एकदा सरकारी नोकरी म्हटली कि बदली हा प्रकार अटळ असतो, त्याचा त्रास एकूणच जीवनात
माणसाला होतो, सततच्या
बदलांमुळ काहीशी अस्थिरता माणसाला स्वीकार करावी लगते. पण त्याचा दुसरा सर्वात
मोठा फायदा म्हणजे वेगवेगळ्या गावात शहरात जायला मिळते,राहायला मिळते, विविध माणसांशी परिचय होतो, मैत्री जोडली जाते, आयुष्यभरासाठी चांगली माणसे, चांगले क्षण आपल्या
आयुष्यात जोडली जातात.
बालपण वडिलांच्या सततच्या बदल्यांमुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच
शाळा कॉलेजची सुरुवातीची वर्षे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात व नंतर स्वतः
शिक्षक म्हणून बरीच वर्ष मराठवाड्यात काढल्याने मला नाशिकबद्दल तसे मनातून
खुप आकर्षण होते. जीवनाच्या एकूण तीन वेगवेगळ्या टप्प्यावर माझा
नाशिकशी संबंध आला. शालेय वयात, बारावी नंतर व तिसऱ्यांदा आला तो थेट माझी
पोस्टिंग सहायक आयुक्त म्हणून विक्रीकर खात्यात झाली तेव्हा आला. जुलै २०१८ ला
माझी बदली नाशिकहून जळगाव झाली अन नेमक त्याच वेळी नाशिकविषयी लिहिण्याच व्यासपीठ
चे पत्र मिळाले हा योगच.
एकदा शालेय वयात असतांना एक परीक्षा देण्यासाठी वडिलांसोबत नाशिकला
आलो होतो. तेव्हा इतक मोठ शहर पाहून दबुन गेलो होतो. ऐसपैस रस्ते, भल्या मोठ्या बिल्डिंग, नळाला येणारे पानी, मोठमोठे मॉल त्यातील चकचकीत
वातावरण, एकदम
झगमगाट, झगमग कपडे सारे कसे
चित्रपटातील वाटत होते. त्यामुळे अगदी एक किंवा अर्धा दिवस जरी अशा शहरात आपण
फिरतोय अस वाटल तरी त्याचे खूप अप्रूप वाटे. मी नाशिकला अस भरपूर काही पाहिलंय हे
कधी एकदा गावी जावून मित्रांना सांगतोय अस सारख वाटायचं.
अन नाशिकहून परत गावी गेल्यानंतर असला प्रकार पण गेला, माझ्या ज्या मित्रांनी
धडगाव व तळोद्या पलीकडे मोठे गाव पाहिले नव्हते त्यांच्यासाठी मी नाशिकविषयी सांगतोय
तो एक वेगळाच अविष्कार ठरत होता,
कळत नकळत माझ्या मित्रांमध्ये माझे वजन वाढले होते. नाशिक बघितलेला
मी एक मोठा माणूस आहे अस त्यांच्या नजरेत मी टिपत होतो, अन मनातून मला आनंद वाटत
होता.
तर असं हे नाशिकबद्दल तेव्हापासूनचे आकर्षण मनात कायम होते, कॉलेज
म्हणजे बारावी संपली पुढे काय करावे याबाबत अंधार होता. आईचे म्हणणे होते डी एड
केलं तर पटकन नोकरी लागेल, वडिलांना
वाटायचे हा हुशार आहे काहीतरी वेगळं केलं पाहिजे, पोरगं अधिकारी वैगेरे झालं पाहिजे पण कस होईल
याबाबत त्यांच्याच कल्पना स्पष्ट नसाव्यात वा परिस्थितीपुढे त्यांना काही सुचत
नसावं पण मग काहीतरी करन भाग होत
........हा दीर्घ सुट्ट्यांचा अनिर्णित कालावधी कुठंतरी घालणं भाग
होतं. तेव्हा माझा मोठा भाऊ ज्याला आम्ही दादा म्हणायचो तो नाशिकला राहत होता.
अर्थात कुठल्यातरी कंपनीत हजार बाराशे रुपयाच्या पगारावर तो काम करत होता, सिडकोतील छोट्याशा एकाच
खोलीच्या रूम मध्ये दादा वहिनी राहत होते. आमच्या दृष्टीने तेव्हा तो नाशिकला
राहतोय याचं अप्रूप वाटायचं, आमच्या
गावाकडे अशी नाशिकला कामानिमित्त गेलेली अनेक जण होते, ते गावी येत तेव्हा हे
शहरात राहणारे कोणीतरी मोठी माणसे आहेत त्यामुळे त्यांच्यासोबत लोक एकतर फटकून
वागत किंवा कौतुकाने तरी अर्थात सरळ सरळ कामगार म्हणून काम करतांना मिळणारा
तुटपुंजा पगार ज्यात घरखर्च धड भागवता येत नसे व इकडे गावी काही मदत करीत नाही
म्हणून गावातील घरचे लोक कायम नाराज राहत असत. असं सारख मन कुरतडत कसंतरी दोन दिवस
सनासुदीचं गावी राहून परत कधी एकदा नाशिक जाणाऱ्या गाडीत बसतो अशा मानसिकतेत अनेक
जण तेव्हा नाशिक - गाव व गाव- नाशिक असा प्रवास करत, आता तर त्यांच्या नंतरच्या पिढीने गावाकडे जाणे तर
दूर पाहणेही सोडून दिलेय अर्थात त्याला दोन्ही बाजूंची अनेक कारणे आहेत.
तर अशा या ये जा करणाऱ्या लवाजम्यात एका सुट्टीत मी पण शामिल झालो.
एक चुलत भाऊ रहायचा एक दिवस त्याच्या छोट्या टेम्पोत सकाळीच त्याच्यासोबत गेलो , काही कंपन्यांचे स्पेआर
पार्ट एक कम्पनीतून दुसऱ्या कंपनीत पोहचवण्याचे काम तो करत होता. त्याच्या ओळखीने
अंबड एम.आय.डी.सी. च्या एका कंपनीत मला पण काम मिळाले. कामाचे स्वरूप पहिल्याच
दिवशी मला फार आवडले. प्लास्टिकचे बॉक्स तयार होऊन एका ठिकाणी पडायचे ते बॉक्स एका
ट्रोलीत भरून ती ट्रोली ढकलत दुसऱ्या ठिकाणी जावून खाली करावे लागत. पहिल्याच
दिवशी खूप उत्सहाने मी दुपारपर्यंत हे काम केले. दुपारी जेवायला सर्वांसोबत बसलो , ते जेवण म्हणजे
आतापर्यंतच्या जेवनापैकी केलेले सर्वात वेगळे जेवण होते, आजूबाजूला बसलेली
माझ्यासारखीच मजूर मंडळी होती,
अंगावर कंपनीचे कपडे,घामाचा उग्र वास पसरलेला, मिळेल त्या जागेवर बसलेली व त्यातल्या त्यात थोड्या वेळासाठी का
असेना कामातून मोकळा
वेळ मिळाला याचा किंचितसा आनंद चेहऱ्यावरून न लपवणारी माणसे मला इतस्त दिसत होती. मी पण
माझा पहिल्या दिवसाचा डबा त्यांच्यासोबतच खाल्ला. याठिकाणी उदरभरण शब्दाचा खरा
अर्थ मला कळत होता,
संध्याकाळी घरी जातांना शिफ्ट सुटल्यावर कामगारांची गर्दी रस्त्यावरून
घाईगर्दीत जातांना दिसायची, तेव्हा सायकली जास्त होत्या, समोरच्या हँडल ला डबे
अडकवून कधी सिंगल तर कधी डबल सीट जातांना ते दिसायचे, कंपन्यांचे चिमणीचे धूर
आसमंतात पसरलेला दिसायचा, दिवसभर
एकच एक ठराविक काम करतांना जणू काही आपण यंत्रामध्ये प्रवर्तीत होत असल्याची भावना
मनात अनेकदा येवून जायची. आर्थिक दृष्ट्या सतत रखडत व महिन्याचा खर्च मेटाकुटीस
येवून पार पाडणारी अनेक कुटुंबे आजूबाजूला दिसत होती. सिडकोतील घरं म्हणजे एक
प्रकारे खुराडेच. एक रूम फार फार तर कोणाला दोन रूम. पण अशा घरात राहणे म्हणजे
एक प्रकारे कम्पनीच्या दोन ड्युटी मधील वेळ काढणे असं वाटायचं मला, एका बाजूला श्रीमंतीचे
टोलेजंग मिनार चढत असतांना हे अस कोनाड्यात पडलेलं पाहतांना मार्क्स आठवायचा.
त्याचा साम्यवादी सिद्धांत व आहे रे नाही रे ची दरी डोळ्यासमोर दिसत असतांना वेदना
व्हायच्या पण आपण स्वतः काहीही नसतांना व हे सर्व बदलवण्याची कुठलीही क्षमता
नसतांना फक्त विचारांचे कढ काही कामाचे नव्हते त्यामुले अशा वेळी काहीतरी
मोठे बनून हे सर्व बदलून टाकायची भावना प्रबळ व्हायची.
या काळात वया परत्वेआकलन कमी असल्याने व तितका आवाका नसल्याने
नाशिकची सांस्कृतिक ओळख झाली नाही, वेळ मिळाल्यास सी बी एस जवळ च्या हुतात्मा स्मारकात जाऊन पेपर
वाचण्याचे काम करायचो, तेथून
परत सिडको तील घरी येतांना सी बी एस च्या समोरील जे सिटी बसेस चे स्टॉप होते त्यात
नेमकी कुठली बस आपल्या घराकडे घेऊन जाईल काही कळायचे नाही.कोणाला विचारायची इच्छा
व्हायची नाही, भयंकर
अपमानास्पद वाटायचं कि साल आपल्याला या जगात काहीच माहीत नाही. या शहराच्या एकूणच
आधुनिक साच्यात आपण गावरान लोक बसू शकत नाही असा कसलासा न्यूनगंड आत साचत चालला
होता.
एकदा असंच कम्पनीला सुट्टी असल्याच्या दिवशी जरा बाहेर फिरून येऊ अस
ठरलं, जायचं
कुठं तर खूप नाव ऐकलेलं होत पंचवटीचे म्हणून म्हटलं पंचवटीला जाऊ. पंचवटी नाव
रामायणकालीन त्यामुळे म्हटल तिथे छान मंदिरे वैगेरे असतील तर जावून बघू. तस
सिडकोतून जाणाऱ्या जवळपास सर्व बसेस पंचवटी या नावानेच जायच्या, एक दिवस असाच मनात धीर धरून
पंचवटी नावाची पाटी लिहिलेल्या
बसमध्ये बसलो हळहलू सिड्को चा भाग गेला सी बी एस मागे पडले, अशोकस्तंम्भ गेले , आर.के. गेले पंचवटी कारंजा
म्हणून कंडक्टर जोरात ओरडला मग कंडक्टरला म्हटल पंचवटी चा स्टॉप हाच का तर तो
म्हटला की पंचवटी याचा पुढचा स्टॉप , झाले कही मिनीटातच पंचवटी स्टँड आले सर्व जण उतरले, गाडीत आता फक्त तीनच जण
राहिले मी , कंडक्टर
व ड्रायव्हर ....कंडक्टर माझ्याकडे '"कुठून कुठून येतात " अशा अत्यंत चमत्कारिक
नजरेने पाहत होता . सर्व जन उतरल्यावर मी त्याला म्हटल,
'पंचवटी कुठे आहे ?'
तो म्हटला , हेच पंचवटी ,
मी म्हटल, 'नाही हे
नाही ते दुसरे पंचवटी,
तो म्हटला अरे भाऊ हेच
पंचवटी ...
बर म्हटल मग बस आता पुढे कुठपर्यंत जाणार?
' डेपो पर्यंत'
' मग म्हटल मला तिथपर्यंत
सोडून द्या'
... त्यानंतर त्यानेही माझा
विचार केला नाही व बस पुढे घेण्यास सांगितले. झाल बस काही अंतरावर गेल्यावर जशी
डेपोत जायला लागली व आजूबाजूला बसेस दिसायला लागल्या तस मी पटकन बसचा स्पीड कमी
होताच उडी मारून खाली उतरलो. आजूबाजूला फक्त दुकाने, रस्ता, रस्त्यातून वाहणारे वाहने यापलीकडे काही दिसत नव्हत. मंदिरांचा
मागमूस पण नव्हता. उलट्या दिशेने झपाझप चालत मी परत पंचवटी stand कडे
निघालो तेव्हा का कुणास ठावूक पण कोणालाच विचारल नाही..कि पंचवटीतील ती प्रसिद्ध
मंदिरे कुठे आहेत ज्यांना पाहायला सर्व जन जात राहतात. अन अस काहीही न करता मी परत
गप बस मध्ये बसून सिडकोच्या घराकडे जायला निघालो.माझी फार भव्य दिव्य अपेक्षा होती
कि पंचवटी हे नाव फार मोठे आहे खूप वेळा खूप वेगवेगळ्या संदर्भात ऐकलेले आहे तर तस
काही दिसावं पण त्या ऐवजी पंचवटी नावाच्या बस, पंचवटी नावाचे बस stand
व डेपो पाहून माझा प्रचंड भ्रमनिरास झाला. असाच भ्रमनिरास माझा झाला
होता जेव्हा लहानपणी वडिलांनी आणले होते नाशिकला व बस मधून मला दाखवले होते हि बघ
हि गोदावरी नदी मी कुठ कुठ करेपर्यंत नदी निघून गेली होती मग परत येतांना परत लक्ष
ठेवून वडिलांनी नदी दाखवली तीही खूपच छोटीशी वाटली ...पुस्तकात वाचून गोदावरी
बद्दलच्या ज्या कल्पना होत्या त्या मानाने हि प्रत्यक्ष नदी खूप लहान जवळपास
एखाद्या घाण नाल्यासारखा तिचा प्रवाह भासत होता.
अस हे दुसऱ्या टप्प्यातील नाशिक माझ्या वयाप्रमाणे धुक्यातील
दिसणाऱ्या स्वप्नाप्रमाणे अर्धअपूर्ण होते. खर व परिपूर्ण नाशिक हे तिसऱ्या
टप्प्यात मला भेटले ज्या वेळी माझी बदली धुळ्याहून नाशिकला २०१२ मध्ये सहायक
आयुक्त म्हणून झाली. नाशिक व या पदावरची पोस्टिंग या दोन्हींसाठी मी तितकाच नवखा
होतो जस नाशिक बद्दल मला जुजबी ज्ञान होते तसच नोकरीत पण फक्त एकच प्रोबेशन वर्ष
झाल होत.
पण आता नाशिकला आलो होतो तेव्हा वयात पण समज आलेली होती, अर्थात मधल्या काळात
गोदावरी मधून भरपूर पाणी वाहून गेले होते, इतक्या वर्षात माझ्या अभ्यासामुळे साहित्यविषयी वाचनाची लिखाणाची व त्या
अनुषंगिक कार्यात रमण्याची जी भूक बाकी होती तिला नाशिकला अत्यन्त सकस व योग्य
वेळेस आहार पुरवला... येथील सावाना, कुसुमाग्रज स्मारक, सायखेडकर व कालिदास
नाट्यगृह येथे सतत काहीना काही सुरु असते. अनेक कार्यक्रम ऐकायला पाहायला मिळाले, अनेक दिग्गज साहित्यिक व
विविध क्षेत्रातील व्यक्तींना पाहण्याची, त्यांना जवळून ऐकण्याची संधी मला मिळाली
..अनेक वर्षांपासून लिहित आलेल्या कवितांची बाड बाहेर काढली, काही पुस्तक विकत
घेऊन वाचण्याची क्षमता थोडी निर्माण झाल्याने बरीच पुस्तके संग्रही जमा व्हायला
लागली. सर्वात महत्वाचे म्हणजे नाशिकमध्ये अनेक मित्र गणगोत नाते तयार झाले.
एखादी नाव राहिले तर उगाच इतरांना राग येईल अशी अनेक मित्र, गणगोत मला या काळात नाशिकने
दिले.
सुरुवातीला आल्यावर मी कविवर्य किशोर पाठक यांची भेट घेतली, साहित्यिक गप्पा झाल्या
त्यांनी आवर्जून माझ्या लिहिलेल्या कविता मागवल्या त्या वाचल्या वाचून कौतुकाची
थाप दिली प्रोत्साहन दिले व सर्वात महत्वाचे म्हणजे मला 'सिंचन भवन' च्या साहित्यिक वर्तुळाशी व
त्यातही विवेक उगलमुगले सरांशी जोडून दिले. विवेक सरांना मी सरच म्हणेल एकतर ते
वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत व आपल्या आयुष्यात अशा काही व्यक्ती असतात ज्या
हक्काने आपल्याला काही सांगू शकतात त्यापैक्की एक म्हणजे विवेक सर. माझा कवितासंग्रह
अस्तित्वात येवू शकतो याची पहिली जाणीव सरांनी करून दिली व इतकेच नव्हे तर
संग्रहाच्या प्रकाशन कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारची मदत उत्स्फूर्तपणे व स्वतःचे
शंभर टक्के देत दिली, याशिवाय
त्याचं वैशिष्ट्य म्हणजे मी नेमक संध्याकाळी त्यांच्या भेटीस सिंचन भवनला जात असे
अशा वेळी दिवसभरच्या कामाने सर खूप थकलेले असले तरी माझ्याशी बोलतांना कधी कंटाळा
केला नाही. त्यांच्या विषयी सांगणे हा एक संपूर्ण लेखाचा विषय होईल पण काही
व्यक्ती अशा असतात
ज्या स्वतःत च एक शहर घेवून जगतात, त्यामुळे नाशिक
विषयी लिहितांना आपसूकच विवेक सरांविषयी लिहीन साहजिकच आहे.
त्यातूनच पुढे किरण भावसार, हेमन्त पोतदार सर,
रवींद्र मालुंजकर,
प्रशांत केंदळे, यांच्याशी
सम्पर्क आला. किरणच्याच घरी कविवर्य खलील मोमीन सर व मी अशा तिघांची मैफेल एकदा
जमली, निम्मित
होते माझ्या ‘अस्वस्थ क्षणांचे पाश’ या कवितासंग्रहासाठीच्या कविता निवडीचे. पण
असे असले तरी त्या दिवशी मोमीन सरांकडून
ऐकलेल्या त्यांच्या व इतर कवींच्या कविता आजही कानात तशाच ऐकू येतात.
नाशिकमध्ये अजून एक महत्वाचं काम करायला मिळाले ते म्हणजे
आतापर्यंत केव्हाच संधी मिळाली नव्हती इतके चित्रपट पाहायला मिळाले अर्थात
यातील 90 टक्के चित्रपट
पूर्वीच्या कलात्मक व समांतर चित्रपटाच्या व्याख्येत मोडणारे होते माझ्या बौद्धिक
भुकेला हे गरजेचे होते सर्वात महत्वाचं म्हणजे थोड्या खर्चिक जरी असल्या तरी
मल्टिप्लेक्स सारख्या सुविधा उपलब्ध असंन महत्वाचे होते, या काळात आलेल्या
अनेक दर्जेदार चित्रपटांनी माझं आयुष्य समृद्ध केलं. संतोष बागुल सारखा
हक्काचा मित्र यासाठी मला सोबत होता, काही चित्रपट त्याने सुचवले बाकी मी पण आम्ही
सोबत पाहिलेले चित्रपट
नाशिकच वातावरण अल्हाददायक आहे, ते सतत नाशिकला राहून जाणवत नाही त्यासाठी माणूस विदर्भ किंवा
मराठवाड्यात राहून आलेला पाहिजे. नाशिकच्या या शांत व प्रसन्न वातावरणाचा
माणसाच्या मनावरील परिणाम पण चांगला होतो, विविध ऋतूंमधील नाशिकचे रूपे मनात साठून राहिलेली आहेत. पावसाळ्यातील
नाशिकच्या आजूबाजूचे निसर्गरम्य रूप बघण्यासारखे असते. तेथील सुरुवातीचे तीन वर्ष
विक्रीकर भवनच्या तिसऱ्या मजल्यावर माझे केबिन होते तेथून मागच्या खिडकीतून पांडव
लेण्यांचा डोंगर छान दिसत असे. कोसळणारा पाऊस, धुके, उन-सावलींचा
खेळ खूपच मस्त वाटत असे. . कामाचा ताण निवळन्यासाठी मला त्या खिडकीतुन दिसणार्या दृश्याचा फार
उपयोग होत असे.
या काळातील नाशिकच्या रहिवासात माझ्या वैयक्तिक आयुष्यात खुप चांगल्या घटना घडल्या, स्वताचे घर झाले,
गाड़ी झाली, आमचे त्रिकोनी कुटुंब चौकोनी झाले, पार्थ नंतर पाच वर्षांनी प्रद्न्या चा जन्म झाला. माझा कविता संग्रह 'अस्वस्थ क्षणांचे पाश' प्रकाशित झाला.
एम्.पि.एस.सी चा अभ्यास करणार्या मुलांसाठी 'आधुनिक भारताचा इतिहास' या पुस्तकाचे लिखाण तर माझ्याकडून झालेच पन शिवाय त्याच्या पाच
आवृत्त्या देखिल प्रकाशित झाल्यात. या काळात अनेक व्याख्यानांच्या मदतीने मला
अभ्यास करणार्या मुलांना मार्गदर्शन करण्याची संधि मिळाली. त्यांच्या समस्या
सोडवन्याचे समाधान मिळाले. त्यातील अनेक जनाची नंतर अधिकारी म्हणून निवड झाली.
एकुनच नाशिकने व नाशिकच्या गोतावल्याने मला
आयुष्यभरासाठी खुप काही दिले,
हे जे शब्दात मांडता आले व
असे भरपूर काही जे मांडता नाही आले.
- समाधान महाजन
७९७२५५२४३९
No comments:
Post a Comment