कुठलीही व्यक्ती समजून घेतांना त्याचा भोवताल व तो काळ समजून घेणे आवश्यक आहे. तो किंवा ती व्यक्ती कुठल्या समाजात जन्माला आली. तिची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक स्थिती कशी होती. ती ज्या काळात जन्माला आली त्या काळातील वातावरण कसे होते या सर्व निकषांवर व्यक्ती पडताळून पाहणे गरजेचे आहे. नाहीतर अलीकडचे जे वातावरण आहे ते तुकड्या तुकड्यात अर्थ लावण्याचे आहे. ते पण वर्तमानाच्या निकषावर ..मग त्यातून वाद होतात. गैरसमज होतात. ‘बरे झाले इंग्रज आले.......पेशवाई गेली’ यातील पहिलेच वाक्य परत परत सांगितले गेले व दुसरे दडवून ठेवले गेले तर बोलणारी व्यक्ती इंग्रजांची समर्थक होती असे चित्र उभे राहील पण वास्तवताः या वाक्यातील तत्कालीन समाजस्थितीचे आकलन केल्यास त्यातील मतितार्थ लक्षात येईल.
आपसाआपसातील गट तट वाद विसरून कधी नव्हे ते एकत्रित येण्याची व प्रतिकार करण्याची गरज आज तयार झाली आहे. तो आमचा नाही. हा आमचा नाही आमच्यावर जेव्हा केव्हा बोलतील तेव्हा बघू .... हे म्हणत बसण्याचा हा काळ नाही नाहीतर उदारमतवाद, समाजसुधारकांचा महाराष्ट्र, पुरोगामी महाराष्ट्र हे इतिहासात जमाच होणार नाहीत तर इतिहासातून पण बेदखल होतील.
“जेव्हा सिंह लिहील तेव्हा खरा शिकारीचा इतिहास बाहेर येईल’ अशी एक आफ्रिकन म्हण आहे. शिकारी इतिहास लिहितांना सावज कसा पकडला या आपल्या पराक्रमाचे गोडवे गात राहील जोपर्यंत सिंह स्वतः आपला इतिहास लिहिणार नाही. अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण किंवा तमाम दलित साहित्य हा एका अर्थाने सिंहाने लिहिलेला इतिहास आहे. इथे आपल्याकडे भरपूर सिंहासारखे वाघासारखे लोक झालेत. आपल्याला त्यांच कार्य व आदर्श जतन ठेवणेही महाग झाले आहे.
खुडे यांनी आपल्या पुस्तकात अन्नाभाऊंच्या साहित्य व्यवहारात सामाजिक रहिवासाचे तीन तळ असतात. असे सांगितले आहे.
1. जाती समजाचा
2. वासाहतिक काळातील भांडवली स्ठीयान्तारातून घडलेल्या समाजस्थितीचा
3. मार्क्सवादी जीवनदृष्टीचा
हे तीन तळ त्यांच्या एकूणच जीवनाला आकार देतात.
पहिला तळ
ज्या जातीत त्यांनी जन्म घेतला त्या बाबत माहिती यात आहे. जी बाकीच्यांसाठी नवीन असू शकते. ती एकूणच जातव्यवस्थेवर प्रकाश टाकणारी आहे. गड, वाडे, महाल, विहीर, तलावाच्या बांधकामात मांगांचा जिवंत बळी दिला जायाचा. त्या दगडी तांद्ळ्यांना मांगीर बाबाचे रूप दिले जायचे. कसल्या क्रूर प्रथा पाळल्या जायच्या. ... बांधकाम पक्क काय बळींनी होते काय... त्याशिवाय बांधकाम टिकत नाही का? विदेशात व तत्कालीन युरोपात काय कोणाचा बळी देऊन बांधकाम केलीत का? पण इथे हा प्रकार सुरु होता.
गड किल्ल्यांचे रक्षण करणार्यांना गुन्हेगारी जातीत टाकले गेले. जे ग्रहण सुटल्यानंतर मागायला येणारी मंडळी असती ते म्हणजे उलटफेऱ्यातून मुक्त करण्याचे – चंद्र, व सूर्य यांना ग्रहानातून मुक्त करण्याची परतफेड म्हणून मोबदला असतो.
मातंग जातीचे पूर्वापार कामे दोरखंड तयार करणे, वाजंत्री वाजविणे, केरसुण्या, झाडू, रखवाली, साफसफाई इत्यादी यातून बाहेर पडून मूळ प्रवाहात येणे त्या काळी किती अवघड असेल.
काकरी, तेलंगी, रंगीत देसुर्या, ढाल्या बलूर, पेठे, मांग-गारुडी या पोट जाती आहेत किंवा नमस्कारासाठी ते हयात व फुर्मान असे शब्द वापरतात तसेच बसवपुराणाची कहाणी या पुस्तकात दिली आहे जी जातीच्या उत्पत्तीची एक आख्यायिका म्हणून समजून घेणे गरजेचे आहे. अर्थात खुडे याही कहाणीची तर्कवादी मीमांसा करतात.
बसवपुरानच्या कहाणीनुसार देवांसमोर आव्हान बनलेल्या बसवला (बैलाचे नाव) जांभ ऋषी शांत करतात त्याच्या तीन शिन्गांपैकी एक शिंग काढून घेतात. खच्ची करून शेतीच्या कामाला पाठवतात. संतापलेला बसव शाप देतो. जांभ ऋषींचे वारस मातंग समाजातील असतील असा. याही आख्यायिकाचे विश्लेषण महादेव खुडे यांनी आपल्या पुस्तकात केले आहे.
दुसरा तळ
वसाहतीक काळात १९२५ च्या कायद्याने मांग जमातीला गुन्हेगारी जमातीच्या यादीत टाकले. पूर्वापार व्यवसाय कमी होत गेले. नोकरी साठी पोटापाण्यासाठी स्थलांतर होत गेले. या सर्वांचा परिणाम अण्णाभाऊ व त्यांच्या काळातील पिढीवर होत होता म्हणून वाटेगाव ते मुंबई हा पायी प्रवास त्यांच्या कुटुंबियांना पायी करावा लागला. १९३०-३१ च्या काळात . मुंबई सारख्या महानगरात जात वर्गीय भान येण्याचा हा काळ होता. वसाहतवादी घटना व निर्णयांनी तसेच कायद्यांनी जातव्यवस्थेवर दूरगामी परिणाम केले.
तिसरा तळ -मार्क्सवादी जीवनदृष्टी
जातीलढे व वर्गलढे एकत्रित लढण्याची घोषणा सर्वानीच केली. पण यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांच्या कामावर सातत्याने चर्चा झाली तर तर लोकांपर्यंत पोहचेल हा हेतू या लिखाणमागे आहे. असे लेखकाने त्याच्या मनोगतात व्यक्त केले आहे.
दुखाला वाचा फोडण्यासाठी अण्णाभाऊनी मार्क्सवादासारखे शास्रीय हत्यार वापरले. मार्क्सने समाज समजून घेण्यासाठी अर्थशास्राचा पहिल्यांदाच वापर केला. पण मुळात मार्क्सवाद येथील जनतेला पचनी न पडण्याचे कारण वर्गव्यवस्थेपेक्षा येथे भक्कम असलेली जात व्यवस्था. ती समजून घ्यायला मार्क्सवाद कमी पडला असे म्हणावे लागेल. त्यामुळे या पुस्तकात विधान येते कि, “भारतातील जातीप्रश्नांकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोनामुळे कम्युनिस्ट चळवळीला मोठी किंमत मोजावी लागली.”
every personal is political हे फेमीनिझमच्या काळात उदयास आले. If you write more and more personal it becomes more universal असे म्हटले जाते. पण शेवटी दलित साहित्य म्हणजे तरी काय? ते पर्सनल तितकेच युनिवर्सल व पोलिटिकल आहे. म्हणून मग अण्णा भाऊंचे साहित्य वर्गीय ? जातीयवादी? मानवतावादी? निव्वळ वास्तववादी? असे प्रश्न विचारून खुडे अण्णा भाऊंच्या साहित्याच्या वैश्विक जाणीवा विषद करतात.
अन्तोनिया ग्रामशी या राजकीय तत्ववेत्त्याने मांडलेल्या सिद्धांतानुसार सांस्कृतिक क्षेत्र आर्थिक सामाजिक घटकांना समांतर असते असे मत मांडले. मुळात अर्थव्यवस्था ज्याच्या ताब्यात असते त्याच्या सांस्कृतिक व चालीरीती अशा बाबींचा प्रभाव विस्तृत प्रभाव बाकी समाजावर पडतो. वसाहतवादी इंग्रज लोकांच्या संस्कृतीचा प्रभाव म्हणून जगभर पडतो व शीतयुद्धानंतर अमेरिकन संस्कृतीचा पडतो त्याला कारण ग्रामशी याने मांडलेले हेगेमनीचे तत्व.
अण्णाभाऊवर मक्झीम गॉर्कीच्या साहित्याचा प्रभाव होता. त्यांचा एक छोटा पुतळावजा मूर्ती अण्णांच्या स्टडी टेबलवर ठेवलेली असायची. अनेक जन त्यांना मराठीतील गॉर्की असेही म्हणतात. जग बदल घालूनी घाव | सांगुनी गेले मला भीमराव” असे म्हणणाऱ्या अण्णा भाऊंना अखेरच्या कालखंडात अनेक अपप्रचार करून सत्ताधाऱ्यांनी तसेच काही लोकांनी प्रस्तुत केले. या अपप्रचाराला विरोध करण्याचे काम चळवळळीकडून झाले नाही. याचा समाचार या पुस्तकात घेण्यात आला आहे. आजही असे अपप्रचार आहेत याला त्याच भाषेत संस्थात्मक चळवळीतून उत्तर मिळाले पाहिजे. हि शेवटची शोकांतिका फक्त अण्णाभाऊचीच झाली असे नाही तर वामनदादा कर्डक, साने गुरुजी यांना देखील तेच अनुभव आले. येथे व्यक्तीपेक्षा पक्षाची ध्येयधोरणे देखील चुकीची होती यावर खुडे भर देतात.
प्रस्तुत पुस्तकात अण्णाभाऊचे भाऊ कॉम्रेड शंकर भाऊ साठे यांच्यावर देखील स्वतंत्र प्रकरण आहे. १२ कादंबऱ्या लिहिणाऱ्या शंकर भाऊ यांचा पत्री सरकारशी सबंध होता. १९८० साली पहिल्यांदा अण्णाभाऊवरील चरित्र प्रकाशित झाले.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ च्या काळात लाल बावटा कलापथकाची स्थापना शाहिर गव्हाणकर, शाहीर अमर शेख, अनाभाऊ यांनी केली होती. माझी मैना गावावर राहिली. या प्रसिद्ध छक्कडचि निर्मिती अण्णाभाऊंनी याच काळात केली होती. तमाशाचे लोकनाट्य हे नामकरण देखील अन्नाभाऊंनी केले होते.
या आधी मी अण्णा भाऊ यांच्यावर बरेच सारे वृत्तपत्रीय व मासिकातील अनेक लेख वाचले पण एक-दोन चांगली पुस्तके देखील वाचली होती- त्यात नांदेड हून पी. विठ्ठल व डॉ. राजेश्वर यांनी लिहिलेले जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे तसेच विश्वास पाटील यांनी लिहिलेले अण्णाभाऊची दर्दभरी दास्तान यांचा समावेश होता.
त्यांनी हे पुस्तक कॉम्रेड जयवंताबाई यांना अर्पण केले आहे. हे अजून एक विशेष. अण्णाभाऊ साठे यांच्या दुसऱ्या पत्नी जयवंता होते. बऱ्याचदा अशा घटनांमध्ये त्या दुसऱ्या स्रीवर बर्यापैकी अन्याय होतो. पण त्यातील अनेक आरोपांचा परखड समाचार महादेव खुडे यांनी एका स्वतंत्र प्रकरणातच घेतलेला आहे.
शरद पाटील यांनी अण्णाभाऊच्या फकीराची व त्यांच्या साहित्याची समीक्षा चिकित्सा केली. त्याचीही परखड तपासणी खुडे यांनी करून त्यातील दोष सांगितले आहेत.
तमाशा व शाहिरी परंपरांचा आढावा घेतला आहे.
तसेच अण्णा भाऊंच्या विचार व साहित्याचे आजच्या काळातील महत्व यावर देखील भाष्य केले आहे. एकूणच अण्णा भाऊवर जी पुस्तके लिहिली गेली आहेत त्यातील हे एक महत्वाचे दुर्लक्षित न करण्यासारखे व काळाने नोंद घ्यावी असे हे पुस्तक आहे असे मला वाटते.
- समाधान महाजन

No comments:
Post a Comment