सातपुडा पर्वतातील एका दुर्गम वस्ती, तिच्या जवळून जाणारा एक रस्ता व घाटाखालून वर येणाऱ्या पहिल्या एसटीची वाट पाहत रस्त्याच्या कडेला उभे असलेलो आम्ही दोघ. मी व पप्पा. पावसाळ्याचे दिवस, या भागात सतत पडणारा पाउस आज सकाळ पासून बंद होता. पण मला मनातून वाटत होते कदाचित घाटातील पावसात गाडी अडकली तर; कारण अकरा वाजता येणारी गाडी अजून आली नव्हती, आज तसा रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस त्यामुळे पपांनाही जास्त काम नव्हत. मग थोड्या वेळाने माझे एकदोन मित्र तिकडे खेळत खेळत आले. मग आम्ही रस्त्याला कान लाऊन गाडीचा आवाज येतो का ते बघू लागलो. कसलाच आवाज येत नव्हता मग आम्ही परत खेळण्यात गुंतलो...
अन एकदम समोरच्या वळणावर लाल-पिवळी एसटी गच्च भरल्यामुळे एखाद्या पोटुशी बाईसारखी हळुवार येतांना दिसली अन मला प्रचंड आनंद झाला मग आम्ही सर्व आतुरतेने एस.टी जवळ येण्याची वाट पाहू लागलो. करकरत एसटी थांबली अन ड्रायव्हर ने नेहमी प्रमाणे दोन तीन पेपरांची भेंडोळी आमच्याकडे फेकली. मला कोण आनंद झाला होता कारण रविवारी येणाऱ्या वृत्तपत्रांमध्ये खास मुलांसाठी येणार्या पुरवण्या राहायच्या व मी त्यांची आतुरतेने वाट पाहायचो. पप्पांनी मला हि वाचायची सवय कशी लावली कुणास ठाऊक पण अगदी तिसरीत असतांना अशा प्रकारे येणाऱ्या वृत्पात्राची वाचण्यासाठी वाट पहायची सवय मला लागली.ते आले कि लगेचच मला कळणाऱ्या सर्व मजकुरांचा मी फडशा पाडत असे.
आमच गाव धुळे तालुक्यातील तरवाडे पण पप्पा शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिक्षक होते. त्यांच्या सतत बदल्या होत त्या पण खूप लांब लांब म्हणजे आताचा मी विचार केला तर एखाद्या चतुर्थ श्रेणी तील माणसच्या इतक्या लांब लांब प्रशासकीय बदल्या होण व जणू पर्यायच नसल्यागत त्या त्या ठिकाणी वडिलांनी हजर होणे हे आजच्या काळात दुर्मिळच. साधा तालुका बदलला तरी तो शिक्षकांना अडचणीचा ठरतो तिथ मी चौथीला जाईपर्यंत पप्पा पुणे(आंबेगाव तालुका), जव्हार (ठाणे), धडगाव (नंदुरबार) या तालुक्यातील अतिदुर्गम भागांच्या शाळेंवर बदली होऊन होऊन आले होते.
वरील प्रसंग हा धडगाव मधील मी चौथीत असतांनाचा आहे.पप्पांचे एक ठरलेले असायचे व ते नेहमी कोणालाही सांगायचे कि आयुष्यात कदाचित मला इस्टेट प्रॉपर्टी पैसा कमावता येणार नाही पण माझ्या मुलांना मी घडवेल त्यांना मोठ बनवेल साहेब बनवेल कलेक्टर करेल. मी परीक्षा पास होऊन क्लास वन ऑफिसर झालो पण तो क्षण बघायला ते नव्हते.
पण त्यांनी माझ्या मनात इतकी संस्काराची झाडे रोपण करून ठेवलीत कि आज त्या झाडांच्या सावलीत त्यांची सावली मी शोधत राहतो. संस्कार हे बळजबरी करून देण्याची व घेण्याची गोष्ट नव्हे ते आपोआप येतात व दिले जातात. त्यासाठी गडगंज श्रीमंती कामास येत नाही न कोणता वशिला कामास येत नाही. गुनसुत्रांनी आपोआप ज्याप्रमाने पिढी दर पिढी जैविक घटकांचे संक्रमण होत असते त्याप्रमाणे घरातील आपल्या वागण्या बोलण्यातून आई वडिलांकडून हा संस्कार नावाचा घटक संक्रमित होत असतो. मग आपल भोवताल व वातावरण कसही असो. आहे त्या परिस्थितीत शक्य होईल ते करण तर आपल्या हातात असते कदाचित हेच सूत्र माझ्या पप्पानी आम्हाला वाढवतांना लक्षात ठेवले असावे अस आता मला वाटत.
बऱ्याचदा ज्या ज्या आदिवाशी आश्रम शाळांवर आमच्या बदल्या व्हायच्या तेथील आमच्या घराच्या भिंती कुडाच्या राहायच्या व वर कौल असायची. त्या शेणाने सारवलेल्या कुडाच्या भिंतींवर पप्पा खास कागदाचे चार्ट करून ते काट्यांनी किंवा खळ करून चिटकवून द्यायचे व ते सर्व पाठ करायला सांगायचे अशा पद्धतींने पाठ केलेलं सर्व मला अगदी चौथी पासूनच्या परीक्षांपासून उपयोगात आले.त्या चार्टस वर सर्व राहायचे म्हणी,वाक्प्रचार,समानार्थी शब्द, श्लोक, पसायदान अस सर्व. हि पाठांतराची सवय आम्हाला पुढे खूप कामी आली.
आम्ही व पप्पा ज्या शाळेत होतो तेथील मुल शाळेचा वेळ सोडला तर बहुतांश त्यांच्या आदिवासी भाषेत बोलायची व ज्या पाड्यावर किंवा वस्तीवर शाळा असायची म्हणजे आमचे घर जिथे असायचे त्या आजूबाजूची लोकही आदिवासी च बोलायची त्यामुळे लहानपणी मला कोकणी,वारली, पावरी, भिलाऊ व मराठी अशा भाषा मला यायच्या पण आमची गावाकडील मातृभाषा आहिरणी मला यायची नाही कारण अगदी पाचवी संपेपर्यंत मी आमच्या गावात आलोच नव्हतो.
त्यामुळे पुढे मला अगदी कुठल्याही भाषिक प्रांतात जाण्याची वेळ आली तेव्हा मला आनंदच वाटायचा कारण वडिलांसोबत फिरल्यामुळे व अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यामुळे बहुभाषिक संस्कार माज्यावर झाले होते. त्यामुळे पुढे थोड कळत झाल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा योग यायचा तेव्हा फक्त आपल्याच प्रदेशापुरत बोलणारे आपल्या भागाची व भाषेची गरजेपेक्षा जास्त प्रौढी मिरवनाऱ्या लोकांचा मला खेद वाटायचा कारण वेगवेगळ्या ठिकाणची सर्व लोक सारखीच असतात व थोडा बहुत कमीजास्त पण सर्वांमध्ये असतो अस नकळत माझ्या मनावर बिंबवल गेल्याने कदाचीत वसुधैव कुटुंबकम या विचारांशी माझी जास्त जवळीक होती.
दुसर खूप महत्वाच काम पप्पानी आमच्यासाठी केल ते म्हणजे ज्या शाळेवर त्यांची बदली व्हायची तेथील ग्रंथालय वाचनालय जे काही असेल त्याचा चार्ज ते स्वतःकडे घ्यायचे याचे कारण म्हणजे एक तर त्यांना स्वतःला त्यात आवड होती व त्यानिमित्ताने शाळेतील सर्व मुलांसोबत आम्हालापण त्याचा फायदा करून द्यायचा त्यामुळे बर्याचदा अस व्हायचं कि आम्ही जिथे जायचो तेथील पुस्तकांची कपाटे व पुस्तकांवरची धूळ साफ करण्याचा मान आम्हीच घ्यायचो कारण तोपर्यंत त्यांना कोणी हाथ लावलेला नसायचा. बरेच लेखक हे असे दर्याखोर्यातील आश्रम शाळेत मला सापडले ते वडिलांमुळेच. लहान मुलांसाठी असलेले त्या त्या शाळेतील सर्व पुस्तक आम्ही अक्षरश आधाशासारखी फस्त करायचो. पार इसापनीती, किशोरकथामाला, विक्रम वेताळ, साने गुरुजी, किशोर अंक, साहसांच्या जगात, व अशी अनेक ज्यांची नावे आता आठवतही नाही अशी पुस्तके लहानपणीच वाचून काढलीत.
चि.वि जोशी, द.मा. मिरासदार मला या ग्रंथालयातच मिळाले. मी भाऊ बहिणी आई वडील या सर्वांनी या पुस्तकांचा आनंद घेतला. दोघांच्या कथांची नावे व कथा आजही आमच्या घरात सर्वांना आठवतात. नारायण धारप यांच्या थरारक कथांचा आस्वाद असाच अंगावर येणाऱ्या काट्यानसोबत एकट्यानेच घेतलेला आठवतो. मराठी विश्वकोश चे बरेच खंड काढून त्यांचे अभ्यासपूर्वक वाचन कसे करावे हे पाप्पानीच शिकवलं. एका ठिकाणी तर खूप मजा वाटली मला जेव्हा किश्रीम मासिकाचे १९८५-८६ पासूनचे अंक मला वाचायला मिळाले त्यात अनेक सुप्रसिद्ध लेखकांचे लिखाण मला वाचायला मिळाले त्याने मी इतका भारावून गेलो होतो कि या किस्रीम असण्याच्या काळात मी का नव्हतो अस सारख मला वाटत राहायच. या किस्रीम चे अनेक अंक जसेच्या तसे न वाचता गठ्ठ्यांमध्ये बांधून पडले होते त्यामुळे जुनाटपानाची पडलेली पिवळी पाने व राहून गेलेला नवा वास अस वासांचे combination यायचे व सोबतच कमी जाहिराती व खूपच दर्जेदार मजकूर, कथा, कादंबरीचा अशंत भाग अस खूप काही त्यात असायचं...सानिया नावाची लेखिका, विद्याधर पुंडलिक नावाचे कथाकार, व श्री ना पेंडसे सारखे कादंबरीकार मला या कीस्रीम मुळे कळले ..या सार्यान्मागे माझे पप्पाच होते.
जुने पेपर, जुनी मासिके, जुने दिवाळी अंक कमी पैशात घरी आणून वाचायची सवय पप्पांना असल्यामुळे पार ऐंशीच्या दशकातील लोकप्रभा नंतर चित्रलेखा श्री अशी अनेक मासिके अंक वाचून काढलीत शाळा संपल्यावर सुट्टीत अस काही वाचायला मिळाले कि खूप मजा वाटायची. काहीच वाचायला नसल कि कालनिर्णयची जुनी दिनदर्शिकाही आम्ही वाचत असू. कोणी कालनिर्णय कशासाठी घेत असतील पण
त्यामागचा मजकूर खूप छान असतो म्हणून तो वाचण्यासाठी बाबा कालनिर्णय विकत
घेत व अनेक वर्ष पुढे तसेच सांभाळून ठेवत.
वाचन हे जस त्यांनी पोहचवल ते अधिकृत पणे तस न कळता अनेक चांगल्या बाबी वडिलांकडूनच माझ्यापर्यंत आल्या ज्या त्यांनी स्वतःहून सांगितल्या नाहीत पण त्यांच्या आवडी पोहोचल्या जस चांगले चित्रपट बघन , गाणी ऐकन इत्यादी. जेव्हा टीव्ही आमच्या घरी व गावातही नव्हता तेव्हा रामायण व महाभारत बघता याव म्हणून जेव्हा जमेल तेव्हा शेजारच्या गावी त्यांच्या मित्रांकडे ते आम्हाला नेत. जेव्हा टीव्ही घरी आला व चांगला चित्रपट किंवा जुनी गाणी लागली कि ते खूप खुश होत व त्याबाबतीत त्यांना माहिती असलेले व त्यांच्याशी निगडीत त्यांच्या स्वतःच्या आठवणी ते आम्हाला सांगत आजही एखाद्या जुन्या हिरोईन हिरो दिग्दर्शक चित्रपट यांच्या बाबत मी वाचतो तेव्हा त्यातील काही मजकूर पप्पानी सांगितलेला जसच्या तसा त्यात असतो, त्यामुळे दर्जेदार चित्रपट व गाणी ऐकण हा माझा छंद न बनता तर नवलच.
कुठलीही गोष्ट करायची ती मनापासून करायची. त्यात आपल सर्व ओतायचे हा पप्पांचा स्वभावगुण माझ्यापर्यंत पण पोहचला. त्यामुळे जेव्हा मी स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उतरलो तेव्हा झोकून देऊन अभ्यास करन हे आपसूकच आल त्यासाठी मला वेगळे प्रयत्न करावे लागले नाही. मी लहानपणापासून पाहायचो ते जे काही करायचे ते एखाद्या निरागस बालाकाप्रमाने त्यात खूप समरस होऊन करायचे. कोण काय म्हणेल याची लाज त्यांनी कधी बाळगली नाही व न आम्हाला बाळगू दिली. मनात जे आल ते प्रामाणिक पणे करायचे. मग एखादी झाडाचे रोप शोधन त्याला व्यवस्थित जागा पाहून ते लावण, एखादी आवडता चित्रपट खूप मन लाऊन पाहता पाहता त्याची माहिती आम्हाला सांगण, शाळेचे अधीक्षकपद हातात आल्यावर मुलांच्या जेवण वसतिगृह अंघोळी त्यांचा अभ्यास यासाठी स्वतःला वाहून देणे, आमचा अभ्यास घेताना खूपच लक्ष देणे, गप्पा मारतांना खळखळून मोकळ हसन, एखाद्याला मदत करतांना मागचा-पुढचा कसलाही विचार न करन, आश्रमशाळेतील बरीच मुले त्यांच्याशी अगदी मित्रांप्रमाने माहिती शेअर करत , मदत मागत ते जीत्थे जात तेथील ते आवडते शिक्षक बनत त्यामुळे वडिलांची बदली झाली कि दोन-दोन तीन तीन दिवस संपूर्ण शाळाच रडत असे , इकडे घरी आम्हीपण रडत असू असा हा सामुहिक रडरडीचा कार्यक्रम पार पडल्यावर पुन्हा सामानाची गाडी भरून नवीन शाळेवर आलो कि तेथील हि विध्यार्थी स्वागतासाठी तयार असत.
आमचे बाबा आमच्या तरवाडे गावातील पहिले इंग्रजीचे पदवीधर झाले होते पण नोकरीसाठी वणवण इकडे तिकडे भटकतांना जे मिळेल ते काम करत, रस्त्याचे काम सुरु असताना त्यावर मजुरी केली , रोजगार हमी च्या चालणाऱ्या कामांमध्ये शिकलेला मनुष्य म्हणून कामासोबत हजेरी भरण्याचे काम केले, एक वेळ अशी आली कि त्यांनी चक्क कर्ज काढले म्हशी घेऊन दुधाचा धंदा सुरु केला, आजही गावातील जुनी जाणती म्हातारी कोतारी माणस भेटली कि माझ्या चेहऱ्यावरून मायेचा हात फिरवत ते म्हणतात,
“बेटा तू गन मोठा साहेब झाया असशी पण तुना बापनी डोकावर शेन न टोपल उचलतांना कवय कसानी लाज ठी नई, तू बी गरीब दुबयाले मदत करतांना लाज ठेवजो नको, कारण तो तुना बापनी खस्ता खायात म्हणून तुले आज या दिन उनात.”
त्याचं तंतोतंत खर असत व माझ्या डोळ्यात पाणी तरळून जात. मग माझ्या डोळ्यापुढे मी लहान असतानाचे बाबा दिसू लागतात. जे सतत आम्हा सर्व भावंडांच्या शिक्षणाचा ध्यास घेऊन असत. त्यांना फक्त शिक्षण घेण्यातच अर्थ नव्हता तर खूप मोठ झालेले त्यांना आम्हाला पाह्यचे होते. तेव्हापासूनच सर्व परीक्षांची तयारी ते आमच्याकडून करून घेत. अन वेगवेगळ्या परीक्षांची माहितीही ते कुठून जमवत कुणास ठावूक कारण आजसारख त्याकाळी नेट नव्हते न इतर संपर्काची साधने तरी अगदी चौथी स्कॉलरशिप पासून सर्व परीक्षा देण्यासोबतच त्यांची पुस्तके गाईड आणून देणे स्वतः माझा अभ्यास घेणे हे काम ते खूप आवडीने करत. मला आठवत त्यावेळी आम्ही सातपुड्यातील धडगाव जवळील एका शाळेवर असतांना सातारा सैनिक स्कूल ची परीक्षा देण्यासाठी चक्क तिथून नाशिकला आलो होतो. हे अंतर तेव्हा सर्वच दृष्टीने खूप मोठ होत. एसटी बसेस खूप कमी असायच्या, कुणाकडे तरी मुक्कामी आम्ही आलो होतो, शिवाय आर्थिक दृष्ट्या या सर्व गोष्टी आम्हाला परवडायच्या नाहीत, याच प्रवासासाठी तिकिटाला लागणारे पैसे नव्हते तर बाबांनी मलाच त्यांच्या एका सहकारी शिक्षक मित्राकडे पाठवले व त्यांना सांगायला लावले कि, “माझी परीक्षा नाशिकला आहे तर बस साठीचे पैसे माझ्या बाबांनी मागीतलेत.” त्या सरांनी लगेच बहुदा शंभर रुपये पटकन काढून दिले. कदाचित बाबांनी त्यांना आधीच सांगितले होते.मग मला का पाठवले परत म्हणून बाबाचा थोडा राग पण आला व वाईट पण वाटत होते कारण एकतर पैसे मागायला जातांना मला खूप अवघडल्यासारख होत होत. आपण खूप गरीब आहोत व आपल्याकडे साधे तिकिटाचे पैसे नाहीत असा विचार करून करून सारखं रडायला येत होत.पणकदाचित याची लाज वाटू नये व आपली परिस्थिती नेमकी कशी आहे तेही कळाव असा कदाचित मला पाठवण्यामागे बाबंचा उद्देश असावा असा मी दोन तीन वर्षांनी पुढे नवोदयला गेलो तेव्हा अर्थ काढला. पण ती घटना कायमस्वरूपी माझ्या मनावर कोरली गेली. इतकी कि जेव्हा बाबा नव्हते तेव्हा माझ्या स्वतःच्या शिक्षक असल्याच्या पगारातून खर्च करून मी दिल्लीला युपीएससी ची मुलाखत द्यायला गेलो तेव्हा खर्च करतांना अनेकदा बाबांसोबत मला ते शंभर रुपये पण आठवत व मी कमी खर्च करत असे. बाबांनी घेतलेल्या तयारी मुळे तर नवोदयची परीक्षा पास झालो व पुढील काही वर्ष बाबांच्या मनासारखं वातावरण मला मिळालं ज्यामुळे माझ आयुष्य समृद्ध झाल.
आर्थिक परिस्थिती जवळपास ते रिटायर होईपर्यंत अगदी बेताचीच राहिली कारण एकतर त्यांना वयाच्या खूप उशिरा नोकरी लागली त्यातही नोकरी गावापासून लांब.सततच्या बदल्या, घरून कसलाही आधार नाही, त्यात आम्ही चार भावंड –आम्ही दोन भाऊ व दोन बहिणी, मी घरात सर्वात लहान व मोठा भाऊ विकास मध्ये दोन्ही बहिणी, ताई व माई . तरी भाऊ एमएस्सी पर्यंत व दोन्ही बहिणी पदवीधर होईपर्यंत शिकले. पुढे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मोठ्या भावाला एकूणच परिस्थितीमुळे माघार घेत पटकन नोकरीसाठी प्रयत्न करावे लागले कदाचित अजून थोडीसी जरी परिस्थिती बरी असती तरी भाऊ पण नक्कीच मोठा अधिकारी झाला असता कारण तो जात्याच हुशार होता. त्यातच बहिणींचे लग्न व इतर सर्व खर्च यांची हातमिळवणी करता करता कधी वडिलांची रिटायरमेंट जवळ आली हे त्यांनाही कळल नाही. बऱ्याचदा अनेक कारणांनी खाजगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेण्यची पण वेळ आली. एक दोनदा तर मीच गेलेलो पैसे आणायला. या पैशांच्या कारणांवरून वा सततच्या बदल्यांच्या कारणांवरून आईचे व बाबांचे भांडण व्हयाचे पण बाबा कायम , ‘हे सर्व मी माझ्या मुलांसाठी करत आहे ते नक्कीच मोठे होऊन काही करून दाखवतील’ अस म्हणत राहत.आईला ते पटत असे पण संसार रेटतांना होणारा त्रास ती सांगेल तरी कोणाला व कसा. पण शेवटी बाबांचे म्हणणे तिला पटे कि, ‘आपली संपत्ती आपली मुले आहेत’. त्यामुळे आई पण आमच्या मागे खंभीरपणे उभे राहत असे.
मला अनेकदा वाटत लहान मुलांवर संस्कार करतांना कृत्रिम शब्दांपेक्षा आपण रुटीन लाईफ मध्ये काय बोलतो, कस बोलतो, कोणते शब्द कसे वापरतो, आपला बोलायचं टोन कसा असतो, तो कसा वेगवेगळ्या परिस्थितीत बदलतो, आपण वेगवेगळ्या घटनांवर कसे react करतो हे खूप महत्वाच आहे मुल यातूनच जास्त शिकत असतात किमान मी तरी अशा अनेक घटनांतून आपोआप शिकत गेलो. अगदी उदाहरनच द्यायचे तर मी बाबांकडून कधीही नशीब हा शब्द ऐकला नाही ओघाने ते बोलून हि गेले असतील पण ज्या वेळी स्वतःच्या चुका किंवा परिस्थितीचे खापर फोडायची वेळ येते तशा वेळी नक्कीच त्यांनी नशिबाला दोष दिलेला मला कधी आठवला नाही. अगदीच टोकाचे म्हणजे त्यांचा दैववादावर पण तितकासा विश्वास नसावा. कारण मला आठवत कदाचित मी दुसरीत असेल तेव्हा ऑफिसमध्ये अधीक्षक पदाची जबादारी दिल्यानंतर बाबांनी शाळेला जी शिस्त लावली त्यातून दुखावलेल्या काही जणांनी बाबांची खोटी तक्रार केली त्यानंतर बऱ्याच काही घडामोडी झाल्या असाव्यात पण एक दिवस माझी सकाळची शाळा सुटल्यानंतर मी दुपारी घरी असतांना बाबा एकदम काही आवेशात घरी आले व त्या आमच्या कुडाच्या भिंतींवर जे जे काही देवी देवतांची पोस्टर फोटो लावले होते ते सर्व टराटर फाडले तस्वीरी खाली आपटून फोडल्या, ती सर्व कागद जाळली, थोडा वेळ तसेच विमनस्क पणे बसले व परत ऑफिसला गेले. दुसर म्हणजे खूप नाराज असण, दुखी – कष्टी होण कुठल्याही परीस्थित मी त्यांना पाहिलं नाही. या सर्व बाबींचा परिणाम नकळत माझ्यावर होत गेला असावा. कारण स्पर्धा परीक्षा देतांना अनेकदा मला ऐन शेवटच्या टप्प्यावर अपयश यायचे पण ना मी कधी अपयशाने कोलमडून गेलो न कधी स्वतःच्या नशिबाला शिव्या घातल्या. मी परत लढायची तयारी ठेवली जोपर्यंत विजय मिळत नाही, कारण असा विजय संपादन करन हीच तर बाबांची खरी इच्छा होती.
माझी मुल मोठे साहेब बनतील त्यांना मी कलेक्टर बनवेल मोठ्या गाडीत मागे बसून फिरेन, साहेबाचा बाप म्हणून माझा असा रुबाब राहील अन असे खूप काही स्वप्न जे ते सतत बोलून दाखवत, लोकांना सांगत, काही वाईट घटना घडली, वाईट दिवस आले कि त्यांचा एकमेव आशावाद असायचा माझी मुल हि सर्व परिस्थिती बदलवतील. चक्क त्यांचा पाया पडायला गेल तरी आशीर्वाद हि तोच देत कि लवकर मोठा साहेब हो. हि अशी अनेक स्वप्न जी त्यांनी आमच्यासाठी पाहिली व त्यासाठी स्वतःचे आयुष्य अक्षरश वाहून दिले ते आमचे बाबा हि स्वप्नपूर्ती झाली तेव्हा ते बघायाला या जगात नव्हते. एम.पी.एस.सी. तून क्लास वन अधिकारी व्हायच्या पाच वर्ष आधीच एक अचानक आलेल्या ब्रेन हेमरेज च्या झटक्यात त्यांनी या जगाचा निरोप घेतला.
पण त्यांचे संस्कार स्वप्न व निरागसता ते कायमसाठी माझ्याजवळ सोडून गेले त्यामुळे आजही ते माझ्याजवळच आहेत अस सारख मला वाटत राहत.
- समाधान महाजन
(व्यासपीठ दिवाळी अंक 2017 )
