माझा इतिहास

माझा इतिहास

शाळेत असतांना इतिहास खुप आवडायचा 
शिवाजी, राणाप्रताप,  झाशीची राणी .....तशाच युद्धजन्य वेशात स्वप्नातही येवून जायचे ....
पानिपत, हळदीघाट व अनेक लढयातील तलवारींचा खणखणाट दिवसात केव्हाही ऐकू यायचा.
अशोक, अकबर, कबिराच्या धर्मात गुंतून जायचो
मी विचारात राहायचो त्या प्रसंगाच्या, घटनेच्या
व शोधू लागायचो त्या व्यक्तींच्या मनाचा तळ .....
व त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आसपास...
मी वर्तमानात असूनही जगत राहायचो भूतकाळात.
कसल्याशा ओढीने.

ब्रिटीश  शत्रूशी  लढणारे गांधी,सुभाष,नेताजी, पटेल , आझाद हे सर्व थोर पुरुष सारखेच वाटायचे....
समाजाच्या भल्यासाठी लढणारे फुले,शाहू,आंबेडकर,शिंदे, कर्वे या सर्वांचे कार्य महान वाटायचे...


माहीत नाही काय झालेय, कस झालेय
पण आताशा  मला इतिहास आवडेनासा झालाय ....


....आजचा इतिहास मोडून-तोडून माझ्यासमोर येतोय....
घटना आपल्या कोनातून फिरवून आपल्याच रंगाचा गडद प्रकाश त्यावर टाकला जातोय...
इतकच नाही तर जुन्या जीर्ण झालेल्या घटना, व्यक्ति, कथांना आपलाच रंग दिला जातोय.
येणाऱ्या पिढ्यानी  जाती धर्माच्या इतिहासापलीकडे जाऊन
सत्याचा शोध घेऊ नये याची काळजी घेतली जातेय आटोकाट.


इतिहासाच्या कुठल्याही पुस्तकाच पान उघडाव वाटत नाहीय.
उघडल तर  त्यात  नक्की काय असेल शास्वती नाहीय
विव्देषाचे काळसर प्रवाह चाल करून  येतील कि 
सत्याचा खून करायला नंग्या तलवारी बाहेर येतील
काहीच सांगता येत नाही.

कारण आता विचारांना नाही
माणसांना कापलं जातंय
भूतकाळातील भुतं वर्तमानाच्या मानगूटीवर बसून भविष्याचा गळा घोटतायत
वाटतंय हळूहळू  स्मृतीपटलावरून उडून जाव्यात आतापर्यंतच्या कोरल्या गेलेल्या सर्व  घटना ज्या बुद्धी,विवेक व शास्राला धरून होत्या व भग्न इमारतीच्या पायाशी पडलेल्या दगडाप्रमाणे पडून राहावे विचारहीन वर्षनुवर्ष.

- समाधान महाजन

(दिवाळी अंक कविता - रती -२०१८ मध्ये प्रकाशित झालेली कविता)





No comments:

Post a Comment