माझ्या पुस्तकाचे अनुभव -१


खर तर माझ पुस्तक आणि त्याबाबत काही फारस लिहू नये असे वाटत असते. पण आज लिहिण्यासारखे वाटल्याने लिहित आहे. असेही स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसाठी ज्ञानपीठ, साहित्य अकादमी आदी छोटे पुरस्कार नसल्याने वा चाळ सम्राट , गल्ली रत्न वैगेरे मोठे पुरस्कार देखील अद्यापपावेतो आयोजित करण्यात आलेले नसल्याने ... आपल्या पुस्तकाची उगाचच का जाहिरात करावी म्हणून मी ते टाळतो.... वरील वाक्यात काही अंश विनोदाचे होते याची नोंद चाणाक्ष वाचकांनी घेतली असावी. आजकाल असे सांगावं लागते...लोक खूपच भावनिक झालेत...चटकन भावना दुखावतात... 
' आधुनिक भारताचा इतिहास - महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात ' असे जरा मोठे नाव असलेले माझे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी वाचत असतात. त्या निम्मित विविध अनुभव येत असतात. 
परवा कॅरीडोरमध्ये एका सहकाऱ्याशी बोलत उभा असताना एक मुलगा पाहत जवळून चालला होता. तो थांबू की नको या द्विधा अवस्थेत दिसला. मग थांबून त्याला थेट विचारलं की तूला माझ्याशी काही बोलायचे आहे का ? तर त्याने हो म्हटल व तुम्ही महाजन सर ना असे म्हणत तो पाया पडू लागला. त्याला म्हंटले तू थोड्या वेळात केबिनला ये. 
तो आला पण एकदम सायलेंट....म्हणजे अलीकडे धाडकन दरवाजा उघडून आत येत खाडकन खुर्ची ओढून त्यावर रजनी स्टाईल ने बसणाऱ्या नवीन रक्ताच्या तुलनेत हे वेगळंच होत....अलीकडे सवयच झालीय अशी ... असो तर.. मग चर्चअंती समजले की... STI म्हणून तो सात आठ दिवसांपूर्वीच आमच्या ऑफिसला जॉइन झालेला होता. नाशिकच्या आदिवासी सुरगाना तालुक्यातील एक छोट्या खेड्यातील तो आहे. एक दीड एकर कोरडवाहू शेती तो घरात मोठा त्यामुळे जबाबदारी व शिक्षण सोबत सोबत घेतले....त्याचे विशेष म्हणजे तो १० किलोमिटर रानिंग स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर तिसरा आलेला आहे....आता अंतर राष्ट्रीय स्पर्धेची तयारी तो करत आहे ...आणि तो नक्की त्यात यश मिळवेल हे त्याचे पाणीदार डोळेच सांगत होते... त्याचे नावच त्याच्या करिअरला साजेशे होते.. ' भागिनाथ गायकवाड ' 

तो सांगत होता, सर तुमच्या पुस्तकाने माझ्या इतिहासाच्या मार्कात सुधारणा झाली...पुस्तक घ्यायला पैसे नव्हते...दोन तीन जणांकडून उसने पैसे घेतले होते....पुढे खूप काही त्याला बोलायचे होते पण बोलवेना..त्याच्या डोळ्यात पाणी होते ...मी पण स्तब्ध झालो. मग इतर तयारी विषयी बोलून काही मदत लागल्यास हक्काने सांग म्हटल्यास तो प्रसन्न झाला...
काही दिवसांपूर्वी मुंबईहून नाशिक ट्रेनने येत होतो. वरचा बर्थ असल्याने सीएसटी पासून कानात हेडफोन ...आपले 90s साँग प्लेलिस्ट ऐकत पडून होतो..कसारा जवळ गाडी बराच वेळ थांबल्याने थोडे उठून बसलो...खाली एक मध्यम वर्गीय कपल व पलीकडील शीटवरील एक मुलगी यांच्यातील गप्पा रंगात आलेल्या होत्या. ती ताई सांगत होती..त्यांना...खूप काही ...त्या परीक्षा पास होणे खूपच कस खाते...मुलींना तर घरचे लोक खूप कमी वेळ देतात...त्यांना फक्त लिस्ट मध्ये नाव पाहिजे असते...प्री मेन्स असे काही त्यांना कळत नाही..इत्यादी इत्यादी...मग लक्षात आले की तिचे कुठल्यातरी पदावर selection झालेले आहे...
मग मी आपल वरूनच सहज तिला विचारलं,..' ताई कोणत्या पदावर selection झालेले आहे तुझे ? 
ती म्हटली.. PSI
मग वर्ष विचारले...recent दोन तीन वर्षांपूर्वी तिची निवड झाली होती. आता पोस्टिंग मुंबईला होती...
मग पुढे विचारले....म्हटल तू इतिहासाला कोणते पुस्तक वाचले ? 
ती अगदी क्षणात म्हटली.... समाधान महाजन ...
म्हटल तू त्यांना कधी भेटलीस का? 
तिने थोडा वेळ माझ्याकडे पाहिले...मी तिला अंदाज घेऊ दिला....yes... सर तुम्ही आहात...समाधान महाजन... बापरे..एक दोन मिनिट ती काही बोलेचना ...she was completely in shock ..
अशा प्रसंगाच्या अलीकडे सवय झाल्याने...मीच हळूहळू तिला बोलत केला...म्हटल नो problem.. अस काही expected नसत कोण कुठे भेटेल वैगेरे... ती भानावर आल्यावर पहिलं वाक्य बोलली .. सर तुम्ही खूप सुंदर पुस्तक तयार केलेय... आम्ही इतिहासाला दुसरे काही वाचतच नाही...आमच्या पूर्ण PSI बॅच कडून तुम्हाला खूप खूप thank you...
जळगाव सोडण्याच्या आधी एक दोन महिन्यापूर्वीची गोष्ट.... एक सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कार्यालयात होता. दोन तीन जणांच्या निवृत्तीत एक शिपाई असणाऱ्या भल्या माणसाचा देखील त्यात समावेश होता.... कार्यक्रम सुरु होण्या आधी हॉलमध्ये मागे आम्ही उभे होतो...त्यात ज्यांचा कार्यक्रम असतो त्यांचे नातेवाईक देखील येतात त्यामुळे ती मंडळी देखील उपस्थित होती. त्या घोळक्यातील एक मुलगा सारख पाहत होता...मग तो थोडा पुढे आला. मला विचारल...'सर तुम्ही महाजन सर ना..... आणि मग बराच वेळ तो भारावून बोलत राहिला. कार्यक्रम सुरु होण्याची वेळ झाली पण तो बोलताच होता... शेवटी त्याला म्हटले ... today is your fathers day... त्यांच्यासोबत राहा.... कार्यक्रमात मान्यवरांचे बोलणे झाल्यावर हा मुलगा मनोगत व्यक्त करण्यासाठी पुढे गेला.. आपल्या वडिलांबाबत बोलणे झाल्यावर ... तो थेट माझ्यावर बोलायला लागला....बोलणे संपता संपता तो अगदी निरागस पणे म्हटला कि, 'सरांना इतके लोक ओळखतात कि, सर जर सदाशिव पेठेत उभे राहिले तर निवडून येतील.'.... आम्हाला हसायला आले. सदशिव पेठेतून निवडून येण्या इतका कॉन्फिडन्स असायला निरागस असणेच महत्वाचे आहे बाकी सुज्ञास सांगणे न लागे.... 
थोडक्यात सांगायचे तर पुस्तकामुळे असे रंगीबेरंगी अनुभव येत असतात. बरेच प्रसंग प्रत्यक्ष घडत असतात...हे आपले उदाहरणार्थ वैगेरे....
फोन कॉल्स वरील किस्स्यांचे अजून एक जग आहे.... अगदी गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार, कोल्हापूर, नांदेड, परभणी ते मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद यातील एकही भाग नसेल जिथून विद्यार्थ्यांनी मला संपर्क केलेला नसेल. पुस्तकानिमित्त एक वेगळी ओळख राज्यभर झाल्याचे कायम जाणवत राहते.  कॉल आल्यावर  बऱ्याचदा पहिले वाक्य हेच ऐकावे लागते...सर तुम्ही नक्की समाधान महाजन सर बोलताय ना...o God..omg .. माझा विश्वासच बसत नाही इत्यादी... एकदा गाडीत with फॅमिली होतो...कॉल आला ..अनोळखी नंबर वरून... Blue thooth असल्याने कारच्या स्पीकरवरून सर्वांना ऐकू जात होते...एका विद्यार्थिनीचा कॉल होता...she was very excited that she talked with जो कोणी समाधान महाजन नामक इसम आहे त्याच्याशी प्रत्यक्ष बोलत असल्याने ..तिचे ते omg करत मोठ्याने किंचाळणे व आश्चर्यमिश्रित आनंदाचे बोलणे ऐकून बायको विचित्र नजरेने पाहण्याच्या आत तिला म्हटल ताई नंतर बोलू आम्ही प्रवासात आहोत....
अगदी रस्त्याने चालतांना, मॉल मध्ये किंवा कुठेही ओळखणारे विद्यार्थी असतात .अलीकडे बायकोलाही अशा प्रसंगांची सवय झाल्याने मी कुठेही गेलो तरी तिला काही वाटत नाही ....कारण माझे विद्यार्थी कुठेही भेटतात याचा ती अनुभव घेत असते...

जळगावला असतांना सुशीलकुमार सोबत इतिहास चित्रपट, वेब सिरीज यावर आभाळ हेपलत असतांना  एखाद्या टपरीवरचा चहा घेत असू... आजूबाजूला सर्व अभ्यास करणारी विद्यार्थी असत एखाद्यावेळा त्यातील काही जन ओळखत .. संवाद होई... पण ओळख न देता झालेला नैसर्गिक संवाद अधिक चांगला राहत असे...  

एक दोन वर्षांपूर्वी गडचिरोली साईड ने एक फोन आला. तो मुलगा सांगत होता सर मागे मी तुम्हाला कॉल केला होता तुम्ही सांगितल्या प्रमाणे तयारी केली होती सर एक जिल्हा भरतीच्या कुठल्याशा जागेवर त्याची निवड झाल्याने तो खूश होता ...खूप भारावून तो बोलत होता...कारण त्याने अभ्यास सुरू केला होता व मी त्याच्या आयुष्यातील प्रथमच असा अधिकारी व्यक्ती होतो ज्याच्याशी तो बोलत होता...पुढे अभ्यास सुरू ठेवतो म्हटला.... त्याच्या लहानशा गावातील तो पहिलाच नोकरी लागलेला मुलगा होता...त्याच्या आनंदात मला सहभागी होता आले हाच आनंद ....नाहीतर गडचिरोलीच्या मुलाच्या आयुष्यात माझ्यासारख्या इतक्या दूर राहणाऱ्या माणसाचे योगदान ते काय असते...हे फक्त त्या पुस्तकामुळे झाले.
कधी कधी माझ्याच पुस्तकाच्या प्रतिक्रिया चेक करण्याची संधी मला पण भेटून जाते. काही दिवसांपूर्वी एका मोठ्या व्यक्तीला माझे पुस्तक द्यायचे होते. त्यांनी भेटायला बोलावले. नेमक माझ्याकडे असलेल्या sample copies संपल्या होत्या. वेळ कमी होता. रस्त्याने जातांना एका पुस्तकाच्या दुकानात गेलो..त्यांना सरळ माझ्या पुस्तकाचे नाव न सांगता विचारले कि, इतिहासाचे एक चांगले पुस्तक पाहिजे.. upsc /mpsc वाले जे वापरतात ते.... त्याने आत आवाज दिला... 'एक समाधान महाजन दे रे... त्यांना म्हटले अहो हे चांगले आहे का पुस्तक पण... ते म्हणे आमच्याकडे सर्वात जास्त हेच विकले जाते... चांगले असेल म्हणूनच लोक घेतात ना...फार वेळ नव्हता.. थोडक्यात बोलून निघालो... 
एकदा यशदामध्ये ट्रेनिंगला गेलो असता... तिथल्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी पुढे चालत होती... त्यांच्या हातात माझे पुस्तक दिसले... त्यांना थांबवून विचारले... कशाचा अभ्यास करता ते म्हटले upsc व राज्यसेवा... त्यांना म्हटले माझा भाऊ अभ्यास करतो. हे इतिहासाचे पुस्तक कसे आहे... त्यांनी सांगितले आम्ही हेच वाचतो इतिहासाला... मी म्हटले माझा भाऊ म्हणतो ... काही खास नाही पुस्तक दुसरे आन असे... . मनातल्या मनात ...'न जाने कहा कहा से चले आते है..लोग ..असा विचार करत त्यांनी एक प्रचंड विचित्र लुक दिला व लगेच ते चालले गेले... 
एक अनुभव असा पण येतो ...काही मित्र, ओळखीचे व नातेवाइकांचे कामासाठी फोन येतात. त्यांची कामे महसूल पोलीस शिक्षण अशा विभागात असतात. मग सबंधित माहिती घेऊन त्या त्या विभागातील अधिकारी उदा. प्रांत, तहसिलदार, dy.sp गट विकास अधिकारी शिक्षणाधिकारी, इत्यादी.. फोन करून कामासाठी मदत करावी अशी विनंती करणारा फोन मी करतांना सुरुवातीला माझे नाव व पद सांगतो ... तिकडून जोरदार आवाज येतो सर तुम्ही ते इतिहासाच्या पुस्तकाचेच महाजन सर ना... मग पुढील काही मिनिट तो अधिकारी आनंदात बोलत असतो. अर्थात त्याच्या इतका आनंद मला पण होतो ... चला नाव लक्षात राहण्यासारखे काहीतरी चांगल काम जीवनात होतेय ... तितकच समाधान. 
 गेल्या काही वर्षापासून  महाराष्ट्रात निवड झालेल्या अनेक क्लास १ क्लास २ अधिकाऱ्यांच्या बुक लिस्ट मध्ये आपल्या पुस्तकाचे नाव कायम असणे हि एक चांगल्या कामाची पावती आहे.. 
 
महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी मित्रांचे मनःपूर्वक आभार...शुभेच्छा...आपण गेली दहा वर्ष माझ्यावरील प्रेम अबाधित ठेवले. ते पुढेही राहील अशी अपेक्षा... पुढील दहावी आवृत्ती २०२४ पर्यंत येईल... त्या बाबत वारंवार विचारणा होतेय म्हणून इथे सांगतोय. हे पुस्तक आपल्या पर्यंत पोहचविणाऱ्या संपूर्ण युनिक टीमचे मनःपूर्वक आभार. 

- समाधान महाजन

(यात अत्यंत निवडक अनुभव मांडलेले आहेत...जवळपास रोजचेच येणारे फोन कॉल, विविध माध्यमातून येणारे मेसेजेस, अनेक प्रत्यक्ष भेटी व अनेक ठिकाणी होणारे कार्यक्रम यांचा अंतर्भाव यात केलेला नाही.....ते सर्वच लिहायला घेतले किंवा स्क्रीनशॉट टाकायला घेतले तर एक वेगळे पुस्तकच लिहावे लागेल.)

ओ साकी साकी...


तर असे की राजाभाऊंकडून ( Raja Gaikwad ) त्यांचे नवप्रकाशित " ओ साकी साकी" पुस्तक चक्क भेट मिळाले आहे. तो लाभ आपल्याला पण होईल असे कोणी समजू नये...राजाभाऊ राजाभाऊ असतात .....तुम्ही मागायला गेलात तर... गेले उडत म्हणून ते लगेच ऑनलाईन बुक करा असे म्हणतात.

हा फोटो काढणाऱ्याला सुद्धा ते, 'विकत घेऊन  वाच की लेका', असा मूलभूत सल्ला वजा धमकी माझ्या समोरच दिल्याने हा शाल जोडीतील असून हे पुस्तक फक्त फोटो काढून राजाभाऊ परत घेता की काय अशी जोरदार शंका मनात होती. पण चटकन पुस्तक काखोटीला मारून त्यांच्या केबिन बाहेर झपाट्याने बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला. 


राजाभाऊ हे पुस्तक मला देण्यास नाखूष असण्याचे मोठ

कारण हे असू शकते की आम्ही पूर्ण teatottler असल्याने व "आणा चखणा, संपवा पटकन" गँगचे तह हयात सदस्य असल्याने  त्यांच्या मतानुसार संध्याकाळी सात नंतर अगदी मिस कॉल द्यावा इतकी पण आमची पात्रता नसल्याने उगाच का एक प्रत खपवा असे असू शकते. 


पण यात गमतीची बाब अशी की " ओ साकी साकी हे पुस्तक मद्य न पिणाऱ्यांना  जास्त उपयोगी आहे.... हे वाचून पिनाऱ्यांना ते काय पीत आहेत. त्याचा शोध कसा लागला. ते कसे प्यावे. आदी अगाध ज्ञान देऊन मागच्या जन्मी आपण लिकर किंग असल्याचे व या जन्मी मल्ल्या ने आपल्या सल्ल्यानेच ब्रँड बनवल्याचे  इम्प्रेशन देता येईल. 

तर असो, 

आम्ही तसे शेजारी शेजारी केबिन मध्ये असल्याने या पुस्तकाच्या एकूणच निर्मितीच्या प्रक्रियेचा सहभागी साक्षीदार मला होता आले. त्याचा पहिला मूळ ड्राफ्ट वाचण्याची संधी मिळण्यासोबतच  व चहा येईपर्यंत अनाहुत  फुकट  सल्ले देण्याचे मनोभावी काम अस्मादिकाने केलेले आहे.  

पुस्तक खरंच वाचण्यासारखे आहे.

- समाधान महाजन 

अण्णा भाऊ साठे यांचे विचार व साहित्य - महादेव खुडे

 अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिम्मित दि १ ऑगस्ट रोजी महादेव खुडे लिखित “अण्णा भाऊ साठे यांचे विचार व साहित्य अलक्षित पैलूंचे आकलन” या पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथे झाले. साधारण १४० -४१ पेजेस असलेल्या या पुस्तकात  नउ प्रकरणात अण्णा भाऊंच्या अशा  पैलूंवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. ज्यांच्याकडे आतापर्यंत पाहिजे तितके लक्ष गेलेले नाही. डॉ. उमेश बगाडे यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना व डॉ. भालचंद्र कानगो यांची पाठराखण या पुस्तकाला लाभली आहे. लोक्वद्न्मय गृहासारख्या दर्जेदार प्रकाशनाकडून हे पुस्तक आलेले आहे.

कुठलीही व्यक्ती समजून घेतांना त्याचा भोवताल व तो काळ समजून घेणे आवश्यक आहे. तो किंवा ती व्यक्ती कुठल्या समाजात जन्माला आली. तिची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक स्थिती कशी होती. ती ज्या काळात जन्माला आली त्या काळातील वातावरण कसे होते या सर्व निकषांवर व्यक्ती पडताळून पाहणे गरजेचे आहे.  नाहीतर अलीकडचे जे वातावरण आहे ते तुकड्या तुकड्यात अर्थ लावण्याचे आहे. ते पण वर्तमानाच्या निकषावर ..मग त्यातून वाद होतात. गैरसमज होतात. ‘बरे झाले इंग्रज आले.......पेशवाई गेली’ यातील पहिलेच वाक्य परत परत सांगितले गेले व  दुसरे दडवून ठेवले गेले तर बोलणारी व्यक्ती इंग्रजांची समर्थक होती असे चित्र उभे राहील पण  वास्तवताः या वाक्यातील तत्कालीन समाजस्थितीचे आकलन केल्यास त्यातील मतितार्थ लक्षात येईल. 

आपसाआपसातील गट तट वाद विसरून कधी नव्हे ते एकत्रित येण्याची व प्रतिकार करण्याची गरज आज तयार झाली आहे. तो आमचा नाही. हा आमचा नाही आमच्यावर जेव्हा केव्हा बोलतील तेव्हा बघू .... हे म्हणत बसण्याचा हा काळ नाही नाहीतर उदारमतवाद, समाजसुधारकांचा महाराष्ट्र,  पुरोगामी महाराष्ट्र हे इतिहासात जमाच होणार नाहीत तर इतिहासातून पण बेदखल होतील. 

जेव्हा सिंह लिहील तेव्हा खरा शिकारीचा इतिहास बाहेर येईल’ अशी एक आफ्रिकन म्हण आहे.  शिकारी इतिहास लिहितांना सावज कसा पकडला या आपल्या पराक्रमाचे गोडवे गात राहील जोपर्यंत सिंह स्वतः आपला इतिहास लिहिणार नाही. अण्णाभाऊ साठे यांचे लिखाण किंवा तमाम दलित साहित्य हा एका अर्थाने सिंहाने लिहिलेला इतिहास आहे. इथे आपल्याकडे भरपूर सिंहासारखे वाघासारखे लोक झालेत. आपल्याला त्यांच कार्य व आदर्श जतन ठेवणेही महाग झाले आहे. 

खुडे यांनी आपल्या पुस्तकात अन्नाभाऊंच्या  साहित्य व्यवहारात सामाजिक रहिवासाचे तीन तळ असतात. असे सांगितले आहे. 

1. जाती समजाचा

2. वासाहतिक काळातील भांडवली स्ठीयान्तारातून घडलेल्या समाजस्थितीचा

3. मार्क्सवादी जीवनदृष्टीचा

हे तीन तळ त्यांच्या एकूणच जीवनाला  आकार देतात.

पहिला तळ

ज्या जातीत त्यांनी जन्म घेतला त्या बाबत माहिती यात आहे. जी बाकीच्यांसाठी नवीन असू शकते. ती एकूणच जातव्यवस्थेवर प्रकाश टाकणारी आहे. गड, वाडे, महाल, विहीर, तलावाच्या बांधकामात मांगांचा जिवंत बळी दिला जायाचा. त्या दगडी तांद्ळ्यांना मांगीर बाबाचे रूप दिले जायचे. कसल्या क्रूर प्रथा पाळल्या जायच्या. ... बांधकाम पक्क काय बळींनी होते काय... त्याशिवाय बांधकाम टिकत नाही का? विदेशात व तत्कालीन युरोपात काय कोणाचा बळी देऊन बांधकाम केलीत का? पण इथे हा प्रकार सुरु होता. 

गड किल्ल्यांचे रक्षण करणार्यांना गुन्हेगारी जातीत टाकले गेले. जे ग्रहण सुटल्यानंतर मागायला येणारी मंडळी असती ते म्हणजे उलटफेऱ्यातून मुक्त करण्याचे – चंद्र, व सूर्य यांना ग्रहानातून मुक्त करण्याची परतफेड म्हणून मोबदला असतो.

मातंग जातीचे पूर्वापार कामे  दोरखंड तयार करणे, वाजंत्री वाजविणे, केरसुण्या, झाडू, रखवाली, साफसफाई इत्यादी यातून बाहेर पडून मूळ प्रवाहात येणे त्या काळी किती अवघड असेल.

काकरी, तेलंगी, रंगीत देसुर्या, ढाल्या बलूर, पेठे, मांग-गारुडी या पोट जाती आहेत किंवा नमस्कारासाठी ते हयात व फुर्मान असे शब्द वापरतात तसेच बसवपुराणाची कहाणी या पुस्तकात दिली आहे जी जातीच्या उत्पत्तीची एक आख्यायिका म्हणून समजून घेणे गरजेचे आहे. अर्थात खुडे याही कहाणीची तर्कवादी मीमांसा करतात.  

बसवपुरानच्या कहाणीनुसार देवांसमोर आव्हान बनलेल्या बसवला (बैलाचे नाव) जांभ ऋषी शांत करतात त्याच्या तीन शिन्गांपैकी एक शिंग काढून घेतात. खच्ची करून शेतीच्या कामाला पाठवतात. संतापलेला बसव शाप देतो. जांभ ऋषींचे वारस मातंग समाजातील असतील असा. याही आख्यायिकाचे विश्लेषण महादेव खुडे यांनी आपल्या पुस्तकात केले आहे.


दुसरा तळ 

वसाहतीक काळात १९२५ च्या कायद्याने मांग जमातीला गुन्हेगारी जमातीच्या यादीत टाकले. पूर्वापार व्यवसाय कमी होत गेले. नोकरी साठी पोटापाण्यासाठी स्थलांतर होत गेले. या सर्वांचा परिणाम अण्णाभाऊ व त्यांच्या काळातील पिढीवर होत होता म्हणून वाटेगाव ते मुंबई हा पायी प्रवास त्यांच्या कुटुंबियांना पायी करावा लागला. १९३०-३१ च्या काळात . मुंबई सारख्या महानगरात जात वर्गीय भान येण्याचा हा काळ होता. वसाहतवादी घटना व निर्णयांनी तसेच कायद्यांनी जातव्यवस्थेवर दूरगामी परिणाम केले. 


तिसरा तळ -मार्क्सवादी जीवनदृष्टी

जातीलढे व वर्गलढे एकत्रित लढण्याची घोषणा सर्वानीच केली. पण यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांच्या कामावर सातत्याने चर्चा झाली तर तर लोकांपर्यंत पोहचेल हा हेतू या लिखाणमागे आहे. असे लेखकाने त्याच्या मनोगतात व्यक्त केले आहे. 

दुखाला वाचा फोडण्यासाठी अण्णाभाऊनी मार्क्सवादासारखे शास्रीय हत्यार वापरले. मार्क्सने समाज समजून घेण्यासाठी अर्थशास्राचा पहिल्यांदाच वापर केला. पण मुळात मार्क्सवाद येथील जनतेला पचनी न पडण्याचे कारण वर्गव्यवस्थेपेक्षा येथे भक्कम असलेली जात व्यवस्था. ती समजून घ्यायला मार्क्सवाद कमी पडला असे म्हणावे लागेल. त्यामुळे या पुस्तकात विधान येते कि, “भारतातील जातीप्रश्नांकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टीकोनामुळे कम्युनिस्ट चळवळीला मोठी किंमत मोजावी लागली.”

every personal is political हे  फेमीनिझमच्या काळात उदयास आले. If you write more and more personal it becomes more universal असे म्हटले जाते. पण शेवटी दलित साहित्य म्हणजे तरी काय? ते पर्सनल तितकेच युनिवर्सल व पोलिटिकल आहे. म्हणून मग  अण्णा भाऊंचे साहित्य वर्गीय ? जातीयवादी? मानवतावादी? निव्वळ वास्तववादी? असे प्रश्न विचारून खुडे अण्णा भाऊंच्या साहित्याच्या वैश्विक जाणीवा विषद करतात. 

अन्तोनिया ग्रामशी  या राजकीय तत्ववेत्त्याने मांडलेल्या सिद्धांतानुसार सांस्कृतिक क्षेत्र आर्थिक सामाजिक घटकांना समांतर असते असे मत मांडले. मुळात अर्थव्यवस्था ज्याच्या ताब्यात असते त्याच्या सांस्कृतिक व चालीरीती अशा बाबींचा प्रभाव विस्तृत प्रभाव बाकी समाजावर पडतो. वसाहतवादी इंग्रज लोकांच्या संस्कृतीचा प्रभाव म्हणून जगभर पडतो व शीतयुद्धानंतर अमेरिकन संस्कृतीचा पडतो त्याला कारण ग्रामशी याने मांडलेले हेगेमनीचे तत्व. 

अण्णाभाऊवर मक्झीम गॉर्कीच्या साहित्याचा प्रभाव होता. त्यांचा एक छोटा पुतळावजा मूर्ती अण्णांच्या स्टडी टेबलवर ठेवलेली असायची. अनेक जन त्यांना मराठीतील गॉर्की असेही म्हणतात.  जग बदल घालूनी घाव | सांगुनी गेले मला भीमराव” असे म्हणणाऱ्या अण्णा भाऊंना अखेरच्या कालखंडात अनेक अपप्रचार करून  सत्ताधाऱ्यांनी तसेच काही लोकांनी प्रस्तुत केले. या अपप्रचाराला विरोध करण्याचे काम चळवळळीकडून झाले नाही. याचा समाचार या पुस्तकात घेण्यात आला आहे.  आजही असे अपप्रचार आहेत याला त्याच भाषेत संस्थात्मक चळवळीतून उत्तर मिळाले पाहिजे. हि शेवटची शोकांतिका फक्त अण्णाभाऊचीच झाली असे नाही तर वामनदादा कर्डक, साने गुरुजी यांना देखील तेच अनुभव आले. येथे व्यक्तीपेक्षा पक्षाची ध्येयधोरणे देखील चुकीची होती यावर खुडे भर देतात. 

प्रस्तुत पुस्तकात अण्णाभाऊचे भाऊ कॉम्रेड शंकर भाऊ साठे यांच्यावर देखील स्वतंत्र प्रकरण आहे.  १२ कादंबऱ्या लिहिणाऱ्या शंकर भाऊ यांचा पत्री सरकारशी सबंध होता. १९८० साली पहिल्यांदा अण्णाभाऊवरील चरित्र प्रकाशित झाले.  

संयुक्त महाराष्ट्र चळवळ च्या काळात लाल बावटा कलापथकाची स्थापना  शाहिर गव्हाणकर, शाहीर अमर शेख, अनाभाऊ यांनी केली होती. माझी मैना गावावर राहिली. या प्रसिद्ध छक्कडचि निर्मिती अण्णाभाऊंनी याच काळात केली होती.  तमाशाचे लोकनाट्य हे नामकरण देखील  अन्नाभाऊंनी केले होते. 

या आधी मी अण्णा भाऊ यांच्यावर बरेच सारे वृत्तपत्रीय व मासिकातील अनेक लेख वाचले पण एक-दोन चांगली पुस्तके देखील  वाचली होती- त्यात नांदेड हून पी. विठ्ठल व डॉ. राजेश्वर यांनी लिहिलेले जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे तसेच विश्वास पाटील यांनी लिहिलेले अण्णाभाऊची दर्दभरी दास्तान यांचा समावेश होता. 

त्यांनी हे पुस्तक कॉम्रेड जयवंताबाई यांना अर्पण केले आहे. हे अजून एक विशेष. अण्णाभाऊ साठे यांच्या दुसऱ्या पत्नी जयवंता होते. बऱ्याचदा अशा घटनांमध्ये त्या दुसऱ्या स्रीवर बर्यापैकी अन्याय होतो. पण त्यातील अनेक आरोपांचा परखड समाचार महादेव खुडे यांनी एका स्वतंत्र प्रकरणातच घेतलेला आहे. 

शरद पाटील यांनी अण्णाभाऊच्या फकीराची व त्यांच्या साहित्याची  समीक्षा चिकित्सा केली. त्याचीही परखड तपासणी खुडे यांनी करून त्यातील दोष सांगितले आहेत.

तमाशा व शाहिरी परंपरांचा आढावा घेतला आहे.

तसेच अण्णा भाऊंच्या विचार व साहित्याचे आजच्या काळातील महत्व यावर देखील भाष्य केले आहे. एकूणच अण्णा भाऊवर जी पुस्तके लिहिली गेली आहेत त्यातील हे एक महत्वाचे दुर्लक्षित न करण्यासारखे व काळाने नोंद घ्यावी असे हे पुस्तक आहे असे मला वाटते. 

-    समाधान महाजन

   






ना. धो. महानोर असतांनाची गोष्ट

 

ना. धो. महानोर असतांनाची गोष्ट
काहीही काम नसलेले व अख्खा दिवस अंगावर येणारे ते दिवस होते. शिक्षण व नोकरी याच्या मधला तो काळ. उद्याचा येणारा दिवस काहीतरी चांगली बातमी घेऊन येईल या आशेवर रात्र जायची. जिथे होतो अर्थात वडिलांच्या नोकरीच्या जागी. मुक्ताईनगर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जोंधनखेडा भागात आम्ही तेव्हा राहत होतो. तिथे वडिलांनी धडपड करून घरासाठी  पेपर सुरु केला होता. तो घेऊन एक कुलकर्णी नामक एक माणूस कुऱ्ह्यावरून सायकलवरून यायचा. अर्थात दोन वेळेस येणारी एस टी सोडली कि जाण्यायेण्यासाठी दुसरे काही साधन नव्हते. आमच्याकडे तर सायकल पण नव्हती. अर्थात आजूबाजूला पण सारखीच परिस्थिती होती.  तो पेपरवाला येतांना दुरून दिसला तरी आनंद वाटायचा. पेपर वाचतांना त्याला येणारा तो नवा कोरा वास काही काळ प्रसन्न करून जायचा. 

असेच एक दिवस तो पेपर घेऊन आला. त्या पेपरचा नूर काहीतरी वेगळा होता. पानझड या काव्यसंग्रहाबद्दल ना.धो. महानोर या कवीला साहित्य अकादमी मिळाल्याची ती बातमी होती. पण त्या संग्रहाचे मुखपृष्ठ त्या कवीचा फोटो त्याची माहिती, सोबत कवितेच्या ओळी असा भरगच मजकूर असलेल्या त्या दिवशीच्या वृत्तपत्राने मनावर मोठा परिणाम केला. पेपरचे ते पहिले पान आजही माझ्या लक्षात आहे. त्यानंतरच्या बरेच दिवस त्या बाबतीत बातम्या येत होत्या. ते सर्व एकदम आवडायला लागले. जळगावला कवींचा मोठा भव्य नागरी सत्कार होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. जळगाव नगरी जणू महानोर यांच्या स्वागतासाठी सज्ज झाल्याचे चित्र डोळ्यापुढे येऊ लागले. 

तेव्हा आमच्या घरात एक रेडीओ होता. त्यावरून जळगाव आकाशवाणी वरून महानोर यांच्या कविता. त्यांची चित्रपटातील गाणी, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या विषयी इतरांच्या मुलाखती असे सारे सारखे सुरु होते. चिंब पावसाने रान झाले आबादानी, जांभूळ पिकल्या झाडाखाली किंवा जैत रे जैत हे सर्व मी पहिल्यांदाच ऐकत होतो. आणि नुसते ऐकत व वाचत नव्हतो ते पार मनात कुठेतरी भिडत होते. ना. धो महानोर नामक कवीचा हा माझा पहिलाच परिचय किंबहुना मराठी साहित्यातील कवीचा देखील तो असा थेट पहिलाच प्रभाव. त्या आधी कवी फक्त शाळेतील अभ्यासक्रमापुरतेच मर्यादित जगातले माहिती होते. 

या सर्व प्रसंगानंतर व प्रभावामुळे मी चक्क कविता लिहिण्याचा प्रयत्न सुरु केला. त्या आधी लिहिलेले ते शाळा कॉलेजातील. निबंध स्पर्धेत चांगला नंबर यायचा. अवांतर वाचनामुळे भाषेवर सोबतच्या इतरांपेक्षा जास्त कमांड असल्याचा कॉन्फिडन्स होता. आपण लिहू शकतो हे माहिती होते पण कविता मात्र कधी लिहिली नाही. आयुष्यातील त्या टप्प्यावर ना.धो महानोर यांच्यावरील त्या बातम्यांच्या प्रभावात मात्र मी कवितेकडे वळलो. 

आज वयाच्या ८१ व्या वर्षी दादांचे निधन झाल्याचे कळले आणि हे सर्व अगदी लक्खन डोळ्यापुढे उभे राहिले. माझ्या कविता लिहिण्याची प्रेरणाच मुळी महानोर यांच्या कवितेमुळे निर्माण झाली होती. अर्थात लिहिण्यातील विषय व जातकुळी हि अगदीच भिन्न असल्याचे कालांतराने समजले पण कवितेची बाराखडी मात्र महानोर यांच्या कविता वाचूनच शिकलो हे मी विसरू शकत नाही. तेव्हा आम्ही राहत असलेला परिसर अगदीच निसर्गरम्य ... महानोर यांच्या ज्या कविता पेपरमधून वाचल्या व रेडीओवरून ऐकल्या त्या निसर्गावरील जास्त होत्या म्हणून मग तसलाच काही प्रयोग करत मी कवितेच्या ओळी लिहू लागलो. डोंगर, नदी. शेती, कपाशी, तूर, पळस असे जे जे काही आजूबाजूला दिसत असे त्यावर मी कविता लिहू लागलो. त्या अगदीच बाळबोध होत्या. जसे दिसतेय तसे लिहिण्याचा अट्टाहास होता तो. पण मग कविता या फॉर्मबद्दल काहीही माहिती नसतांना... व मनात अनेक संभ्रम असतांना ओळी लिहिता यायला लागल्या हे भारी वाटायचे. शेजारी वडिलांच्या शाळेतील चौधरी सर राहायचे त्यांना हे सर्व आवडायचे. त्यांना जाऊन मी लिहिलेल्या कविता दाखवायचो. ते कौतुकाने छान म्हणायचे. अजून मस्त वाटायचे. अशाच चाळीस पन्नास कविता लिहून काढल्या. 

एक दिवस मनात आले जळगाव ला जाऊन कवी महानोर यांना भेटू. वडिलांना सांगितले. त्यांनीही परवानगी दिली. जोंधनखेडा, कुऱ्हा काकोडा, मुक्ताईनगर, भुसावळ जळगाव असे करत जळगाव पोहचलो. इथे आलो पण कवी कुठे राहतात हे माहिती नव्हते. कसे शोधायचे?  तेव्हा जळगावातील एकही जन ओळखीचे नव्हते. पण मी त्यांना भेटल्याशिवाय मात्र जाणार नव्हतो. अशा वेळी माझे डोके अगदी स्पीडने चालायाचे. ज्या मुळे मला महानोर कळले तो पेपर मी विकत घेतला त्यातील नंबर वर std वरून फोन लावला. त्यांना सांगितले कि मला महानोर यांच्या घरी जायचे आहे मला त्यांचा पत्ता द्या. त्यासाठी तीन चार लोकांशी फोनवर बोलावे लागले. त्यांनी मला त्यांचा landline दिला. त्या नंबर वर कॉल करून मी महानोर दादा घरी असल्याची खात्री केली व त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर पायीच निघालो. तेव्हा जळगाव माझ्यासाठी खूप मोठे शहर होते. कसाबसा घरी पोहचलो तेव्हा मी प्रवासाने व  चालून थकलो होतो.  पण महानोर दादांना पाहताच माझा थकवा पळून गेला. मी त्यांच्याशी काय बोललो ते आता  सर्व आठवत नाही पण बराच वेळ गेल्यासारखे वाटले. त्यांनी आस्थेने विचारपूस केली. काय करतोस? कुठून आलास? वडील काय करतात? कवितेविषयी काही बोलले. चहा पाजला. परत काहीतरी त्यांनी सांगितले. त्यांचा पाया पडून मी त्यांचा निरोप घेतला तेव्हा मोठ्या कवी  माणसाला भेटल्यामुळे मलाही मोठे झाल्यासारखे वाटत होते. आपण काहीतरी मोठे कार्य केल्यासारखे फील येत होते. 

मध्यंतरी बराच काळ गेला. मग मी शिक्षक म्हणून परभणीत रुजू झालो. mpsc/upsc चा अभ्यास सुरु झाला. optional म्हणून मराठी साहित्य हा विषय घ्यावा कि काय असा विचार करू लागलो. जिंतूरला असतांना कविवर्य इंद्रजीत भालेराव सरांची भेट झाली. त्यांच्या सहवासाने पुन्हा एकदा खंडित झालेला कवितेचा झरा पुन्हा वाहू लागला. महानोर यांच्या कविता मनात घेऊन आलो असतांना भालेराव यांच्या कवितांची ओळख झाली. त्यांच्या पीकपाणी कवितेच्या ओळी त्यातील शब्दकळा आकर्षित करू लागल्या. शिक्षकाचा पगार सुरु झालेला होता. भीत भीत अर्थात परवडेल कि नाही या भीतीने काही पुस्तके विकत घेऊ लागलो. एकदा असेच औरंगाबादला स्पर्धा परीक्षांची पुस्तके घ्यायला आलो असतांना एका ठिकाणी साहित्यिक पुस्तके असल्याचे दिसले. तेथून पानझड, रानातल्या कविता, अजंठा असे महानोर यांच्या तीन चार कवितांची पुस्तके विकत घेतली. पुढे अनेक दिवस ती पुस्तके माझ्या सोबत असायची. रात्री झोपतांना. अभ्यास करून बोर झाले कि मी महानोर यांच्या कवितांच्या आश्रयाला जायचो....

“मीच माझा एकटा एककल्ली चालत गेलो

अन आडवाटेने पिसाटाच्यापरी बेहोश झालो..... “ 

हि कविता व या ओळी मी अनेकदा वाचायाचो. माझ्या अभ्यासाच्या प्रवासात मी एकटा होतो. तेव्हा या ओळी मला प्रेरणा द्यायच्या. 

मुख्य परीक्षेच्या दीर्घोत्तरी उत्तरांमध्ये त्यांच्या काही कवितेच्या ओळी मी वापरायचो त्यात 

“ या नभाने या भुईला दान द्यावे “ या ओळी मी हमखास घुसवायचो. संदर्भ असो वा नसो. कुठे न कुठे त्या फिट बसवायचो. कारण एकच- त्या कविता आवडायच्या इतकेच.  

नंतर असेच एकदा दिवाळीच्या सुट्टीत गावाकडे आलेलो होतो. तेव्हा परत एकदा वाटले कि कवींना भेटावे. त्यांच्या तेव्हाच्या नंबरवर फोन लावला तर समजले कि ते जळगाव येथे नाही त्यांच्या मूळ गावी पळसखेड येथे गेले आहेत. एव्हाना वाचन बरेच वाढलेले असल्याने पळसखेडबद्दल देखील बरेच काही वाचण्यात आले. साक्षात यशवंतराव चव्हाण, लता मंगेशकर सारख्या प्रभूती त्या ठिकाणी महानोर यांच्या घरी राहिलेले होते. मग म्हटले अशा ऐतिहासिक स्थळाला आपण जाऊ या. दादांची फोनवरून परवानगी घेतली. त्यांनी सांगितलेला पत्ता लिहून घेतला. डोक्यात फक्त कवींना भेटणे व त्यांच्याशी बोलणे इतकेच होते. झाले मुख्य रस्त्यावर उतरलो आणि पायी पायी आपले निघालो एक दोन ठिकाणी रस्ता बरोबर असल्याची खात्री केली आणि काही वेळाने दादांच्या शेतात पोहचलो. तिथे सीताफळाची गाडी भरत असल्याचे दिसले. शेती, पिके, गवत, पानी या सर्वांचा संमिश्र वास त्या ठिकाणी होता. दादा भेटले. खूप वेळ बोलणे झाले. त्यांना मी जळगावला झालेल्या भेटीची आठवण दिली. इतकी लोक भेटायला तेव्हा यायचे दादा तरी किती लक्षात ठेवतील. यावेळी मात्र मनसोक्त गप्पा मारल्या. ग्रेस पासून तर यशवंतराव चव्हाण, शरद पवार, लता मंगेशकर, हृदयनाथ, पुणे मुंबई तर भरपूर असे काही दादा बोलत होते मी मध्ये मध्ये प्रश्न विचारत होतो. त्या प्रत्येकाचे ते उत्तर देत होते. त्यांनी स्वतः फिरून घरातील फोटो सर्व पुस्तकांचा संग्रह दाखविला. तेथून शेतमाल घेऊन जाणाऱ्या गाडीत त्यांनी माझी जाण्याची व्यवस्था देखील केली. माझे परत पायी जाण्याचे कष्ट वाचले. महानोर दादांची हि प्रत्येक्ष शेवटची भेट ठरली. त्यानंतर अधिकारी म्हणून निवड झाल्यावर दादांना आवर्जुन फोन करून आनंदाची बातमी दिली. यावेळी मात्र त्यांनी ओळखले. शुभेच्छा दिल्या. जळगावला कधी आलास तर नक्की भेट म्हणून सांगितले..... 

आणि आज दादा गेल्याची बातमी समजली...

देहाचे वय होते. दादांच्या कविता वयापलीकडील आहेत. कायम तारुण्यात राहणाऱ्या आहेत. आपल्याला जिवंत व तरुण ठेवणाऱ्या आहेत. माझ्या कवितांची सुरुवात दादांमुळे झाली व त्यातून अनेक कवी कविता वाचण्यात आले. माझ्या काव्यकक्षा रुंदावण्यात कवी ना.धो.महानोर या कवीचा सिंहाचा वाटा आहे. 

- समाधान महाजन