाधान कशात आहे या तुम्हा आम्हा सामन्य जनतेला पडणाऱ्या प्रश्नापाशी येऊन थांबतात. नानासाहेब, भूजाडीमामा, बापूसाहेब हे देखील आपला निवडलेला मार्गावर त्यांच्या पद्धतीने विचार करतातच. कुठलेही नाट्य न येऊ देता, कोणतीही कलाटणी न येऊ देता, कोणत्याही ठोस निष्कर्षावर न येता, कादंबरी संपते. ते सर्व वाचकाने ठरवू देत..काय चूक काय बरोबर अशी सरधोपट मांडणी नसल्याने निष्कर्ष तरी कसा काढणार. त्यामुळे विविध शक्यअशक्यतांचे काहूर वाचकाच्या मनात उमटवून लेखक थांबतो. 
...............

सुरुवातीचा ४२ व ५८ चा भाग वगळला तर पुस्तक थोडे रेंगाळत जाते... ग्रीप घेत नाही थोडे शॉर्ट केले असते, काही कंटेन वगळला असता तर अजून गोळीबंद झाले असते. त्या तुलनेत सातपाटील बऱ्यापैकी आटोपशीर आहे. कदाचित काळाचे बदलत जाणारे राजकीय, सांस्कृतिक, नैतिक वैचारिक बदल हे ज्या पद्धतीने हळूहळू होत जातात ते कालानुक्रमे टिपण्याचा हा प्रयत्न असावा. चिंतन, मीमांसा व मनोविश्लेषण या बाबी अजून वाढवता आल्या असत्या. घटना कमी करून ते आले असते तर अजून बरे झाले असते. 

    एकूणच देशमुख व शहाण्णव कुळी यांच्यातील स्रीयांच्या प्रश्नांच्या विविध छटा यात मांडलेल्या आहेत. पार गडगंज श्रीमंत असो, राजघराण्यातील असो, राजकीय वर्तुळातील असो, गरीब असो सगळ्यांच्या आपल्या काहीना काही समस्या आहेतच. या कादंबरीतील विविध स्री पात्रांवर देखील भरपूर काही लिहिण्यासारखे आहे. इंदिराराजे नावाचे पात्र त्याच्या अंगभूत वैशिष्ट्यांसह डोळ्यापुढे उभे राहते. काही वेळा तर असे वाटते कि कदाचित बापूसाहेबांना बाजूला करून इंदिराराजेच राजकारणाची सूत्रे हाती घेतात कि काय पण तसे होत नाही. या कादंबरीचा पुढचा भाग खरे तर पठारे सरांनी लिहायला हवा. पात्र व पार्श्वभूमी तीच ठेऊन १९७९ ते २०२२ असा भव्य पट पुन्हा उभा केल्यास अप्रतिम राहील. 


ताम्रपटच्या जुन्या आवृत्तीचे मुखपृष्ठ
खर तर आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास या ताम्रपट कादंबरीवर एखादी अप्रतिम वेब सिरीज वा चित्रपट देखील येऊ शकतो. राजकारणावरील मराठीतील हि एक नि:संशय श्रेष्ठ दर्जाची कादंबरी आहे.   

कादंबरी वाचतांना त्यातही नानाचे पात्र पुढे आले कि वाटत राहते गांधी नेहरू आदी मंडळींनी स्वातंत्र्य प्राप्तीसाठी ज्या विचारांची बैठक दिली होती ती तेव्हढ्यापुरतीच  ठेऊन  ही मंडळी नवीन विचार व प्रहावांना सामोरे का नाही गेली? नवीन प्रश्न व विचार तेच यातून तर हा पेच झाला नसावा? पण ते तरी आपला मार्ग व ध्येय का बदलतील? बर दादासाहेब सारख्यांनी बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःत बदल करून व उधळ्त्या वारूवर स्वार होऊन देखील ते आयुष्याच्या शेवटी पुन्हा समाधान शोधतच होते कि मग नाना तरी काय चुकले? अर्थात दोन्ही तिन्ही जन आपापल्या निवडलेल्या मार्गाबद्दल तरी कुठे ठाम राहतात. ठाम कुठे काय असते जीवनात?

पूर्वीच्या काळी राजे देत असलेले ताम्रपट तरी काळाच्या ओघात भले टिकले जरी असले पण त्यांच्यावरील मजकूर कुठे शाश्वत राहिला. ताम्रपटावर नाव कोरले असून देखील जर शेवटी सर्वच काही टिकत नसेल तर कशाला काय अर्थ आहे? असे अनेक विचार निर्माण करून हि कादंबरी आपल्याला सम्रुद्ध करते. 
- समाधान महाजन  


दिवाळी

 ९० च्या दशकात अशी एक पिढी होती जी नोकरीधंदा, रोजगार, पोटपाण्यासाठी शहरात जायची. त्यात choice पेक्षा option नसण्याचे प्रमाण जास्त होते. त्यांना दिवाळीत गावी घरी जाण्याची वेळ आली कि पोटात गोळा यायचा. सायकॉलॉजीत असले नसलेले सर्वच कॉम्प्लेक्स त्याच्या डोक्यात थयथय नाचायचे. गावात गेले कि घरातील, शेजारील, नात्यातील, गल्लीतील त्या नजरा, ते प्रश्न, अपेक्षा याच्या मानसिकतेपल्याडच्या असायच्या. 

शहरात गेले कि एलीयट गटात गेले. सधन झाल्याचे लोक समजत. हा इकडे कामगार वस्तीत, एका खोलीत, चहाचेही पैसे वाचवून महिना काढत असतांना हा शहरातून गावातल्यासाठी दिवाळीत काही तरी घेऊन येईल. त्याही पुढे जाऊन इथे पडीक असलेल्यासाठी काही काम बघ किवा याला इथून घेऊन जा अशाही अपेक्षा झेलाव्या लागत. लग्न झालेल्यांचे वेगळेच प्रश्न. Stand वर उतरल्यापासून गल्लीभर स्कॅनर बसवलेले असत. त्याची बायको कशी, मुले कशी कोणती कपडे घालतात काय बोलतात कसे वागतात... यासाठी पुढे काही दिवस उपहास, उपेक्षा, अपमान अस काही बाही सहन करत.. दिवाळी साजरी पेक्षा सहन केली जाई. पटणार नाही पण ही एक प्रकारची गावातील क्रूरता होती फक्त  कनेक्ट राहणे वाळीत न टाकणे यासाठी तो हे सारे करायचा. 

यातून जे जगले वाचले ते adjust झाले बाकी मात्र तुटून वेगळे झाले ते परत येईनाशे झाले. त्यांच्या गावातील व शहरातील पुढच्या नव्या पिढीला या अंतरजाणीव व वेदना कदाचित माहितीही होणार नाहीत. आता बऱ्यापैकी गावांनी शहरी रूप धारण केलेत. इंग्लिश मिडीयमच्या शाळा खेड्यात पसरल्या. त्यामुळे किमान मराठीत बोलणाऱ्याला हसणे बंद झाले. चांगले कपडे घालणे, चांगले राहणे, घरात फर्निचर असणे अशा बारीक सारीक बाबी गावानेही स्वीकारल्या. काही ठिकाणी आता ते दिवाळीचे चार पाच दिवस विलेज टूर ला गेल्यासारखे जाऊन ‘its my farm...river..village अशा सेल्फ्या टाकण्याची सोय झाली. त्याकडे गावातील आजी बाबा कौतुकाने बघतात....यात मुल किंवा नातवंडाच्या हट्टाने गावात अनेक वर्षांनी परतलेला त्या पिढीचा तो बाप किंवा बाबा अजूनही ते व्रण काही केल्या विसरत नाही.... त्याचे काही मित्र शहरातच राहून तेथील झगमगत्या वातावरणात त्या दिवाळीतील पणत्यांखाली पसरलेला इवलासा अंधार अजूनही जपून असतात... 

अर्थात यातील प्रत्येक बाबीला अपवाद आहेत जे मान्य आहेत. 

लिहिले ते सहजच ....

- समाधान महाजन 

#Happy Diwali

१९४२ चा लढा व चिमूरची शोकांतिका

 

भारताला मिळालेले स्वातंत्र्य किती अमूल्य आहे याची जाणीव अनेकांना नसते. मोठ्या लोकांचे वा नेत्यांचे जाउद्या; स्वातंत्र्यचळवळीत काही सामन्य जनतेने असे काही  हाल अपेष्टा अन्याय सोसले आहेत कि ते आपल्या पर्यंत पोहचले देखील नाहीत. अशीच कहाणी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या गावाची. तुम्ही इंटरनेट वर सर्च केले तर किमान इतकी माहिती कळेल कि, चिमूर हे असे गाव आहे जे १९४२ च्या चळवळीत १४ ते १६ ऑगस्ट या तीन दिवस स्वातंत्र्य होते. देशातील हे एकमेव ठिकाण होते जे देशाला स्वातंत्र्य मिळायच्या आधीच तीन दिवस का असेना पण स्वातंत्र्य झाले होते. यासाठी २१ क्रांतीकारकांना फाशीची शिक्षा व २६ जणांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. १४ ते १६ ऑगस्टपर्यंतचे हे स्वातंत्र्य खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी बर्लिन रेडिओवरून जगाला कळविले होते.  पण हि माहिती अपूर्ण व वन साईडेड आहे.  या गावात फक्त इतकेच झाले नव्हते तर माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनांची मालिकाच झाली होती. 


चिमूरमध्ये  करबंदी व कायदेभंग मोहीम सुरु झालेली होती.  संत तुकडोजी महाराज व त्यांच्या आरती मंडळाने आंदोलन तीव्र केले होते. १३ व १४ ऑगस्ट रोजी झालेल्या सभांमध्ये राजद्रोही भाषणे करण्यात आली. १६ ऑगस्ट पर्यंत चिमूर मध्ये जनता राज्य होते. त्यानंतर सशस्र पोलिसांची कुमक दाखल झाली. डाक बंगला व पोलीस ठाण्यावर जमाव चालून गेला. जमाव व पोलीस यांच्यात लढा झाला. जमावाने चिमूरमधील डाक बंगला, पोलीस ठाणे, जंगल खात्याच्या चौक्या, डाक कार्यालय आणि महसूल खात्याचे सर्व रेकॉर्ड नष्ट केले. सर्व सरकारी इमारती जाळल्या. यात काही सरकारी अधिकारी ठार झाले. 


यानंतर चीमुरला स्वतः जिल्हा दंडाधिकारी फौज सोबत घेऊन आला व  सुडाची कारवाई सुरु झाली. दिसेल त्या पुरुषाला अमानुष मारहाण करण्यात आली. ब्रिटिशांनी गावातील निरपराध, बायका, मुलांना बेदम मारहाण केली. अटक केलेल्या सर्व पुरुषांना गुरांच्या कोंडवाड्यात कोंबण्यात आले. वरून पाउस व खालून चिखल अशा अवस्थेत त्यांना काही दिवस ठेवण्यात आले. नागरिकांवर मारा करण्यासाठी चार तोफाही आणल्या होत्या पण सुदैवाने त्या पावसामुळे निकामी ठरल्या.


सैनिकांनी लोकांकडील सर्व पैसा व दागदागिने लुटले. त्याहीपेक्षा सैनिकांनी महिलांवर पाशवी बलात्कार केले. त्यातून अगदी गरोदर माता. बाळंतीनी, कुमारिका व बालिका कोणालाही सोडले नाही. त्यांची आर्जव्ये, विरोध विनंती धुडकावून हे जुलमी अत्याचार सुरु होते. हा प्रकार दोन अडीच दिवस सारखा सुरु होता. मध्ययुगातील रानटी टोळ्यांनी किंवा महायुद्धातील आक्रमण काळात झालेल्या नृशंस प्रकारासारखा हा घृणास्पद प्रकार होता. त्यानंतर एका म्हातारीने धाडस करून गावाबाहेर तळ ठोकून बसलेल्या कलेक्टरला अत्याचाराविषयी सांगितले. त्यानंतर हे प्रमाण कमी झाले पण संपले नाही. २६ ऑगस्ट पर्यंत हे सुरु होते. या बलात्काराच्या घटनानंतरच्या काळात कौटुंबिक प्रश्न देखील निर्माण झाले. ही करून व बीभत्स कहाणी लिहिणेही अवघड वाटते असे डॉ के के चौधरी यांनी त्यांचे पुस्तक आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यात लिहिले आहे.  


इतकेच नाही सूडबुद्धीने चिमूरवर एक लाख रुपयांचा सामुहिक दंड आकरण्यात आला. बंदुकीच्या धाकाने तो
वसुलही करण्यात आला. प्रशासनाने चिमूर मधील अत्याचाराची बातमी अनेक दिवस बाहेर जाऊ दिली नाही. आरोप करणाऱ्या चंद्रपूरच्या वकिलांना खोटे ठरवले. 


१९ सप्टेंबर १९४२ रोजी रमाबाई तांबे, विमला देशपांडे, विमला अभ्यंकर, द्वारका देऊस्कर, डॉ.वझलवार हे सर्व चीमुराला गेले. बळी पडलेल्यांच्या अत्याचार झालेल्या कुटुंबीयांना भेट दिली. त्यांनी सखोल चौकशी केली. व अहवाल मध्य प्रांत सरकारला सदर केला. सरकारने ते अहवाल अतिशयोक्त असल्याने सांगून त्यांची वासलात लावली. सरकारने १६ ऑक्टोबर रोजी एक पत्रक काढून चीमुरमध्ये मिलिटरीने केलेल्या अत्याचारांची व बलात्कारांची चौकशी करण्यात येणार नाही असे जाहीर केले.


चिमूर अत्याचार व बलात्काराची चौकशी व्हावी यासाठी गांधीवादी नेते प्रा. जे पी भन्साळी यांनी ६३ दिवस उपोषण केले. त्यांच्या उपोषणाच्या बातम्या छापन्यावर देखील डिफेन्स ऑफ इंडिया रूल ४१ (१) (बी) खाली बंदी घालण्यात आली. पुढे तर असा बंदीहुकुम काढला आहे हे छापन्यावर देखील बंदी घालण्यात आली होती. !!!??? उपोषणाच्या आधी या प्रकरणावर लक्ष द्यावे व चौकशी करण्यास सरकार वर दबाव आणावा यासाठी प्रा. भन्साळी तत्कालीन व्हाईसरॉयच्या मंत्रिमंडळात मंत्रीपदी असलेले माधव अणे यांना देखील भेटले होते पण तितकासा सकारात्मक प्रतिसाद त्यांच्याकडून मिळाला नाही. अखेर प्रा. भन्साळी यांनी उपोषणाचा मार्ग निवडला होता. 

सर्व काही होऊनही गव्हर्नरने या घटनेची चौकशी करण्यास साफ नकार दिला होता. 

युद्धाच्या व त्यातही स्वातंत्र्ययुद्धाच्या सर्वच कहाण्या झळाळत्या नसतात. त्यांना चिमूरसारख्या शोकांतिकेची व अमानुषतेची काळीकुट्ट किनार लागलेली असते.

- समाधान महाजन 

(संदर्भ – आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – खंड दुसरा (पेज क्र १०२१ ते १०२८), लेखक – डॉ. के. के. चौधरी, सदरील पुस्तक महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाकडून २०१८ मध्ये प्रकाशित झाले आहे.)   


मोर ओडिशा डायरी

राजेश पाटील (IAS) यांचे 'मोर ओडिशा डायरी' हे पुस्तक अलीकडेच डिसेंबर २०२१ मध्ये  समकालीन प्रकाशनने प्रकाशित केले आहे. राजेश सरांना आम्ही मोठ्या भावासारखे दादा म्हणतो. दादांनी खानदेशातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श प्रस्थापित केला आहे. त्यांच्या संघर्षमय आयुष्याचा प्रवास त्यांचे आधीचे पुस्तक "ताई मी कलेक्टर व्हयणु" यात आलेला आहे. अभ्यास करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांना हे पुस्तक त्यांच्या आयुष्यात कायमच प्रेरणा देत आलेले आहे.   

परीक्षांची तयारी करत असताना सर्वांच्या स्वप्नात कलेक्टरची पोस्ट असते.  लाल दिवा, बंगला, नोकर चाकर असा लवाजमा त्यांच्या स्वप्नांना खुणावत असतो. पण प्रत्येक्षात काम करत असतांना कदाचित असे लक्षात येत जाते कि सरकारने या सर्व सुविधा लोकांचे कामे करण्यास सोपे जावे यासाठी बनवलेल्या असतात. मोर ओडिशा डायरी या पुस्तकात मांडलेले राजेश दादांचे अनुभव हे फिल्डवरचे आहेत म्हणून अस्सल आहेत. हिरोगिरी नाही की प्रसिद्धीचा सोस नाही अगदी आपल्या स्वभावानुसार राजेश दादांनी प्रशासन सांभाळले व ते जसे सांभाळले तसे लिहिले. पुस्तक वाचतांना सहज जाणवत राहते कि अनेकदा प्रामाणिकपणे ते स्वतः च्याच मर्यादा, चुका कबूल करतात तेव्हा अजूनही त्यांच्यातील जमिनीवर पाय असणाऱ्या माणसांचा अभिमान वाटतो.

 संपूर्ण पुस्तकात कुठेही चमकोगिरी दिसत नाही. जिल्हाधिकारी पदावर जेव्हा  बाहेरच्या एखाद्या राज्यातील एखाद्या जिल्ह्यात काम करावे लागते तेव्हा तो जिल्हाधिकारी असलेला व्यक्ती अनेकदा सर्वार्थाने एकटा असतो. याउलट काही निगेटिव्ह शक्ती असणारे स्थानिक लोक हे ऑरगॅनिक घटक असतात. ते त्याच मातीतील असतात व त्यांचे हितसंबंध देखील त्याच मातीशी असतात त्यामुळे त्यांचा समूह किंवा गट किंवा समाज एकत्र येण्याची प्रक्रिया naturally fast असते.अशा वेळी आपल्याला वाटते की कलेक्टर असल्यावर कायद्याने काम केले की संपले. दर वेळी असे तंतोतंत करता येतेच असे नाही. अशा वेळी अनेक असहाय वाटणारे एकटे वाटणारे प्रसंग येत असतात. तेव्हा पुन्हा एकदा स्वतःला सावरत लोकांच्या समस्या सोडवण्याकडे लक्ष देणे हे बाहेरून बघण्याइतके सोपे नाही. तसे प्रसंग या पुस्तकात आहेत मग ते नक्षलवादी भागातील अनुभव असो कि बाहुबली नेत्यांच्या मतदारसंघातील अनुभव असो. 

प्रशासन व राजकारण यावर अगदी प्रॅक्टिकल भाष्य आहे. अनुभवाचे बोल आहेत. उगाचच मी आमदार खासदारांना कसा धडा शिकवला अशी फिल्मी भाषा यात येत नाही. भारतीय प्रशासनात लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी यांच्यातील सबंध चांगले असतील तर विकासकामे कसे होतात हे सोदाहरण त्यांनी दाखवून दिले आहे. आणि विशेषतः आपली मूल्य न सोडता.


जाणत्या अधिकाऱ्याला स्वतः मध्ये एक शिस्त असणे गरजेचे आहे. त्याशिवाय तो प्रशासनाला शिस्त लावू शकत नाही.  हे अनुभवाचे बोल सरांनी यात मांडले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून काम करत असतांना ५० टक्के हून अधिक आदिवासी भाग कार्यक्षेत्र म्हणून त्यांच्यापुढे पसरलेला असतांना त्यांनी शेती, फळबागा, सिंचन, शिक्षण आरोग्य, अवैध्य वाहतूक, मादक पदार्थांची विक्री, भूजल प्रश्न, चारा, जनावरे, बॉक्साईटच्या खाणी, आदिवासी-जंगल-जमीन एकीकडे तर बहुराष्ट्रीय कंपन्या दुसरीकडे अशा प्रचंड वैविध्यपूर्ण प्रश्नावर मुळापासून काम केले. प्रश्न समजून घेण्यासाठी ते त्या स्थानिक भागात फिरले. स्थानिक बोलीभाषेत त्यांच्याशी संवाद साधला. प्रश्नांच्या दोन्ही बाजू अत्यंत सहजपणे ते मांडतात. 

नक्षलवाद असो कि आदिवासींचे जमीन जंगलाचे अधिकाराबाबताचा प्रश्न असो त्यांचा त्यावरचा अभ्यास लगेच जाणवतो. ते मांडतांना देखील अगदी हळुवारपणे ते त्या प्रश्नात घुसून सर्व बाजू आपल्या पुढे मांडतात. त्यामुळे एकांगी पणा नसतो. उगाचच आरोप- प्रत्यारोप नाही. आक्रस्ताळेपणा नाही. शोमेनशिप नाही.  स्वतःचा उदो उदो नाही त्यामुळे एका प्रशासकीय अधिकाऱ्याच्या प्रत्यक्ष फिल्डवरचे अस्सल अनुभव आपल्याला वाचायला मिळतात. 

नव्याने प्रशासनात येणाऱ्या, आधीच सेवेत असणाऱ्या व ज्यांना आतून प्रशासन काय आहे हे समजून घेण्याची इच्छा असणाऱ्या व प्रशासनावर उठसुठ टीका करणाऱ्या अशा साऱ्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचायला हवे. 

- समाधान महाजन