 |
| इनग्रीड बर्गमन |
कवी ग्रेस, इनग्रीड बर्गमन, रॉबर्तो रोस्सेलिनी व सोनालिनी दासगुप्ता .......
या सर्व व्यक्तींचा काय परस्परसबंध?
तर आहे... अगदी जवळचा आहे.
मला पहिल्यांदा इनग्रीड बर्गमन हे नाव समजले ते कवी ग्रेस यांच्या कविता वाचतांना. तेव्हा ती कोणीतरी पाश्चात्य अभिनेत्री आहे इतके माहित होते. नंतर हळूहळू काही बाबी समजल्या जसे- १९५८ पासून ग्रेस यांनी जेव्हा आपल्या काव्यलेखनाला प्रारंभ केला. त्याच काळात इन्ग्रिड बर्गमन या अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी ग्रेस हे नाव धारण केले.
दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी, "शी इज इन ग्रेस" असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे त्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला, तिचे ऋण आठवत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. संध्याकाळच्या कविता हा १९६७ साली प्रकाशित झालेला त्यांचा पहिला काव्यसंग्रह. हा कवितासंग्रह त्यांनी इनग्रिड बर्गमनला अर्पण केला आहे. त्यात इन्ग्रिड बर्गमन नावाची कविता देखील आहे ज्यात
 |
| कवी ग्रेस |
ते म्हणतात-
"आषाढातील भर्जरी मेघांसारखे पूर्ण ऐहिक डोळे
घेऊन तू आलीस; नेस्तनाबूत झालेल्या या
साथीच्या गावात......"
तर अशी हि इनग्रीड बर्गमन स्वीडिश अमेरिकन अभिनेत्री होती. जिला तीन वेळा ऑस्कर पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार मिळाले होते. माय स्टोरी हे तिचे आत्मचरित्र. तिला चार मुले होते. पीटर लिन्डस्टोर्म हा तिचा पहिला पती. त्यानंतर ती व रॉबर्तो रोस्सेलिनी हे एकमेकांच्या प्रेमात पडले. रॉबर्तो हा एक इटालियन दिग्दर्शक होता. या रोबर्तो रॉसेलिनीची पहिली पत्नी होती मार्शेला द मार्शी. तो तिच्यापासून दूर होऊन बर्गमनच्या जवळ गेला.
 |
| रॉबर्तो रोस्सेलिनी |
हा इटालियन दिग्दर्शक भारतात एक डॉक्युमेंटरी तयार करण्यासाठी येतो व येथील एक भारतीय बंगाली गृहिणी सोनालिनी दासगुप्ता हिच्या प्रेमात पडतो. ते दोघे अनेक वर्ष एकत्र राहतात. या सर्व प्रकरणावर दिलीप पाडगावकर यांनी 'under the spell' हे पुस्तक लिहिले होते. पाडगावकर हे रोस्सेलिनीला भेटलेले होते. त्यांचे हे इंग्रजी पुस्तक 2010 मध्ये सुजाता देशमुख यांनी मराठीत केले व राजहंसने ते 'तिची मोहिनी' या नावाने प्रकाशित केले. ग्रेस सोडून उर्वरित सर्व माहिती या पुस्तकात येते. ग्रेसचा संदर्भ खास अस्मादिकाचा!
 |
| रोस्सेलिनी व सोनालिनी दासगुप्ता |
रोस्सेलिनीने भारतात येऊन जो चित्रपट तयार केला तो म्हणजे "इंडिया:मातृभूमी". हा चित्रपट कांस चित्रपट महोत्सवात झळकला 9 मे 1959 रोजी. पाडगावकरांनी पुस्तकात रोस्सेलिनीच्या चित्रपट निर्मितीचा सखोल आढावा घेतला आहे. एका परकीय दिग्दर्शकाच्या कॅमेऱ्यातून भारताकडे बघण्याचे अनेक angles दिसतात. तो भारत म्हणजे नुकतेच स्वातंत्र मिळून आठ दहा वर्ष झालेला भारत असतो. हिराकूड धरणाच्या राष्ट्रसमर्पणाच्या कार्यक्रमासाठी रोस्सेलिनी स्वतः नेहरुंसोबत विमानात असतो. पाण्यात गेलेल्या शेतजमिनीला पाहून विमनस्क झालेले नेहरू तो टिपतो. भारतातल्या अनेक लहान लहान बाबी तो चित्रित करतो. त्यात त्याची ओळख आधी हरी दासगुप्ता यांच्याशी होते व नंतर त्यांची पत्नी सोनालिनी हिच्याशी.
सोनालीनी दासगुप्ता बंगालच्या प्रसिद्ध घराण्यातील एक स्री. तिचे काका म्हणजे प्रसिध्द चित्रपट निर्माते व दिग्दर्शक बिमल रॉय. टागोरांच्या शांतीनिकेतन मध्ये तिचे सहा काका मामा शिकवायला होते. लहानपणीच नेहरूंची तिची ओळख झाली होती. सत्यजित रे यांच्यमुळे हरी दासगुप्ता यांची सोनालिशी शांती निकेतन मध्ये भेट झाली होती. नंतर दोघांचे लग्न झाले.
चित्रपट निर्मितीच्या काळात रोस्सेलिनी सोनालिनीच्या प्रेमात पडले. या प्रकरणाची सगळीकडे चर्चा व्हायला लागली. त्या काळात आतासारखा मिडिया नव्हता. पण जो होता तोहि कमी नव्हता. या प्रकरणावर सगळीकडे प्रचंड टीका व्हायला लागली. फिल्मिडिया चे बाबुराव पटेल यांनी अत्यंत विखारी भाषेत या प्रकरणाचा समाचार घेतला. ते जात्याच नेहरू विरोधी असल्याने याचे धागेदोरे त्याने नेहरूंच्या पाश्चात्य धोरणावर नेऊन ठेवले.ब्लीट्झचे आर के करंजिया यांनी देखील असाच लेख लिहिला.
यानंतर विदेशात असताना बर्गमनने पंतप्रधान पंडित नेहरू यांची भेट घेऊन रोझेलिनीला भारतातून त्याने शूटिंग केलेल्या रीलांसहीत येऊ देण्याची विनंती केली जी नेहरूंनी मान्य केली. बर्गमन, रोस्सेलिनी व सोनालिनी या सर्वांसोबत नेहरूंची ओळख होती. या सर्व प्रकरणात केंद्र स्थानी असलेल्या सर्व व्यक्ती आपआपल्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर होत्या त्यामुळे या प्रकरणाची चर्चा भारतातच नाही तर अमेरिका युरोप आदी प्रदेशातही होत होती. चित्रकार एम एफ हुसेन यांनी रोस्सेलिनीची पाठराखण केली. सोनालीने भारतातून बाहेर जातांना सुरक्षिततेसाठी हुसेन यांची बायको सौ हुसेन या नावाने प्रवास केला होता हे विशेष.
नौदल अधिकारी नानावटी ज्यावर अलीकडे अक्षयकुमारचा रुस्तम नावाचा चित्रपट आला होता. त्याची बायको सिल्व्हिया जी जन्माने ब्रिटिश होती. ती ज्या प्रेम आहुजाच्या प्रेमात पडते तो आहुजा रोस्सेलिनीचा चांगला मित्र होता. या प्रकरणावर 'अपराध मीच केला' हे नाटक प्र के अत्रे यांनी लिहिले होते. जे त्या काळात तुफान चालले होते.
१९५७ ला सुरू झालेले हे प्रकरण १९७४ ला संपले जेव्हा रोस्सेलिनीने सिल्व्हिया या त्याच्या नवीन मैत्रिणींशी लग्न केले. तत्पूर्वी त्याने इनग्रीड बर्गमन सोबत १९६२ मध्ये घटस्फोट घेतला होता. सोनालिनी व रोस्सेलिनी यांना दोघांची दोन मुले होती जील व राफाएला.
.jpg) |
| रोस्सेलिनी व बर्गमन |
जून 1977 ला रोस्सेलिनीचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तेव्हा त्याची पहिली बायको त्याच्या सोबत होती.
ऑगस्ट १९८२ मध्ये इंग्रिड बर्गमन चे निधन झाले.
ऑगस्ट १९९६ मध्ये हरी दास गुप्ता वारले.
या कहाणीचा असा अंत होत गेला.
इथे बर्गमनच्या प्रभावात असलेल्या ग्रेस यांच्या तिच्यावर लिहिलेल्या पुढील ओळी आठवतात-
"तसे माझ्या झोळीत काही नाही; ......
फक्त एवढेच : नि;शब्द भासांच्या काठाला लटकलेले
हे स्टेशन आणि संवेदनांच्या आवर्तांना झुगारून,
कोण्या मावळत्या संताला तू दिलेले
एकाकी आलिंगन ..... "
या ओळी लिहितांना 1967 मध्ये ग्रेस यांच्यासमोर कोण असेल?
बर्गमन कि सोनालिनी ?
कि रोस्सेलिनी कि हरी दासगुप्ता? ....
कि स्वतः ग्रेस.... ?
कविता अमर असतात त्या अशा ....
- समाधान महाजन