अ प्रिन्सेस रिमेम्बर्स- गायत्रीदेवी

अ प्रिन्सेस रिमेम्बर्स  हे जयपूरच्या महाराणी गायत्री देवी यांचे आत्मकथन आहे. जगातील सर्वात सुंदर स्रियांमध्ये ज्यांची गणना केली जाते त्या गायत्री देवी. (२३ मे १९१९ ते २९ जुलै २००९). अनेक दिवसांपासून फक्त हे नाव ऐकले होते. काही चित्रपटांमधून त्यांच्यावर आधारित नायिका होत्या पण ते सर्व वरवर होते.  काही इतिहासाच्या पुस्तकातून नाव वाचलेले होते पण तेही संस्थानावर असलेल्या त्रोटक माहितीतून. हे पुस्तक हाती आले आणि या सर्व अनसुलझे रहस्यांचा रहस्यभेद झाला माझ्यासाठी. 

एखाद्या व्यक्तीचे नशीब कसे असावे? आजोळ म्हणजे गायकवाडांचे बडोदा, वडील कुचबिहार संस्थानचे राजे व नवरा म्हणजे जयपूर संस्थानचा राजा. हि लीगेसी ज्या व्यक्तीला मिळाली त्या गायत्री देवींचे व्यक्तिमत्व देखील काळाच्या पडद्यावर झळाळून जाणारे होते. काही यु ट्यूब चानेल्स मधून त्यांची माहिती दिली आहे पण ती काहीशी अतिरंजित वा उथळ स्वरुपाची आहे. त्यातल्या त्यात सिमी गरेवाल यांनी गायत्री देवींची एक मुलाखत घेतलेली आहे. ती नक्कीच बघण्यासारखी आहे. 

असो, तर या पुस्तकातून अनेक अनटच प्रश्नांची उत्तरे आहेत. आणीबाणीत पाच सहा महिने तिहार जेल मध्ये त्यांना राहावे लागले होते. त्यांच्या घरांवर आयकर विभागाची रेड पडली होती. त्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. पण त्याआधीची रंजक माहितीही महत्वाची आहे. गायत्री देवी पहिल्याच प्रकरनात त्यांच्या  कुचबिहारवरून बडोदा या त्यांच्या लहानपणीच्या  रेल्वेप्रवासाची माहिती सांगतात. कुचबिहार वरून एक रात्र प्रवास करून ते कलकत्त्याला पोहचायचे. तेथे त्यांचे ‘वूडland नावाचे घर होते तिथे दोन दिवस थांबायचे. मग पुढील प्रवासास निघायचे. शेवटी बडोदा संस्थानच्या लक्ष्मीविलास palace मध्ये पोहचल्यावर हा प्रवास संपायचा. ज्या इंजिनियरने कुचबिहारचा राजवाडा बांधला होता त्यानेच हा palace देखील बांधला होता. दोन्ही वास्तूंसाठी इंडो-सरसानिक शैली वापरली होती. 

गायत्रीदेवींच्या आजीला , आजोबांनी शिकविले. त्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. या आजी पुढे all इंडिया कॉन्फरन्सच्या अध्यक्ष झाल्या. त्यातील एक नात आणि आजोबांचा संवाद महत्वाचा आहे. आजोबा म्हणतात, “तू पलंगावर पडली तर झोपायला हवस. तू वाचत असली तर फक्त वाचायचे. खात असली तर फक्त खायचं, विचार करायचा असला तर फक्त विचारच करायचा. दोन वेगळ्या गोष्टी मिसळू नकोस. त्यातून काहीच चांगल निष्पन्न होत नाही. आनंदही मिळत नाही आणि फायदा हि होत नाही” 


१९११ च्या दिल्ली दरबाराला हे सर्व महत्वाची संस्थांनी लोक उपस्थित होते. गायत्री देवींच्या आईचे नाव इंदिरा गायकवाड. त्यांचे लग्न घरच्यांना ग्वाल्हेरच्या शिंद्यांशी करायचे होते. पण त्यांनी नकार दिला व जुलै १९१३ ला लंडन मध्ये कुचबिहारच्या राजाशी त्यांचे लग्न झाले. त्या स्वतः दिसायला सुंदर होत्या. पहिले महायुद्ध संपल्यावर ते सुट्टी घेऊन लंडनला गेले. २३ मे १९१९ रोजी गायत्रीदेवींचा जन्म झाला. गरोदरपणात त्यांची आई रायडर हेगार्डची she /शी नावाची कादंबरी वाचत होती. तेव्हा त्यांनी ठरवले कि त्यांना मुलगी झाली तर तिचे नाव या कादंबरीतील नायीकेवरून आयेशा असे ठेवायचे. गायत्रीदेवींनी बारा वर्षांची असतांना एका बिबट्याची शिकार केली. त्या शिकारीचे व एकूणच कुचबिहार संस्थानचे केलेले वर्णन वाचन्यासारखे आहे. 

 गायत्रीदेवी लंडनच्या ग्लेनडोवर स्कूलमध्ये शिकल्या. शांतीनिकेतन मध्ये देखील त्यांचे वर्षभर शिक्षण झालेले आहे. १७ एप्रिल १९४० ला जयपूरचे राजे जय यांच्याशी त्यांचे लग्न झाले. जय यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या. badmintan असोसीयशान ऑफ इंडियाच्या त्या अध्यक्ष होत्या. टेनिस असोसिएशन ऑफ इंडिया च्या त्या उपाध्यक्ष होत्या. 

भारताच्या पहिल्या निवडणुकीच्या काळात जोधपुरचे महाराज निवडणुकीस अपक्ष म्हणून  उभे राहिले. प्रचार संपून मतदान झाल्यानतर एका विमान अपघातात त्यांचे निधन झाले. जेव्हा निकाल लागले तेव्हा महाराजांचा दहा हजार मतांनी विजय झाला होता. त्यांच्या विरोधातील कॉंग्रेसचे उमेदवार जयनारायण व्यास यांचे डीपोझिट जप्त झाले होते. पण नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रतिस्पर्धी नसल्याने व्यास निवडून आले व राजस्थानचे मुख्यमंत्री बनले. 

गायत्रीदेवी पुस्तकात एका ठिकाणी म्हणतात, ज्या जमिनीवर नवी दिल्लीची उभारणी झाली आहे. ती पूर्ण जमीन एके काळी जयपूरच्या महाराजांची व्यक्तिगत मालमत्ता होती. पण बऱ्याच काळापूर्वी त्या जमिनी सरकारला दिल्या गेल्या. नवी राजधानी वसविण्यासाठी जयच्या दत्तक वडिलांनी पंजाबमधील एका खेड्याच्या बदल्यात ती जमीन देऊन टाकली. 

गायत्री देवी यांनी जयपूर हस्तकलेचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे भरवले होते तेव्हा त्याचे उद्घाटन पंडित नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते. १९६२ च्या निवडणुकीत गायत्री देवी यांनी सी. राजगोपालाचारी यांच्या  स्वतंत्र पक्षाकडून निवडणूक लढवली. प्रचार केला. कॉंग्रस पक्षाचे चिन्ह होते एकत्र जुंपलेली बैलजोडी, समाजवादी पक्षाचे चिन्ह होते वटवृक्ष, साम्यवादी पक्षाचे चिन्ह होते कोयता आणि गव्हाच्या ओम्ब्याच्या तीन डहाळ्या, स्वतंत्र पक्षाचे चिन्ह तारा होते. गायत्रीदेवींना ते चिन्ह  पटवून देण्यात खूप त्रास व्हायचा. अखेर निकाल लागला तेव्हा कॉंग्रेस उमेदवाराचा एक लाख पंच्यात्तर हजार मतांनी  पराभव करून गायत्री देवी निवडून आल्या. या बहुमतामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली. सर्व विरोधी उमेदवारांचे डीपोझीट जप्त झाले. तेव्हाचे अमेरिकन अध्यक्ष केनेडी यांच्याशी भेट झाली होती. 

एकूणच गायत्री देवी यांच्या आयुष्याच्या विविध घटनांची आपल्याला माहिती तर मिळतेच शिवाय तत्कालीन समाजव्यवस्था, संस्थानिक व जनता यांच्यातील नाते. तत्कालीन राजकारण अशा विविध बाबींची महत्वपूर्ण माहिती या पुस्तकातून आपल्याला मिळते. 

- समाधान महाजन / १७ मार्च २०२५ 


सतीश आळेकर

काल  १० मार्च २०२५ रोजी  सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार देण्यात आला. नाशिकच्या  गुरुदक्षिणा हॉल इथे संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होता. इथे कुमार केतकर, जब्बार पटेल, वसंत आबाजी डहाके,  प्रभा गणोरकर, आदी मंडळी उपस्थित होती.

कार्यक्रम बघतांना जाणवत होते, हि  एक जुनी पिढी आहे. काळाच्या पडद्याआड झपाट्याने जात आहे. या मंडळींचा जन्म स्वातंत्र्य मिळाले त्याच्या आसपासचा. त्यामुळे स्वातंत्र्याच्या काळातील पिढीचा यांच्यावर एक पगडा असेल. आदर्शवाद आणि त्याला जोडून स्वातंत्र्योत्तर काळात आलेला भांडवलवाद व मुक्तपणा अशा पार्श्वभूमीवर वावरणारी हि पिढी होती.

शिक्षण व अभ्यास सुरु असतांना यातील कुसुमाग्रज, बापट, करंदीकर, पाडगावकर, श्रीराम लागू, निळू फुले, विजय तेंडूलकर आदी दिग्गज म्हणवली जाणारी व्यक्तित्व हे काळाच्या पडद्याआड गेले होते. अर्थात दैनदिन वावरात त्यांच्याबद्दल वाचत व ऐकत होतोच. माझ्या मोठ्या भावाला एका निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल निळू फुले यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले होते. तेव्हाचा तो फोटो लहानपणी पाहिलेला असल्याने चित्रपटापलीकडील निळू भाऊ आहेत असे माहिती झाले होते. विजय तेंडूलकर यांची एक दोन पुस्तके काही मुलाखती पाहिलेल्या. त्यातील माझ्या हाती बंदूक असती तर अशा प्रकारचे विधान त्यांचे त्या काळात बरेच प्रसिद्ध झालेले. असे एकूण, म्हणजे अशा दिग्गज म्हणवल्या जाणाऱ्यांच्या आठवणी या अशा पाहीलेल्या, ऐकलेल्या वा वाचलेल्या. भेट, फोटो असे नाही. आपल्या स्वतःच्या जगण्यानातील संघर्षाची किनार संपत नाही तोपर्यंत नाटक, कादंबरी, कविता हे सर्व लाड कोड व एकदम ग्रामीण भाषेत सांगयचे म्हटले तर हे सर्व चोचले जिथे वाटतील असा भोवताल आसपास असल्याने सुरुवातीला एक वाचन सोडले तर व त्यातून जागृत होणारी उत्सुकता सोडली तर या क्षेत्रात आमची तशी फर प्रगती नव्हती. अर्थात हे फार उशिरा कळल कि यालाच जगणे समजणारी लोक इकडे आहेत. स्वतःचे आयुष्य या क्षेत्रात वेचणारे लोक आहेत. लौकिकअर्थाने कदाचित सर्वांनाच सुख संपत्ती नाव असे मिळाले नसेल कदाचित पण याच क्षेत्रात राहून संघर्ष करणारी मंडळी नंतरच्या आयुष्यात समजत गेली. असो, 

 तर हे ज्या वरील मंडळींचे नाव मी सांगितले ती पिढी त्याच्याही आधीच्या पिढी सोबत वाढलेली. म्हणजे काल जब्बार पटेल व  सतीश आळेकर ज्या पद्धतीने कुसुमाग्रजांच्या आठवणी सांगत होते किंवा काही दिवसांपूर्वी पॉप्युलरच्या आठवणी ज्या प्रमाणे रामदास भटकळ यांच्या कडून एका कार्यक्रमात एकल्या. किंवा भालचंद नेमाडे त्यांच्या जुन्या काळातील आठवणी ज्या पद्धतीने सांगतात हे सर्व ऐकून वा या याच्यावर विचार करून असे वाटते कि या मंडळींना अगदी परीस असलेले माणसे भेटलेली. त्यांच्या संपर्कात आलेले. काम वा लिखाण याबद्दल त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालेले अशी हि लोक आहेत. ज्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या लोकांचा परीसस्पर्श मिळाला. असो,


तर आपल काय ?


सॉरी माझ काय?


मी इकडे कुठे न कशात?


तर त्याचे असे झाले कि हा कार्यक्रम ऐकत असतांना जाणवले कि हि परीसस्पर्श लाभलेली सर्व मंडळी आज वयाने  साठच्या पुढे आहे. या लोकांना मी आज ऐकू शकत आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे बालपण एकूणच हे मी अशा काळाबद्दल ऐकत आहे जेव्हा मी या भूतलावर नव्हतो. मला ते खूप आवडते. किती सुंदर ते दिवस असे वाटते. ...पण चटकन वाटते हि मंडळी देखील एकदिवस अशीच एकदम नाहीशी होतील एक एक. ..... तेव्हा ?

ऑफकोर्स काळ पुढे सरकतो. नवीन पिढी तिच्या कर्तुत्वाने वर येते. अगदी बरोबर....

पण काल सतीश आळेकर ज्या पद्धतीने कुसुमाग्रजांच्या घरातील भेटीगाठी याबद्दल सांगत होते. जे माझ्यासाठी पूर्णतः नवीन होते... जे त्यांच्या कोणत्या पुस्तकात नाहीय... हे मला कोण सांगणार..? याच्यावरची उत्तरे मला नको आहेत.


मी जे आता ऐकतोय..अनुभवतोय...हाही एक काळ आहे.


आणि आपल्या जगाच्या पलीकडे अनेक जग असतात तेथील यशाच्या फुटपट्टी वर ते लोक प्रचंड यशस्वी असतात. आपल्याला नावे माहिती असतात फक्त किंवा माहिती देखील नसतात. आपण समोर आलेले क्षण जगुण कृतार्थ व्हावे इतकेच! 

- समाधान महाजन. 

11/03/2025


Black Warrant

 

जवळपास ४ वर्षांचा काळ-  साधारण ८० ते ८४.

स्थळ तिहार जेल.

म्हणजे काही विशिष्ट एरियात घडणाऱ्या घटना व त्या संबंधी व्यक्ती. म्हणजे सिरीज साठी एकूण भौतिक  अवकाश लिमिटेड आहे. पण त्यातील चित्रित घटना आपल्या बुद्धीला अनलिमिटेड खाद्य पुरवतात. चार्ल्स शोभराज त्याच काळात तिहार जेल मध्ये होता. सुरुवात आणि शेवट त्याच्या सबंधित दृश्याने झालेली असली तरी इतर अनेक घटना बघता बघता त्याचा विसर पडतो. पुढच्या सिझन मध्ये तो तेथून पळालेला दिसेल. मग कदाचित पुढे किरण बेदी पर्यंत हि सिरीज येईल कि अजून पुढे जाईल हि उत्सुकता आहे.  

विक्रमादित्य मोटवाने व दिग्दर्शकाने अभ्यासपूर्ण सिरीज बनवली आहे. कदाचित प्रत्यक्षात याहीपेक्षा भयंकर घटना घडलेल्या असू शकतात. पण सिरीज मधील फोकस घटनांमागील घटनावर आहे. त्यामुळे रंगा बिर्ला ला फाशी होणे यापेक्षा फाशीचे execution कसे होते. जेल manual काय म्हणते. जल्लाद आल्यावर त्यांची व्यवस्था करणे. फाशी स्थळाची दुरुस्ती. ज्यांना फाशी होणार आहे त्यांची मनोवस्था या बाबी पाहतांना जाणवते कि हे फक्त वरवर बनवले नाहीय. उगाचच बनवल्याचा फार्स नाहीय त्यात.

जेलचे ऑडीट होणे. त्यात बारीक सारीक बिले दाखवणे. हे सर्व कौतुकास्पद आहे. otherwise तिहार वर सिरीज म्हणून काहीही नाट्य त्यात नाही. अर्थात यासाठी पुस्तकाचा आधार घेतलाच आहे. पण आपल्याकडे कादंबरीत वेगळे व स्क्रीन वर वेगळे दिसते. ड्रामा असलेल्या दृश्यांना महत्व दिले जाते. यात असे नाही. जेल मधील अंतर्गत सत्ता संघर्ष. जात व्यवस्था त्यावर आधारित विभाजन. धर्म . इंदिरा गांधी यांच्या काळातील विद्यार्थी आंदोलन ते त्यांची हत्या या जेल बाहेर घडणाऱ्या घटनांचा जेल मधील वातावरणावर होणारा प्रभाव पण यात दिसून येतो. ही सिरीज २०१९ च्या Black Warrant: कन्फेशन ऑफ तिहार जेल या सुनील गुप्ता व सुनेत्रा चौधरी यांच्या पुस्तकावर आहे.

विशेष म्हणजे कोणाच्या नजरेतून हे दाखवले आहे तर एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील साधा मुलगा जो नोकरीची गरज म्हणून परीक्षा देत असतो व जेलर म्हणून त्याची निवड होते. त्याच्या मुलाखती पासून या सिरीज ची सुरुवात होते. भारतात भरपूर घटना अनटच आहेत ज्यावर अजून काही आलेले नाही. म्हणून मग इतक्या वर्षांनी आलेल्या मानवत मर्डर पण चर्चा होते. आता असे platform पण उपलब्ध आहेत व तसे प्रेक्षक देखील तयार आहेत. त्यामुळे बरेच विषय अभ्यासपूर्ण मांडणीसह पुढे येत आहेत.

एक लक्षात येते कि एखाद्या व्यक्तीने त्याच्या भोवतालच्या नोंदी जरी करून ठेवल्या तरी तो एक ऐतिहासिक दस्ताऐवज होतो. आता त्या काळात असलेल्या व्यक्तीने तिहार जेल मधील घटना लिहून ठेवल्या त्या इतक्या वर्षात काळाच्या उदरात गडप झाल्या असत्या. कोणालाच समजले नसते कि त्या काळात काय झाले आहे. नेमाडे तेच म्हणतात, भोवतालच्या नोंदी करून ठेवत जा. किती महत्वाचे आहे हे. काही वर्षांनी त्याचे महत्व कळते. 


- समाधान महाजन 

फ्रॅक्चर्ड फ्रीडम - कोबाड गांधी

कोबाड गांधी यांचे फ्रक्चर्ड फ्रीडम नावाच्या पुस्तकाची चर्चा काही दिवसांपूर्वी होती.  राज्य शासनाचा पुरस्कार देखील या पुस्तकाला मिळाला होता. तो नंतर परत देखील घेण्यात आला होता. या विरोधाभाशी कारवाईमुळे अजूनच चर्चा झाली होती.  त्या वर्षाच्या अन्य पुरस्कारप्राप्त काही साहित्यीकांनी आपले पुरस्कार देखील परत केले होते.  नुकतेच हे पुस्तक वाचून संपवले.

कोबाड गांधी यांच्या जीवनावर काही चित्रपटात भूमिका दाखवण्यात आल्या आहेत. प्रकाश झा यांच्या चक्रव्यूह मधील ओम पुरीची भूमिका. मणीरत्नम यांच्या रावण मधील अभिषेक बच्चनची  भूमिका तसेच रेड अलर्ट चित्रपटात विनोद खन्ना याने केलेली भूमिका.  

१७ सप्टेंबर २००९ रोजी कोबाड गांधी यांना UAPA खाली अटक करण्यात आली होती. नक्षलवादी आणि अतिरेकी कारवायांच्या संदर्भात त्यांच्यावर जे आरोप होते, त्यातून त्यांची सुटका करण्यात आली आहे. दहा वर्ष व एक महिना तुरुंगात राहून कोबाड गांधी यांची १६ ऑक्टोबर २०१९ रोजी  सुटका झाली. या काळात भारतातील वेगवेगळ्या जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. त्यातील अनुभव व एकूण त्यांचे अभ्यासू चिंतन असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. जे बोजड भाषेत नाही तर सोप्या भाषेत आहे.  या पुस्तकात त्यांनी खर तर नक्षलवादावर टीका केलेली आहे. 

मला काय वाटल .... हे पुस्तक वाचतांना 

आपण विदेशातील लंडन, स्विस, न्यूयॉर्क, आदी देश व शहरांना पाहतो चित्रपटात. पडद्यावर. ते आपल्याला जाणवते पण जेव्हा आपण प्रत्यक्ष जर बघू तर ते फिलिंग वेगळे असेल. तसे काहीसे हे पुस्तक वाचतांना मला काही ठिकाणी जाणवले. विशेषतः आपण प्रकाश झा किंवा रामगोपाल वर्मा किंवा अनुराग कश्यप च्या चित्रपटात आपण उत्तरेतील बाहुबली नेते. गुन्हेगार व राजकारणी व जेल यांच्यातील पुसट झालेली सीमारेषा पाहतो. तेव्हा तिकडे असेच काहीसे असेल अशी आपली एक प्रतिमा मनात तयार झालेली असते. 

पण कोबाड गांधी या सर्व लोकांमध्ये जेलमध्ये राहिलेत. तिहार पासून तामिळनाडू, सुरत आदी विविध ठिकाणच्या जेल मधील  जीवन त्यांनी जवळून पाहिले. उत्तरेतील बाहुबली नेते, गुंड, समांतर व्यवस्था हि प्रत्यक्षात कसे काम करते ते त्यांनी अनुभवले.  गरिबाला बाहेर त्रास आहेच पण जेल मध्ये देखील भेदभाव आहे. साध्या मुलभूत बाबी मिळवण्यासाठी देखील पैसे लागतात किंवा अनेक दिवस वाट पहावी लागते. कदाचित पाहिजे असलेली वस्तू मिळेपर्यंत सबंधित कैदीचा जीव जाईल किंवा त्याची सुटका होईल किवा त्याची बदली होईल दुसऱ्या जेल मध्ये. यावर गांधी यांनी सविस्तर लिहिले आहे. 

या पुस्तकातील त्यांची काही मते उल्लेखनीय वाटतात. 

जसे- 

चक्रधर स्वामी व भक्ती परंपरा ते फुले शाहू आंबेडकर पेरियार या सर्वांनी जातीयता संपवण्याचा त्या त्या काळात प्रयत्न केला. पण आजच्या भारतात हि परंपरा गायब झाल्याचे मत गांधी एका ठिकाणी नोंदवितात आणि ते खरेच आहे. 

कम्युनिस्ट चळवळ देखील कुंठीतअवस्थेत आलीआहे. पुढे तिला रस्ता सापडत नाहीय.  

पंचतंत्र सारख्या गोष्टी मुलांना सांगितल्या तर त्यांच्यावर योग्य ते संस्कार करण्याची ताकद या कथांमध्ये आहे. सहाव्या शतकातील जातक कथा देखील अशाच आहेत.  आपल्या सांस्कृतिक इतिहासात इतक्या चांगल्या रचना असतांना आपल्या देशात आणि काम्युनिस्टामध्ये देखील त्याकडे दुर्लक्ष केले जाते. 

ते एका ठिकाणी म्हणतात, तुरुंगाच्या आत एक विश्व असते त्या विश्वात एकच देव असतो आणि तो म्हणजे पैसा. पैसा हि एक अशी शक्ती आहे जी सर्व प्रकारच्या स्वतान्र्याचा विध्वंस करते. अर्थात यावर त्यांनी सविस्तर लिहिलेले वाचले तरच खरा अर्थ त्यातून लक्षात येईल. 

कोबाड गांधी यांचे शिक्षण मुंबई आणि देहरादून च्या डून स्कूल मध्ये झालेले आहे. मुंबई ला रसायनशास्त्रमधील पदवी घेतल्यानंतर सीए होण्यासाठी ते इंग्लंडला गेले होते. तेथील वर्णद्वेष बघून ते डावीकडे झुकले. तेथील चळवळीत शामिल झाल्यामुळे तीन महिने लंडनच्या तुरुंगात त्यांना काढावे लागले. सी ए करणे सोडून १९७२ मध्ये भारतात येऊन इथल्या शोषित समूहांमध्ये काम करण्याचे त्यांनी ठरवले. १९८२ पासून २००२ पर्यंत ते नागपूर येथे होते. 

- समाधान महाजन