बाबासाहेब धुळे शहरात आले असता त्यांनी शहरातील विजयांनद चित्रमंदिरामध्ये जाहीर सभा घेवून दलित जनतेला मार्गदर्शन केले. धुळ्यातील असंख्य कार्यकर्त्यांसह लळींग येथील विश्वासू सहकारी अण्णासाहेब पुनाजी लळींगकर यांना भेटायला गेले. त्यांच्या घरीच भोजन करून लांडोर बंगल्यावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी करण्यात आल्या. या तीन दिवसांच्या मुक्कामात बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांना, समाजाला आणि महिलांना उपदेश व मार्गदर्शन केले.
याच काळात त्यांनी धुळे शहरातील गरूड वाचनालयाला भेट दिली आणि इतिहासाचार्य राजवाडे संशोधन मंडळाला देखील भेट देऊन अभिप्राय नोंद केला आहे. त्याचा आजही संग्रह आहे. आण्णासहेब लळींगकरांची बहिण कृष्णाबाई यांनी स्वरचित अहिराणी गीते गावून तर तालुक्यातील नरव्हाळचे दिवंगत रतन जाधव या शाहीराने आपल्या शाहिरीतून बाबासाहेबांचे मनोरंजन केले. दि.१ ऑगस्टला बाबासाहेब मुंबईला परत जाताना आण्णासाहेब लळींगकरांना तात्कालीन धुळे जिल्ह्यातील तालुका असलेल्या नंदुरबार या आदिवासी असलेल्या गावी जावून शैक्षणिक कार्य करण्यास सांगितले. त्यानंतर लळींगकर यांनी नंदुरबार शहरात जिल्ह्याचे तत्कालीन धुळे जिल्हाधिकारी कॅप्टन कुऱ्हे यांच्या हुकुमाने साक्री नाका परिसरात पातळगंगा नदीकिनारी जागा मिळवली होती. आणि त्याठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी छात्रालयाची स्थापना करण्यात आली होती. अण्णासाहेब लळिंगकर यांनी अत्यंत जिद्दीने आंबेडकरी चळवळ चालवली होती. ते काही वर्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अंगरक्षक म्हणून देखील राहिले होते. बाबासाहेबांच्या पावनस्पर्शाने पुनीत झालेल्या या लांडोर बंगल्याच्या वास्तुस भेट देण्यासाठी असंख्य पर्यटक येतात. ३१ जुलै रोजी लळिंग जवळील या लांडोर बंगला परिसरात दलित बांधवांचा मेळावा भरतो. विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
वन विभागाने अत्यंत सुंदर पद्धतीने या बंगल्याची निगा तर राखलीच आहे पण त्याचसोबत बंगल्याच्या आजूबाजूचा परिसर देखील खूप चांगल्या प्रकारे विकसित करण्यात आला आहे. या ठिकाणी वन विभागाची जी मंडळी आहे ती अत्यंत आस्थेने व काळजीपूर्वक सर्व निगा राखत असल्याचे दिसते तसेच तितक्याच तळमळतेने लोकांना ही सर्व माहिती व्हावी अशी त्यांची धडपड असते.
डॉ.बाबासाहेबांनी ज्या दिवाण / बेडवर विश्राम केला होता. तो बेड देखील जतन करण्यात आलेला आहे. तसेच अलीकडे त्याच खोलीत बाबासाहेबांचा एक सुंदर अर्धकृती पुतळा देखील बसविण्यात आलेला आहे. लगतच्या उर्वरित दोन खोल्या रिकाम्या आहेत. अशी अपेक्षा आहे या ठिकाणी बाबासाहेबांच्या ग्रंथाचे व त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचं एक संग्रहालय करण्यास हरकत नाही तसेच त्यांचे त्या काळातील धुळे भेटीचे व इतर छाया चित्र देखील लावले तर ते अधिक चांगले होईल.
याच बंगल्याच्या परिसरात पावसाळ्यात अत्यंत रमणीय वातावरण असते. आज माझ्यासोबत मित्रवर्य श्री मनजीत सिंग चव्हाण ( PI, ACB धुळे) व श्री योगेश सोनवणे ( शिक्षक) हे होते. या ठिकाणी अत्यंत दुर्मिळ वनस्पतींचे एक राखीव उद्यान बनवलेले आहे तसेच विविध प्रकार असलेले एक कॅक्ट्स गार्डन देखील बनविण्यात आले आहे.
बाबासाहेबांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या स्थळास एकदा नक्की भेट द्या.
- समाधान महाजन



नावीन्यपूर्ण व छान माहिती.
ReplyDeleteThanx
Deleteअविस्मरणीय अनुभव ...
ReplyDeleteहोय... धन्यवाद.
Deleteवावा खुपच छान माहिती मिळाली! खुप सारे धन्यवाद सर! या ठिकाणी कसे पोहोचायचे याची माहिती मिळाली तर फार मदत होईल.
ReplyDeleteधन्यवाद... धुळे मालेगाव रोडवर लळिंग किल्ल्याच्या खालच्या बाजूला हा बंगला आहे. धुळ्यापासून जवळ आहे.
Deleteबाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणीच एक पान आपण उलगडून दाखवल... सुंदर सर
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteखूपच छान..लांडोर बंगाला ऐकून होतो पण इतिहास आज समजला
ReplyDeleteधन्यवाद...
Deleteधन्यवाद सर!
ReplyDeleteआपल्या लेखणीतून हा अज्ञात ठेवा आम्हा इतिहासप्रेमींना गवसला!
खूप छान शब्दांकन! 💐💐💐💐
धन्यवाद...
Delete