एखाद्या व्यक्तीचे नशीब कसे असावे? आजोळ म्हणजे गायकवाडांचे बडोदा, वडील कुचबिहार संस्थानचे राजे व नवरा म्हणजे जयपूर संस्थानचा राजा. हि लीगेसी ज्या व्यक्तीला मिळाली त्या गायत्री देवींचे व्यक्तिमत्व देखील काळाच्या पडद्यावर झळाळून जाणारे होते. काही यु ट्यूब चानेल्स मधून त्यांची माहिती दिली आहे पण ती काहीशी अतिरंजित वा उथळ स्वरुपाची आहे. त्यातल्या त्यात सिमी गरेवाल यांनी गायत्री देवींची एक मुलाखत घेतलेली आहे. ती नक्कीच बघण्यासारखी आहे.
असो, तर या पुस्तकातून अनेक अनटच प्रश्नांची उत्तरे आहेत. आणीबाणीत पाच सहा महिने तिहार जेल मध्ये त्यांना राहावे लागले होते. त्यांच्या घरांवर आयकर विभागाची रेड पडली होती. त्याचीही माहिती त्यांनी दिली आहे. पण त्याआधीची रंजक माहितीही महत्वाची आहे. गायत्री देवी पहिल्याच प्रकरनात त्यांच्या कुचबिहारवरून बडोदा या त्यांच्या लहानपणीच्या रेल्वेप्रवासाची माहिती सांगतात. कुचबिहार वरून एक रात्र प्रवास करून ते कलकत्त्याला पोहचायचे. तेथे त्यांचे ‘वूडland नावाचे घर होते तिथे दोन दिवस थांबायचे. मग पुढील प्रवासास निघायचे. शेवटी बडोदा संस्थानच्या लक्ष्मीविलास palace मध्ये पोहचल्यावर हा प्रवास संपायचा. ज्या इंजिनियरने कुचबिहारचा राजवाडा बांधला होता त्यानेच हा palace देखील बांधला होता. दोन्ही वास्तूंसाठी इंडो-सरसानिक शैली वापरली होती.
गायत्रीदेवींच्या आजीला , आजोबांनी शिकविले. त्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. या आजी पुढे all इंडिया कॉन्फरन्सच्या अध्यक्ष झाल्या. त्यातील एक नात आणि आजोबांचा संवाद महत्वाचा आहे. आजोबा म्हणतात, “तू पलंगावर पडली तर झोपायला हवस. तू वाचत असली तर फक्त वाचायचे. खात असली तर फक्त खायचं, विचार करायचा असला तर फक्त विचारच करायचा. दोन वेगळ्या गोष्टी मिसळू नकोस. त्यातून काहीच चांगल निष्पन्न होत नाही. आनंदही मिळत नाही आणि फायदा हि होत नाही”
१९११ च्या दिल्ली दरबाराला हे सर्व महत्वाची संस्थांनी लोक उपस्थित होते. गायत्री देवींच्या आईचे नाव इंदिरा गायकवाड. त्यांचे लग्न घरच्यांना ग्वाल्हेरच्या शिंद्यांशी करायचे होते. पण त्यांनी नकार दिला व जुलै १९१३ ला लंडन मध्ये कुचबिहारच्या राजाशी त्यांचे लग्न झाले. त्या स्वतः दिसायला सुंदर होत्या. पहिले महायुद्ध संपल्यावर ते सुट्टी घेऊन लंडनला गेले. २३ मे १९१९ रोजी गायत्रीदेवींचा जन्म झाला. गरोदरपणात त्यांची आई रायडर हेगार्डची she /शी नावाची कादंबरी वाचत होती. तेव्हा त्यांनी ठरवले कि त्यांना मुलगी झाली तर तिचे नाव या कादंबरीतील नायीकेवरून आयेशा असे ठेवायचे. गायत्रीदेवींनी बारा वर्षांची असतांना एका बिबट्याची शिकार केली. त्या शिकारीचे व एकूणच कुचबिहार संस्थानचे केलेले वर्णन वाचन्यासारखे आहे.
गायत्रीदेवी लंडनच्या ग्लेनडोवर स्कूलमध्ये शिकल्या. शांतीनिकेतन मध्ये देखील त्यांचे वर्षभर शिक्षण झालेले आहे. १७ एप्रिल १९४० ला जयपूरचे राजे जय यांच्याशी त्यांचे लग्न झाले. जय यांच्या त्या तिसऱ्या पत्नी होत्या. badmintan असोसीयशान ऑफ इंडियाच्या त्या अध्यक्ष होत्या. टेनिस असोसिएशन ऑफ इंडिया च्या त्या उपाध्यक्ष होत्या.
भारताच्या पहिल्या निवडणुकीच्या काळात जोधपुरचे महाराज निवडणुकीस अपक्ष म्हणून उभे राहिले. प्रचार संपून मतदान झाल्यानतर एका विमान अपघातात त्यांचे निधन झाले. जेव्हा निकाल लागले तेव्हा महाराजांचा दहा हजार मतांनी विजय झाला होता. त्यांच्या विरोधातील कॉंग्रेसचे उमेदवार जयनारायण व्यास यांचे डीपोझिट जप्त झाले होते. पण नंतर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रतिस्पर्धी नसल्याने व्यास निवडून आले व राजस्थानचे मुख्यमंत्री बनले.
गायत्रीदेवी पुस्तकात एका ठिकाणी म्हणतात, ज्या जमिनीवर नवी दिल्लीची उभारणी झाली आहे. ती पूर्ण जमीन एके काळी जयपूरच्या महाराजांची व्यक्तिगत मालमत्ता होती. पण बऱ्याच काळापूर्वी त्या जमिनी सरकारला दिल्या गेल्या. नवी राजधानी वसविण्यासाठी जयच्या दत्तक वडिलांनी पंजाबमधील एका खेड्याच्या बदल्यात ती जमीन देऊन टाकली.
गायत्री देवी यांनी जयपूर हस्तकलेचे प्रदर्शन नवी दिल्ली येथे भरवले होते तेव्हा त्याचे उद्घाटन पंडित नेहरू यांच्या हस्ते करण्यात आले होते. १९६२ च्या निवडणुकीत गायत्री देवी यांनी सी. राजगोपालाचारी यांच्या स्वतंत्र पक्षाकडून निवडणूक लढवली. प्रचार केला. कॉंग्रस पक्षाचे चिन्ह होते एकत्र जुंपलेली बैलजोडी, समाजवादी पक्षाचे चिन्ह होते वटवृक्ष, साम्यवादी पक्षाचे चिन्ह होते कोयता आणि गव्हाच्या ओम्ब्याच्या तीन डहाळ्या, स्वतंत्र पक्षाचे चिन्ह तारा होते. गायत्रीदेवींना ते चिन्ह पटवून देण्यात खूप त्रास व्हायचा. अखेर निकाल लागला तेव्हा कॉंग्रेस उमेदवाराचा एक लाख पंच्यात्तर हजार मतांनी पराभव करून गायत्री देवी निवडून आल्या. या बहुमतामुळे त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्यांची नोंद झाली. सर्व विरोधी उमेदवारांचे डीपोझीट जप्त झाले. तेव्हाचे अमेरिकन अध्यक्ष केनेडी यांच्याशी भेट झाली होती.
एकूणच गायत्री देवी यांच्या आयुष्याच्या विविध घटनांची आपल्याला माहिती तर मिळतेच शिवाय तत्कालीन समाजव्यवस्था, संस्थानिक व जनता यांच्यातील नाते. तत्कालीन राजकारण अशा विविध बाबींची महत्वपूर्ण माहिती या पुस्तकातून आपल्याला मिळते.
- समाधान महाजन / १७ मार्च २०२५


.jpeg)