अलीकडेच दशोराज्ञ नावाचे पुस्तक वाचण्यात आले. यूपीएससी चा अभ्यास करतांना इतिहासाच्या अभ्यासक्रमात या युद्धाचा थोडक्यात परिचय झाला होता. थोडक्यात यासाठी की या युद्धाबद्दल उपलब्ध असलेली माहिती मुळातच फार कमी आहे. ऋग्वेदातील काही ऋचा हा मूळ स्रोत व तदनंतर च्या साहित्यात आलेले काही त्रोटक संदर्भ वगळता ना विषयाबद्दल काही पुरातत्त्वीय संदर्भ स्थळ प्राप्त होते न काही लिखित संदर्भ.
परीक्षेमध्ये देखील याबाबत येणारे प्रश्न फिक्स असतात. दशोराज्ञ युद्धात कोण कोणात झाले व यात कोणता पक्ष जिंकला....
सुदास राजाचा पूर्वीचा पुरोहित विश्वामित्र त्याच्याच विरोधात दहा राजांचा संघ तयार करतो तरी देखील सूदास या सर्वांना हरवितो या वेळी त्याचे पुरोहित वशिष्ठ असतात.
या थीम वर डॉ. क्षमा शेलार यांनी एक पूर्ण कादंबरी लिहिली आहे, नव्हे जिवंत केली आहे. मुळात वैद्यकीय व्यवसायात असताना देखील अशा विषयावर समरसून लिहिणे हे कौतुकास्पद आहे. आधी सांगितल्या प्रमाणे संदर्भ साधने कमी असताना देखील डॉ. क्षमा शेलार यांनी ज्या पद्धतीने एकूणच कादंबरीची रचना केली आहे, मूळ विषयाला प्रवाहित ठेवत त्याला काही समांतर प्रवाह जोडणे व एकूणच उत्कंठा वाढवित नेने हे अगदी छान जमून आले आहे. वैदिक काळ उभा करतांना त्या काळची भाषा, शब्दकळा अगदी समर्पक वापरण्यात आलेली आहे. ते वातावरण आपल्या डोळ्यापुढे उभे राहते.
अशा वेगळ्या विषयावरील कादंबरीचे वाचून नक्कीच स्वागत केले पाहिजे.

No comments:
Post a Comment