कार्यक्रम बघतांना जाणवत होते, हि एक जुनी पिढी आहे. काळाच्या पडद्याआड झपाट्याने जात आहे. या मंडळींचा जन्म स्वातंत्र्य मिळाले त्याच्या आसपासचा. त्यामुळे स्वातंत्र्याच्या काळातील पिढीचा यांच्यावर एक पगडा असेल. आदर्शवाद आणि त्याला जोडून स्वातंत्र्योत्तर काळात आलेला भांडवलवाद व मुक्तपणा अशा पार्श्वभूमीवर वावरणारी हि पिढी होती.
शिक्षण व अभ्यास सुरु असतांना यातील कुसुमाग्रज, बापट, करंदीकर, पाडगावकर, श्रीराम लागू, निळू फुले, विजय तेंडूलकर आदी दिग्गज म्हणवली जाणारी व्यक्तित्व हे काळाच्या पडद्याआड गेले होते. अर्थात दैनदिन वावरात त्यांच्याबद्दल वाचत व ऐकत होतोच. माझ्या मोठ्या भावाला एका निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल निळू फुले यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले होते. तेव्हाचा तो फोटो लहानपणी पाहिलेला असल्याने चित्रपटापलीकडील निळू भाऊ आहेत असे माहिती झाले होते. विजय तेंडूलकर यांची एक दोन पुस्तके काही मुलाखती पाहिलेल्या. त्यातील माझ्या हाती बंदूक असती तर अशा प्रकारचे विधान त्यांचे त्या काळात बरेच प्रसिद्ध झालेले. असे एकूण, म्हणजे अशा दिग्गज म्हणवल्या जाणाऱ्यांच्या आठवणी या अशा पाहीलेल्या, ऐकलेल्या वा वाचलेल्या. भेट, फोटो असे नाही. आपल्या स्वतःच्या जगण्यानातील संघर्षाची किनार संपत नाही तोपर्यंत नाटक, कादंबरी, कविता हे सर्व लाड कोड व एकदम ग्रामीण भाषेत सांगयचे म्हटले तर हे सर्व चोचले जिथे वाटतील असा भोवताल आसपास असल्याने सुरुवातीला एक वाचन सोडले तर व त्यातून जागृत होणारी उत्सुकता सोडली तर या क्षेत्रात आमची तशी फर प्रगती नव्हती. अर्थात हे फार उशिरा कळल कि यालाच जगणे समजणारी लोक इकडे आहेत. स्वतःचे आयुष्य या क्षेत्रात वेचणारे लोक आहेत. लौकिकअर्थाने कदाचित सर्वांनाच सुख संपत्ती नाव असे मिळाले नसेल कदाचित पण याच क्षेत्रात राहून संघर्ष करणारी मंडळी नंतरच्या आयुष्यात समजत गेली. असो,
तर हे ज्या वरील मंडळींचे नाव मी सांगितले ती पिढी त्याच्याही आधीच्या पिढी सोबत वाढलेली. म्हणजे काल जब्बार पटेल व सतीश आळेकर ज्या पद्धतीने कुसुमाग्रजांच्या आठवणी सांगत होते किंवा काही दिवसांपूर्वी पॉप्युलरच्या आठवणी ज्या प्रमाणे रामदास भटकळ यांच्या कडून एका कार्यक्रमात एकल्या. किंवा भालचंद नेमाडे त्यांच्या जुन्या काळातील आठवणी ज्या पद्धतीने सांगतात हे सर्व ऐकून वा या याच्यावर विचार करून असे वाटते कि या मंडळींना अगदी परीस असलेले माणसे भेटलेली. त्यांच्या संपर्कात आलेले. काम वा लिखाण याबद्दल त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळालेले अशी हि लोक आहेत. ज्यांना काळाच्या पडद्याआड गेलेल्या लोकांचा परीसस्पर्श मिळाला. असो,
तर आपल काय ?
सॉरी माझ काय?
मी इकडे कुठे न कशात?
तर त्याचे असे झाले कि हा कार्यक्रम ऐकत असतांना जाणवले कि हि परीसस्पर्श लाभलेली सर्व मंडळी आज वयाने साठच्या पुढे आहे. या लोकांना मी आज ऐकू शकत आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचे बालपण एकूणच हे मी अशा काळाबद्दल ऐकत आहे जेव्हा मी या भूतलावर नव्हतो. मला ते खूप आवडते. किती सुंदर ते दिवस असे वाटते. ...पण चटकन वाटते हि मंडळी देखील एकदिवस अशीच एकदम नाहीशी होतील एक एक. ..... तेव्हा ?
ऑफकोर्स काळ पुढे सरकतो. नवीन पिढी तिच्या कर्तुत्वाने वर येते. अगदी बरोबर....
पण काल सतीश आळेकर ज्या पद्धतीने कुसुमाग्रजांच्या घरातील भेटीगाठी याबद्दल सांगत होते. जे माझ्यासाठी पूर्णतः नवीन होते... जे त्यांच्या कोणत्या पुस्तकात नाहीय... हे मला कोण सांगणार..? याच्यावरची उत्तरे मला नको आहेत.
मी जे आता ऐकतोय..अनुभवतोय...हाही एक काळ आहे.
आणि आपल्या जगाच्या पलीकडे अनेक जग असतात तेथील यशाच्या फुटपट्टी वर ते लोक प्रचंड यशस्वी असतात. आपल्याला नावे माहिती असतात फक्त किंवा माहिती देखील नसतात. आपण समोर आलेले क्षण जगुण कृतार्थ व्हावे इतकेच!
- समाधान महाजन.
11/03/2025
.jpeg)
No comments:
Post a Comment