अंतुर किल्ला


अंतुर किल्ल्यावर जायचा विचार अनेक  दिवसांपासून सुरू होता. अजंठा सातमाळ डोंगर रांगेतील कन्नड तालुक्यात (जिल्हा - औरंगाबाद) हा किल्ला येतो. अखेर  काल त्याला मुहूर्त मिळाला. खर तर जवळचा रस्ता कन्नड - पिशोर - नागापूर मार्गे होता पण आम्ही जळगाव वरून जात असल्यामुळे पाचोरा - भडगाव - नगरदेवळा - नागद मार्ग आम्ही निवडला. 
किल्ला बघणे व ट्रेकिंग करणे या दोन्ही बाबींचा आनंद या प्रवासात घेता येतो. बेसिकली एक छोटी चूक आमच्याकडून अशी झाली की मुळात जळगाववरुन निघतांना आम्हाला थोडा उशीर झाला त्यामुळे किल्ल्याच्या रस्त्याला लागलो तेव्हा ऑक्टोबर हीटचे भर दुपारचे बारा वाजलेले होते. (सकाळी आठ किंवा नऊ वाजता जर सुरुवात केली तर ते छान राहील, शिवाय ज्यांना कुटुंबासह किल्ला पाहायचा असल्यास त्यांनी नागापूर मार्ग निवडल्यास उत्तम जो जरा जवळ आहे व सोपा आहे.)
आम्ही सर्व मिळून सात जन होतो. नागदच्या पुढे एका गावाजवळ दोन्ही गाड्या लावल्या व पुढील पायी प्रवासास आम्ही सुरुवात केली. ग्रुप असला की अशा ट्रेकिंगला मजा येते. अनेक गमती जमती सुरू असतात. चालायला लागलो तेव्हा किल्ला नजरेच्या अगदी टप्प्यात होता. पण पायांना काय माहीत  तो टप्पा गाठण्यासाठी आज त्यांचा बळी जाणार होता. त्यानंतर जे आठवते ते इतकेच की आम्ही फक्त चालत होतो. काही अंतराने बसत होतो. भरपूर पाणी पीत होतो.  सतत लागणाऱ्या चढावांमूळे त्यातल्या त्यात एक  घायाळ झालेल्या जवानाला धीर देत होतो की," बस आलाच किल्ला. इथून आता तिरपा रस्ता आहे व थोडे पुढे गेले की किल्ल्याचा दरवाजा लागतो" 

या इतक्या मानसिक आधारावर (की अत्याचारावर?😜)  विश्वास ठेऊन   (दुसरं ते करणार तरी काय?...अब सफर इस मुकाम तक पहुंच गया था जहा से जिंदगी के मायने भी धुंधले लगने लगे थे 🤩)  त्यो गडी बी मग असल नसल ती ताकद एकवटून अखेर चढून च गेला....अन नंतर त्याच्या पायांनी टप टप उतरून बी गेला.... पण ते मानसिक आधार देण्याचे क्षण इतक्या उन्हात बी सावली सारखे अनेक वर्ष टिकून राहतील हे नक्की. 



यातला आमचा एक जवान हा किल्ला चौथ्यांदा चढत होता. पण मायला गम्मत अशी की, दरवेळी तो वेगवेगळ्या मार्गाने चढल्यामुळे एकाच किल्ल्याकडे जाण्याच्या चार आठ  वाटा तो एकच वेळी सांगत होता व दरवेळी, समोर दिसणाऱ्या किल्ल्याकडे बोट दाखवून "हा काय किल्ला.... इथच तर हाये" ... अस सांगत असल्यामुळे......" आठशे खिडक्या नऊशे दार..." असा प्रकार वाटत होता. शाहिस्तेखानाच्या फौजेला पुण्यातून चकवून दुसऱ्या मार्गाने काढणाऱ्या महाराजांच्या सैन्यातील मोहिमेचे नेतृत्व याच जवानाने मागील जन्मी तर केले नव्हते ना असा विचार क्षणभर चमकुन गेला..... पण मग आमच्यातील एकाने ज्या पद्धतीने लाल भडक जंगली गोम एक झटक्यात त्यांच्या बॅगेवरून झटकून  दिली त्याच वेगाने मी देखील  तो विचार क्षणात झटकून काढला. 

आता आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलो होतो की  किल्ला अगदी  आमच्या समोर होता व त्याच पतलात समोर आम्ही होतो....एक दगडांचे सपाट मैदान व एक दाट झाडीतून शेवटचा चढाव इतकेच राहिले होते.  पुन्हा एकदा  घायाळ झालेल्यांना, " हा काय किल्ला इथच.." अशी उभारी देवून चालायला सुरुवात केली.  
चालता चालता अजून एक बाब लक्षात आली की, आपण ट्रेकिंग करतांना स्थानिक लोक काय म्हणतात ते ऐकले पाहिजे किंबहुना आपणच त्यांना विचारले पाहिजे. कारण बरीच आपल्याला नसलेली माहिती ते सांगू शकतात. व ट्रेकिंग चा रस्ता  ठरवणे... स्पीड व टाइम यांचा अंदाज येतो व त्यानुसार आपण आपले नियोजन करू शकतो. आम्ही निघालो तेव्हा रस्त्याने भेटलेल्या एक दोन म्हातारबाबांनी आम्हाला डाव्या बाजूची टेकडी आधी चढून घ्या असे सुचवले होते पण आम्ही ते ऐकले नाही कारण किल्ला डाव्या बाजूला दिसत होता... त्यामुळे सरळ जाऊन मग वर चढू असा जो आम्ही अंदाज केला होता तो चुकीचा ठरला. त्यामुळे नाहक एक मोठी टेकडी आम्हाला चढावी लागली. ...पण मग असो...एकदा अस काही लक्षात आले की मनुष्य आयुष्यभर विसरू शकत नाही. 

प्रवेशद्वार

आता आम्ही ट्रेकच्या शेवटच्या टप्प्यावर पोहचलो होतो. इथून किल्ला जवळच दिसत होता. आजूबाजूला सागाचे दाट जंगल लागले होते. आत्तापर्यंत डोक्यावर सतत असलेले उन आता मात्र दाट झाडांमुळे पार दिसेनासे झाले होते. गाड्या लावल्या तेथून इंग्रजी C आकारासारखा  प्रवास आम्ही भर उन्हात केल्यामुळे हे घनदाट जंगल सुखद वाटत होत.. भर दुपारच्या उन्हाची तिरीपही त्या जंगलात येत नव्हती हे विशेष. सोबत आणलेले स्नॅक्स व पाण्याच्या बाटल्या रिकाम्या होत चालल्याने बॅगांचे वजन ही कमी होत होते. 
पठार संपून शेवटच्या चढावला सुरुवात केली. पलीकडे काही अंतरावर असलेल्या  दरीच्या कडेकडेने आम्ही चालत होतो. मध्येच मोठ-मोठ्या दगडातून वाट जात होती.... तर कधी जंगलातील पाण्याच्या झर्‍यांमधील वाहणार्‍या पाण्यामुळे रस्ता  मध्येच निसटता झाला होता, अर्थात सावध चालत गेल्यास तो तितका रिसकी नव्हता. अचानक झाडींमधून पलीकडे पाहिले असता पलीकडच्या उंचच उंच डोंगरावर अगदी कडेला दोन छोट्या वस्त्या दिसल्या...लाल कौलारू छपर असलेली ती दहा पंधरा घरे टुमदार दिसत होती. .... या जंगलाच्या साम्राज्याची राजधानी असल्यासारखा त्यांचा दिमाख वाटत होता. 

समोर असे चालत असतांना अचानक एका ठिकाणी चक्क पायऱ्यांचे दर्शन झाले ... वाटले आला किल्ला पण त्या ठिकाणी खालून वर येणारी दुसरी एक वाट पाहायला मिळाली. पुढे उजव्या बाजूला किल्ल्याच्या तटबंदीची भिंत दिसू लागली व लगेच पुढे पक्क्या पायर्‍या दिसल्या... त्यावर चालत गेलो असता . "  महाद्वाराचे दर्शन झाले व  मनातच  "याजसाठी केला होता अट्टाहास...." अस म्हणून घेतल. 

इथे देवगिरि सारखे एक नंतर एक असे तीन मोठे दरवाजे लागतात. पूर्वी या तिन्ही ठिकाणी लाकडी दरवाजे होते असे म्हणतात. आता पहिल्या गेट ला लाकडी दरवाजा दिसतो पण तो जुना वाटत नाही. प्रवेशाचा मार्ग चढून वर आल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बंदिस्त तलाव आहे. तलावाच्या पूर्व दिशेला एक कमानीची बांधणी आहे. तलावाच्या उत्तरेला इमारतींचे अवशेष दिसतात. त्यांचे घुमटाकार छत १५-१६व्या शतकातील निझामकालीन वास्तुशैलींशी साधर्म्य दाखवते. किल्ल्यावरील तलावाच्या शेजारील मशीद, दर्गाह व काही थडगी अशा धार्मिक इमारती आहेत. किल्ल्यात प्रवेशापूर्वी ज्या मोठ्या बुरुजाला फेरी मारून आपण दरवाज्याकडे मार्गस्थ होतो त्या बुरुजावर जाण्यासाठी मार्गावर जाताना तळघर असलेल्या इमारतीचे अवशेष आणि एक भव्य दरवाजा पाहायला मिळतो. दक्षिणेच्या ह्या बुरुजामध्ये पहारेकऱ्यांसाठी देवड्या आणि एक पीराचा दर्गाह आहे. किल्ल्याचा दर्शनी बुरुज व महादरवाजा अजुन ही बऱ्या पैकी चांगल्या स्थितीत आहे... वरती असलेले भग्न अवशेष पाहून तत्कालीन किल्ल्याची स्थिती कशी असेल याची कल्पना येते. 

आम्ही निवडलेला दिवस होता 2 ऑक्टोबर ...ऑक्टोबर महिन्याची सुरुवात होती....या वर्षी या भागात चांगलाच पाऊस झालेला असल्याने संपूर्ण परिसर हिरवाईने नटलेला होता. मोठमोठे गवत वाढलेलं होते. त्यातून मार्ग काढत आम्ही किल्ल्याच्या सर्वोच्च पॉइंट वर पोहचलो  तेथून दिसणारे  दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे तर होतेच पण आतापर्यंत आलेला सर्व थकवा घालवणारे पण होते....वर येणारे थंडगार वारं उरली सुरली कसर भरून काढणारे होते. या ठिकाणाहून किल्ल्याच्या सर्व बाजूंनी परिसर दिसत होता. पश्चिमेकडील भागात भरपूर प्रमाणात तलाव व पाण्याचे साठे दिसत होते. पूर्वेकडे दुसऱ्या एका  डोंगरावरील सपाटीवर दिसणारे छोट्या वस्त्या होत्या.....चोहाबजूने निसर्गाने  उधळण केलेली होती. सर्व दृश्य मनात साठवून 

हळूहळू आम्ही किल्ला उतरायला सुरुवात केली. सूर्य ज्या वेगाने मावळतीला चालला होता त्याच वेगाने आम्ही उतरतीचा प्रवास करत होतो ...मावळतीच्या रंगात सारे डोंगर न्हावून निघत असताना अंधार पडायच्या आत आम्हाला आमच्या वाहनांपर्यंत पोहचणे गरजेचे होते. ...अर्थात शेवटच्या टप्प्यात थोड्या अंधार प्रवासाचा देखील अनुभव आम्ही घेतला. ..


अखेर परतीच्या प्रवासात पाचोरा जवळ थोडा वेळ थांबून गांधी जयंती निम्मित शाश्री जयंती वर दोन शब्द बोलुन व  शुद्ध सात्विक आहार घेवून आम्ही परतीच्या प्रवासास लागलो...मध्यरात्री जळगाव पोहचलो तेव्हा निशब्द शांतता पसरली होती.... सहकाऱ्यांसोबत घालवलेला अख्खा एक दिवस एक नवीन ऊर्जा देणारा ठरला होता. 

............................................

या  किल्ल्याची उभारणी एका मराठा सरदाराने केली होती असे म्हणतात. पुढे हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात गेला. पुढे अंतुरजवळ मुघल सरदार दिलेरखान आणि मराठे ह्यांच्यामध्ये मोठी लढाई झाल्याचे उल्लेखही इतिहासात सापडतात. परिसरातील इतर किल्ल्यांसारखी अंतुरवरील मुघल आणि पुढे हैदराबादच्या निझामकाळातील अधिक माहिती आपल्याला मिळत नाही. इसवी सन १८८४ मधील औरंगाबाद गॅझेटीयरमधील नोंदीमुळे मराठ्यांकडेसुद्धा किल्ल्याचा ताबा असल्याचे कळते. ह्या नोंदीनुसार इसवी सन १८२०च्या सुमारास मराठ्यांविरुद्ध शेवटच्या मोहिमेत ब्रिटीश आणि निझामाच्या संयुक्त सैन्यापुढे अंतुरच्या किल्ल्याने शरणागती पत्करली. मुघल काळापासून किल्लेदारी एका राजपूत घराण्याकडे असल्याचीही नोंद आहे.

- समाधान महाजन 


6 comments:

  1. खूप छान वर्णन
    मुलांना नेण्याचा विचार होता ,पण आता विचार करावा लागेल☺️

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर, दुसऱ्या रस्त्याने तुम्ही मुलांना नेऊ शकतात, तो जवळ आहे.

      Delete
  2. प्रत्यक्ष अनुभव घेतला गेला असे वाटतेय

    ReplyDelete
  3. प्रत्यक्ष अनुभव घेतला गेला असे वाटतेय

    ReplyDelete
  4. प्रत्यक्ष अनुभव घेतला गेला असे वाटतेय

    ReplyDelete