थाळनेर हे गाव धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात येते. आजूबाजूला असलेल्या गावांसारखे एक गाव ते आता दिसत असले तरी एकेकाळी मात्र हे गाव खानदेशची राजधानी होते. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात एमए करत असतांना प्रथम वर्षाला आम्हाला खांदेशाचा इतिहास हा एक पेपर होता. त्यावेळी पहिल्यांदा समजले की या प्रदेशाला देखील स्वतःचा असा इतिहास आहे. तोपर्यंत फक्त जो इतिहास पाठ्यपुस्तकात आहे व जो स्पर्धा परीक्षांमध्ये आहे तोच इतिहास आम्हाला माहिती होता. म्हणून मग खानदेशच्या इतिहासावरील उमवि मधील एमएचे पुस्तक वाचतांना एकदम उत्सुकता वाढत गेली की किमान येथील महत्वाच्या स्थळांना आपण भेट दिली पाहिजे. ते बघितले पाहिजे. त्यांचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. त्यातून आज 21 ऑगस्ट रोजी आम्ही थाळनेर येथे जाण्यास निघालो.
यावेळी माझ्यासोबत होते, इतिहासकार डॉ. रनसिंग परदेशी सर व माझे एमएचे सहकारी तुषार सोनवणे सर. शिवाय तिथे गेल्यावर थाळनेर कॉलेजला शिकविणारे इतिहासाचे प्राध्यापक बोरसे सर देखील तिथून आम्हाला जॉइन झाले. रनसिंग परदेशी सरांचा स्ट्रॉंग पॉइंट मध्ययुगीन इतिहास हा आहे. त्यांनी राजपूत राजे/राज्य व महाराष्ट्र याच्यातील सबंधांवर चार-पाच पुस्तके देखील लिहिली आहेत व अजून तितक्याच पुस्तकांवर त्यांचे काम सुरू आहे. मुळात थाळनेर देखील मध्ययुगीन इतिहासाचा एक महत्वाचा भाग होते. म्हणजे अत्यंत योग्य व्यक्ति योग्य ठिकाणी आमच्या सोबत होती.
खांदेशात फारुकी घराण्याची स्थापना कशी झाली हे सांगतांना फरीश्ता त्याच्या गुलशन-ई-ईब्राहिमी या पुस्तकात म्हणतो, मलिकराजाचे पूर्वज दिल्लीच्या दरबारात अल्लाउद्दीन खिल्जी आणि मुहम्मद तुघलकाच्या कारकिर्दीत प्रतिष्ठित सरदार असून त्यांनी मानाचे स्थान प्राप्त केले होते. मलिक राजाला फिरोजशाह तुघलकने आपले शरीररक्षक म्हणून नियुक्त केले होते.
फिरोजशाहला शिकारीची फार आवड होती. तो गुजरातच्या जंगलमय इलाख्यात आपल्या छावणीपासून 14 कोस अंतरावर शिकारीसाठी गेला. बादशाहबरोबरील इतर सर्व सेवक कंटाळून छावणीत परत आले. मलिक राजा मात्र शेवटपर्यन्त बादशाह बरोबर राहिला होता. त्यामुळे मलिक राजावर बादशाह खुश झाला. दिल्लीत परतल्यावर बादशाहने दरबार भरवून मलिक राजास दोन हजारी मनसब व थाळनेर आणि करवंद हे प्रदेश जहागिरी म्हणून दिले. फेरीश्ताणे फारुकी घराण्याचे सातशे पस्तीस वर्षात एकूण 16 बादशाह झाल्याचे नमूद केले आहे. शाह शमसुद्दीन यांनी फारुकी घराण्यात 27 बादशाह झाल्याचे आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. 1370 ते 1601 असे सुमारे 231 वर्ष फारुकी घराण्याची सत्ता खांदेशात होती.
खानदेशच्या इतिहासावर भरपूर लिखाण करणारे प्रा. डॉ.जी.बी.शाह यांच्या एका पुस्तकात फारुकी घराण्याची स्थापनेची एक वेगळी कहाणी देखील देण्यात आली आहे त्यानुसार फारुकी घराण्यातील कोणी पूर्वज दक्षिणेतील राज्यात लष्करी सेवेत होता. लष्करात सेवा करतांना काही कारणाने तो नाराज झाला आणि खानदेशमध्ये आला. यावेळी खानदेशमध्ये विविध राजे व सरदार यांचे राज्य होते. तो एका गावात पोहचला हे गाव मात्र त्याला आवडले. या गावात त्याच्याबरोबर असलेल्या कुत्र्याला एक ससा दिसला. कुत्र्याला ससा दिसताच कुत्र्याने सशाचा पाठलाग केला. परंतु थोड्याच वेळात त्या सशाने कुत्र्याच्या पाठीमागील बाजूने कुत्र्यावर आक्रमण केले. सशाचे हे साहस पाहून त्या सैनिकाला आश्चर्य वाटले व त्याने विचार केला की ज्या भूमीवर असे अद्भुत व साहसी दृश्य दिसते ती भूमी साहस आणि शौर्याची प्रतीक असली पाहिजे. असा विचार करून त्याने तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्याने ही गोष्ट तेथील वतनदाराला सांगितली. पण त्याने त्या गोष्टीला नकार दिला. तेव्हा त्याने दिल्लीला जाऊन थाळनेर आणि करवंद हे दोन्ही परगणे दिल्लीचा सुल्तान फिरोजशाह तुघलक याच्याकडून 1370 मध्ये जहागिरी म्हणून मिळविले. ही जहागिरी मिळविणार्या व्यक्तीचे नाव होते मलिक राजा खान व घटना जेथे घडली त्या गावाचे नाव होते थाळनेर. तर असो, फारूकींच्या स्थापनेची कहाणी काहीही असली तरी सत्य हे आहे की त्यांची व पर्यायाने खानदेशाची पहिली राजधानी ही थाळनेर होती हे नक्की.
खानदेश Gazetteer- 1880 मध्ये असा उल्लेख आहे की, स्थानिक अनुदानानुसार 12 व्या शतकाच्या सुरूवातीला (1128) while the country for twenty miles round was without a light,' and twenty -seven of its forts were deserted, Thalner prospered under Javaji and Govaji.
मलिक राजा फारुखी या पहिल्या राजाने बस्तान थाळनेर येथे बसल्यानंतर त्याने साम्राज्याचा विस्तार करण्याचे ठरवले. गुजरातच्या सुलतांनांच्या ताब्यात असलेला सुलतानपुर आणि नंदुरबारच्या प्रदेशावर आक्रमण करण्याचे धाडस त्याने केले. पण हे आक्रमण निष्फल ठरले. पुन्हा वापस थाळनेर येथे येऊन त्याने गुजरातच्या सुल्तानाशी वाटाघाटी करून तह केला.
मलिक खान हा 1399 मध्ये मरण पावला. त्याला दोन मुले होते पैकी जो इफ्तिकार नावाचा जो लहान मुलगा होता त्याला थाळनेरचा किल्ला व त्या सभोवतालचा प्रदेश दिला. तर मोठा मुलगा नसीरखान याला लळींगचा किल्ला व त्या सभोवतालचा प्रदेश दिला. नसीरखान हा महत्वकांक्षी राजा होता. त्याने गैरमार्गाचा वापर करून असा आहीर याच्या ताब्यातील असिरगडचा किल्ला घेतला व आपले राज्य मजबूत केले. त्यानंतर थाळनेर येथे असलेला त्याचा लहान भाऊ इफ्तीकार याच्यावर 1417 मध्ये आक्रमण केले. लहान भावाचा पराभव करून त्याला कैद केले व असीरगडच्या किल्ल्यात बंदिस्त ठेवले. त्याच्यानंतर 1511 आणि 1566 या दोन्ही वर्षात पुन्हा गुजरातचा सुलतान व खानदेशचा सुलतान यांच्यामध्ये युद्ध झालेली दिसतात. 1600 मध्ये सम्राट अकबराने खानदेशच्या फारुकी घराण्याचा शेवटचा राजा बहादुरशाह फारुकी याचा पराभव केला. आणि थाळनेरचा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला.फारुकी राजांच्या कबरी – असा हा फारुकी राजांचा इतिहास पाहिल्यानंतर या गावात त्यांच्या आज रोजी
अस्तित्वात असलेल्या कबरी या कोणाचेही लक्ष वेधून घेतील अशा आहेत. तिथे आता संपूर्ण परिसराला तारेचे कंपाऊंड केलेले आहे. आत प्रवेश करताच एका उंच चौथार्यावर चार मोठे घुमटाकार वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. या चार कबरी मलिकराजा, नासिरखान, मिरन आदिलखान आणि मुबारीक खान यांच्या आहेत. या सर्व कबरींमध्ये मिरन मुबारकखान याची कबर आकाराने सर्वात उंच मोठी व भव्य आहे. त्याच्या महान कारकीर्दीचा उल्लेख त्याच्या थडग्यावरील शिलालेखात दिसतो.
फारूकींच्या या वास्तू त्यांच्या सांस्कृतिक कलेची प्रतीके आहेत.
या कबरिंची काही वैशिष्ट्य अशी आहेत –
1) लांब, चौरसाकृती चौथार्यावर एकावर एक असे तीन चौथरे आणि तिसर्या चौथार्यावर मुख्य वास्तूची केलेली उभारणी.
2) चौकोनी वास्तूच्या छतावर भव्य, उंच परंतु पसरट असा टेकवलेला घुमट. मांडूच्या होशंगशाहच्या थडग्यावरील इमारतीप्रमाणेच ही इमारत असून घुमटाच्या वजनाचा भार एकाच ठिकाणी पडू नये म्हणून वास्तूच्या आकाराएवढा पसरट घुमट बनवून तो इमारतीवरील सर्व भागावर विखुरलेला आहे. तसेच घुमटाच्या वजनाचा भार सभोवार तोलला जावा म्हणून इमारतीचा दर्शनी भाग अत्यंत उंच व भव्य केला आहे.
3) इमारतीच्या आरंभीच्या भागात एक मुख्य दरवाजा आणि बाजूच्या खिड्कींसाठी मोकळी व विस्तृत जागा.
4) इमारतीच्या वरील बाजूस काढलेले सजजे व पागोळया हे फारूकींच्या थडग्याचे आणखी एक वैशिष्ट्य मानावे लागेल. इमारतीचा आरंभीचा भाग आणि छताच्या बाहेर काढलेल्या पागोळया (सज्जे) व घुमटाचा दर्शनीय भाग इत्यादींवर असलेल्या वरवंडी (लहान भिंती) हेही एक वैशिष्ट्य.
5) थडग्याच्या छतावरील चारही कोपर्यात लहान लहान आकारांचे बुरूज असून ते इमारतीवरील मुख्य घुमटाला शोभून दिसणारे आहेत.
6) कबरीच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी अरबी व पर्शियन भाषेत कोरलेला शिलालेख हे मिरन मुबारक खानच्या थडग्याचे वैशिष्ट्य मानावे लागेल.
थाळनेर येथील स्थापत्य कलेवर अरबी स्थापत्य शैलीचा प्रभाव जाणवतो. कारण अरबी स्थापत्य शैलीप्रमाणे राजाच्या कबरीवर शिलालेख कोरण्याची पद्धत फारुकी सुल्तंनांनी उचललेली दिसते. येथील राजांच्या कबरीच्या वास्तू या इंडो-इस्लामिक शैलीचे नमुने मानले जातात. तरी त्यांच्यावर हिंदू कला व सौंदर्याचा प्रभाव पडलेला जाणवतो. अनेक ठिकाणी कमळ व तोरणाची नक्षी वापरली आहे. एकूण फारूकींच्या स्थापत्य शैलीवर हिंदू, अरब व मुस्लिम शैलीचा प्रभाव असल्याचा दिसतो.
या मोठ्या कबरीच्या शेजारी खाली एका ठिकाणी वीस-बावीस छोट्या कबरी व पलीकडे मेहरब आहे. समोर अजून
नंतरच्या काळातील काही दोन-तीन कबरी आहेत. गावाच्या जवळच हा सर्व परिसर आहे. तेथून आम्ही नदीच्या जवळ असलेल्या थाळनेर या किल्ल्याकडे निघालो.
थाळनेर किल्ल्याची निर्मिती- 1370 मध्ये हा मलिक राजा थाळनेर येथे आला आणि त्याने खानदेश मध्ये फारुकी घराण्याचे राज्य स्थापन केले. तसेच थाळनेर ही आपल्या राज्याची राजधानी म्हणून जाहीर केली. कारण थाळनेरचा किल्ला हा राज्य संरक्षणाच्या दृष्टीने भक्कम व अभेद्य असा किल्ला होता. पर्सि ब्राऊन या किल्ल्याचा उल्लेख बादशाही किल्ला म्हणून करतो. हा किल्ला तापी नदीच्या किनारी बांधला आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला तापी नदीचा अर्ध चक्राकार प्रवाह वाहतांना दिसतो. आजही पावसाळ्यात किल्ल्याच्या वर जाऊन
पाहिले तर नदीच्या बाजूचे अत्यंत विहंगम दृश्य तिथे दिसते. या किल्ल्याच्या भिंतीची ऊंची सुमारे 60 फुट असून
या किल्ल्यातील सगळ्या तोफांचा मारा बहुतेक पूर्वेच्याच बाजूला आहे. कारण पश्चिमेच्या बाजूला तापी नदीचे खोल पात्र आहे तसेच उत्तर आणि दक्षिण या दिशांनी तुटलेले कडे आहेत यामुळे तिन्ही बाजूला किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण मिळाले आहे.
मोगलांनंतर हा किल्ला मराठा काळात पेशव्यांच्या ताब्यात गेला. तेव्हा त्यांनी तो इंदोरच्या होळकरांना सरंजाम म्हणून दिला होता. 1800 च्या दरम्यान तो निंबाळकरांच्या देखरेखीखाली होता. काही वर्षांनी तो पुन्हा होळकरांच्या ताब्यात गेला. मंदसोरचा तह होईपर्यंत तो त्यांच्या ताब्यात होता.
आता मात्र या किल्ल्यावर कोणतीही जुनी इमारत अस्तित्वात नाही. एक देवीचे छोटेसे मंदिर म्हणून आहे पण ती मूर्ति जुनी असली तरी मंदिर मात्र नवे वाटते. पर्यटन विभागाकडून इथे आलिकडे छोटी तटबंदीची किनार बांधलेली दिसते तसेच पायर्या देखील केलेल्या आहेत. किल्ला उंचावर आहे त्याच्या सपाट पृष्टभागावरून आजही खूप लांब पर्यंतचा प्रदेश दिसतो. जेव्हा इथे मोठ्या इमारती असतील तेव्हा तर खूप मोठा प्रदेश नजरेच्या टप्प्यात येत असेल. या ठिकाणी किल्ल्याच्या बाजूला तापी नदी वाहते. तिच्या U आकाराचे वळण गळ्यातील हारासारखे सुंदर दिसते. अजूनही खूप प्रमाणात विकास या ठिकाणी झाला पाहिजे असे वाटते.थाळनेरचे आर्थिक व सांस्कृतिक महत्व - तापी नदीमुळे या प्रदेशातील जमीन सुपीक होती. त्यामुळे शेतीचे उत्पन्न चांगले होते. तसेच थाळनेर हे सूरत ते बरहानपुर या महत्वाच्या व्यापारी मार्गावर वसलेले होते. पावसाळ्यात थाळनेर येथे येणार्या व्यापार्यांना व प्रवाशांना आश्रय घेता येई. थाळनेर अर्थात खानदेशमधील व्यापार्यांचे सबंध दौलताबाद, हैदराबाद, अहमदनगर, विजापूर इत्यादि विविध शहरांशी फार पूर्वीपासून होते. थाळनेरचा सांस्कृतिक सबंध माळवा-गुजरातशी आला होता. 1660 मध्ये टर्विनियर या परदेशी प्रवाशाने थाळनेरच्या प्रदेशातून प्रवास केला. सूरत-बरहानपूर मार्गावरील थाळनेर हे व्यापाराचे प्रमुख केंद्र असल्याचा उल्लेख तो आपल्या प्रवास वर्णनात करतो. थाळनेरचे भौगोलिक, सांस्कृतिक व व्यापारी महत्व ओळखून मलिक राजाने खानदेशची राजधानी म्हणून त्या ठिकाणाची निवड केली.
1857 चा उठाव व थाळनेर – होळकर व ब्रिटीशांचे युद्ध 1817 मध्ये झाले. ब्रिटीशांचे नेतृत्व जॉन माल्कम व थॉमस हीस्लोप हे करत होते. त्यांनी मराठा लष्कराचा पराभव करून होळकरांशी 21 डिसेंबर 1817 रोजी एक तह केला. यानुसार होळकरांना खानदेशमधील सर्व मुलुख ब्रिटीशांच्या स्वाधीन करावा लागला. उत्तरेकडील सेंधव्याकडून
येणार्या सर थॉमस हिसलोप आपल्या सैन्यासह 27 फेब्रुवारी 1818 रोजी थाळनेर परिसरात दाखल झाला. त्याने किल्लेदार तुळशीराम मामास शरण येण्यासबंधी निरोप पाठविला पण तेथील किल्लेदार तुळशीराम मामाने यास नकार दिला. आहे तितक्या सैंनिकांसह व सामुग्रीसह त्याने किल्ला लढविण्यास सुरुवात केली. अखेर मुख्य किल्लेदार इंग्रजांच्या हाती आला. त्याला ब्रिटीशांनी 27 फेब्रुवारी 1818 रोजी सर्वांसमोर फाशी दिली. तुळशीराम मामा हा खानदेशमधील पहिला हुतात्मा ठरला. की ज्याने ब्रिटीशांना खानदेशमध्ये पाऊल टाकताच प्रथम विरोध केला. या तुळशीराम मामांच्या घराण्यातील वाड्याची जुनी मध्ययुगीन वास्तू अत्यंत देखणीय आहे. लाकडी बांधकाम या ठिकाणी आहे. जुन्या विटांचा बुरूज आहे. जुन्या काळातील रंग अजूनही फ्रेश आहेत. यानंतर आम्ही या तुळशीराम मामांचे वंशज असलेल्या नरेंद्रसिंह जमादार यांच्या घरी गेलो. डॉ. परदेशी सरांच्या ओळखीमुळे ते शक्य झाले. त्यांनी देखील बराच वेळ आम्हाला त्यांना माहीत असलेला इतिहास सांगितला.
एकूण खानदेशची राजधानी असलेल्या थाळनेरचा इतिहास उज्ज्वल आहे. गरज आहे त्या ऐतिहासिक वास्तू टिकविण्याची व त्यांचा इतिहास जतन करून पुढील पिढ्यांकडे पोहचविण्याची.
- समाधान महाजन
थाळनेर विषयीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खालील you tube link वर क्लिक करा.
https://youtu.be/v1UJxhW3zIY
संदर्भ पुस्तके-
1) खानदेश Gazetteer(1880)
2) खानदेशचा राजकीय व सांस्कृतिक इतिहास - प्रा. डॉ. टी. टी. महाजन
3) उपेक्षित दुर्गांचा इतिहास - प्रा.डॉ.जी.बी.शाह
3) मध्ययुगीन खानदेशचा इतिहास - प्रा.डॉ.जी.बी.शाह
4) गुलशन-ई-ईब्राहिमी - फरीश्ता (मराठी अनुवाद - कॅ.डॉ.भ.ग.कुंटे)
5) यशार्थ - धुळे जिल्हा डिजिटल ई -साप्ताहिक (दिनांक -20 मे 2018)
















